Wednesday, September 28, 2022

कायदे मे रहोगे तो फायदे मे रहोगे!

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
    *कायदे मे रहोगे तो फायदे मे रहोगे!*
               *डॉ अनिल पावशेकर*
*********************************
नुकतेच भारत आणि इंग्लंड दरम्यान महिलांची एकदिवसीय क्रिकेट मालिका पार पडली. खरेतर ही मालिका भारताची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीच्या निवृत्तीमुळे प्रकाशझोतात आली होती परंतु शेवटच्या सामन्यात आयसीसीच्या मंकडींग नियमाने चांगलेच वादळ निर्माण झाले आहे. भारताची अष्टपैलू खेळाडू दिप्ती शर्मा आणि इंग्लंडची चार्ली डीन यांच्यात रंगलेल्या मंकडींग नाट्याने अवघे क्रिकेट विश्व ढवळून निघाले आहे. खेळभावना महत्वाची की नियमाला धरून चालायचे यावर वादविवादाला तोंड फुटले आहे.

क्रिकेट म्हटले की फलंदाज गोलंदाज आलेच, मात्र काही प्रमाणात कसोटी सोडले तर एकदिवसीय सामने असो अथवा टी ट्वेंटी, फलंदाजांना झुकते माप देण्यात आले आहे. तर गोलंदाज म्हणजे निव्वळ मार खाणारे प्राणी असा समज झाला आहे. तरीपण क्रिकेट मध्ये गोडी कायम रहावी फलंदाज, गोलंदाज दोघांनाही समान संधी मिळावी म्हणून आयसीसी वेळोवेळी नियमांत सुधारणा करत असते. अर्थातच सुधारणा सर्वांनाच हव्या असतात मात्र त्याची सुरुवात आपणापासून नको असे सर्वांनाच मनोमन वाटत असते. शिवाय आपल्या चुकांसाठी आपण सर्वोत्तम वकिल असतो तर दुसऱ्यांच्या चुकीच्या वेळी आपण न्यायमुर्ती असतो.

अगदी हाच प्रकार अंतिम सामन्यात दिसून आला. इंग्लंडच्या चार्ली डीनला वारंवार सूचना देऊनही ती नॉन स्ट्राईकर्स एंडला गोलंदाजांची ॲक्शन पुर्ण व्हायच्या पहिलेच धावत सुटायची. मात्र दिप्ती शर्माने तिला धडा शिकवत बाद केले आणि यावर तिसऱ्या पंचाने सुद्धा शिक्कामोर्तब केले. मात्र सहजासहजी हार मानतील तर ते इंग्रज कसले. एकतर चोर आणि वरून शिरजोर होत त्यांनी भारतीय संघावर खिलाडूवृत्ती नसल्याचा आरोप केला. मात्र हा प्रकार म्हणजे सौ सौ चुहे खाके बिल्ली हज को चली सारखा होता. कारण २०१९ च्या विश्वचषकात अंतिम सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंडच्या पुरुष संघाने लबाडी करत जेतेपद पटकावले होते. त्यावेळी किवी कर्णधार केन विलीयम्सने अजिबात थयथयाट न करता शांतपणे, संयमाने निकाल स्विकारला होता.

अर्थातच त्यावेळी इंग्लिश संघाच्या क्षमतेची फुशारकी मारणारे आज भारतीय संघाच्या क्षमतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. वास्तविकत: भारतीय महिला संघाने विस वर्षाच्या इतिहासात प्रथमच इंग्लंडला व्हाईट वॉश देण्याची कामगिरी बजावली आहे. मात्र हा पराभव जिव्हारी लागल्याने इंग्लिश संघाचे पित्त खवळले आणि चोराच्या उलट्या बोंबा प्रमाणे भारतीय दिग्वीजयाला गालबोट लावले आहे. चार्ली डीन बाद होताच तिला रडू कोसळले, मात्र मैदानावर मर्दुमकी गाजवायची असते. तिथे रडून फडून काहीच फायदा होत नसतो. रडण्याने तुम्हाला फारतर प्रेक्षकांची सहानुभूती मिळू शकते, विजय नाही. मैदानावर रडायचं नाही तर लढायचं असतं हे कोणीतरी इंग्लिश संघाच्या कानात सांगायला हवं.

तसंही इंग्लिश संघ आणि खेळभावना यांचा संबंध येतोच कुठे? मग तो सौरभ गांगुली असो की युवराजसिंग असो, क्रिकेट मध्ये इंग्रजांची उबडी करून घुबडी ठेवल्याशिवाय ते वठणीवर येत नाही हा इतिहास आहे. खेळपट्टीवर मुत्र विसर्जन करणे असो अथवा मैदानावर मद्यप्राशन करून गोंधळ घालणे असो, इंग्लंड संघाचा कोळसा उगाळावा तितका तो काळाच असतो. तसंही भारतावर राज्य केल्याच्या सरंजामी मानसिकतेला स्वतःच्या अंगणात म्हणजेच लॉर्डसवर पराभूत होणे कसे काय पचणार? मात्र त्यांचा सुंभ जळाला तरी पीळ कायम आहे. तुलनेने छोट्या भारतीय संघाकडून पराभव ते मनाने स्विकारू शकले नाहीत. एव्हाना हर छोटा एकदिन बडा होता है, हे त्यांच्या ध्यानात आले असेलच.

क्रिकेटच्या एकदिवसीय आणि टी ट्वेंटीत प्रेक्षकांचे मनोरंजन म्हणा अथवा व्यावसायिक हितसंबंध म्हणा बहुतांशी नियम फलंदाजांना अनुकूल आहेत. गोलंदाजांची अवस्था तर माय जेवू घालत नाही, बाप भीक मागू देत नाही अशी असते. निल आर्मस्ट्राँगला चंद्रावर पहिले पाऊल ठेवतांना जितक्या वेदना झाल्या नसतील त्याच्या कैकपट वेदना गोलंदाजांना शेवटचं पाऊल टाकताना होत असतात. गोलंदाजांचा एक नोबॉल सामन्याचे भवितव्य ठरवून जातो. कधी कधी गोलंदाजांना पाच बळी मिळवूनही योग्य ते कौतुक त्याच्या वाट्याला येत नाही परंतु एक सेमी अथवा इंचाच्या नोबॉल ने तो लगेच खलनायक ठरवल्या जातो. मग गोलंदाजांना एवढे काटेकोर नियम आहेत तर फलंदाजांनी का म्हणून त्यांना आखून दिलेली लक्ष्मणरेषा ओलांडावी? 

सामना सुरू असताना जगभरातील लाखो करोडो क्रिकेटवेडे डोळ्यात तेल घालून सामना बघत असतात. मग फलंदाज ऊतू जात असेल तर गोलंदाजांनी मंकडींग केले तर काय वाईट आहे? शिवाय ते आयसीसीच्या नियमांत सुद्धा आहे. क्रिकेट मध्ये जय पराजयाशी खेळाडू, संघ आणि त्यांच्या देशाची प्रतिष्ठा पणाला लागली असते. शिवाय कोणताही संघ जिंकण्यासाठीच खेळत असतो. यांत खेळभावना जरुर जोपासली जावी याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. मात्र खेळभावनेच्या बदल्यात जर जयपराजय निश्चिती होत असेल तर ते कसे काय खपवून घेणार? 

ज्यांना केवळ खेळभावनाच पाहिजे त्यांनी क्रिकेट तरी कशाला खेळावे? त्यांनी क्रिकेट ऐवजी सरळसरळ आदा मादा कौन पादा खेळावे. प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर खेळात सुसुत्रता यावी, प्रत्येक संघ अथवा खेळाडूंना योग्य तो न्याय मिळावा यासाठी नियमांचे बंधन असते आणि त्यामुळेच खेळाची गोडी टिकून राहते. मात्र नियमाआडून रडीचा डाव खेळणे योग्य नव्हे. मग तो कोणताही संघ असो वा खेळाडू. यानिमित्ताने कायदे मे रहोगे तो फायदे मे रहोगे हे सर्वांनी ध्यानात ठेवणे गरजेचे आहे.
**********************************
दि. २८ सप्टेंबर २०२२
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
**********************************

Monday, September 26, 2022

हैद्राबादेत कांगारूंचा करेक्ट कार्यक्रम

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
  *हैद्राबादेत कांगारूंचा करेक्ट कार्यक्रम*
             *डॉ अनिल पावशेकर*
*********************************
नॉर्वेला मध्यरात्रीच्या सूर्याचा देश म्हणतात. मात्र काल संध्याकाळी टीम इंडियाच्या सू‌र्याने कांगारूंना दिपवून टाकत त्यांचा करेक्ट कार्यक्रम करून टाकला. अत्यंत चुरशीच्या लढतीत सूर्यकुमार यादव आणि विराटने घणाघाती प्रहार करत कांगारूंचा बिमोड केला. काटेकोर गोलंदाजी आणि दक्ष क्षेत्ररक्षणाचे चक्रव्यूह भेदत टीम इंडियाने ही मालिका २/१ अशी आपल्या खिशात टाकली आहे.

झाले काय तर आशिया चषकाच्या कटू आठवणी पुसून काढण्यासाठी टीम इंडियाला ही मालिका जिंकणे अत्यंत गरजेचे होते. त्यातच मोहालीच्या सामन्यात अवाढव्य धावसंख्या करूनही गोलंदाजांनी सामन्याची माती करून टाकली होती. भुवनेश्वर कुमारचा सध्याचा फॉर्म पाहता त्याला आपली माती आपली माणसं म्हणणे योग्य ठरेल. तर नागपूरची लढत म्हणजे खऱ्या अर्थाने लकी ड्रॉ होती. कारण एवढ्या छोटेखानी सामन्यात कोणताही संघ बाजी मारू शकला असता. परंतु रोहीतच्या बलदंड फलंदाजीने आपण तो सामना काढला. त्यातही रोहीतची फटकेबाजी मंत्रमुग्ध करणारी होती. रोहीतच्या बॅट बॉलचा मधुचंद्र कधी संपूच नये असे वाटत होते मात्र सामना केवळ आठ षटकांचा असल्याने आपला हिरमोड झाला.

खरेतर आयसीसीने रोहीतच्या सहजसुंदर आणि उत्तुंग षटकारांना सहा ऐवजी आठ धावा द्यायला हव्या एवढे ते फटके नयनरम्य असतात. काय ती अचाट ताकद, काय ते अचूक टायमींग सगळं कसं ओक्के मंधी असतं. हैद्राबादचा सामना गाजवला तो दोन्ही बाजूंच्या फलंदाजांनी. प्रमुख गोलंदाजांची मनसोक्त धुलाई करत त्यांनी गोलंदाजांना चाळीशी पार करायला लावली. आपल्याकडे भुवनेश्वर कुमार खरेतर ॲसेट पेक्षा लायबलीटी झाला आहे. भुवी गोलंदाजीला येताच विरोधी फलंदाज तुने मारी एंट्री और दिलमे बजी घंटी यार असे नक्कीच म्हणत असणार. भलेही भुवीने या सामन्यात खतरनाक कॅमरून ग्रीन चा बळी घेतला असेल, तरीपण त्याचे तीन षटकांत ३९ धावा देणे पचायला जड जातंय. फारतर याला घर जाळून कोळसा विकणे एवढे जरुर म्हणू शकतो.

कालच्या सामन्यात इतर गोलंदाजांत बुमराहला सुद्धा कांगारूंनी तडाखा देत त्याला पन्नास धावा मोजायला लावल्या. केवळ अक्षय पटेल कांगारूंना वेसण घालण्यात यशस्वी ठरला. पटेलच्या फिरकीची अक्षरं तिन्ही सामन्यात कांगारूंना कळलीच नाही. अक्षरने तिन्ही लढतीत कांगारूंना अक्षरशः छळले. उर्वरित पांड्या आणि हर्षल पटेल म्हणजे बनी तो बनी नहीं तो अब्दुल गनी सारखे काम आहे. मात्र हे दोघेही भुवीपेक्षा कमी अनुभवाचे असल्याने आंधळी पेक्षा तिरळी बरी असे म्हणावेसे वाटते. त्यातच भुवीला दुसरे षटक द्या अथवा अठरावे, एकोणिसावे षटक द्या , तो सातत्याने धावांचा रतीब घालतो आणि विरोधी संघाला सामन्यात कमबॅक करायची संधी देतो. भुवीच्या हातात चेंडू येताच भारतीय पाठीराख्यांची अवस्था भिक नको पण कुत्रा आवर अशी होते.

भारतीय संघाची फलंदाजी सध्यातरी समाधानकारक आहे. मात्र गोलंदाजांचे उष्टे काढतांना त्यांच्या नाकी नऊ येत आहेत. खरेतर एकवेळ कांगारू चौदाव्या षटकांत सहा बाद ११७ वर थबकले होते परंतु भारतीय गोलंदाजांनी सढळ हाताने मदत करत धावसंख्या फुगण्यास हातभार लावला. प्रत्युत्तरादाखल आपलाही संघ सुरवातीला अडखळला. राहुल रोहीत स्वस्तात निपटताच संंघ दडपणाखाली आला. मात्र यावेळी विराट आणि सूर्यकुमार ने कांगारूंची दाळ शिजू दिली नाही. विशेषतः सूर्यकुमारने अफलातून खेळी करत सामना आपल्याकडे खेचून आणला. या जोडीने एनआयए ने पीएफआय वर टाकलेल्या धाडी पेक्षा जास्त धाडी कांगारूंवर टाकत विजय दृष्टीपथात आणला होता. मात्र कहानीत अजूनही ट्वीस्ट बाकी होते.

यादवचा सूर्य मावळताच चौकार षटकारांचा दुष्काळ पडला. आपल्या संघाने पांढरे निशाण तर फडकवले नाही ना, एखादा अदृश्य हात आपल्या संघाला सामना शेवटच्या षटकांत नेण्याचा आदेश तर देत नाही ना असा मनात संशयकल्लोळ निर्माण झाला. मात्र त्याला कांगारूंची कधीही हार न मानण्याची चॅम्पियन वृत्ती कारणीभूत आहे असे वाटते. सूर्यकुमार बाद होताच विराटचे टायमींग चुकू लागले होते. तर कांगारूंनी पांड्याची पुरती नाकेबंदी करून टाकली होती. पांड्या साठी ऑफला विशेषतः एक्स्ट्रा कव्हरला टाईट सिक्युरिटी, सोबतीला वाईड यॉर्कर टाकून त्याला संपूर्णतः जखडून टाकले होते. ऐनवेळी विराट बाद झाल्याने कांगारूंच्या अपेक्षा पुन्हा एकदा पल्लवित झाल्या होत्या. मात्र पांड्याने वाईड यॉर्करच्या फटीतून तीर सोडत एकदाचा सामना संपवून टाकला.

सध्या जगभरात दहाबारा देश क्रिकेट खेळतात, तरीपण चॅम्पियन संघाचे बिरूद फक्त कांगारूंना लागले आहे आणि त्याचे कारणही तसेच आहे. ही मालिका जरी कांगारूंनी गमावली असली तरी त्यांच्या विजिगिषू वृत्तीचे कौतुकच करावे लागेल. पहिल्या सामन्यात ज्या धडाडीने त्यांनी दोनशे धावा ओलांडल्या ते निश्चितच कौतुकास्पद आहे. तर शेवटच्या सामन्यात त्यांनी भारतीय संघाला धावांसाठी झगडत ठेवले. विशेषतः कांगारूंनी लावलेले क्षेत्ररक्षण पाहण्यासारखे होते. त्यांनी रोहीत, सूर्यकुमार आणि विराटचा नेमलेल्या जागी झेल देण्यास भाग पाडले. शिवाय अंतिम सामना शेवटपर्यंत नेण्यात ते यशस्वी ठरले. भारतीय संघाबाबत बोलायचे झाले तर भुवी आपल्यासाठी गोलंदाजीतील भळभळती जखम आहे. एक अकेला देवेंद्र क्या करेगा प्रमाणे एक अकेला बुमराह क्या करेगा हे संघनिवड करतांना विचारात घ्यावे लागेल.  फलंदाजीत जरी आपण मध्यमवर्गीय असलो तरी गोलंदाजीत आजही दारिद्र्य रेषेखालीलच आहोत याचेच भान टी ट्वेंटीच्या विश्वचषकासाठी जातांना ठेवावे लागेल.
**********************************
 दि. २६ सप्टेंबर २०२२
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++++

Wednesday, September 21, 2022

एकोणीसावे षटक धोक्याचं

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
       *एकोणवीसावं षटक धोक्याचं*
              *डॉ अनिल पावशेकर*
*********************************
१९६४ सालची सोळावं वरीस धोक्याचं ही लावणी आपल्या चांगल्या परिचयाची आहे. अर्थातच हार्मोन्सच्या केमीकल लोच्या ने शारीरिक मानसिक बदल, विकास होतो आणि याच वयात नवतरुणांना जास्त जोपायचं असतं. अगदी असंच काहीसं टीम इंडियाचं एकोणवीसावे षटक धोक्याचं झालेलं आहे. हातातोंडाशी आलेला विजय विरोध संघ १९ व्या षटकांत पळवत असल्याने आपला संघ हतबल झाला आहे. निश्चितच केवळ शेवटच्या षटकातच चांगले खेळून सामना जिंकला जातो असे नसले तरी जिंकायची शेवटची लाईफ लाईन तिथेच असते आणि नेमके याच क्षणी आपले गोलंदाज गळपटू लागले आहे. पाक, लंका आणि आता ऑस्ट्रेलिया विरुद्ध आपण १९ व्या षटकांत सामना गमावून बसलो आहोत.

झाले काय तर आशिया चषकाच्या नामुष्की नंतर कांगारू विरूद्ध लढतीत भारतीय गोलंदाज काही शिकले असतील असे वाटले होते. मात्र कालचा सामना पाहता आपले गोलंदाज हम नहीं सुधरेंगेची प्रतिज्ञा केलेले दिसताहेत. दोनशेहून जास्त धावा करूनही आपण हरत असेल तर काय म्हणावे अशा गोलंदाजीला. त्यातही भुवनेश्वर कुमार, उमेश यादव आणि चहल सारखे अनुभवी गोलंदात धावांच्या खिरापती वाटत असेल तर सामना कोण जिंकून देणार? खरेतर विरोधी संघांनी भारतीय गोलंदाजीचा चावून चोथा केलेला आहे. पुर्वीचा आपल्या स्वींगने बळी टिपणारा भुवी आता फारतर वासरात लंगडी गाय शहाणी एवढा राहीला आहे.

भुवीचे सध्याचे प्रदर्शन पाहता त्याला डेथ ओव्हर स्पेशलीस्ट म्हणणे धाडसाचे ठरेल. एखादी जलवाहिनी फुटून कारंजी उडावी तशी त्याची धावावाहीनी फुटून संघाची नाव एकोणवीसाव्या षटकांत डुंबून जाते. कधी कधी तर संशय येतो की ज्याप्रमाणे राहुल मोदींचा स्टार प्रचारक आहे, त्याचप्रमाणे भुवी विरोधी संघाचा स्टार खेळाडू तर नाही ना. त्यामुळे यापुढे भुवी १९ व्या षटकांत सामना काढून देईल ही एकप्रकारची अंधश्रद्धा वाटते. तसेही आपल्याकडे बहुमजली इमारतीत तेरावा मजला केवळ अंधश्रद्धेमुळे नसतो. मग १९ वे षटक टाकतांना आपले गोलंदाज वरचा मजला का बरे वापरत नसणार हा प्रश्नच आहे.

केवळ भुवी कशाला, उमेश यादवने सुद्धा कालच्या सामन्यात निराशा केली. खरेतर उमेश यादवचा या संघात समावेश नक्कीच धक्कादायक होता. त्याच्या पहिल्याच षटकात कांगारूंनी धडाकेबाज फलंदाजी करून त्याची हवा काढून टाकली. दुसऱ्या षटकांत उमेशने दोन बळी जरूर टिपले परंतु त्यात फलंदाजांचा सिंहाचा वाटा होता. तो प्रमुख गोलंदाज म्हणून खेळवला गेला असला तरी तो आपली चार षटके सुद्धा पुर्ण टाकू शकला नाही. सोबतच चहलच्या फिरकीची जादू फिकी पडल्याचे जाणवते आहे. आयपीएल स्टार हर्षल पटेलची कामगिरी त्याला स्वतः ला सुद्धा पटणार नाही एवढी सुमार होती. फक्त अक्षर पटेलने थोडीफार लाज राखली पण इतरांचे काय हा यक्षप्रश्नच आहे.

प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर केवळ जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सामी हेच सध्या आपल्याकडे जागतिक स्तराचे गोलंदाज आहे. इतर वेगवान गोलंदाजांचा विचार केला तर ज्यांच्या कडे वेग असतो त्यांच्या कडे अचूकता नसते, अचूकता असली तर वेग नसतो. तरीपण दिपक चहर, शार्दुल ठाकूर, टी नटराजन यांचा मुरब्बा होऊ नये याची बीसीसीआयने दक्षता घेतली पाहिजे अन्यथा या गोलंदाजांच्या भरवशावर आगामी टी ट्वेंटीचा वर्ल्डकप जिंकणे आपल्यासाठी दिवास्वप्न ठरेल.

मोहालीच्या सामन्यात कांगारूंनी ज्याप्रकारे माहौल केला ते पाहता आपल्या गोलंदाजांना संपूर्ण विस षटके सामन्यावर पकड ठेवणे गरजेचे आहे. सोबतच कॅमरून ग्रीन, स्टीव्ह स्मिथ आणि मॅथ्यू वेडला जीवदान देऊन आपल्या क्षेत्ररक्षकांनी आपल्या पायावर धोंडा मारून घेतला. खरेतर भारतीय क्षेत्ररक्षक परोपकाराच्या बाबतीत हिशोब एकदम चोख ठेवतात. तुम्ही आमचे दोन झेल सोडले काय, आम्ही तुमचे तीन झेल सोडतो. निश्चितच याबाबत तरी आपल्याला फेअर प्ले अवार्ड जरुर मिळू शकतो. कालच्या सामन्यात आपल्या फलंदाजांनी उत्कृष्ट प्रदर्शन करत गोलंदाजांना चांगली संधी दिली होती. मात्र कांगारूंनी प्रारंभ ते शेवटपर्यंत टॉप गिअरमध्ये फलंदाजी करत टीम इंडियाचे मनसुबे उधळून लावले.

तीन सामन्यांच्या मालिकेत आपला संघ माघारला असला तरी आपल्याकडे सुधारण्याची संधी नक्कीच आहे. मात्र यात प्रामुख्याने जबाबदारी गोलंदाजांची आहे. नाही तर आपल्याला एकतर बुमराहचे क्लोनींग करून दोनतीन बुमराह तयार करावे लागतील किंवा मोदीजींना सांगून आफ्रिकेतून चीत्यांसोबत दोन चार वेगवान गोलंदाज मागवावे लागतील. अथवा रोहीत शर्माला भारत जोडो यात्रेसारखी अच्छे बॉलर खोजो यात्रा काढावी लागेल. यातील गंमतीचा भाग जरी सोडला तरी टीम इंडिया आयसीसीच्या चषकापासून चार हात दूर का आहे याचा गांभीर्याने विचार करावा लागेल. जागतिक स्तरावरचे फलंदाज, गोलंदाज संघात नसतील तर आयपीएलच्या काजव्यांकडून सूर्यप्रकाशाची अपेक्षा का म्हणून बाळगावी.
**********************************
दि. २१ सप्टेंबर २०२२
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++++

Monday, September 5, 2022

सुपर सामन्यात पाक संघ सुपरहिट

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
       *सुपर सामन्यात पाक सुपरहिट*
               *डॉ अनिल पावशेकर*
*********************************
आशिया चषकातील सुपर फोर सामन्यात पाकने परंपरागत प्रतिद्वंदी भारताला नमवून साखळी फेरीतील पराभवाचा वचपा काढला आहे. भारतीय संघाने चांगली धावसंख्या उभारुनही गोलंदाजी निष्प्रभ ठरल्याने आपल्या संघाला पराभूत व्हावे लागले. अत्यंत अटीतटीच्या लढतीत पाक फलंदाजांनी सैरभैर झालेल्या भारतीय गोलंदाजीचा बिमोड करत विजय मिळवला आहे. फलंदाजांनी कमावले तर गोलंदाजांनी गमावले असे एकंदरीत या सामन्याचे वर्णन करता येईल.

खरेतर आपला पराभव होताच आपल्या संघातील उणीवा स्पष्ट दिसायला लागल्या आहेत आणि याची सुरुवात होते संघ निवडी पासून. प्रतिष्ठेच्या आशिया चषकात आपण केवळ तीन वेगवान गोलंदाज घेऊन खेळतो ही एक प्रकारची गंमतच आहे. त्यातही आवेश खान आणि अर्शदिपसिंग सारखे काच्चा बादाम असल्यावर आनंदी आनंद. वास्तविकत: आपल्याकडे मो.सामी, मो.सिराज, शार्दुल ठाकूर, दिपक चहर सारखे फिनिश्ड प्रॉडक्ट असतांना आवेश, अर्शदिप सारखा कच्चा माल आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत उतरवायचाच कशाला? त्यातही हे दोघे द्विपक्षीय मालिकेत चालून गेले परंतु विश्वचषकाचे बोन्साय असलेल्या आशिया चषकात नेमके किती चालतील हा प्रश्नच आहे.

दुष्काळात तेरावा महिना असल्यासारखे दुर्दैवाने जडेजा जायबंदी झाला. तर अनुभवी आणि क्रिकेट कारकिर्दीत एकंदर साडेसहाशेच्यावर बळी टिपणारा अश्विन ड्रेसींग रुममध्ये आराम करतोय. किंबहुना संघ व्यवस्थापनाने त्याला दुबईच्या संग्रहालयात ठेवायचा मानस केलेला असावा. मोजक्याच साधनांचा मेळ साधत रोहीतला पाकचा मुकाबला करायचा होता. त्यामुळे त्याने निव्वळ चार गोलंदाज आणि अष्टपैलू हार्दिकवर विश्वास ठेवला आणि इथेच थोडा घोळ झाला. प्रमुख किंवा अस्सल पाच गोलंदाजानंतर हार्दिकची गोलंदाजी म्हणजे आयसींग ऑन दी केक असते. मात्र जेव्हा तो प्रमुख पाच गोलंदाज म्हणून खेळवला जातो तेव्हा त्याची कामगिरी दारिद्र्य रेषेखालील असते.

भारतीय फलंदाजीचे चित्र निश्चितच आशादायी आहे. या सामन्यात रोहीत आणि विराट अगदी त्यांच्या नावारुपाला जागत खेळले. विशेषतः सलामीला रोहीत राहुलने पाकवर त्वेषाने हल्ला करत सामन्याचा झकास प्रारंभ करून दिला होता. मात्र राहुल चांगली फलंदाजी करतोय म्हणजे ते धावपट्टी फलंदाजीला पोषक असल्याचे संकेत होते. म्हणूनच धावसंख्या कमीतकमी दोनशेच्या टप्प्यात राहील अशी अपेक्षा होती. मात्र चितलं ते घडत नसतं आणि झालेही तसेच. सलामीवीरांनी दामटलेल्या फेरारीला ब्रेक लागताच टीम इंडियाने धक्का स्टार्टचे रुप घेतले. विराटने वेळोवेळी धावांचे पेट्रोल टाकून विस्कटलेली फलंदाजी सावरली. तरीपण सुर्यकुमार, रिषभ, पांड्या हे शोभेचे बाहुले ठरले तर दिपक हुड्डाकडे तोकडा वेळ असल्याने त्याला मर्यादा आल्या.

ज्या मध्यफळीवर आपल्याला गर्व होता तिच कोसळल्याने दोनशे धावा म्हणजे "दुबई बहोत दूर है" अशी परिस्थिती निर्माण झाली होती. खरेतर रिषभ पंतचा प्रवास ब्लॉकबस्टर ते बुजगवाण्याकडे झाल्याने आपल्या संघाला त्याचा चांगलाच फटका बसला. आतातर रिषभ पंतने "सोनेरी संधीचे मातेरे कसे करायचे" याचे कोचिंग क्लासेस घ्यायला हवे. पाकने रिषभला लेगवर गोलंदाजी करत त्याचे पाय बांधून ठेवले आणि उतावीळ होत त्याने आपली विकेट फेकत बेजबाबदारपणा दाखवून दिला. गत सामन्यातील हिरो पांड्या आला कधी, गेला कधी कळलेच नाही . अखेर हुड्डा, विराट परतताच आपली फलंदाजी संकुचली. नशीब समजा शेवटच्या षटकांत फखर झमनने शेजारधर्म निभावत आपल्याला दोन चौकारही बहाल केले आणि रवी बिश्नोईचा झेलसुद्धा सोडला म्हणून आपण १८० पार करू शकलो.

पाकला रोखण्यासाठी बाबर आणि रिझवानला थोपवण्याची मोठी कामगिरी भारतीय गोलंदाजांवर होती. त्यातही बाबर लवकरच गळाला लागल्याने भारतीयांच्या आशा बळावल्या होत्या. मात्र रिझवानने जीब्राल्टरचा खडक बनून भारतीय आशा अपेक्षा धुळीस मिळवल्या. भुवी, अर्शदिप आणि रवी बिश्नोई ने प्रारंभी सुरेख मारा करत सामना जीवंत ठेवला. मात्र त्यामानाने चहल पांड्याला सुर गवसला नव्हता. वर फारशी पडझड न झाल्याने हळूहळू भारतीय गोलंदाजीची धार बोथट झाली आणि इथेच आपले आक्रमण ढेपाळल्याने पाकचा विजयपथ सुकर होत गेला. त्यातच बिश्नोई भुवीने करून सरून भागले अन वाईड ला लागले सारखी वाईट गोलंदाजी करत भारताच्या उरल्यासुरल्या आशा संपुष्टात आणल्या.

कधी नव्हे ते या सामन्यात कर्णधार रोहीत गोंधळल्या सारखा वाटला. निष्प्रभ गोलंदाजीने त्याच्या चिंता वाढविल्या होत्या तर ऐन मोक्याच्या वेळी अर्शदिपने धोकादायक आसिफ अलीचा झेल सोडून पाकच्या फखर झमनला रिटर्न गिफ्ट दिले. खरोखरच या सामन्यात भारत पाक क्षेत्ररक्षणाच्या बाबतीत जुळी भावंडं शोभत होते. निश्चितच या सामन्यात पाक संघ विजयाचा हकदार होता‌. रोहित राहुलच्या धडाकेबाज प्रारंभानंतरही पाक गोलंदाजांनी जबरदस्त कमबॅक करत भारतीय फलंदाजांना हात मोकळे करू दिले नाही. अन्यथा आपली सुरूवात पाहता सहजपणे दोनशे धावा झाल्या असत्या. 

मात्र आता पश्चात्ताप करून फायदा नाही. चहलला आराम देऊन एकतर अश्विन किंवा अक्षर पटेलला उर्वरित सामन्यात संधी द्यावी. सोबतच बेभरवशाच्या रिषभ पंत ऐवजी ओल्ड इज गोल्ड दिनेश कार्तिकला संघात स्थान द्यावे. शिवाय पाच तज्ञ गोलंदाज संघात नसण्याची चुक आपल्या संघाला परतीचे तिकीट देऊ शकते. तसेही या सामन्यात दिपक हुड्डाचा गोलंदाज म्हणून उपयोग का केला गेला नाही हा प्रश्न उरतोच. सरतेशेवटी राहुल, सुर्यकुमार यादव आणि हार्दिक पांड्याला आपल्या कामगिरीत सातत्य ठेवले अत्यंत गरजेचे आहे. सोबतच गोलंदाजांना आपली वज्रमूठ आवळणे जरूरी आहे तेंव्हाच कुठे आपल्याला अंतिम फेरीच्या आशा बाळगता येईल.
*********************************
दि. ०५ सप्टेंबर २०२२
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
**********************************

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...