Sunday, October 31, 2021

क्रूझायण भाग ०४

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
                 *'क्रूझायण' भाग ०४*
                *डॉ अनिल पावशेकर*
*************************************
क्रूझवर पहिला दिवस धावपळीत गेल्याने रात्री गाढ झोप लागली. दुसऱ्या दिवशी क्रूझ दुपारी बारा वाजता गोव्याला पोहचणार होते. त्यामुळे जागे होण्याची फार घाई न करता सकाळी नऊ पर्यंत अंथरुणात पडून राहणे आम्ही सोयिस्कर समजलो. मात्र रुममध्ये पाण्याशिवाय इतर कोणतेही खाद्यपदार्थ नेण्यास मनाई असल्याने अखेर ब्रेकफास्ट साठी रुमच्या बाहेर पडावेच लागले. टॉप डेकला पोहचलो तर निसर्गाचे एक मनोहारी रुप आमची वाट बघत होते. हलक्याÀaa brother सरींनी क्रूझला ओलेचिंब केले होते. सोबतच सोसाट्याचा वारा अंगात गारवा निर्माण करत होता. वाऱ्याचा वेग इतका जास्त होता की टॉप डोम ला गेलो तर आपला तोल सांभाळणे कठीण होऊन गेले होते. अखेर भुकेची आणखी जास्त अग्निपरिक्षा न घेता आम्ही फुडकोर्टला शरण गेलो.

ब्रेकफास्ट करीता शाकाहारी आणि मांसाहारी दोन्ही पर्याय उपलब्ध होते. मात्र शाकाहारी पदार्थांची विविधता आणि सुंदर सजावट पाहून आम्ही मन तृप्त होईपर्यंत एकेक पदार्थांचा समाचार घेतला. दरम्यान थिएटरला एक सांस्कृतिक कार्यक्रम असल्याने लवकरच तिकडे निघालो. "इंडिया थ्रू मुव्हीज" याअंतर्गत आसेतुहिमाचल भारतीय संस्कृतीचे नयनरम्य दर्शन घडवले गेले. अर्थातच मराठी पर्यटकांची संख्या लक्षणीय असल्याने या कार्यक्रमाची सांगता "गणपती बाप्पा मोरया" ने झाली. एव्हाना साडेअकरा वाजले होते आणि गोव्यासाठी डिसेंबार्कमेंट (क्रूझ खाली उतरणे) च्या सूचना प्रवाशांना देण्यात आल्या होत्या. ज्यांना १२ ते संध्याकाळी ५ पर्यंत गोव्यात उतरायचे होते त्यांना आपले कार्ड पेमेंट करणे आवश्यक होते. तसेही क्रूझवर दुपारी विशेष कार्यक्रम नसल्याने आम्ही गोवा फिरण्याचा निर्णय घेतला.

खरेतर पाच तासांत गोवा फिरणे म्हणजे एकप्रकारची चेष्टाच आहे. सोबतच दक्षिण गोव्यात फिरण्यासारखे फारसे नसल्याचे कळले. अखेर टाईमपास म्हणून आम्ही बागमालो बीच आणि उल्टापुल्टा म्युझियम बघण्याचा निर्णय घेतला. सिमा शुल्क भवन, सीआयएसएफ गेट, मुरगांव इथे उतरून आम्ही टॅक्सीने बागमालो बीच कडे निघालो. क्षणभर तर आपण पश्चिम बंगालला तर उतरलो नाही ना असा भास झाला. कारण जागोजागी ममता दिदींचे "गोएंची नवीन सकाळ" स्लोगन सहित तृणमूलचे चिन्ह असलेल्या फलकांनी मार्गाच्या दोन्ही बाजू व्यापून टाकल्या होत्या. ममतांनी इतक्या दुर कसा काय निशाणा लावला कळत नव्हते. मात्र नुकतेच राजकीय रणनितीकार प्रशांत किशोर यांनी गोवा काबिज करण्याचे सुतोवाच केल्याने ममतांची निती स्पष्ट झाली.

गोव्याला तशी आमची ही चौथी भेट परंतु यावेळी इथले वातावरण एकदम निरस आणि भकास वाटत होते. जागोजागी उदासी पसरल्यासारखी वाटत होती. गोवा चैतन्य आणि सळसळत्या उत्साहासाठी प्रसिद्ध आहे. मात्र इथले सुतकी वातावरण पाहता कधी एकदाचे इथून निघतो असे झाले होते. बागमालो बीच वर पंधरा मिनिटे फेरफटका मारून लगेच उल्टापुल्टा म्युझियमला निघालो. इथे पाच सहा रुममध्ये किचन, डायनिंग हॉल, बेडरूम, कार आदी रचना उलट्या टांगलेल्या आहेत. आपण व्यवस्थित पोझ दिली तर हेच फोटो उलटे करुन पाहण्याची अलग मजा आहे. जणूकाही आपण हवेत तरंगत असल्याचा भास होतो. याव्यतिरिक्त मुख्य बाजारपेठेत आलो तर सर्वत्र शांतता आढळते. कोरोनाच्या तडाख्याने पर्यटन क्षेत्रासोबत इतरही व्यवसायीकांना कसे डबघाईस आणले याचे ते उत्तम उदाहरण होते.

आणखी फार वेळ न दवडता आम्ही क्रूझवर परतणे पसंत केले. रविवारी मुख्य आकर्षण होते भारत विरुद्ध पाक सामना.याकरीता जय्यत तयारी झाली होती.टॉप डेकला मेगा स्क्रीन सहित मल्टीपल बार मध्येही सामना बघण्याची सोय होती. टॉप डेकला बघ्यांची तुफान गर्दी झाली होती. पुलबार ओसंडून वाहत होता. बीअर, कोल्ड्रिंक्सची ट्रॉली लगेच खाली होत होती. अर्थातच भारतीय संघाची फलंदाजी पाहता प्रत्येकाच्या चेहऱ्यावर "सागरा प्राण तळमळला" चे भाव होते. मात्र सर्वांचा नाईलाज होता.तरीपण मध्यंतरापर्यंत सगळेच आपली जागा पकडून होते. कारण भारतीय संघाची धावसंख्या अगदीच दारिद्र्य रेषेखालील नव्हती. शिवाय भुवी, मोहम्मद शामी आणि बुम बुम बुमराहवर ब्लाईंडमध्ये कोणीही पैसे लावायला तयार होते.

मात्र तो दिवस टीम इंडियाचा नव्हताच. पाक संघाची गोलंदाजी,क्षेत्ररक्षण आणि फलंदाजी अफलातून होती.अधाश्यासारखे त्यांनी टीम इंडियाचा फडशा पाडला. मात्र खेळ म्हटले की हारजीत होणारच. मात्र अगदी लिंबुटिंबू संघाकडून हरलो तरी चालेल परंतु पाकविरूद्ध जिंकलोच पाहिजे ही भावना आपल्याला सर्वकाही विसरायला लावते. मग अचानक आपले खेळाडू पैशामुळे मस्तावले, आयपीएल मुळे बिघडले सारखे युक्तिवाद सुरू होतात. शिवाय प्रत्येक भारतीय जन्मजात क्रिकेट तज्ञ म्हणून जन्माला येत असल्याने वादविवाद तरी कोणाशी आणि किती करणार. त्यातच देशासाठी खेळणाऱ्या खेळाडूंच्या देशप्रेमाविषयी शंका उपस्थित करण्याचे महापातक सुद्धा आपल्याच हातून होते.

सामन्याचा दुसरा डाव सुरू झाला आणि भारतीय पाठीराख्यांचा संयम सुटू लागला. हळूहळू टॉप डेक वरील गर्दी पांगू लागली. सामन्याचा आस्वाद घेत चरणारी मंडळी जणुकाही तेरवीचे जेवण असल्यासारखे अन्न घशाखाली ढकलत होते. कोल्ड्रिंक्स, बीअरच्या ट्रॉलीला कोणी गिर्हाईक उरले नव्हते. सुतकी वातावरणात कोणाचीही कोणाशी बोलण्याची इच्छा उरली नव्हती. उच्च कोटीचा संयम बाळगत बहुतेक क्रिकेट प्रेमी आपापल्या रुमची वाट धरत होते. समाधानाची बाब म्हणजे कोणीही भारतीय संघ आणि खेळाडूंचा उद्धार करत नव्हते. हिच एक समाधानाची बाब याठिकाणी प्रकर्षाने जाणवली. 

पाक संघाने संपूर्ण सामन्यात वर्चस्व गाजवत भारतीय संघाला कुठेही अजिबात तोंड वर काढू दिले नव्हते. अगदी नाणेफेक जिंकणे सुध्दा आपल्या वाट्याला आले नव्हते. पांडवांचा जेवढा अपमान द्युतयुद्धात झाला नसेल तेवढा मानभंग भारतीय संघाचा या सामन्यात झाला. रिषभ पंत, विराटने वस्त्रहरण रोखण्याचा प्रयत्न जरूर केला मात्र तो तोकडा पडला. श्रीकृष्णाची भूमिका पार पाडायला कोणीही उपलब्ध नव्हते. तर उत्तरार्धात  भारतीय गोलंदाज भिष्माचार्याप्रमाणे निर्विकार राहिले. भारतीय संघाचे टायटॅनिक हळूहळू आपल्या गंतव्याकडे निघताच आम्ही खिन्न मनाने टॉप डेक चा निरोप घेतला. मात्र प्रत्येक काळ्या ढगाला चंदेरी रुपेरी किनार असते हे विसरून कसे चालणार होते आणि झालेही तसेच. रातराणी सभोवताली वातावरणाला आपल्या बाहुपाशात घेत असतांनाच एक गुलाबी घोषणा झाली. ती ऐकताच आमची अवस्था "आंधळा मागतो एक डोळा देव देतो दोन डोळे" सारखी झाली. ती घोषणा होती,,,,,,!
क्रमशः,,,
************************************
दि. ३१ ऑक्टोबर २०२१
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++++

No comments:

Post a Comment

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...