Monday, November 1, 2021

"क्रूझायण" अंतिम भाग

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
            *"क्रूझायण", अंतिम भाग*
                *डॉ अनिल पावशेकर*
************************************
भारत पाक सामन्यात भारतीय संघाचा भुरका झाल्याने आम्ही खिन्न मनाने आपल्या रुमकडे परतत होतो. जेवनाची इच्छाच मरून गेली होती. भारतीय संघ इतक्या वाईट पध्दतीने हरल्याने अन्न कसे काय गोड लागणार हा प्रश्नच होता. मात्र कर्णमधुर, मादक आवाजातली एक घोषणा ऐकताच आमचे कान टवकारले गेले. अंगाअंगात रोमांच उभे राहिले. जणुकाही गंगास्नानाचे पुण्य लाभल्याची मनात भावना निर्माण झाली. मित्रमंडळींच्या डोळ्यात एक आश्वासक चमक दिसू लागली होती. "अंत भला तो सब भला" म्हणून सर्व आनंदाने गलबलून गेले होते. "जिसे ढुंढा गली गली, वो तो यहीं मिली" चे समाधानी भाव सर्वांच्या चेहऱ्यावर उमटले होते. केवळ आम्हीच कशाला क्रूझमधील बहुतांशी व्यक्ती "पाऊले चालती थिऐटरची वाट" चे वारकरी झाले होती. कारण ती घोषणा खऱ्या अर्थाने सर्वधर्मसमभाव मानणारी होती. एखाद्या सार्वजनिक विषयावर क्षणार्धात एवढे एकमत तुम्हाला कधीच आढळणार नाही. 

ती घोषणा होती ऐटीन प्लस शो (ॲडल्ट शो) ची. अर्थातच सजीव म्हटले की लैंगिकता,वासना ही नैसर्गिक भावना कोणालाच चुकली नाही. याउलट तुम्ही जितके याचा बाऊ कराल, तितकी ती भावना तुमच्या मानगुटीवर बसेल. मात्र यातील संकल्पना आणि मर्यादा याचे निश्चित असे मापदंड नक्कीच नाही किंवा ते कोणीही आखू शकत नाही. मा.न्यायालयाने ३७७,४९७ आदी कलमांचा पुनर्विचार केल्याने कित्येकांना मोकळे रान मिळाले आहे.सोबतच लिव्ह इन रिलेशनशिपचे पिल्लू सोडल्याने "मै चाहे ये करू, मै चाहें वो करु, मेरी मर्जी" अशी भावना वाढीस लागली आहे. तरीपण संस्कार, नैतिकता, प्रामाणिकता आणि स्वैराचार यात लक्ष्मणरेषा असते. याचे पालन नाही केले तर "रेखाओंका खेल है मुकद्दर, रेखाओंसे मात खा रहे हो" अशी अवस्था होऊ शकते.

अर्थातच वयस्करांची या शो साठी लगबग पाहून मानव प्रगत जरी झाला तरी तो मुळात प्राणीच आहे यावर शिक्कामोर्तब झाले. लगेच आम्ही पण फार आढेवेढे न घेता थिएटरमध्ये दाखल झालो. खरेतर कार्डेलिया एम्प्रेस हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे क्रूझ आहे आणि याचे प्रत्येक जागी सगळ्या बाबींचे तंतोतंत पालन केले जाते. मग ते थिएटर मधला बॉलिवूड डान्स शो चा ड्रेस कोड का असेना.या शोमध्ये तोकड्या कपड्यात जवळपास पंधरा नृत्यांगना आपले नृत्य कौशल्य दाखविणार होत्या. वास्तविकत: यापेक्षाही अर्ध्या कपड्यातील टिव्ही मालिका किंवा चित्रपट आपल्या नजरेखालून गेल्याने त्यात वावगे असे काहीच वाटत नाही. मात्र या शो चे नाव ऐकून प्रत्येकजण आपापला कयास लावत असतो आणि हे आपल्या पुर्व संचित कल्पना,स्मृतीच्या आधारे असू शकते. हा फक्त नावापुरताच ऐटीन प्लस शो आहे, अश्लीलता अजिबात नाही. मात्र सौंदर्य,नृत्यदृष्टी नसणाऱ्यांनी आणि सोवळे पाळणाऱ्यांनी दोन हात दुर राहिल्यास उत्तम.

रात्रीचे अकरा वाजले होते, निशाराणीची जादू प्रत्येकवर असर दाखवू लागली होती. पंचतारांकित थिएटर, दणक्यातले संगित आणि समोर होता सर्वांगसुंदर अप्सरांचा घोळका. कमनीय बांधा, सळसळते तारुण्य,दिलखेचक अदा,नृत्यचपलता आणि संगतीला एकसे बढकर एक बॉलिवूडची भन्नाट गाणी. जणुकाही आपण चुकून स्वर्गात तर आलो नाही ना असा भास होत होता. काय ती सुंदरता, काय ते तारुण्य, काय ते पददालीत्य,,, "एकदम झकास, बोले तो नंबर वन" असा नृत्याविष्कार त्यांनी सादर केला. सोबतच नाजुकता,मादकता आणि "दिलकी नजरसे, नजरोंकी दिलसे" चा बेजोड मिलाफ त्यांनी घडवून आणला, त्यासाठी शब्द अपुरे पडतील. शिवाय त्या जेव्हा प्रेक्षकांत येऊन नृत्य करू लागल्या तेव्हा त्यांचे सौंदर्य पाहून ह्या परीं या ग्रहावरच्या नक्कीच नाही अशी माझी ठाम समजूत झाली.

अखेर एकदाची ही नृत्यमैफिल आटोपली आणि आम्ही भानावर आलो. कुठे ते कृत्रिम संहारक हायड्रोजन बाॅम्ब आणि कुठे हे शब्द, स्पर्श, रुप, रस, गंधाचे सौंदर्य बॉम्ब. जवळपास अर्धा तासाच्या बेधुंद मैफिलीतून निघताच क्रिकेटमधील पराभवाचा लवलेशही कुठे दिसला नाही. संगीत नृत्याने रोम रोम बहरून आला होता. खरेतर इथून निघूच नये असे वाटत होते परंतु आमचा नाईलाज होता. अगदी शंभर टक्के पैसा वसूल असा हा कार्यक्रम होता. "जिंदगी भर नहीं भुलेंगी क्रूझ की ये रंगीन रात" असंच या घटनेचे वर्णन करता येईल. अखेर आणखी वेळ न दवडता आम्ही आपापल्या रूमवर परतलो.

दुसऱ्या दिवशी क्रूझ दुपारी बारा वाजता मुंबईला पोहोचणार होते. मात्र याकरीता सकाळी आठ पासूनच प्रवाशांना याबाबतीत सूचना देण्यात येऊ लागल्या होत्या. वास्तविकत: कुठेही प्रवासात आपण एक-दोन दिवस जरी मुक्काम केला तरी त्या जागेचा आपणास लळा लागतो. खाणे,पिणे आणि फिरणे एवढीच दिनचर्या असल्याने घरी परतायला कोणाला आवडेल. शिवाय तेच ते रुटीन, भाजीपाला आणा, घरातील जळमटं काढा, दळण दळून आणा, किराणा आणा,,मला तर अशा गोष्टींचा भयंकर राग येतो. मात्र घरोघरी मातीच्याच चुली असते हे आठवून मनाची समजूत घालत असतो. शिवाय क्रूझवरून परततांना सामानाची आवराआवर करणे अत्यंत कंटाळवाणे काम असते. सर्व आटोपून सामानाला कुलूप लावून बसताच एखादी कामाची वस्तू नेमकी कशी काय आत राहून जाते याचेच मला दुःख असते.

 सोबतच रुममधील सामान उचलू उचलून पाहण्याची प्रक्रिया आणखी आपला जीव घेते. पेन,चष्मा, चिल्लर पैसे, चाव्या आपली नजर चुकवून नेमक्या अडचणीच्या जागी जाऊन का फसतात हेच मला कळत नाही.  नेतांना सामान कमी असते परंतु परततांना काहीही खरेदी केले नसले तरी आमच्या बॅग्ज विहीनबाई सारख्या का फुगून बसतात कोण जाणे. काही प्रवाशांना हॉटेल,क्रूझ आणि इतरत्रही तुम्हाला वापरण्याकरीता दिलेले सामान सावडायची फार वाईट सवय असते.कवडीमोल किमतीचे टुथ ब्रश, पेस्ट, शेविंग क्रिम,बारक्या चिरक्या साबण, बोटभर शॅम्पू चोरण्यात काय आनंद मिळतो देव जाणे. काहींना चहा, कॉफी,साखरेचे छोटी पाकीटे जमा करतांना पाहून त्यांच्या दरिद्रतेची किव येते. अशा प्रवाशांमुळे म्हणूनच की काय रूम सोडताना (चेक आऊट) वेटर नेहमीच आमच्याकडे संशयाने पाहत असतो. मात्र अशा प्रसंगाला आम्ही नेहमीच धैर्याने सामोरे जात असतो.

अखेर क्रूझने एकदाचे मुंबई गाठले आणि आमचा प्रवास पुर्णत्वास आला. जवळपास दोन दिवसांच्या थोड्याफार बंदिस्त भटकंतीत मनमुराद आनंद लुटला गेला. अर्थातच याकरीता कॉर्डेलिया एम्प्रेस क्रूझ आणि त्यांचा कर्मचारी वर्ग यांचा सेवा देण्यात मोलाचा वाटा होता. इथे "अतिथी देवो भव" याचे तंतोतंत पालन केले गेले आणि हेच या क्रूझच्या लोकप्रियतेचे गमक आहे. पर्यटनाने तुमचे अनुभवविश्र्व समृद्ध होते. एवढेच नव्हे तर विचारप्रक्रियेतही मोलाची भर पडते. नवनवीन स्थळांना भेट दिल्याने जगाची नवी ओळख होते. "केल्याने देशाटन" म्हणतात ते याचकरीता. मग वाट कसली बघता मित्रांनो, भरा बॅग आणि निघा प्रवासाला. मी तर पुढे जाऊन देवाला आणखी म्हणेल मला यापुढचा ही जन्म मानवी रुपातच, याच मित्रांसोबत दे.कारण अजूनही बरेच जग पालथे घालायचे आहे, आणखी उनाडक्या करणे बाकी आहे. धन्यवाद.
प्रवास वर्णन समाप्त.
*************************************
दि. ०१ नोव्हेंबर २०२१
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++++

No comments:

Post a Comment

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...