Saturday, March 19, 2022

द कश्मिर फाईल्स पुर्वार्ध‌‌‌

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
          *द कश्मिर फाईल्स, पुर्वार्ध*
              *डॉ अनिल पावशेकर*
**********************************
द कश्मिर फाईल्स,,खरेतर जवळपास तिन तासांत मध्ययुगीन रानटी टोळ्यांचे धडधडीत सत्य मांडणारा सत्यपट होय. गलिच्छ राजकारण, आत्मा हरवलेला मिडीया आणि आपल्या देशबांधवांकडे कानाडोळा करण्याच्या स्वार्थी मानसिकतेचे अचूक चित्रण यांत करण्यात आले आहे. केवळ इतिहासच नव्हे तर वर्तमान आणि भविष्यकालीन संकटाची चाहूल देण्याची किमया या सत्यपटाने दिली आहे. शहामृगासारखे संकटकाळी वाळूत मान खुपसून बसले तरी संकट काही टळणार नाही.याऊलट झालेल्या नरसंहारातून काही शिकण्यासारखे नक्कीच आहे. धर्मांधांपुढे तुम्ही पुरोगामीत्वाच्या कितीही गळाभेटी घेतल्या, सर्वधर्मसमभावाच्या कितीही डफल्या वाजवल्या तरीही तुमचे अस्तित्व उकळत्या चहात पारले जी बिस्कीटांसारखे गळून पडणार हे निश्चित आहे. योगायोगाने या चित्रपटात सुद्धा पारले जी चा उल्लेख आहे मात्र यातून धडा घेतला नाही तर भविष्यात हारले जी म्हणून पस्तावण्याची वेळ येऊ शकते.

चित्रपटाचे कथानक विस्थापित झालेल्या पुष्करनाथ पंडितच्या कुटुंबावर केंद्रीत आहे. आपला मुलगा, सुन आणि एक नातू यांची आपल्या डोळ्यादेखत होणाऱ्या हत्यांचे साक्षीदार होण्याची दुर्दैवी वेळ त्याच्यावर येते. मात्र ना सरकार, नोकरशाही अथवा कुठेच थारा न मिळाल्याने ही भळभळती जखम घेऊन तो जगत असतो. अर्थातच जेंव्हा मिडीया आणि शिक्षण प्रणालीतून सत्याचा विपर्यास मांडला जातो, तेंव्हा तो कळवळून उठतो. हत्याकांडात हात रंगल्यांचे उदात्तीकरण आणि पिडीतांनाच जेव्हा अपराधी ठरवले जाते तेव्हा हा चित्रपट का पहावा याचे उत्तर आपोआप मिळते.

या सत्यपटाला १९८० चा उत्तरार्ध आणि १९९० च्या पुर्वार्धाची पार्श्वभूमी आहे. शिवा आणि अब्दुल या मुलांच्या क्रिकेट सामन्यातून कथानक पुढे सरकते आणि प्रत्येक प्रसंग, प्रत्येक क्षण तिथल्या काळ्याकुट्ट अध्यायाची परत उघडत जाते. मुख्य कथानक १९ जानेवारी १९९० ला धरून असले तरी वातावरण निर्मिती बरेच काळापासून सुरू असते. पुष्करनाथ (अनुपम खेर) च्या कुटूंबात मुलगा करण पंडित (अमन इक्बाल), सुन शारदा पंडित (भाषा सुंबली), नातू शिवा आणि क्रिष्णा पंडित असतात. सोबतच त्याची डिजीपी हरीनारायन (पुनित इसार), आयएएस अधिकारी ब्रह्मदत्त (मिथुन चक्रवर्ती), डॉ महेश कुमार (प्रकाश बेलवाडी) आणि मिडीयातील प्रस्थ विष्णुराम (अनुप श्रीवास्तव) यांच्याशी उठबस असते. यामुळेच की काय पुष्करनाथ येणाऱ्या संकटाबाबत अनभिज्ञ असतो.

मात्र जिथे लष्करावर आणि पोलिसांवर हल्ले होत असतील तर पुष्करनाथ सारख्या सामांन्यांचा कुठे टिकाव लागणार? मुख्य म्हणजे काश्मिरी पंडितांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या नेत्यांना आणि व्यक्तींना प्रामुख्याने टिपून इतरांना एक धमकीवजा निरोप धाडला जातो. रलिव गलिव चलिव,,,अर्थातच आमचा धर्म स्विकारा अन्यथा चालते व्हा किंवा मरणास तयार रहा. अर्थातच ज्यांनी पिढ्यानपिढ्या तिथे वास्तव्य केले आहे त्यांच्यासाठी हे आभाळ फाटण्यासारखेच होते. मग इथेच नरसंहार आणि पलायणाचे भिषण वास्तव दृष्टीस येते. पुष्करनाथच्या घरी जेंव्हा बिट्टा कराटे नावाचा क्रुरकर्मा दाखल होतो तेव्हा जिव वाचवण्यासाठी करण पंडित तांदुळाच्या कोठीत लपतो. परंतू शेजारच्याने खाणाखुणा करताच तांदुळाच्या कोठीतच त्याच्या शरीराची चाळण करण्यात येते.

याप्रसंगी पुष्करनाथ बिट्टा कराटेला तू माझा शिष्य आहे, मी तुला शिकवले आहे याची आठवण करून देतो. मात्र बिट्टा कराटे आपल्या मिशन बद्दल कटीबद्ध असतो. मी तुमचा विद्यार्थी नाही तर एरीया कमांडर बिट्टा कराटे आहो याची ओळख करून देतो आणि या हत्येचे कुणीतरी साक्षीदार असावे म्हणून पुष्करनाथ आणि उरलेल्या सदस्यांना जिवंत सोडतो. तत्पूर्वी करण पंडितच्या रक्ताने माखलेले तांदूळ जबरदस्तीने त्याच्या पत्नीला खाण्यास भाग पाडतो. काय म्हणावे या क्रौर्याला. वास्तविकत: हे कथानक इथुनच पुढे सरकायला हवे होते. मात्र अचानक एक अंतर ठेऊन हे कथानक थेट जेएनयूत पोहोचते त्यामुळे प्रेक्षक चित्रपटास खिळून राहत नाही. त्यातच पात्रांच्या तोंडी बरेचदा स्थानिक भाषा वापरली आहे त्यामुळे प्रेक्षकांचा रसभंग होतो. तरीपण प्रत्येक वेळी इंग्रजी सबटायटल्स दिल्याने भावार्थ समजणे सुसह्य होते.

हे कथानक जेंव्हा जेएनयूत पोहोचते तेव्हा पुन्हा एकदा काश्मीर अध्यायाचा कसा विपर्यास केला जातो याचे दर्शन घडते. विशेषतः डाव्यांनी शैक्षणिक क्षेत्रात जे इतिहासाचे विकृतीकरण आणि धर्मांधांच्या क्रौर्याला कुरवाळण्याचे पातक केले आहे ते पाहून चिड येते. युवापिढीला काश्मीर प्रकरणी कसे भ्रमित केले जाते, युवा शक्तीचा देशविरोधात कसा वापर केला जातो याचे जिवंत चित्रण इथे केलेले आहे. पुष्करनाथ आपल्या एकमेव जिवंत नातवासोबत म्हणजेच कृष्णासोबत शरणार्थी शिबिरात आयुष्याचे उरलेले दिवस मोजत असतो. तर कृष्णा पंडित जेएनयूत प्रोफेसर राधिका मेननच्या हाताखाली शिक्षणाचे धडे घेत असतो. देशविरोधाने ठास्सून भरलेली प्रो.राधिका मेनन एकीकडे तर दुसरीकडे नरसंहार आणि पलायनाची भळभळती जखम उराशी घेऊन लाचारीचे जिवन जगणारा पुष्करनाथ यांच्या वैचारिक द्वंद्वात कृष्णा पंडितचा अक्षरशः सॅंडविच होतो.

प्रो.राधिका मेनन आणि त्यांचे टोळके विद्यार्थी संघाच्या निवडणुकीत कृष्णा पंडितला अध्यक्षपदाची उमेदवारी देते. मग इथेच डाव्यांचे कटकारस्थान सुरू होते. काश्मिरातील नरसंहार आणि पलायनाला देश कसा जबाबदार आहे,  संघवाद से आझादी, मनुवाद से आझादी कशी जरुरी आहे हे विद्यार्थ्यांच्या मनावर बिंबवले जाते. प्रत्येक कहाणीला खलनायकाची गरज असते आणि काहीही करून, कसेही करून ही निवडणूक आपल्याला जिंकायची आहे यासाठी सोयऱ्याच्या जोड्याने विंचू मारण्यासारखे,,, कृष्णा पंडितलाच काश्मिरात काश्मिरींवर सरकार आणि लष्कराद्वारे कसे अत्याचार होत आहेत याच्या संकलनासाठी पाठवलं जातं. मात्र सत्य कितीही झाकलं तरी ते लपून राहत नाही. जेव्हा कृष्णा पंडित त्याच्या आजोबांचा म्हणजेच पुष्करनाथचा अस्थिकलश घेऊन दाखल होतो तेव्हा त्याला ग्राउंड रिअलीटी कळते. पुष्करनाथचे सहकारी ब्रह्मदत्त, हरीनारायण, डॉ महेश कुमार आणि विष्णुराम यांच्या तोंडून अखेर सत्य बाहेर पडतेच. कृष्णा पंडितला आपले कुटुंब अपघातात नव्हे तर हत्याकांडात मारले गेले याची जाणीव होते. खरेतर इथुनच द कश्मिर फाईल्स मनाचा ठाव घ्यायला सुरुवात करते.
क्रमशः,,,
**********************************
दि. १९ मार्च २०२२
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++++

No comments:

Post a Comment

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...