@#😈😈😈😈😈😈😈😈#@
*अगंबाई अरेच्चा*
*ओव्हलवर इंग्लंडचं वाट्टोळं*
*************************************
भारत आणि इंग्लंड दरम्यानची कसोटी मालिका रंगतदार अवस्थेत आली असून चौथी कसोटी जिंकून भारताने २/१ अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंडला चिवटपणे झुंजवत टीम इंडियाने जो रुटच्या संघाचा जोरदार पराभव केला आहे. पहिल्या डावात गटांगळ्या खाऊनही भारतीय संघाने दुसऱ्या डावात फिनिक्स पक्षासारखी भरारी मारली आणि इथेच इंग्लंडच्या पराभवाची बीजे रोवली गेली होती. स्विंग,सिम आणि वेगवान गोलंदाजी ही इंग्लंडची अस्त्रे इंग्लंडवरच उलटवून टीम इंडियाने ओव्हलवर इंग्लंडचं वाट्टोळं केलं आहे.
खरेतर टीम इंडियाच्या इंग्लंड दौऱ्यात प्रथमा ग्रासे माक्षिकापात झाला होता. जागतिक कसोटी स्पर्धेत न्युझीलंड संघाने भारतीय संघाला धूळ चारली होती. या धक्क्यातून सावरत भारतीय संघाने पहिली कसोटी जवळपास जिंकल्यातच जमा केली होती. मात्र ऐनवेळी वरुणराजा इंग्लंडच्या मदतीला धावला आणि हातातोंडाशी आलेल्या विजयाच्या घासाला भारतीय संघ मुकला होता. याची परतफेड करण्याची नामी संधी लॉर्ड्स वर होती आणि भारतीय संघाने ती व्याजासकट वसूल केली होती. याच सामन्यात भारताला शार्दूल नावाचा एक नवा मसिहा गवसला होता. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात त्याप्रमाणे शार्दूलच्या अष्टपैलूत्वाने क्रिकेट पंडीतांचे लक्ष वेधले होते.
दुर्देवाने हेडींग्ले कसोटीत इंग्लंडचा तोफखाना धडाडला आणि भारतीय संघ भुईसपाट झाला होता. लॉर्ड्सचा बदला घेऊन इंग्लंडने मालिकेत बरोबरी साधली होती. शिवाय त्यांनी हेडींग्लेत भारतीय संघाचे विमान क्रॅश लॅंडींग केल्याने चौथा सामना आरपारचा होणार यात वाद नव्हता. यातच पहिल्या डावात फलंदाजांनी पुन्हा एकदा हाराकिरी केल्याने हेडींग्लेची पुनरावृत्ती होते की काय अशी शंका उपस्थित झाली होती. मात्र यावेळी कहानीत ट्वीस्ट बाकी होते. ॲंडरसन ॲंड कंपनी भारतीय फलंदाजांना है कोई माईका लाल अशी चिथावनी देत असतांनाच शार्दूलने मैदान सांभाळले आणि खेळाचा नुर पालटला.
ॲंडरसनची गब्बर कंपनी ठाकूरला पाहून जो डर गया वो मर गया करत असतांनाच शार्दूलनेही डर के आगे जीत है हे दाखवून दिले. इंग्लिश गोलंदाज आग ओकत असतांनाच चेंडू मात्र शार्दूलच्या बॅटवर फिदा झाला होता. आग आगीवर झाली फिदा म्हणतात ते यापेक्षा वेगळे काय असू शकते. इंग्लंडच्या नाकावर टिच्चून शार्दूल ने घणाघाती अर्धशतक ठोकले आणि इंग्लंडची पाठ कशी शेकायची असते याचा धडा सर्वांसमोर मांडला. मग याचाच फायदा भारतीय संघाला दुसऱ्यांदा फलंदाजी करताना झाला.
इंग्लंडने ही आपला दमखम दाखवत पहिल्या डावात शतकी आघाडी घेतली. खरेतर यामुळे जो रुट निश्चिंत झाला होता. मात्र यावेळी विराट ॲंड कंपनी जो रुटचे मनसुबे उधळण्यास आतुर होती. त्यातच रोहीतने बलदंड फलंदाजी करत धावांचा चारमिनार उभा करण्याचा पाया रचला. त्याला पुजारा, पंत, शार्दूल ने कळस चढवला. पहिल्या डावाची उधारी चुकवत भारताने जवळपास ३७० ची आघाडी घेतली होती. मात्र ३७० चे आव्हान केवळ मोदी,शाहची जोडीच मोडून काढू शकते हे सर्वांना माहीत होते.
अखेर ६ सप्टेंबर चा दिवस उजाडला आणि भारतीय संघ विजयाचा एक नवा अध्याय लिहायला तयार झाला. इंग्लंडरूपी राक्षसाचे प्राण जो रुट नावाच्या पोपटात दडले होते. तसेही जो रुट इज दी रुट कॉज ऑफ इंग्लंड्स सक्सेस हे वेगळे सांगायची गरज नव्हती. बमराह, शार्दूल, सिराज आणि जडेजा सहित उमेश यादवची अग्निपरीक्षा होती. मात्र या अग्निपरीक्षेत सिराज वगळता सर्वांनी बळी घेतले. शंभरी गाठेपर्यंत निश्चिंत असलेला इंग्लंड संघ शार्दूल ने बोहणी करुन देताच ढेपाळू लागला. त्यातच जडेजाची जादू आणि बुमराहच्या तिखट माऱ्याने इंग्लंडचे सालटे निघाले होते.
तरी पण खेळपट्टीवर जो रुट पाय रोवून उभा ठाकल्याने भारतीय संघ चिंतातूर होता. तसे पाहता जो बायडेनने अफगाण सोडताना जी तत्परता दाखवली त्यापेक्षा कैकपटीने जो रूट सामन्यात संयम दाखवत होता. भारतीय गोलंदाजांनी आतापर्यंत कित्येकदा जो रुट ला जो जो रे बाळा म्हणून झोपवण्याचा प्रयत्न केला. मात्र हट्टी,जिद्दी बाळाप्रमाणे तो शतके रचत भारतीय गोलंदाजांना रडवत आला होता. अखेर ठाकूरने त्याचा अडसर दूर करताच भारतीय चाहत्यांचा जीव भांड्यात पडला.
या सामन्यात जितके शार्दूल चे कौतुक करावे तितकेच रहाणेचे अपयश चिंताजनक आहे. अजिंक्य, एवढा गुणी फलंदाज मात्र आत्मविश्वास हरवल्याने त्याची कामगिरी ढासळली आहे. बुद्धीमत्तेला आत्मविश्वासाची जोड न लाभल्याने त्याची कारकीर्द काळवंडत आहे. जिथे आपले तळाचे फलंदाज इंग्लिश गोलंदाजांवर तुटून पडत आहे तिथे अजिंक्य गळपटून बसला आहे. त्याची बॅट आणि त्याच्या धावांत इतके सोशल डिस्टंसींग आहे की तो कोरोना बचावाचा ब्रॅण्ड ॲम्बेसेडर शोभून दिसतो. खेळपट्टीवर त्याचे दचकणे, दांदरणे, अडखळणे पाहून एखादी नवविवाहिता खाष्ट सासू समोर उभी आहे की काय असा भास होतो. या प्रकारचा अजिंक्य भारतीय संघात राहणे, संघाच्या अजिबात हिताचे नाही. याच कारणाने अजिंक्य वन-डे, टी ट्वेंटी, एवढेच नव्हे तर आयपीएल मध्येही आपली पत गमावून बसला आहे. एखादी मोठी खेळी करायची आणि त्याच्या व्याजावर नंतर पाच-सहा सामने सडवायचे, या दुष्टचक्रातून तो जेवढा लवकर बाहेर पडेल तेवढं ते त्यांच्यासाठी, संघासाठी उपयुक्त ठरेल.
एक मात्र खरे, पराभवाचा दणका बसुनही टीम इंडियाने मुसंडी मारत इंग्लंडला नामोहरम केले आहे. ओव्हलवर ५० वर्षांनी पुन्हा एकदा आपला झेंडा फडकवून भारतीयांना सुखद धक्का दिला आहे. राहुल रोहीतची आश्वासक सुरूवात, पुजारा विराट आणि पंतच्या उपयुक्त खेळींना शार्दूलच्या व्हायग्रा बॅटींगची साथ महत्वाची ठरली. सोबतच बुमराहला उमेश यादवची भेदक तर शार्दूल ची चमत्कारिक गोलंदाजी भक्कम साथ देऊन गेली. इंग्लंडतर्फे निश्चितच ॲंडरसन ॲंड कंपनीने सदाबहार गोलंदाजी केली. मात्र दुसऱ्या डावात त्यांनी लय गमावली आणि तिथेच सामन्याचे पारडे भारताकडे फिरले.
शेवटच्या दिवशी भारतीय माऱ्यात इंग्लंडचे जहाज भरकटले होते. जो रूट सारखा निष्णात नावाड्या सुद्धा इंग्लंडची नाव पैलतीरावर नेऊ शकला नाही. इंग्लंडचा अतिआत्मविश्वास तर भारताचा जबर आत्मविश्वास हाच या कसोटीची कहानी लिहून गेला. तर फलंदाजी आणि गोलंदाजीत शार्दूल ची ठाकूरकी पाहता जो संकटकाळी कामी येतो तोच खरा शार्दूल हा नवीन वाक्प्रचार येत्या काळात पुढे येऊ शकतो. सोबतच घर घरसे शार्दूल निकलेगा अशा घोषणा लंडनमध्ये ऐकायला आल्यास नवल वाटायला नको.
************************************
दि. ०७ सप्टेंबर २०२१
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
No comments:
Post a Comment