@#😈😈😈😈😈😈😈😈😈😈#@
*बॉलिवूडचा टिन एज सुपरस्टार रिषी कपूर*
***************************************
जगभरात करोनाने धुमाकूळ घातला असून आता कॅन्सरनेही आपले उपद्रवमुल्य दाखवणे सुरू केले आहे. लागोपाठ दोन दिवसांत ५३ आणि ६५ वयाच्या दोन बॉलिवूड कलाकारांचे बळी घेऊन कॅंसरने चित्रपट रसिकांना चांगलेच दुखावले आहे. इरफान खानच्या दु:खातुन सावरत असतांनाच बॉलिवूडचा टिन एज सुपरस्टार रिषी कपूरनेही आपली एक्झिट घेतल्याने चाहत्यांना दुहेरी धक्का बसलेला आहे. खरेतर मृत्यू हे अंतिम सत्य आहे मात्र या दोघांच्या जाण्याने मनाला चटका लागला असून सिनेक्षेत्राची अपरिमित हानी झालेली आहे.
अभिनयाचे बाळकडू कोळून प्यालेल्या रिषीचे दर्शन पहिल्यांदा प्यार हुआ इकरार हुआ मध्ये झाले आणि त्याच्यावर चाहत्यांनी आयुष्यभर भरभरून प्रेम केले. रिषी कधीच सुपरहिरो किंवा आडदांड भुमिकेत जगला नाही तर आपल्या सहजसुंदर अभिनयाने तो सर्वांना आपलासा आणि हवाहवासा वाटायचा. ढिशुम ढिशुमच्या भानगडीत न पडता, उगाच ही मॅन सारख्या एखाद्या बलदंड चौकटीत न अडकता सुद्धा चित्रपट गाजवू शकतो हे त्याने दाखवून दिले. हातात कधी डफली असो वा गिटार अथवा व्हायोलीन, कोणत्याही वाद्याला उत्तम नृत्य, कमालीच्या पददालित्याची जोड देत हमखासपणे प्रेक्षकांना आकर्षित करायचा.
खरेतर राजेश खन्ना, अमिताभ, विनोद खन्ना, जितेंद्र आणि शत्रुघ्न सिन्हा सारख्या दिग्गजांच्या भाऊगर्दीतही रिषीने आपले वेगळेपण जपले होते. नायिका मग ती नितू सिंग असो की दिव्या भारती, रिषीची केमेस्ट्री कुठेही सहज खुलायची. कधी बचना ऐ हसिनो म्हणून तर कधी मैं शायर तो नहीं म्हणत आपल्या शैलीत प्रेमरसाची बरसात करायचा. मैं हुं प्रेमरोगी, दर्दे दिल दर्दे जिगर सारख्या गाण्यातून त्याने कित्येक पिढ्यांच्या व्यथा सर्वांसमोर मांडल्या होत्या. प्रेमात थोडी मॅच्युरीटी दाखवतांना त्याचे चेहरा है या चांद खिला है आणि सोचेंगे तुम्हे प्यार करे के नहीं करत आदर्श प्रेमवीर साकारला होता.
मेरा नाम जोकर पासून सुरू झालेला त्याचा अल्लड प्रेमाचा प्रवास बॉबी ते दिवाना पर्यंत अनोख्या अदाकारीने भरभराटीला आला होता. अमर अकबर अँथनी मध्ये त्याने नजाकतीने अकबर साकारुन अमिताभ, विनोद खन्नाच्या उपस्थितीतही आपली दखल घ्यायला भाग पाडले होते. सरगम, प्रेमरोग, कर्ज, हिना, नगीना सारखे चित्रपट आपल्या उत्तम अभिनयाने साकारत प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. तर आपल्या सेकंड इनिंग मध्येही चांदणी, दिवाना,सागर, सिंदूर, बोल राधा बोल, नसिब अपना अपना आणि दामिनी सारख्या चित्रपटातून आपली जादू कायम असल्याचे दाखवून दिले होते. दो दुनी चार, अग्निपथ, स्टुडंट ऑफ दी इअर, कपूर ॲंड सन्स, डी डे सारख्या चित्रपटातून आपला जलवा दाखवत त्याच्यातला कलाकार अजुनही जिवंत असल्याचा पुरावा दिला होता.
नायकांसोबत, विशेषतः त्याची अमिताभ सोबत जोडी छान जमायची. लंबू टिंगूच्या या जोडीने अमर अकबर अँथनी, कुली, नसिब, कभीकभी आणि अजुबा सारख्या चित्रपटातून धमाल केली होती. अमिताभ सारख्या दिग्गजाच्या सोबत काम करतानाही रिषीने आपल्या भुमिकेत जिव ओतत आपली भुमिकेचे महत्त्व अबाधित राखले होते. या दोघांवर चित्रित केलेले नसिब मधले चल चल मेरे भाई हे गाणे या दोघांच्या निखळ अभिनयाचे उदाहरण होते. आपल्या अभिनयात प्रयोग म्हणून रिषींनी नाक मुरडत का होईना अग्निपथमध्ये रौफलाला साकारला होता आणि त्याने या भुमिकेचे अक्षरशः सोने केले.
१९७० पासून जवळपास ९० चित्रपटातून आपली छाप सोडणाऱ्या या कलाकाराला २०१८ ला ल्युकेमियाने गाठले, याकरिता त्यांनी न्युयाॅर्कला आपले उपचार पण घेतले. मात्र ३० एप्रिलला त्याची झुंज संपली. आपल्या परखड विचारांसाठी आणि सडेतोड भुमिकेसाठी त्याने कधी कोणाचीही पर्वा केली नाही.
"चांदणीचा" "दिवाना" असणारा हा कलाकार आपल्यात नाही यावर विश्वास बसत नाही. अभिनयात "नगीना" असणारा हा "सागर" कधी "कुली" तर कधी "कपुर ॲंड सन्स" मध्ये झळकला होता. कोणत्याही आव्हानासमोर "हम किसिसे कम नहीं" असणारा हा "अजुबा" कॅन्सरच्या "निगाहे" समोर "नसिब" हरवून बसला. कोणत्याही भुमिकेला "दो दुनी चार" करणारा हा नट कॅन्सरच्या "अग्निपथवर" "ऑल इज वेल" राहू शकला नाही. गंभीर आजारातही हसतखेळत राहणारा याच्यासारखा "दुसरा आदमी" शोधुनही सापडणार नाही. "साजन का घर" ते "नमस्ते लंडन" पर्यंतचा यांचा आपल्यासोबतचा "याराना" आता संपला असून, ते आता अनंतात विलीन झाले आहे. समस्त चाहत्यांतर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.
***************************************
दि. ०१ मे २०२०
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++++++
No comments:
Post a Comment