Wednesday, September 28, 2022

कायदे मे रहोगे तो फायदे मे रहोगे!

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
    *कायदे मे रहोगे तो फायदे मे रहोगे!*
               *डॉ अनिल पावशेकर*
*********************************
नुकतेच भारत आणि इंग्लंड दरम्यान महिलांची एकदिवसीय क्रिकेट मालिका पार पडली. खरेतर ही मालिका भारताची वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामीच्या निवृत्तीमुळे प्रकाशझोतात आली होती परंतु शेवटच्या सामन्यात आयसीसीच्या मंकडींग नियमाने चांगलेच वादळ निर्माण झाले आहे. भारताची अष्टपैलू खेळाडू दिप्ती शर्मा आणि इंग्लंडची चार्ली डीन यांच्यात रंगलेल्या मंकडींग नाट्याने अवघे क्रिकेट विश्व ढवळून निघाले आहे. खेळभावना महत्वाची की नियमाला धरून चालायचे यावर वादविवादाला तोंड फुटले आहे.

क्रिकेट म्हटले की फलंदाज गोलंदाज आलेच, मात्र काही प्रमाणात कसोटी सोडले तर एकदिवसीय सामने असो अथवा टी ट्वेंटी, फलंदाजांना झुकते माप देण्यात आले आहे. तर गोलंदाज म्हणजे निव्वळ मार खाणारे प्राणी असा समज झाला आहे. तरीपण क्रिकेट मध्ये गोडी कायम रहावी फलंदाज, गोलंदाज दोघांनाही समान संधी मिळावी म्हणून आयसीसी वेळोवेळी नियमांत सुधारणा करत असते. अर्थातच सुधारणा सर्वांनाच हव्या असतात मात्र त्याची सुरुवात आपणापासून नको असे सर्वांनाच मनोमन वाटत असते. शिवाय आपल्या चुकांसाठी आपण सर्वोत्तम वकिल असतो तर दुसऱ्यांच्या चुकीच्या वेळी आपण न्यायमुर्ती असतो.

अगदी हाच प्रकार अंतिम सामन्यात दिसून आला. इंग्लंडच्या चार्ली डीनला वारंवार सूचना देऊनही ती नॉन स्ट्राईकर्स एंडला गोलंदाजांची ॲक्शन पुर्ण व्हायच्या पहिलेच धावत सुटायची. मात्र दिप्ती शर्माने तिला धडा शिकवत बाद केले आणि यावर तिसऱ्या पंचाने सुद्धा शिक्कामोर्तब केले. मात्र सहजासहजी हार मानतील तर ते इंग्रज कसले. एकतर चोर आणि वरून शिरजोर होत त्यांनी भारतीय संघावर खिलाडूवृत्ती नसल्याचा आरोप केला. मात्र हा प्रकार म्हणजे सौ सौ चुहे खाके बिल्ली हज को चली सारखा होता. कारण २०१९ च्या विश्वचषकात अंतिम सामन्यात न्यूझीलंड विरुद्ध इंग्लंडच्या पुरुष संघाने लबाडी करत जेतेपद पटकावले होते. त्यावेळी किवी कर्णधार केन विलीयम्सने अजिबात थयथयाट न करता शांतपणे, संयमाने निकाल स्विकारला होता.

अर्थातच त्यावेळी इंग्लिश संघाच्या क्षमतेची फुशारकी मारणारे आज भारतीय संघाच्या क्षमतेबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत आहेत. वास्तविकत: भारतीय महिला संघाने विस वर्षाच्या इतिहासात प्रथमच इंग्लंडला व्हाईट वॉश देण्याची कामगिरी बजावली आहे. मात्र हा पराभव जिव्हारी लागल्याने इंग्लिश संघाचे पित्त खवळले आणि चोराच्या उलट्या बोंबा प्रमाणे भारतीय दिग्वीजयाला गालबोट लावले आहे. चार्ली डीन बाद होताच तिला रडू कोसळले, मात्र मैदानावर मर्दुमकी गाजवायची असते. तिथे रडून फडून काहीच फायदा होत नसतो. रडण्याने तुम्हाला फारतर प्रेक्षकांची सहानुभूती मिळू शकते, विजय नाही. मैदानावर रडायचं नाही तर लढायचं असतं हे कोणीतरी इंग्लिश संघाच्या कानात सांगायला हवं.

तसंही इंग्लिश संघ आणि खेळभावना यांचा संबंध येतोच कुठे? मग तो सौरभ गांगुली असो की युवराजसिंग असो, क्रिकेट मध्ये इंग्रजांची उबडी करून घुबडी ठेवल्याशिवाय ते वठणीवर येत नाही हा इतिहास आहे. खेळपट्टीवर मुत्र विसर्जन करणे असो अथवा मैदानावर मद्यप्राशन करून गोंधळ घालणे असो, इंग्लंड संघाचा कोळसा उगाळावा तितका तो काळाच असतो. तसंही भारतावर राज्य केल्याच्या सरंजामी मानसिकतेला स्वतःच्या अंगणात म्हणजेच लॉर्डसवर पराभूत होणे कसे काय पचणार? मात्र त्यांचा सुंभ जळाला तरी पीळ कायम आहे. तुलनेने छोट्या भारतीय संघाकडून पराभव ते मनाने स्विकारू शकले नाहीत. एव्हाना हर छोटा एकदिन बडा होता है, हे त्यांच्या ध्यानात आले असेलच.

क्रिकेटच्या एकदिवसीय आणि टी ट्वेंटीत प्रेक्षकांचे मनोरंजन म्हणा अथवा व्यावसायिक हितसंबंध म्हणा बहुतांशी नियम फलंदाजांना अनुकूल आहेत. गोलंदाजांची अवस्था तर माय जेवू घालत नाही, बाप भीक मागू देत नाही अशी असते. निल आर्मस्ट्राँगला चंद्रावर पहिले पाऊल ठेवतांना जितक्या वेदना झाल्या नसतील त्याच्या कैकपट वेदना गोलंदाजांना शेवटचं पाऊल टाकताना होत असतात. गोलंदाजांचा एक नोबॉल सामन्याचे भवितव्य ठरवून जातो. कधी कधी गोलंदाजांना पाच बळी मिळवूनही योग्य ते कौतुक त्याच्या वाट्याला येत नाही परंतु एक सेमी अथवा इंचाच्या नोबॉल ने तो लगेच खलनायक ठरवल्या जातो. मग गोलंदाजांना एवढे काटेकोर नियम आहेत तर फलंदाजांनी का म्हणून त्यांना आखून दिलेली लक्ष्मणरेषा ओलांडावी? 

सामना सुरू असताना जगभरातील लाखो करोडो क्रिकेटवेडे डोळ्यात तेल घालून सामना बघत असतात. मग फलंदाज ऊतू जात असेल तर गोलंदाजांनी मंकडींग केले तर काय वाईट आहे? शिवाय ते आयसीसीच्या नियमांत सुद्धा आहे. क्रिकेट मध्ये जय पराजयाशी खेळाडू, संघ आणि त्यांच्या देशाची प्रतिष्ठा पणाला लागली असते. शिवाय कोणताही संघ जिंकण्यासाठीच खेळत असतो. यांत खेळभावना जरुर जोपासली जावी याबाबत दुमत असण्याचे कारण नाही. मात्र खेळभावनेच्या बदल्यात जर जयपराजय निश्चिती होत असेल तर ते कसे काय खपवून घेणार? 

ज्यांना केवळ खेळभावनाच पाहिजे त्यांनी क्रिकेट तरी कशाला खेळावे? त्यांनी क्रिकेट ऐवजी सरळसरळ आदा मादा कौन पादा खेळावे. प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर खेळात सुसुत्रता यावी, प्रत्येक संघ अथवा खेळाडूंना योग्य तो न्याय मिळावा यासाठी नियमांचे बंधन असते आणि त्यामुळेच खेळाची गोडी टिकून राहते. मात्र नियमाआडून रडीचा डाव खेळणे योग्य नव्हे. मग तो कोणताही संघ असो वा खेळाडू. यानिमित्ताने कायदे मे रहोगे तो फायदे मे रहोगे हे सर्वांनी ध्यानात ठेवणे गरजेचे आहे.
**********************************
दि. २८ सप्टेंबर २०२२
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
**********************************

No comments:

Post a Comment

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...