@#😈😈😈😈😈😈😈😈#@
*अगंबाई अरेच्चा*
*मंतरलेल्या दिवसाचे तंतरलेले साथीदार*
*************************************
आपल्या जिवनात आईवडील आणि गुरुसोबतच मित्रांचे अनन्यसाधारण महत्व असते. आपले राहणीमान, वागणूक आणि सामाजिक वावर यावर आपल्या मित्रपरिवाराचा चांगलाच ठसा उमटला असतो.Man is known by company he keeps असे म्हटले जाते ते याकरीता. विशेषतः कॉलेजच्या दिवसातले मित्र आपल्याला जास्त जवळचे वाटतात कारण ते जास्तवेळ आपल्या सोबत असतात आणि मुख्य म्हणजे या मैत्रीला युवावस्थेचा तडका, उत्साहाची भरती आणि बेफिकरीची धुंद असल्याने एक आगळीवेगळी मजा असते. अर्थातच मैत्री हा माझा विकप्वाईंट असल्याने मी बालपणापासून माझा मित्रपरिवार चांगला जपला आहे. याबाबतीत तरी मी जो मित्रवान तो भाग्यवान आहे असे ठामपणे म्हणू शकतो.
"श्री" ८६ बॅचला ज्या बेधुंद आणि धुरंदर मित्राची संगत लाभली त्यात प्रदिप पाटीलचे नाव अग्रक्रमाने घ्यावे लागेल. आपल्या धुंदीत जगणारा हा अवलीया बाकी जगाला सिगरेटच्या थुटक्याऐवढीही किंमत देत नसे. शर्टची वरची दोन बटने उघडून, गळा चेहऱ्यावर पावडर शिंपडून, सर्वांना दिसेल असा सोन्याचा गोफ गळ्यात घालून ही स्वारी कॉलेजच्या पोर्चमध्ये उभी राहीली की आमचे थ्रीडी स्कॅनींग चालू व्हायचे. अर्थातच आमच्या हाती काही नाही यायचे पण याच्या गळाला अलगद मासे फसायचे.
अभ्यासाच्या नावाने आनंदीआनंद असल्याने सहजा कोणी क्लासमध्ये बसण्यास अजिबात उत्सुक नसायचो. मात्र घरून आणलेले खाण्याचे डब्बे लंगरमध्ये आल्यासारखे कोणीही खाऊन मोकळे व्हायचे आणि माझी उपासमार व्हायची. परंतु प्रदिप पाटील आणि युवराज काळे हे तोंडात सोन्याचा चमचा घेऊन जन्मले असल्याने माझी पोटपाण्याची चांगली सोय व्हायची. या दोघांनी कॉलेज जिवनापासून ते आतापर्यंत कधीही मला बिलाकरीता खिशात हात टाकू दिला नाही. अशी आमची मैत्री ही कृष्णसुदाम्याच्या तोडीचीच आहे.
प्रदिप गांधीनगरला आणि मी देवनगरला राहत असल्याने एकमेकांकडे नियमीतपणे जाणेयेणे असायचे. जेव्हा प्रदिपच्या परिवारातील सदस्य बाहेरगावी जायचे तेव्हा मी प्रदिपकडे स्वयंपाक करून आम्ही चांगला ताव मारत होतो. आता मात्र मी पाककला विसरत चालल्याने स्वयंपाकघरात फक्त जेवनापुरती उपस्थिती लावतो.
त्याकाळी दुरदर्शनवर युजीसीचा कंट्रीवाईड क्लासरुम नावाचा कार्यक्रम प्रक्षेपित व्हायचा. अगदी तद्वतच आमचा कंट्रीवाईन क्लासरुम प्रोग्राम असायचा. अर्थातच त्या वयात काय बरे, काय वाईट याची फारकाही समज नसल्याने किंवा आपण इतरांपेक्षा वेगळे आहोत अथवा आपण वेगळ्याच ग्रहावरचे प्राणी असल्याची गुर्मी असल्याने आम्ही कोणालाच मोजत नव्हतो ना कुणाची फिकर करत होतो.
मात्र बाहेर कितीही बेशिस्त वागलो तरी आम्हाला आमच्या गुरूजनांचा विशेष लळा होता. कारण ते काय शिकवायचे आणि आम्ही काय समजायचो याचे काही सोयरसुतक नसल्याने आनंदीआनंद होता. मुख्य म्हणजे पहिले एकदोन क्लास होताच आमचा संयम सुटायचा, मग कधी संगम टॉकीज तर कधी आशिर्वाद टॉकीजकडे मोर्चा वळायचा. मस्तपैकी मॅटीनी शो पाहून ताजेतवाने झालो की संस्कृत किंवा स्वस्थवृत्ताच्या क्लासमधये झोपा काढायचो.
त्याकाळी श्री राठी सर स्वस्थवृत्त तर पंडीत श्री शर्मा सर संस्कृत शिकवायचे. श्री राठी सर आमचे आवडते सर. त्यांचे ते राजबिंडे रुप, एखाद्या हिरोसारखे व्यक्तीमत्व आणि मुख्य म्हणजे युवा विद्यार्थ्यांसोबत त्यांची केमिस्ट्री चांगली जुळल्याने ते आम्हाला मित्रासारखे वाटायचे. संस्कृतचा क्लास म्हणजे आमच्यासाठी काला अक्षर भैस बराबर असायचा. परंतु खोड्या करायचो, चित्रविचित्र आवाज काढायचो आणि पंडीतजी मग अंगावर खेकसत आम्हाला क्लासबाहेर काढायचे,, याच्यात आम्हाला स्वतःचा गौरव वाटायचा.
युजी आणि पीजी आम्ही दोघेही सोबत असल्याने आमची ढवळ्यापवळ्याची जोडी नेहमी चर्चेत रहायची. विशेष म्हणजे "पीजी"ला प्रदिपने "पीजीओ" जिप घेतली आणि तो ड्रायव्हर तर मी कंडक्टर म्हणून गुरूजनांच्या सेवेत २४ तास असायचो. पीजी आटोपताच दोघांनीही आपापले वेगळे बस्तान मांडले आणि आपापल्या संसारात रमलो. परंतु नेमके एकाचवेळी दोघेही काळाच्या दुष्टचक्रात सापडल्याने चांगलेच भरडले गेलो. संदर्भ वेगळे, पार्श्वभूमी वेगळी असली तरी ज्याचे जळते त्यालाच कळते अशी परिस्थिती होती.
मात्र संकटाला संधी समजून पुढे जाण्यातच खरा अर्थ असतो. झाले काय तर संकटाने पिळून निघताच आम्ही दोघेही खऱ्या अर्थाने मुक्त झालो. अभिमान, दंभ, फुशारकी, स्वार्थ, फायदा, तोटा, नफा, नुकसान, मानसन्मान ही अवजड लक्तरे आपोआप गळून पडायला लागली आणि उरले ते निर्मळ मन. आयुष्यात संकटे तर येणारच मात्र आपण त्याला कसे तोंड देतो हे जास्त महत्त्वाचे आहे.
आज प्रदिप आयुष्यातील प्रचंड उलथापालथ पचवून ठामपणे उभा आहे. अर्थातच Behind every successful man, there is a woman हे विसरून कसे चालणार? प्रदिपच्या आयुष्यात आलेल्या वादळी तुफानाला परतवून लावतांना अर्चना वहिनीने प्रयत्नांची पराकाष्ठा करत साक्षात सावित्रीलाही मागे टाकले. या दोघांच्या संसारवेलीवर अतिशय गोड आणि गुणी अशी रुचा आणि रिया ही फुले उमलली आहे. कर्मधर्मसंयोगाने आज प्रदिप आणि रुचा या दोघांचाही वाढदिवस आहे. आपण सर्वांतर्फे या दोघांना वाढदिवसाच्या लाख लाख शुभेच्छा आणि भावी जिवनाकरीता प्रभुचरणी मंगलप्रार्थना.
🌹🌹🌹💐💐💐💐🎂🎂🍰🍰🥧🥧🍮🍮🍭🍭🍬🍬🍫🍫🍫🍿🍿🌹🌹🌹🌹💐💐
डॉ प्रदिप पाटील हे श्री स्वामी समर्थ हॉस्पिटल, त्रिमुर्तीनगर, नागपुरचे संचालक असून नॉन सर्जिकल कार्डीॲक उपचार पद्धतीचे तज्ञ आहेत.
*************************************
डॉ अनिल पावशेकर
मो. 9822939287
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++++++
No comments:
Post a Comment