"काबूल, मै तूझे कबूल, तू मुझे कबूल"
***********************************
१५ ऑगस्ट २०२१, आपल्या देशात स्वातंत्र्य दिन साजरा होत असतांनाच काबूल वर क्रुर तालिबान्यांनी आपल्या विजयाचे काळेपांढरे निशाण फडकवले होते. अर्थातच बायडन सैन्याने आपला बाडबिस्तरा गुंडाळून तलवारी म्यान केल्याने तालिबान्यांचे आयतेच फावले होते. याचेच दुष्परिणाम म्हणून पुन्हा एकदा तालिबान्यांचे भुत जगाच्या मानगुटीवर बसले आहे. खरेतर हा अफगाणिस्तानचा अंतर्गत मामला, मात्र आपल्या देशातील तालिबान्यांच्या हमदर्दींना अचानक हर्षवायू झाल्याचे दिसत आहे. यातच जेष्ठ सिनेकलावंत नसीरुद्दीन शहा यांनी याच टोळक्यांचे कान टोचून एक सुखद धक्का दिला आहे.
वास्तविकत: याच नसीरुद्दीन शहांनी यापुर्वी या देशात राहायची भिती वाटते, डर का माहौल है अशा वल्गना केल्या होत्या. मात्र काळापरत्वे त्यांच्या मानसिकतेत हा बदल का झाला असावा हे सांगणे कठीण आहे. कदाचित २०१९ पासून केंद्रात अमित शाह निती लागू झाल्याने नसीरुद्दीन शहा सारख्यांना शहाणपण आले असावे. किंबहुना तालिबान्यांनी आपली मध्ययुगीन रानटी संस्कृती, पाशवी कायदे आणि अधम प्रवृत्तीचे जे हिडीस प्रदर्शन केले आहे ते पाहता इथली डर पलटण गर्भगळीत झालेली दिसते.
तालिबान्यांना मात्र मानावेच लागेल. अत्याचार करतांना त्यांनी जे सर्वधर्मसमभाव, सर्वसमावेशकतेचे धोरण राबवले, त्याला तोड नाही. धर्म कोणताही असो, स्त्री,पुरुष,बालक असा भेदाभेद न करता आणि स्वदेशी विदेशीची गफलत न करता जे सरसकट मृत्युतांडव चालवले आहे ते पाहता आपला देश कित्येकांना स्वर्गासमान भासू लागला आहे. इतके सर्व सुर्यप्रकाशासारखे स्वच्छ आणि स्पष्ट असतांनाही इथल्या काही माथेफिरुंना आणि ढोंगी पुरोगाम्यांना तालिबानचा पुळका आल्याचे दिसत आहे. काय म्हणे तर तालिबान्यांनी चक्क पत्रकार परिषद घेतली. खरेतर तालिबान्यांचा हा सौ सौ चुहे खाके बिल्ली,,चा प्रकार आहे.
निश्चितच ज्यांना तालिबानशी चुंबाचुंबी करायची आहे किंवा रोटी बेटी व्यवहार करायचे आहे त्यांनी ते जरूर करावे. किंबहुना ज्यांना तालिबान प्रेमाचे भरते आले आहे त्यांनी काबूलला जाऊन मै तूझे कबूल तू मुझे कबूल म्हणत चौकाचौकात फेर धरावा. राष्ट्रप्रेमी जनता अशा महाभागांना अफगाण सिमेपर्यंत स्वखर्चाने नक्कीच सोडून देईल. एवढेंच नव्हे तर तिथे जाऊन तालिबान दर्दींनी हवे तेवढी शांततेची कबुतरे आणि धर्मनिरपेक्षतेचे तितर बटेर उडवावेत. वाटल्यास तालिबान उदयाच्या आनंदसोहळ्यासाठी त्यांनी उंटावरून साखर किंवा खजूर जरूर वाटावेत.
मात्र असे करतांना भारतभूमी आणि इथल्या संस्कृतीवर उगाचंच पिचकाऱ्या मारू नयेत. तालिबान्यांशी इथल्या संस्कृतीची तुलना करून ते महापातक करत आहे. दुर्देवाने यात शिकले सवरलेलेच अग्रभागी आहेत. मग ते मुनव्वर राणा सारखे काबूली चने असो की काही लखनवी टुंडे कबाब असो. काही नररत्नांनी तर तालिबान्यांची तुलना स्वातंत्र्य सैनिकांशी करुन आपल्या अकलेची दिवाळखोरी जाहीर केली आहे. जेएनयु छाप मर्कटांच्या अजब तर्कटानुसार त्यांना दिल्लीचे काबूल कधी होईल याची दिवास्वप्ने पडू लागली आहेत. मात्र इथे आता अयोध्या पॅटर्न सुरू झाला असल्याने त्यांचे दुष्ट मनसुबे पुर्ण होणार नाहीत.
मुख्य म्हणजे कोरोना झाल्याने शरिरातील ऑक्सिजनची पातळी कमी होऊन अस्वस्थ वाटते. मात्र २०१४ पासून काहींना विनाकारण अस्वस्थ वाटत आहे. मग ते नजराणे, बिदागीला आसुसलेली मिडीया असो अथवा पुरस्कारजीवी विचारवंत असोत. दोन्हींचे हुक्कापाणी बंद झाल्याने तालिबान संकटातही ते देशासोबत खंबिरपणे उभे राहायला तयार नाहीत. उलट तालिबानची वकीली करण्यात ते धन्यता मानत आहेत. नशिब समजा की केंद्रात खंबीर सरकार असल्याने या देशाच्या सिमा अफगाण टोळधाडींसाठी उघडल्या नाहीत. अन्यथा या देशाला जागतिक धर्मशाळा होण्यापासून कोणीही वाचवू शकले नसते.
निश्चितच या पार्श्वभूमीवर नसीरुद्दीन शहांच्या विधानाचे कौतुक करायला हवे. तालिबान्यांची निती आणि नियती एवढ्या स्पष्टपणे सांगितल्याबद्दल त्यांना धन्यवाद द्यायला हवेत. बरे झाले तालिबानचा खरा चेहरा जगासमोर आला आणि नसीरुद्दीन सारखे कलाकार ताली से नही साहब, तालिबान से डर लगता है म्हणू लागले. अन्यथा इथल्या तालिबान दर्दींनी केंव्हाचेच तालिबान से ताल मिला म्हणत नाचणे सुरू केले होते. अर्थातच सीएए सारख्या कायद्यांचे महत्व याप्रसंगी अधोरेखित होते. सोबतच आणखी एका भुभागातून हिंदू आणि हिंदू संस्कृतीचे उच्चाटन झाले याची योग्य ती दखल घेणे ही काळाची गरज आहे.
************************************
दि. ०३ ऑगस्ट २०२१
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++++
No comments:
Post a Comment