Friday, November 11, 2022

ॲडीलेडला घोडं का अडलं?

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
        *ॲडीलेडला घोडं का अडलं?*
             *डॉ अनिल पावशेकर*
**********************************
ॲडीलेड ओव्हलवर झालेल्या उपांत्य सामन्यात अखेर इंग्लंडने टीम इंडियाचा दारुण पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. अत्यंत उत्सुकता लागलेल्या या लढतीत इंग्लंडने शत प्रतिशत कामगिरी करत टीम इंडियाला अक्षरशः कान धरून बाहेर काढले आहे. दोन्ही संघात फलंदाजी आणि गोलंदाजीत जमीन अस्मानाचा फरक असल्याचे इंग्लंड संघाने दाखवून देत ते फायनलमध्ये थाटात दाखल झाले आहेत. उपांत्य फेरीत प्रारंभ ते शेवटपर्यंत टीम इंडिया इंग्लंडचे चक्रव्यूह भेदू शकली नाही आणि अखेर ॲडीलेडला टीम इंडियाच्या घोड्याने पेंड खाल्लं.

झाले काय तर 'जींदा रहने के लिये तेरी कसम, एक मुलाकात जरूरी है सनम' असे म्हटले जाते. अगदी असेच फायनल पर्यंत जीवंत राहण्यासाठी टीम इंडियाला आरसा दाखवणारा एकतरी सामना हवा होता. आपल्या नशिबाने आपल्या संघाची स्थिती दाखवणारे तब्बल तीन सामने आपल्या वाट्याला आले होते. प्रारंभीला पाकविरुद्ध आपले प्राण कंठाशी आले होते तर द.आफ्रिकेने आपल्याला चक्क धोबीपछाड दिली होती. त्यातच हाफ टिकीट बांग्लादेशविरुद्ध आपण धापा टाकत जिंकलो होतो. मात्र विनिंग कॉम्बीनेशन बदलायचे नाही या अंधश्रद्धेतून आपला संघ बाहेर पडला नाही.

आपली फलंदाजी विराट, सूर्यकुमार आणि पांड्या भोवती केंद्रीत राहिली. सलामी जोडी रोहीत राहुल म्हणजे जागते रहो मेरे भरोसे मत रहो सारखे होते. त्यातच राहुलने उपांत्य फेरीपुर्वी दोनदा पन्नाशी गाठली. मात्र या दोन खेळींच्या मुद्दलावर तो आणखी कितीदा टीम इंडियाला वेठीस धरेल हे सांगता येत नाही. सेमीफायनलला राहुलची फ्लॉप खेळी पाहण्यापेक्षा राहुलबाबाच्या भारत जोडो यात्रेत सहभागी झाले असते तर क्रिकेट रसिकांचे तेवढेच मनोरंजन झाले असते.जणुकाही के एल राहुलला झेलणे आता अनिवार्य झाले आहे असे त्याच्या संघातील अढळस्थानावरून वाटत आहे.

खरेतर टीम इंडिया सेमीफायनल साठी मानसिक दृष्ट्या तयार होती की नाही हा प्रश्नच पडतो. ज्याप्रमाणे आपली संथ सुरूवात झाली ती पाहता आपल्यासाठी दिडशेचा टप्पा म्हणजे 'दिल्ली बहोत दूर है' झाले होते. मात्र विराट, पांड्या ने पुन्हा एकदा संघाला तारून नेले. अर्थातच आपल्या फलंदाजीतील उणीवांसोबतच इंग्लंडच्या गोलंदाजांनाही दाद द्यावी लागेल. कधीकाळी फिरकीपटूंना धुवून काढणारे भारतीय फलंदाज आदील रशीद, लीविंगस्टोन समोर चाचपडत होते. तर सूर्यकूमारविरूद्ध गोलंदाजांनी वेगात बदल करत त्याची वाघनखे काढून टाकली होती. तरीपण एकशे अडुसष्ट धावा आपल्या गोलंदाजांसाठी अपुऱ्या नव्हत्याच. मात्र गरज होती ती 'धावा रक्षति रक्षित:' हा मुलमंत्र जपण्याची आणि तिथेच सगळा घोळ झाला.

विश्वचषकापासून दोन पावलं दूर असलेल्या टीम इंडियाला करबो लडबो जीतबो शिवाय पर्याय नव्हता आणि यासाठी सुरवातीला बळी टिपणे हा एकमेव मार्ग होता. आपला उद्देश स्पष्ट होता परंतु आपले शस्त्र बोथट निघाले. निरूपा रॉयने जितकी लेकरं हरवली नसतील तितक्या धावा भुवनेश्वर कुमार सहज सांडवतो. भुवीने धावांचे कॉक उघडताच मैदानात ॲलेक्स हेल्सच्या रुपात हेल स्टॉर्म अवतरले. जोडीला बटलरचा जोश असल्यावर टीम इंडियाच्या दुःखाला पारावर उरले नाही. गोलंदाजीत बदल जरूर होत गेले परंतु त्यांना अनलिमिटेड मार चुकला नाही. इंग्लंडच्या बेदरकार फलंदाजी पुढे आपल्या गोलंदाजांची घडी विस्कटून गेली. आपले लक्ष्य गाठायला इंग्लंडला सोळा षटकं पुरेशी ठरली.

निश्चितच खेळ म्हटले की हारजीत तर होणारच. परंतु सध्यातरी आपला संघ फारतर द्विपक्षीय मालिका जिंकतो आणि आयसीसी स्पर्धेत ढेपाळतो. हे म्हणजे चढाई जिंकून लढाई हरण्यासारखे आहे. घरमे शेर बाहर मे ढेर आणखी किती दिवस चालणार? याची सुरुवात संघनिवडीपासून व्हायला हवी. आयपीएलचा संपूर्ण हंगाम खेळणारे आपले खेळाडू आयसीसी स्पर्धेच्या वेळी कसे काय अनफीट होतात. टी ट्वेंटी विश्वचषक डोळ्यासमोर असतांना बुमराहला ऑस्ट्रेलिया विरुद्ध द्विपक्षीय मालिकेत का खेळवले गेले? त्यातही कसोटी, एकदिवसीय सामने आणि टी ट्वेंटीसाठी योग्य खेळाडू शोधून तयार करणे गरजेचे आहे. 'जो फिट है वो हिट है' असे असतांना वयस्कर खेळाडूंना सन्मानाने निरोप द्यायला हवा मग तो कोणताही खेळाडू असो.

फलंदाजीत राहुल रोहीत, गोलंदाजीत भुवनेश्वर कुमार अश्विन, यष्टीरक्षणात पंत कार्तिक आणि कर्णधार म्हणून परत एकदा रोहीत राहुलचे पर्याय शोधणे ही काळाची गरज आहे. खायला काळ आणि भुईला भार असणारे खेळाडू संघात ठेऊन शेवटी आपलाच कपाळमोक्ष होत आहे. जरी टीम इंडिया सेमीफायनल जिंकली असती तरी उपरोक्त खेळाडूंच्या क्षमतेवर कधी ना कधी प्रश्नचिन्ह निर्माण झालेच असते. जोपर्यंत संघ जिंकत आहे तोपर्यंत अपयश झाकले जाते परंतु पराभव होताच ह्या जखमा ठळकपणे दिसून येतात. यासोबतच प्रशिक्षक राहुल द्रविडने भारतीय खेळाडूंना विदेशातील लीगमध्ये खेळण्याबाबत सुतोवाच केले आहे त्याबाबत विचार व्हायला हवा.

कधीकाळी फिरकीसमोर लेझीम खेळणारे परदेशी खेळाडू आयपीएलच्या बुस्टर डोझने आता फिरकी सहज खेळतात. अश्विन अक्षर चहल देशात गाजतात पण विदेशात मार खातात. मो. सिराज, हर्षल पटेलला संधी मिळाली नाही तर दिपक हुड्डा मिळालेल्या संधीचे सोने करू शकला नाही.  याउलट पाक संघाने सुरवातीला दणके खाऊनही तो संघ अंतिम फेरीत पोहोचला. अर्थातच यात 'तेरी मेहरबानीया तेरी कदरदानीयाचा' सिंहाचा वाटा होता. मात्र त्यांनी सेमीफायनलला किवीजला बुकलून काढत आपला दम दाखवून दिला. तिच कहानी इंग्लंडची, आयर्लंड कडून पराभवाची नामुष्की पत्करुनही त्यांनी आपला दर्जा उंचावत फायनलमध्ये धडक मारली.

खरेतर पराभवाचे पोस्टमॉर्टेम करताना संघनिवड, संघबदल अत्यंत गरजेचे आहे. तसेही भाकर परतवली नाही तर करपते, घोडा फिरवला नाही तर अडतो याचप्रमाणे टीम इंडियात फेरबदल अपेक्षित आहे. सुनिल गावस्कर यांनी सुद्धा काही खेळाडूंच्या निवृत्तीचे संकेत दिले आहेत ते अगदी योग्य आहे. नाही तर जबतक सूरज चांद रहेगा, राहुल तेरा (टीम मे) नाम रहेगा म्हणून काय फायदा होणार? खेळाडूंचे प्रदर्शनानूसार मुल्यमापन कधी होणार? भुतकाळातील कामगिरीने आणखी किती वेळ वर्तमानाचा बळी देणार? यशाला अनेक बाप असतात, अपयश अनाथ असतं. तरीपण टीम इंडियाच्या उज्ज्वल भविष्यासाठी कडू गोळी नव्हे तर सर्जिकल ऑप्शन कधीही योग्य राहील. अन्यथा येरे माझ्या मागल्या होईल आणि टीम इंडियावर नेहमी करीता 'गुड फॉर सेमीफायनल' चा ठप्पा लागेल. 
*********************************
दि. ११ नोव्हेंबर २०२२
मो.९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++++

No comments:

Post a Comment

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...