@#👿👿👿👿👿👿👿👿#@
*बेबी ऑफ सुकेशिनी, भाग ०२*
*डॉ अनिल पावशेकर*
*********************************
खरेतर सुकेशिनी भंडाऱ्यापासून दुरवर खेड्यातील रहिवासी होती. नवरा सुरेश सोबत मोलमजुरी करून दिवस पुढे ढकलत होती. घरी अठराविश्व दारिद्र्य असूनही दोघांचा चांद्रमौळी झोपडीत एकोप्याने संसार सुरू होता. तसेही आपणास गरिबीत एकोपा आणि श्रीमंतीत दुरावा जागोजागी बघायला मिळतो. अर्थातच त्यांच्यावर लक्ष्मी जरी प्रसन्न नसली तरी निसर्गाने आपला प्राकृतधर्म तंतोतंत पाळला होता. पहिल्यांदाच आई होण्याच्या कल्पनेने सुकेशिनी सुखावली होती. तर सुरेश, नवरा ते बाप अशा प्रमोशनने मनोमन आनंदी झाला होता.
गावी फारशा आरोग्य सुखसुविधा नसल्याने या जोडप्याने भंडारा गाठले. बाळंतपण सुरळीतपणे पार पडले, सुकेशिनीच्या पोटी भाग्यलक्ष्मी जन्माला आली. मात्र सुकेशिनी आपल्या बाळाला मायेची ऊब देण्यात कमी पडली. यामुळे तिच्या छकुलीला कृत्रिम वातावरणात म्हणजेच इनक्युबेटरमध्ये ठेवण्यात आले. अर्थातच तिची बाळाशी जरी ताटातूट झाली असली तरी बाळाच्या भल्याकरीता हा निर्णय घेणे अत्यंत गरजेचे होते. तर दुसरीकडे सुरेशला आपल्या कन्येचे केंव्हा एकदा दर्शन घेतो असे झाले होते.
वास्तविकत: बाप गरीब असो की श्रीमंत, त्याच्यासाठी त्याची मुलगी राजकन्या असते. तिच्या कोडकौतुकासाठी काहीही करण्याची त्याची तयारी असते. मुलगा जरी वंशाचा दिवा मानला गेला असला तरी घराला घरपण, ममत्व देण्यात मुलींचा हात कोणी पकडू शकत नाही. आजीची आपुलकी,ॠणानुबंध, आईचे वात्सल्य, मावशीची माया,ममता, काकूची कणव, आत्याचा आपलेपणा, बापाची अधिकारवाणी हे सर्वकाही विधात्याने मुलीच्या रुपात समाविष्ट करून तिला तुमच्या पोटी धाडले असते. बापाचा उर्मटपणा कमी करणे असो की भावाला वळण लावणे असो, आईला घरकामात हातभार लावणे अथवा तिला मानसिक आधार देणे असो, हे सर्व गुण मुलींमध्ये उपजत असतात.
एरवी पाषाणह्रदयी असणारे बाप मुलीच्या लग्नात कोपऱ्यात एकटे डोळ्यांच्या कडा पुसतांना आपण नेहमीच अनुभवतो. शिवाय कन्यादान करण्याचे महतपुण्य सर्वांनाच लाभते असेही नाही. सुरेशही आपल्या लाडक्या कन्येच्या स्वागताला उत्सुक होता. कारण त्याच्या दारी लक्ष्मीची चिमुकली पाऊले उमटण्याची पुर्ण तयारी झाली होती. राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली, ती सर्व प्राप्त झाली या झोपडीत माझ्या हे गुणगुणत तो छकुलीची वाट बघत होता.
मात्र दुसरीकडे नियती आणि काळाची अभद्र युती झाली होती. छकुलीची प्रकृती झपाट्याने सुधरत असल्याने दुसऱ्या दिवशी सकाळी सुकेशिनीला बाळासहीत सुट्टी होणार होती. केवळ आजची रात्र कशीबशी काढायची असल्याने ती निश्चिंत होऊन झोपायला गेली होती. मात्र मध्यरात्रीला अनाहुत चाहूल लागल्याने ती दचकून जागी झाली होती. काळाचा भास झाल्याने ती मनोमन हादरली होती. कोणीतरी तिची आणि छकुलीची ताटातूट करत आहे याची अनामिक भिती तिच्या मनात घर करून गेली होती. कडाक्याच्या थंडीतही ती भितीपोटी घामाने डबडबून गेली होती. मात्र अंथरुणात पडून राहण्याशिवाय तिच्याकडे दुसरा पर्याय नव्हता.
तर काळाने आपल्या अंतिम टप्प्यात प्रवेश केला होता. स्पेशल न्युबॉर्न केअर युनिट आणि तिथली ३६ बेड त्याचे लक्ष्य होते. सुदैवाने तिथे केवळ सतरा बालके उपचार घेत होती. मात्र काळाला सतरा काय आणि छत्तीस काय, कशाशी देणेघेणे नव्हते. त्याने वार्डात नजर टाकली, त्या सतरा कोवळ्या जिवांशिवाय तिथे कोणीही नव्हते. ना डॉक्टर ना नर्सेस. तिथे बिनधास्तपणे वावरत काळाने आपली क्रुर योजना आखली. ना तिथे त्याला आडकाठी करणारे, टोकणारे कोणी होते, ना आपात्कालीन प्रसंगी बाळांच्या मदतीला कोणी धाऊन येणारे होते. आपली कामगिरी किती चोख आणि अचूक असते याची काळाला खात्री पटली होती. अखेर घड्याळाने मध्यरात्रीचा दोन वाजण्याचा टोला देताच काळ भानावर आला, त्याने आपले मिशन स्पेशल न्युबॉर्न केअर युनिट तडीस न्यायला सुरूवात केली.
हळुवारपणे तो एका इनक्युबेटरच्या वार्मरमध्ये शिरला. आपल्या प्रभावाने त्याने ज्वाळा निर्माण केल्या आणि कोवळी पाती, रोपटे अमानुषपणे करपण्यास सुरूवात झाली. एवढ्यावरच तो थांबला नाही तर अग्नी नंतर धुरावाटे त्याने कोवळ्या जिवांचा श्वास रोखायचा प्रयत्न केला. सकाळपासून ओव्हरहिटींग झालेले इन्क्युबेटर काळाची साथ लाभताच धडाडून पेटू लागले. कोवळ्या जीवांना वाचविण्याचे प्रण घेतलेले इन्क्युबेटर कोवळ्यांचाच कोळसा करू लागले. अर्थातच ते हतबल, असहाय हाडामांसाचे इवलेसे, निष्पाप गोळे बलाढ्य काळाचा प्रतिकार करणे शक्यच नव्हते. शिवाय कच्याबच्च्यांचा रडण्याचा आवाज तरी किती असणार? काळाने छद्मी हास्य करत आपली दुष्ट कामगिरी फत्ते झाल्याची खात्री केली. जाता जाता आपल्यावर बालंट येऊ नये म्हणून शॉर्ट सर्किटचा आभास निर्माण करून तो हळूच पसार झाला.
एव्हाना आगीने आपले रौद्ररूप धारण केले होते. इतरांना याची खबरबात लागताच एकच हलकल्लोळ माजला. पहिल्या मजल्यावरील आगीने इतरत्र डोकावणे सुरू केल्याने जो तो जीव मुठीत धरून धावायला लागला. प्रचंड अफरातफरी माजल्याने अर्धवट झोपेत असलेल्या सुकेशिनीला जाग आली. ती सुद्धा इतरांसारखी देवाचा धावा करत तळमजल्यावर आली. मात्र शेवटच्या पायरीवर ती थबकली, लगेच भानावर आली, आपली छकुली कुठे आहे, ती सुरक्षीत तर आहे ना, तिला काही झालं तर नाही ना? अशी एक ना असंख्य प्रश्नांची मालिका तिच्या डोक्यात घर करु लागली. मात्र तिला उत्तर तरी कोण देणार होतं? रुग्ण, नातेवाईकांच्या लोंढ्याने तिला फरफटत बाहेर ढकलले होते.
अखेर ठेचाळत, पडझड करत ती रुग्णालयाच्या पटांगणात आली. लगेच तिची नजर पहिल्या मजल्यावर जाताच तिची वाचा बंद पडली. रात्री काळोखाच्या पार्श्वभूमीवर आगीच्या ज्वाळा भयानकपणे उठून दिसत होती. मधातच धुराचे लोंढे आकाशी झेपावत होते. रुग्णांच्या अगतिक, असहाय्यपणे रडण्याने आसमंत दणाणून गेला होता. आत जावे म्हटले तर ना तेवढे त्राण तिच्या शरीरात उरले नव्हते ना आत जायचा मार्ग तिला सुचत होता. अग्निशमन दलाचे जवान आणि उपस्थित लोकांनी क्रुर आगीशी झुंजत काहींना बाहेर काढण्याचा कसोशीने प्रयत्न केला होता. बाहेर काढलेल्या प्रत्येकावर सुकेशिनी आशाळभूतपणे नजर टाकत होती. मात्र तिची छकुली तिच्या नजरेस पडत नव्हती. इतक्यात पहिल्या मजल्यावरून कोणीतरी ओरडले,,, बच्चे जल गये आणि हे ऐकताच सुकेशिनीची शुद्ध हरपली.
क्रमशः,,,,
--------------------------------------------------------
वाचकांना नम्र सूचना,,,
सत्यघटनेवर आधारित या लेखात पात्रांची नावे काल्पनिक आहेत.
*************************************
दि. २९ मे २०२१
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
No comments:
Post a Comment