Saturday, May 28, 2022

बेबी ऑफ सुकेशिनी, भाग ०१

            बेबी ऑफ सुकेशिनी, भाग ०१
                   डॉ अनिल पावशेकर
********************************
साल २०२१, दि. ०९ जानेवारी, स्थळ जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा आणि वेळ होती मध्यरात्रीची. मार्गशीर्ष अमावस्या तोंडावर आली होती आणि क्रुर काळ आपल्या सावजासाठी टपून होता. सर्वकाही शांत होताच काळाने वैनगंगेचे पात्र ओलांडून भंडारा शहरात प्रवेश केला होता. महामार्गावरील तुरळक वाहतूक वगळता तलावांचा जिल्हा म्हणून प्रसिद्ध असलेले हे शहर निद्रादेवीच्या अधीन झाले होते. काळ झपाझप पाऊले टाकत आपल्या लक्ष्याकडे निघाला होता. मार्गातील पिंपळ, चिंचेचे मोठाले वृक्ष आणि त्यावरील अतृप्त आत्मे काळाच्या दहशतीने गारठून गेले होते.

मात्र मानवाचे विश्वासू मित्र असलेले शहरातील श्वान काळाच्या मार्गात खोडा बनून उभे राहिले होते. आपल्या भेसूर ओरडण्याने ते इतरांना सावध करत होते. तसेही एवढ्या काळकुट्ट रात्री, कडाक्याच्या थंडीत भटक्या कुत्र्यांचे रूदन ऐकायला रस्त्यांवर चिटपाखरूही नव्हते. सर्वकाही सारीपाट काळाच्या मर्जीनुसार आखला गेला होता. आपले सावज नजरेच्या टप्प्यात येताच काळ क्षणभरासाठी थबकला. एक जळजळीत कटाक्ष त्याने भंडारा जिल्ह्यातील सर्वात मोठ्या शासकीय रुग्णालयावर टाकला. आपल्या कामगिरीची परत एकदा उजळणी केली आणि मोहीम फत्ते करायची मनोमन तयारी केली.

रुग्णालयाच्या मुख्य प्रवेशद्वारावर काळूराम नावाचा पहारेकरी पेंगत होता. मात्र मानवाच्या सुरक्षेच्या कल्पना किती तुच्छ आणि तकलादू आहेत हे पाहून काळाने मनोमन स्मित केले. काळूरामला कोणीतरी आत शिरल्याचा भास झाला मात्र झोपेच्या तंद्रीत तो अरिष्ट ओळखू शकला नाही. काळाने आकस्मिक कक्ष न्याहाळला मात्र तिथे सगळं सुनसान होतं. वर्हांड्यातून समोर जाताच त्याला पुरुष रूग्णांच्या वार्डात काही वृद्ध, अगतिक, दुर्धर व्याधींनी ग्रस्त, प्राणांतिक वेदनेने तडफडणारे रुग्ण त्याची डोळ्यात तेल घालून वाट पाहतांना आढळले.

मात्र काळाची आजची निवड जगावेगळी होती. शस्त्रक्रिया वार्डातही फारसे वेगळे चित्र नव्हते. कित्येक रुग्ण आपला नंबर कधी लागणार यासाठी ताटकळत पहुडले होते तर शस्त्रक्रिया झालेल्यांना घरादाराची ओढ लागली होती. ऑर्थोपेडीक वार्डातील एकंदरीत परिस्थिती पाहता मानवाला जगण्यासाठी कोणत्या दिव्याला सामोरे जावे लागते याची काळाला कल्पना आली. सृष्टीकर्त्याच्या रचनेला मानवाने विज्ञानाच्या सहाय्याने कितीही वाकुल्या दाखवल्या असल्या तरी विज्ञान आपलं अजुनही काही वाकडं करू शकत नाही हे समजल्याने काळाची मान गर्वाने आणखी उंचावली. कारण आज काळही आला होता आणि वेळही आली होती.

तळमजल्यावर फेरफटका मारल्यावर काळाने पहिल्या मजल्याकडे वाट धरली. खरेतर हाच पहिला मजला त्याची युद्धभूमी होती. तसेही सरकारी दवाखाने काळासाठी अपरिचित तर नव्हतीच. शिवाय इथे कितीही  धुमाकूळ घातला तरी बोलणारे कोणीही नव्हते. सोबतच मृत्युचे सरकारी सापळे बिनदिक्कतपणे तिथे पहिलेच स्थिरावले होते. गरज होती फक्त एका निमित्ताची, केमीकल रिॲक्शन सुरू व्हायची. अखेर पहिल्या मजल्यावर येताच काळाचे काऊंटडाऊन संपले. आता फक्त त्याला महिला, माता वार्ड ओलांडायचा होता. मात्र इथेच काळाची चाल मंदावली होती. त्याने स्मृती जागवताच भुतकाळात कुठेतरी स्त्री शक्तीने आपणास हतबल केले होते याची त्याला जाणीव झाली.

माता वार्डातही सामसूम होती. मात्र त्याची नजर सुकेशिनी वर पडताच काळ थोडा थबकला. एक अनामिक भावनेने त्याच्या पायाला ब्रेक लागले होते. कधी नव्हे ते आज या भयाण रात्री काळाची पाऊले जड झाली होती. फिक्कट पिवळ्या प्रकाशातही त्या माऊलीच्या तेजस्वी चेहऱ्याने काळाचा मार्ग रोखला होता. मात्र त्या माऊलीच्या पुढ्यात काय वाढून ठेवले आहे या कल्पनेने खुद्द काळही शहारला. आपल्या हस्ते कोणते पातक होणार आहे याची जाणीव होताच त्याला स्वतःला लाज वाटली. पहिल्यांदाच काळाच्या काळजाला भोके पडली होती. काळाचे क्रुर हात, राक्षसी पाऊले आणि निष्ठूर मन त्याच्याशी आज बंडखोरीच्या पावित्र्यात होते.

इकडे काळाच्या काळजात घालमेल सुरू होती तर तिकडे सुकेशिनीला तिचे अंतर्मन काहीतरी विपरीत घडणार याची चाहूल देत होते. तरीपण ती निश्चिंत होती. आपल्या नवजात बाळासाठी तिचा पान्हा अहोरात्र झिरपत होता. मात्र तिच्या नशिबात काही वेगळेच लिहिले होते. झोपेत असुनही तिला आपल्याकडे कोणीतरी नजर रोखून पाहत असल्याचा भास झाला आणि खाडकन तिला जाग आली. मान वळवताच कोणीतरी वर्हांड्यातून आपल्याला न्याहाळते आहे असे वाटले. मात्र डोळे फाडून पाहिले असता तिथे कोणीही नव्हते. आजुबाजुला नजर फिरवताच इतर माता पांढऱ्याशुभ्र बिछान्यावर लाल ब्लॅंकेट ओढून निजलेल्या दिसल्या. मनाची कशीबशी समजूत घालत ती पुन्हा एकदा बिछान्यात शिरली. इतक्यात हळुवारपणे तिच्या कानात तिच्या छकुलीचा क्षीण,आर्त आवाज घुमला, "आई मला वाचव, आई मला वाचव".
क्रमशः,,,,,
------------------------------------------------------
वाचकांना नम्र सूचना,,,
लेखातील सर्व पात्रे काल्पनिक आहेत.
**********************************
दि. २८ मे २०२१ 
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++

No comments:

Post a Comment

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...