@#😈😈😈😈😈😈😈😈#@
*कांगारूंचा विश्वचषकावर कब्जा, पुर्वार्ध*
*डॉ अनिल पावशेकर*
***********************************
आयसीसी क्रिकेट स्पर्धांत आपला दबदबा कायम राखत कांगारूंनी टी ट्वेंटी विश्वचषक आपल्या नावे केला आहे. अंतिम सामन्यात किवींना आठ गड्यांनी दणदणीत मात देत प्रथमच टी ट्वेंटीचे जेतेपद पटकावले आहे. एकतर्फी झालेल्या या लढतीत आपल्या साधारण गोलंदाजी नंतरही कांगारू फलंदाजांनी मनसोक्त फलंदाजी करत किवींना सामन्यात परतण्याची एकही संधी दिली नाही. काट्याच्या लढतीत विजिगीषु वृत्ती अंगी बाळगत फिंच ॲंड कंपनीने मैदानावर निर्विवाद वर्चस्व गाजवत आपणच कसे सिकंदर आहोत हे क्रिकेट जगताला दाखवून दिले आहे. अंतिम सामना कसा खेळायचा असतो, प्रतिस्पर्धी संघाचे मानसिक खच्चीकरण कसे करायचे असते याचा परिपाठ जणू कांगारू संघाने दाखविला आहे.
सामन्याच्या प्रारंभीच फिंचने नाणेफेक जिंकत नि:संकोचपणे गोलंदाजी पत्करली. कारण त्याला आपल्या संघाच्या कामगिरीवर शंभर टक्के विश्वास होता. न्यूझीलंडने सुरूवात तर चांगली केली मात्र समोर जोश हेजलवूड येताच किवी एक्स्प्रेसला ब्रेक लागला. हेझलवूडने जणुकाही कॉम्प्युटराईज्ड डिझाईन केल्यासारखी काटेकोरपणे लाईनलेंथ गोलंदाजी करत किवी फलंदाजांना चांगलेच जखडून टाकले. ग्लेन मॅकग्रा नंतर क्वचितच अशी सुरेख गोलंदाजी बघायला मिळत आहे.त्यातच पहिला बळी जाताच गुप्टील, विलियम्सने अकराव्या षटकापर्यंत ढक्कलगाडी केल्याने त्यांना फार धावा जमवत्या आल्या नाही. खरेतर इथेच किवी संघाने सामन्यातली आपली लय घालवली होती.
मात्र याची भरपाई त्यांनी मिचेल स्टार्क कडून वसूल करायला सुरुवात केली. ज्या हेझलवूडने अप्रतिम गोलंदाजी केली त्याने स्टार्कच्या गोलंदाजीवर विलीयम्सचा सोपा झेल सोडला. मात्र कांगारूंनी त्याचा हसन अली होणार नाही याची दक्षता घेतली. कारण विलीयम्सला जिवदान मिळताच त्याच्या अंगी दहा हत्तीचे बळ आले आणि त्याने डोईजड होणाऱ्या कांगारूंना लोळवणे चालू केले. विशेषतः मिचेल स्टार्कला आवडते खाद्य असल्यासारखे किवींनी फाडून खाल्ले. कधीकधी घातक गोलंदाज म्हणून ओळखला जाणारा स्टार्क या सामन्यात शुद्ध शाकाहारी प्राणी झाला होता. किवींनी त्याच्या चार षटकात तब्बल साठ धावा चोपून त्याचा पार चोथा करून टाकला.
केन विलीयम्स खेळपट्टीवर असेपर्यंत किवी संघ दोनशेच्या जवळपास जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. कारण तो ज्याप्रकारे सहजसुंदर फलंदाजी करत होता तोपर्यंत ते नक्कीच शक्य होते. मुर्ती लहान पण किर्ती महान असणाऱ्या विलीयम्सने आडदांड कांगारूंचा तोडीस तोड मुकाबला करत धडाकेबाज ८५ धावा ठोकल्या. त्याने किवी संघाला साथ दिली मात्र इतर फलंदाजांनी त्याला पुरेशी साथ दिली नाही. मिशेल, गुप्टील, फिलिप्स, निशम यांना आपापल्या खेळीला फायनल टच देता आला नाही आणि किवी संघ कमीतकमी २०/२५ धावांनी कमी पडला.
तब्बल चौदा वर्षांच्या वनवासानंतर ऑस्ट्रेलियाला टी ट्वेंटी चे पहिलेवहिले जेतेपद खुणावू लागले होते. स्पर्धेपूर्वी कोणाच्याही खिजगणतीतही नसलेला कांगारू संघ चक्क अंतिम फेरीत धडकला होता. त्यातच कर्णधार ॲरोन फिंच आणि स्टीव्ह स्मिथचे टी ट्वेंटीतले प्रदर्शन दारिद्र्य रेषेखालील होते. समाधानाची बाब म्हणजे सलामी फलंदाज डेव्हिड वॉर्नरला या स्पर्धेत लय सापडली होती. तर मिशेल मार्श हा खेळाडू विनोद मेहरा सारखा सहकलाकाराच्या भुमिकेत होता. त्याच्या निवडीवर अनेकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले होते. तरीसुद्धा तो निर्गुण निर्विकार चेहऱ्याने आपले कर्तव्य निभावत होता. ग्लेन मॅक्सवेल सारखा मानवी बॉम्ब संघात असणे कोणत्याही कर्णधाराला भुषणावह असते. फक्त तो आपल्या कंपूत न फुटता प्रतिस्पर्धी संघावर फुटावा एवढीच सर्वांची इच्छा असते.
मुख्य म्हणजे उपांत्य फेरीत स्टोईनिस, वेडच्या दुक्कलीने पाकला ज्याप्रकारे बदडले होते ते पाहता कांगारूंची फलंदाजी किती खोलवर आहे याचा अंदाज येत होता. मागच्या सामन्यात स्टोईनिसच्या धिरोदात्त खेळीला मॅथ्यू वेडने शहाणी फलंदाजी करत "पाकमध्ये डर का माहौल" निर्माण केला होता. याशिवाय शिदोरी म्हणून पॅट कमिन्ससुद्धा उपयुक्त फलंदाजीसाठी राखीव होता. सोबतच आयसीसीसी स्पर्धा सर्वाधिक वेळा जिंकण्याचा मानसन्मान आणि अनुभव कांगारूंच्या गाठीशी होता. मात्र किवी संघात उरात धडकी भरवणारे गोलंदाज होतेच कुठे. एक नवसाचा ट्रेंट बोल्ट वगळता इतर वेगवान गोलंदाज फारसे नावाजलेले नव्हते.
किवी संघात मिचेल सॅंटनर आणि इश सोढी हे दोघे फिरकीपटू जरूर होते. मात्र त्यांचा समाचार घ्यायला फिंच, वार्नर आणि स्टीव्ह स्मिथ सक्षम होते. टी ट्वेंटीत कोणत्या गोलंदाजाला केंव्हा आणि किती मार पडेल याचा भरवसा नसतो. म्हणूनच सॅंटनर असो वा सोढी यांची स्थिती "बनी तो बनी नहीं तो अब्दुल गनी" सारखी होती. भरीस भर म्हणून खेळपट्टी फलंदाजांच्या प्रेमात पडली होती. मैदानात टक्कर बलदंड फलंदाजी आणि सामान्य गोलंदाजीत होती. कांगारुंना जिंकण्यासाठी १७४ धावा म्हणजे "ऊंट के मुंहमे जिरा" सारखे होते आणि शेवटी झालेही तसेच.
क्रमशः,,,,
************************************
दि. १५ नोव्हेंबर २०२१
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
No comments:
Post a Comment