@#😈😈😈😈😈😈😈😈#@
*अगंबाई अरेच्चा*
*मॅथ्यू वेडने "क्रेझी किया रे"*
************************************
दुबईत झालेल्या टी ट्वेंटीच्या दुसऱ्या उपांत्य सामन्यात कांगारूंनी झुंजार खेळी करत पाकिस्तानला मायदेशी रवाना केले आहे. पहिल्या उपांत्य लढतीसारखीच थरारकता या सामन्यात बघायला मिळाली. दोन्ही सामन्यांत १९ वे षटक धोक्याचे ठरले असून मॅथ्यू वेडच्या घणाघाती फलंदाजीने पाक संघाला नक्कीच वेड लागले असणार. पाकच्या हातातोंडाशी आलेल्या विजयाला मॅथ्यू वेडनं क्रेझी फलंदाजी करून हिसकवले आहे. स्पर्धेत आतापर्यंत अपराजित, अबाधित असलेली बिरूदावली मिरवणाऱ्या पाक संघाची ऐनवेळी "काशीवरून आणलं आणि वेशीवर सांडलं" अशी स्थिती झाली आहे.
खरेतर कित्येक क्रिकेट पंडीतांनी अंतिम सामना इंग्लंड विरुद्ध पाक असा रंगेल अशी भविष्यवाणी केली होती. मात्र मैदानावरील क्रिकेट सर्वांना पुरून उरले आहे. स्टार खेळाडूंना बाजूला सारून न्युझीलंडच्या डॅरेल मिशेल, जिमी निशम तर ऑस्ट्रेलियाच्या स्टोईनिस आणि वेडने आपापल्या संघाला अंतिम लढतीचे तिकीट काढून दिले आहे. दवबिंदूच्या भुताटकीचा या स्पर्धेत चांगलाच गाजावाजा झाला. मात्र आपल्या जिगरबाज खेळीने किवी आणि कांगारू या दोन्ही शेजारी संघांनी प्रतिस्पर्ध्याला डोईजड होऊ दिले नाही. वास्तविकत: पाक आणि कांगारू हे दोन्ही संघ तुल्यबळ होते. दोन्हीकडे दादा फलंदाजांची कमतरत नव्हती. शिवाय उभय संघातील गोलंदाजी तोडीस तोड होती. तरीपण ऐन मोक्याच्या वेळी कांगारू संघाचे मनोबल वाखाणण्याजोगे होते, जे त्यांच्या यशाचे गमक ठरले.
प्रथम फलंदाजी करताना पाकने डावाची दमदार सुरुवात केली होती. या सामन्यात कांगारू गोलंदाज थोडे भरकटलेले वाटत होते. त्यातच क्षेत्ररक्षकांनी झेल सोडण्याचे औदार्य दाखवल्याने पाक संघाने पाऊने दोनशे धावा सहज जमवल्या. बाबर आझम, रिझवान आणि फखर झमनने सुंदर फटकेबाजी करत कांगारूंना सळो की पळो करून सोडले होते. प्रत्युतरात कांगारुंचा प्रथमा ग्रासे माक्षिकापात झाला. तर मार्श, स्टीव्ह स्मिथ, मॅक्सवेल शादाब खानचे बळी ठरले. त्यातच वॉर्नर ची विकेट पाकसाठी दिवाळीचा बोनस ठरला. शंभरीच्या आत अर्धा संघ गारद होताच पाकचे हिरवे निशाण फडकणे सुरू झाले होते आणि इथेच कांगारूंच्या दृढनिश्चयाची कसोटी लागली होती.
धावगती बाराच्या पुढे जाताच कांगारूंचे बारा वाजणार यात दुमत नव्हते. शिवाय स्टोईनिस, वेडची जोडी फारशी वलयांकित नव्हती. मात्र या सामान्य खेळाडूंनी असामान्य धैर्य, धुरंधरता दाखवत होत्याचे नव्हते केले. सर्वात पहिले दोघांनीही संयम दाखवत आपली विकेट सांभाळून ठेवली. उद्धट हसन अलीला ठोकून काढत त्यांनी तवा गरम केला. मग या स्पर्धेत सर्वात यशस्वी गोलंदाज असलेल्या शाहीन आफ्रिदीला शेकून काढले. दरम्यान मॅथ्यू वेड चा झेल टपकवून हसन अलीने पाक संघासाठी असलेली शेवटची लाइफ लाइन तोडून टाकली होती. "कॅचेस विन मॅचेस" का म्हणतात ते याचसाठी. मिळालेल्या जिवदानाचा फायदा घेत वेड ने आफ्रिदीला बुकलून काढले आणि पाक संघाला नतमस्तक व्हायला लावले.
एक मात्र खरे, पाक संघ हरला असला तरी या स्पर्धेतील त्यांचे प्रदर्शन दृष्ट लागण्यासारखे होते. उपांत्य सामन्यात त्यांना कांगारूंनी दिलेल्या धोबीपछाडीने त्यांच्या अतिउत्साही पाठीराख्यांना वेसन घातले असणार. पाकविरूद्ध भारतीय संघ हरताच उन्मादाने फटाके फोडणाऱ्यांना काल रात्री फुटलेले फटाके थोडेफार शहाणपण शिकवून गेले असणार. या स्पर्धेत टीम इंडियाची कामगिरी पाहता या संघाला कशाला तिथे पाठवले असेच वाटते. आयपीएल ग्रस्त भारतीय खेळाडू निस्तेज, निष्प्रभ आणि गलितगात्र दिसत होते. पहिल्या दोन सामन्यांत तर आपले खेळाडू फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन झाल्यासारखे खेळले. ज्या संघाविरुद्ध मर्दुमकी दाखवायची, तिथे गळपटले आणि लिंबुटिंबू संघाविरुद्ध शिलाजीत खाऊन खेळले. तरीपण उपांत्य फेरीसाठी भारतीय संघाचा पाळणा हललाच नाही. शेवटी टेस्ट ट्युब बेबी साठी टीम इंडिया अफगाणिस्तान वर अवलंबून राहीली. मात्र तिथेही "अफगाण जलेबी माशूक फरेबी" झाल्याने वांझोट्या संघाचा शिक्का टीम इंडियाच्या कपाळी लागला.
प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर भारतीय संघाची निवड चुकीची होती. मोठ्या नावापेक्षा मैदानावर कामगिरी करणाऱ्यांना डावलले गेले होते. पहिल्या दोन महत्त्वाच्या सामन्यात फलंदाजांच्या अपयशाने गोलंदाजी विस्कळीत झाली होती. उर्वरित सामन्यात भारतीय फलंदाजांनी दाखवलेली कामगिरी म्हणजे "बैल गेला आणि झोपा केला" अशी होती. अखेर आपला संघ उपांत्य फेरीपुर्वीच स्पर्धेला मुकला. निश्चितच आगामी न्युझीलंड दौऱ्यासाठी भारतीय संघात बरीच कापाकापी झाली मात्र त्यासाठी दुर्दैवाने टी ट्वेंटी वर्ल्ड कप ची आहुती द्यावी लागली. संपूर्ण स्पर्धेत बहारदार कामगिरी करणारा पाक संघ एका झेल मुळे, १९ व्या षटकात आपले सर्वस्व गमावून बसला. पाक संघाच्या या स्पर्धेतील गच्छंती बाबत त्यांचे पाठीराखे फारतर एवढेच म्हणू शकतात,,,
"बहुत निकले मेरे अरमान लेकिन फिर भी कम निकले"
"बहोत बेआबरू होकर तेरे कूचे से हम निकले"
*************************************
दि. १२ नोव्हेंबर २०२१
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
No comments:
Post a Comment