@#😈😈😈😈😈😈😈😈#@
*या चिमण्यांनो परत फिरारे,,,,!*
*डॉ अनिल पावशेकर*
***********************************
बोलॅंड मैदानावर द.आफ्रिकेने भारतीय संघाची बोलती बंद केली असून एकदिवसीय मालिकेवर कब्जा केला आहे. कसोटी पाठोपाठ एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाला ठोकून काढत द आफ्रिकेने भारतीय संघाची लक्तरे वेशीवर टांगली आहे. भारतीय संघ आता इतका गलितगात्र झाला आहे की १९८३ चा कपीलचा संघही यांना सहज हरवू शकतो अशी स्थिती आहे. एवढे मुर्दाड प्रदर्शन पाहूनही टीम इंडिया का पेटून उठत नाही याचे आश्चर्यच वाटते. किंबहुना आमची अशाच मानहानीकारक पराभवाची लायकी आहे याची कळत नकळत कबूली तर देत नाही ना अशी शंका येते. निश्चितच खेळ म्हटले की हारजीत तर होणारच परंतू द.आफ्रिकेचा संघ म्हणजे वेस्ट इंडीजच्या क्लाइव्ह लॉइडचा संघ नव्हे तरीपण आपला संघ एवढा का ढेपाळला याचे पोस्टमॉर्टेम व्हायलाच हवे.
प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर या सगळ्या पानिपतामागे संघात एकी नसणे, बेबनाव असणे हे प्रमुख कारण आहे. याकरिता माजी कर्णधार विराट आणि आणि बीसीसीआय यांच्यातील मानापमान नाट्य जबाबदार आहे. विराट प्रकरणातून धडा घेऊन बीसीसीआयने यापुढे तरी कोणत्याही खेळाडूला मुजोर व्हायच्या पहिलेच त्याच्या मुसक्या आवळणे गरजेचे आहे. कोणताही खेळाडू हा क्रिकेट पेक्षा मोठा नाही हे नेहमीच लक्षात ठेवले पाहिजे. सोबतच खेळाडूंचा फॉर्म आणि फिटनेस पाहूनच त्याची संघात निवड करावी. पस्तिशीकडे झुकलेले, दमलेले भागलेले वयोवृद्ध खेळाडूंचा वनडे आणि टी ट्वेंटीत विचार करायला नको. खेळाडूंच्या भुतकाळातील सोनेरी आठवणींच्या आधारे ते खेळाडू वर्तमानातील लढाया जिंकून देऊ शकत नाही हा इतिहास आहे.
खरेतर टीम इंडियाला आता थातुरमातुर औषधींची नव्हे तर मोठ्या ऑपरेशनची गरज आहे. कसोटी सामन्यांकरीता अश्विन, भुवनेश्वर कुमार यांचा जरूर विचार करावा परंतु झटपट क्रिकेट साठी त्यांना आणि यांच्यासारख्या ज्येष्ठ खेळाडूंना विश्रांती दिलेलीच बरी. खरेतर विराट आता संघासाठी किती घाम गाळेल हा यक्षप्रश्न आहे. कारण त्याची कर्णधार पदाची अंगवस्त्रे बीसीसीआयने फेडल्यापासून तो प्रतिशोधाच्या आगीत जळत असेल यात वाद नाही. मानहानी आणि पदवनती झाल्याने त्याच्या फलंदाजीचे फॅमिली प्लॅनिंग ऑपरेशन झाले आहे. यामुळे यापुढे विराटची बॅट मैदानावर खेळेल मात्र सामने जिंकून देईल की नाही हे येणारा काळच सांगेल. विशेषतः जे सामने औपचारिक आहेत अन्यथा मालिकेच्या दृष्टीने महत्त्वाचे नाही तिथे त्यांची बॅट तळपू शकते. याचे उत्तम उदाहरण म्हणजे तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात तो शतक सुद्धा झळकवू शकतो.
विराट बाबतीत तरी सध्या एवढेच म्हणू शकतो की " अहंकार से तिन गये,, धन वैभव वंश, ना मानो तो फिर देखो,,, रावण कौरव कंस". विराट पतनानंतर लगबगीने राहुलच्या गळ्यात कर्णधार पदाची माळ पडली. मात्र सध्यातरी त्याच्या नेतृत्वात संघाची "मागितली टाळी, मिळाली केळी" अशी अवस्था आहे. शिवाय संघातल्या अनागोंदीचा त्याला सामना करावा लागत आहे. सोबतच त्याचे वैयक्तिक प्रदर्शन "कभी खुशी कभी गम" असे आहे. त्याला खंबिरपणे साथ देईल असा मर्द मराठा आणि मावळ्यांच्या शोधात तो आहे. याकरीता "नाव मोठे लक्षण खोटे" असणाऱ्यांना निवड समितीने शाल श्रीफळ देणं आवश्यक आहे. अन्यथा क्रिकेट जगतात टीम इंडियाचा दबदबा नामशेष होण्याची संभावना आहे.
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात भारतीय फलंदाजांनी जोरकस प्रयत्न केले असले तरी गोलंदाजांनी सामन्याची माती केली. कधी फलंदाज पाठलाग करताना दमतात तर कधी गोलंदाज सामना वाचवू शकत नाही. किंबहुना आपल्या खेळाडूंत सामना जिंकण्याची भुकच दिसत नाही. याला अतिक्रिकेट हे एक कारण असू शकते. सोबतच आयपीएलमुळे खेळाडूंच्या चरणी कुबेराच्या धनराशी लोळण घेत असल्याने त्यांना कमवण्याची चिंताच उरली नाही. आयपीएलने सर्वात जास्त नुकसान टीम इंडियाचे झाले आहे.कारण आयपीएलमुळे विदेशी खेळाडूंना भारतीय खेळपट्ट्या, इथले वातावरण आणि प्रत्येक भारतीय खेळाडूंचे विक प्वाईंट्स लक्षात आले आहेत.
आयपीएलचा तमाशा भरवण्यापेक्षा बीसीसीआयने देशांतर्गत स्पर्धांकडे जास्त लक्ष दिले तर ते भारतीय क्रिकेट साठी बरे राहिल. टीम इंडियात खुर्च्या उबवणाऱ्या खेळाडूंना रणजीसारख्या सामन्यात जुंपावे. आयपीएलमुळे निश्चितच काही गुणी खेळाडू पटलावर आले आहे परंतु वरिष्ठ खेळाडू सुस्त झाले आहे. टीम इंडियाच्या भल्यासाठी बीसीसीआयने कोणत्याही खेळाडूला डोक्यावर बसवू नये. शिवाय प्रशिक्षकाच्या कामगिरीचे मूल्यमापन अत्यंत जरुरी आहे. शिवाय संघात असेपर्यंत खेळाडूंना जाहिरात करण्यास मज्जाव करावा. कारण आयपीएल आणि जाहिरातीतून आलेल्या अमाप संपत्तीने काही खेळाडू माजले आहेत.अर्थातच अशा विराट खेळाडूंना बीसीसीआयने डच्चू देऊन त्यांचे डोके ताळ्यावर आणणे आवश्यक आहे. तरच हे खेळाडू देशासाठी घाम गाळतील अन्यथा औपचारिकता म्हणून सामने खेळतील आणि असेच सामने गमावत राहतील.
बीसीसीआयने लंगड्या घोड्यांवर डाव लावण्यापेक्षा उदयोन्मुख खेळाडूंना वाव द्यायला हवा. सोबतच प्रसिध कृष्णा, मो.सिराज, अक्षर पटेल, हर्षल पटेल, वॉशिंग्टन सुंदर सारख्या खेळाडूंना संघात स्थान देण्यात यावे. सध्यातरी भारतीय संघाची गंभीर अवस्था पाहता आणखी नामुष्की ओढवण्यापेक्षा या संघाला उर्वरित सामने न खेळता परत बोलावले तर ते चांगले राहिल. कमीतकमी आणखी नामुष्की ओढवण्यापेक्षा "झाकली मुठ सव्वा लाखाची" तरी राहिल. एकंदरीत काय तर भारतीय संघाची करुण, दारुण अवस्था पाहता "या चिमण्यांनो परत फिरारे घराकडे अपुल्या" असे म्हणावेसे वाटते.
************************************
दि. २२ जानेवारी २०२२
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
No comments:
Post a Comment