@#😈😈😈😈😈😈😈😈#@
*पुन्हा एकदा "हारले जी"*
*डॉ अनिल पावशेकर*
***********************************
दुसऱ्या कसोटी पासून टीम इंडियाचे सुरू झालेले नष्टचर्य काही केल्या संपायचे लक्षण दिसत नाही. कसोटीच्या पराभूत मानसिकतेतून अजूनही टीम इंडिया बाहेर आली नसून पहिल्याच वन डे मध्ये पराजित झाली आहे. नवा गडी नवा राज प्रमाणे राहुलच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ आपले नशिब आजमवायला निघाला परंतु सध्यातरी राहुल आणि यशाचा बहुतेक छत्तिसचा आकडा असल्यासारखे क्रिकेट असो वा राजकारण, दोन्हीकडे पाटी कोरी आहे.
खरेतर भारतीय क्रिकेटचे विराटपर्व इतिहास जमा होऊन राहुल पर्वाला सुरूवात झाली आहे. मात्र अजूनही आपल्या संघाची गाडी रुळावर आलेली दिसत नाही. गुणवान गोलंदाजांना लय सापडत नाही तर फलंदाजांना खेळपट्टीवर उभे राहता येत नाही. भरीस भर म्हणून क्षेत्ररक्षणातला स्तर खालावत चालला आहे. कदाचित याला कारणीभूत द.आफ्रिकेची काळी जादू तर नसावी अशी शंका येत आहे.अन्यथा खेळाडू विना पगार खेळत असावे. कारण टीम इंडियाची ती जिद्द, तो जोश, हरलेला सामना जिंकणे असो की मैदानातला दबदबा असो, सर्व काही हरवल्या सारखे वाटत आहे. किंबहुना टीम इंडिया केवळ औपचारिकता म्हणून तर हे सामने खेळत नाही ना अशी शंका येते. मुख्य म्हणजे खेळाडूंच्या बॉडी लँग्वेज वरून विजयाची भुक दिसून येत नाही.
वास्तविकत: द आफ्रिकेने अठराव्या षटकापर्यंत तीन गडी गमावून जेमतेम अडुसष्ठ धावा केल्या होत्या. याच वेळी विरोधी संघाला आवळण्याची गरज होती. मात्र कर्णधार टेम्बा बवूमा आणि वॅन डर ड्युसेनने भारतीय गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले. या जोडीने तब्बल द्विशतकी भागीदारी करत त्यांच्या संघाला सुस्थितीत नेले. दोन्ही फलंदाजांनी शतक ठोकत भारतीय गोलंदाजी खिळखिळी करून टाकली. मात्र तरीही धावसंख्या तिनशेच्या आत असल्याने भारतीय संघावर खुप मोठे संकट कोसळले अशातला भाग नव्हता. फक्त गरज होती निर्धार पुर्वक सामना जिंकण्याची.
भारतीय संघ पाठलाग करताना उतरताच द.आफ्रिकेने हुशारीने फिरकीपटूला आणले. मात्र तो शेन वॉर्न किंवा मुरलीधरन नव्हता. तरीपण त्याला "घालीन लोटांगण वंदिन चरण" करत जबरदस्त आदर दिला गेला. जवळपास तिनशे धावा करायच्या असतांना आणि पॉवर प्ले असतांना सलामीवीरांनी "अहिंसा परमो धर्म" चा जाप करायला नको होता. अखेर फिरकीसमोर लेझीम खेळत राहुलने आपली विकेट गमावली. त्यामानाने शिखर धवनने चांगली खेळी केली. त्याला विराटची साथ लाभताच हा सामना भारतीय संघ हसत खेळत जिंकणार असे वाटत होते. या दोघांच्या फलंदाजी समोर द. आफ्रिकेचा मारा अत्यंत सामान्य वाटत होता.
मात्र शिखर धवन परतताच पुन्हा एकदा टीम इंडिया धरण फुटल्यासारखी कोसळली. खरेतर भारतीय फलंदाजी विराटभोवती घुटमळते. शिवाय विराट धावांचा पाठलाग करतांना बब्बर शेर आहे. मात्र या सामन्यात त्याच्या शेर पावशेर धावा पाहून कुठेतरी टीम इंडिया गटांगळ्या खाणार हे ठरले होते. प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर विराटची कर्णधार पदाची कवचकुंडले काढल्याने तो नक्की कोणत्या मानसिकतेतून जात असेल याबाबत न बोललेलचं बरं. विराट म्हणजे "जहाँ मॅटर बडा, वहाॅं विराट खडा" असे समिकरण होते. तसेच या सामन्यात कमीतकमी एका फलंदाजाने शतक ठोकून डाव सांभाळणे अपेक्षित होते. मात्र प्रत्येक फलंदाज "जागते रहो,मेरे भरोसे मत रहो" सारखे खेळले.
विराट नंतर दोन्ही अय्यर बाऊंसरवर धाराशायी झाले. तर रिषभ पंतने घोर निराशा केली. तो मॅचविनर आहे यात वाद नाही मात्र मॅच्युरिटी नावाची काही गोष्ट असते याचे त्याला भान नाही. कदाचित पद्मीनी कोल्हापूरे, सचिन पिळगावकर सारखा तो कायम बाल्यावस्थेतच राहणार काय असा प्रश्न पडतो. शेवटी शार्दुल ठाकूरने आपली ठाकूरकी दाखवली मात्र तोपर्यंत आपल्या संघाची अंतिम यात्रा निघाली होती. त्याची पन्नाशी ना त्याला समाधान देऊ शकली ना संघाला विजयी करू शकली.
अखेर पहिल्याच वनडे मध्ये पराभवाची नामुष्की आपल्या संघावर आली. राहुलच्या नेतृत्वाबद्दल सध्यातरी फारकाही बोलणे योग्य ठरणार नाही.मात्र फलंदाजीत त्याला आपला रेकॉर्ड नक्कीच सुधारावा लागेल. तर शिखर धवन आणि विराटला आणखी जबाबदारीने खेळावे लागेल. श्रेयस अय्यर असो की व्यंकटेश अय्यर, या दोघांनाही मिळालेल्या संधीचे सोने करावे लागेल. सोबतच सूर्यकुमार यादवचे लोणचे घालू नये एवढी अपेक्षा आहे. व्यंकटेश आय्यरला अष्टपैलू खेळाडू म्हणून संघात घेतले असेल तर त्याला एकही षटक का दिले नाही याचे आश्चर्य वाटते. खरेतर कालचा सामना पाहून पुजारा, रहाणे सुखावले असतील. आम्ही दोघं नसतांनाही टीम इंडिया सामने हरू शकते हे पाहून दोघांचा ऊर भरून आला असेल. शेवटी काय तर जवळपास एकशे तीस करोड जनसंख्येतून आपण अकरा खेळाडूंत जागा पटकावली आहे तर कमीतकमी प्रदर्शनही त्याच दर्जाचे करणे भारतीय खेळाडूंना गरजेचे आहे. अन्यथा क्रिकेट रसिक कसोटी सोबतच एकदिवसीय सामन्यांकडे पाठ फिरवतील अशी भिती वाटते.
***********************************
दि. २० जानेवारी २०२२
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
No comments:
Post a Comment