Friday, March 11, 2022

फूल खिले है गुलशन गुलशन

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
        *फूल खिले है गुलशन गुलशन*
              *डॉ अनिल पावशेकर*
********************************
अवघ्या देशाच्या नजरा लागलेल्या पाच राज्यांच्या निवडणुकांचे निकाल हाती आले असून मतदारांनी कांग्रेसला चांगलाच हात दाखविल्याचे दिसत आहे. २०२४ च्या फायनल पुर्वी झालेल्या या सेमी फायनलमध्ये भाजपने ४/१ असा दणदणीत विजय मिळवला आहे. भाजपचा बालेकिल्ला असलेल्या उत्तर प्रदेशात मोदी योगींच्या डबल इंजिनने बुवा बबुआ सहित उरल्यासुरल्या काँग्रेसचा धुव्वा उडविला आहे. हत्ती,सायकल आणि पंजाला बेदरकारपणे चिरडून योगींच्या बुलडोझर ने यहाँ के हम सिकंदर हे दाखवून दिले आहे. अर्थातच या लढतीत योगी आदित्यनाथ मॅन ऑफ दि मॅच तर पंतप्रधान नरेंद्र मोदी मॅन ऑफ दि सिरीज ठरले आहेत.

खरेतर या निवडणुकांना बेरोजगारी, महागाई, कोरोनाच्या लाटां सारखी दुर्दैवी पार्श्वभूमी होती. त्यातच शाहिनबाग, दलालांचे आंदोलन आणि सोबतच हिजाब प्रकरणाचा तेजतर्रार तडका होता. मात्र मोदी योगींच्या जोडगोळीने या नोबॉल, वाईडबॉलला लिलया खेळत चार राज्यांत धडाकेबाज पुनरागमन केले आहे. त्यातच वामपंथीय लालमिडीया आणि जेएनयू छाप माकडे २०१४ पासूनच हात धुवून मोदींच्या मागे लागली होती. मात्र सुशासन, सुरक्षा आणि राष्ट्रवादाचे शिवधनुष्य उचललेल्या मोदींचा ते बाल ही बाका करु शकले नाही.

मुख्य म्हणजे निवडणुका म्हटल्या की धर्मांधांच्या दाढ्या कुरवाळणे, जातपातधर्माच्या राजकारणाचे आखाडे बांधणे, अव्यवहार्य मोफत योजनांची मुक्त उधळण करणे इत्यादी विरोधकांच्या पारंपरिक पद्धतीला फाट्यावर हाणत भाजपने ही लढाई जिंकली आहे. पाच राज्यांच्या लढतीत सर्वांचे पंचप्राण दडले होते युपीत आणि तिथेच भाजपची खरी कसोटी होती. कारण एकतर अवाढव्य राज्य, प्रचंड लोकसंख्या आणि ॲंटी इन्कम्बन्सी फॅक्टर. मात्र योगींची स्वच्छ प्रतिमा, मोदींचे राष्ट्रव्यापी धडक नेतृत्व, मजबूत पक्ष संघटन या बाबी महत्त्वाच्या ठरल्या.

तर दुसरीकडे सपा, बसपा, कांग्रेस आदी विरोधकांचे दाही दिशांना दहा तोंडे होती. प्रत्येक विरोधक "मै झुकेगा नहीं साला" मुडमध्ये होता. बसपा ची स्थिती नाव गंगुबाई हाती कथलाचा वाडा अशी होती. हत्ती आणि पक्षप्रमुखांच्या पुतळ्यांपुढे या पक्षाची मजल गेली नाही. कधीकाळी तिलक तराजू और तलवार,,, आणि हाथी नहीं गणेश है,,सारख्या घोषणांनी मैदान मारणारा हा पक्ष या निवडणुकीत रसातळाला गेला. एकहाती सत्ता काबीज करणाऱ्या मायावतींना यावेळी बोटावर मोजण्या इतक्या जागांवर समाधान मानावे लागले.

समाजवादी पक्षाची तर गोष्ट निराळीच होती. त्यांच्यासाठी एम वाय फॅक्टर जणुकाही निवडणुका जिंकण्याचा पासवर्ड होता. मात्र यावेळी एम वाय फॅक्टर अपडेट होऊन तो मोदी योगींत परिवर्तीत झाला होता. मुलायमसिंगांची कवचकुंडले असल्याने अखिलेश यादवांचा आयत्या बिळात नागोबा झाला होता. मात्र आता पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे. जन्मदात्या बापाला युज ॲंड थ्रो करणाऱ्या अखिलेश यादवला या निकालाने दिवसा तारे दिसू लागले असेल. सैफईचा नंगानाच म्हणजे युपीचा विकास नव्हे हे मतदारांनी लक्षात ठेवल्याने समाजवादी पक्ष फारशी चमक दाखवू शकला नाही.

कांग्रेसने यावेळी खांदे बदल करत प्रियंका वाड्रा यांच्यावर प्रचाराची धुरा सोपवली. परंतु पळसाला पाने तिनंच राहिली. लडकी हूं लड सकती हूं सह प्रियंकांनी वातावरण ढवळून काढण्याचा प्रयत्न केला. मात्र ना मतदारांनी, ना कोणत्या राजकीय पक्षांनी त्यांना गांभीर्याने घेतले. अखेर कांग्रेस पक्ष या निवडणुकीत युपीत दोन आकडी संख्याही गाठू शकला नाही. एवढेच नव्हे तर अमेठी, रायबरेली सारख्या परंपरागत मतदार संघातूनही त्यांचा बाजार उठवल्या गेला. तत्पूर्वी राहुल गांधींनी हिंदुत्व आणि हिंदुत्ववाद्यांचे अजब तर्कट समोर आणले होते, ज्याचा त्यांनाच तोटा झाला.

असंघटित आणि विस्कळीत विरोधकांचा मोदी योगी जोडीने येथेच्छ समाचार घेतला. तर विरोधकांच्या उरल्यासुरल्या आशा दलालांच्या आंदोलनावर टिकल्या होत्या. मात्र भाडोत्री आणि लंगडे घोडे असलेल्या टिकैतचे निवडणुकांपुर्वीच विसर्जन केल्याने दलालांचे आंदोलनही विरोधकांना संजिवनी देऊ शकले नाही. तर राज्याची सुत्रे सांभाळताच योगींनी युपीचा कायापालट करण्याचे काम हाती घेतले.गोरगरीब जनता, दुर्बल असहाय घटक आणि महिलावर्ग यांच्याकडे त्यांनी विशेष लक्ष दिले. सोबतच राज्यात वर्षानुवर्षे बळावलेल्या गुंडगिरीला लगाम घातला. पोलिसदल बळकट करून गुंडांच्या वळकटी बांधण्याने कायदा सुव्यवस्था सुरळीत केली. लाथोंके भुत बातोंसे नहीं मानते हे योगींनी चांगले माहीत असल्याने त्यांनी बुलडोझरची क्लृप्ती वापरली.

यासोबतच जाज्वल्य देशाभिमान आणि धर्माची पताका खांद्यावर घेऊन उत्तर प्रदेशाची वाटचाल उत्तम प्रदेशाकडे केली. राष्ट्रीय स्तरावर मोदींनी हिंदुत्वाचे अग्निकुंड धगधगते ठेवण्याचे कार्य केले. यांत सोमनाथ ते केदारनाथ, अयोध्या ते काशीचा नकाशा बदलवून टाकला. यामुळेच कधीकाळी हिंदूत्व म्हटले की अंगावर पाल पडल्यासारखे दचकणारे विरोधक मंदिरात रमू लागले. कुणी हनुमान चालीसा म्हणू लागले तर कुणाला आपले दत्तात्रेय गोत्र आठवले. हिंदुंच्या रक्ताला चटावलेली बंगाली दीदी चक्क काशी विश्वेश्वराच्या पायाशी लोळण घेऊ लागली. रामभक्तांचे रक्त सांडवणाऱ्या समाजवाद्यांच्या स्वप्नात भगवान श्रीकृष्ण येऊन दृष्टांत देऊ लागले. अर्थातच ही किमया एका रात्रीत झाली नाही आणि त्याचे किमयागार होते मा.नरेंद्र मोदी.

निश्चितच सोन्याच्या किंमतींनी बावन्न हजारांचा टप्पा ओलांडला असला तरीही हिंदुत्वाचे बावन्नकशी सोने असलेल्या मोदी योगींनी हिंदुत्वाला नवीन झळाळी दिली आहे. जवळपास ग्लानीत असलेल्या हिंदुत्वाला जागृत करून धर्माभिमानाची पताका देशविदेशात फडकवली आहे. विकास तर वेळेनुसार क्रमाक्रमाने होतच राहील यात शंका नाही. याच विकासाला सर्वसमावेशक हिंदुत्वाचा मुलामा असल्यानेच देश प्रगतीपथावर आहे. सिरीया, उक्रेन आदी देश विकासावर चालूनही भकास का झाले यांचे उत्तर प्रखर राष्ट्रवादात दडले आहे. नेमकी हीच बाब हेरून या निवडणुकांत भाजप यशस्वी झाला आहे. कधीकाळी अवघ्या दोन खासदारांचा पक्ष म्हणून टर उडवल्या गेलेल्या भाजपने गगनभरारी घेत संपूर्ण देशात आपला झेंडा रोवला आहे. कमळ केवळ चिखलातच नव्हे तर देशभरात बहरू शकते हे या निकालांनी दाखवून दिले आहे. येत्या काळात भाजप हीच कामगिरी वृद्धिंगत करत "फूल खिले है गुलशन गुलशन" अशा स्थितीत येईल अशी अपेक्षा आहे.
*********************************
दि. ११ मार्च २०२२
मो.९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++++

No comments:

Post a Comment

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...