@#😈😈😈😈😈😈😈😈#@
*राहुल गडाला जेंव्हा जाग येते*
*डॉ अनिल पावशेकर*
********************************
ॲडीलेड ओव्हल मैदानावर रंगलेल्या लढतीत टीम इंडियाने बांग्लादेशाचा कडवा प्रतिकार मोडून काढत सेमीफायनलचे तिकीट जवळपास कन्फर्म केले आहे. शेवटच्या चेंडूपर्यंत उत्कंठा कायम ठेवणाऱ्या या द्वंदात अखेर बांग्लादेशी फलंदाजांचे प्रयत्न तोकडे पडले आणि तमाम भारतीय पाठीराख्यांचा जीव भांड्यात पडला. मुख्य म्हणजे आतापर्यंत फॉर्मात नसलेल्या के एल राहुलला ऐनवेळी फॉर्म गवसला आणि केवळ फलंदाजीच नव्हे तर क्षेत्ररक्षणातही त्याने चुणूक दाखवत संघाच्या विजयात हातभार लावला. एक खेळी, एक थ्रो सामन्याला कशी कलाटणी देऊ शकते हे राहुलच्या खेळी वरून आज दिसून आले.
झाले काय तर द.आफ्रिके विरूद्धच्या पराभवाने टीम इंडियावर जे शंका कुशंकांचे मळभ होते, त्याला आजच्या प्रदर्शनाने धुवून काढले आहे. खरेतर भारतीय संघाचा प्रारंभ आजही नेहमीप्रमाणेच झाला. सुरुवातीला रोहीतला जीवदान मिळूनही तो त्याचा फायदा उठवू शकला नाही. मात्र या सामन्यात राहुल जणुकाही शक्तीमान बनून आला होता. तीन चौकार आणि चार षटकांची बरसात करत त्याने सामन्याचा केवळ अर्धशतकच नाही झळकवले तर बांगलादेशी गोलंदाजांची दादागिरी संपुष्टात आणली. मात्र भारतीय फलंदाजीचा भार खऱ्या अर्थाने उचलला तो विराटने. जणुकाही कोणाच्या खांद्यावर कोणाचे ओझे हे केवळ त्याच्यासाठीच लिहिले असावे असे वाटते.
सध्यातरी भारतीय फलंदाजीचा ठेका विराट, सूर्याकुमार यादव या बडे मियां छोटे मियां जोडीकडे असेच वाटते. रोहीत, पांड्या आणि दिनेश कार्तिक यांना अजूनही फलंदाजीचा शुभमुहूर्त सापडलेला दिसत नाही. त्यामानाने राहुलने देर आए दुरुस्त आए करत थोडाफार डॅमेज कंट्रोलचा प्रयत्न केला आहे. या विश्वचषकात विराटचा फलंदाजी आणि या सामन्यातील त्याच्या चौसष्ट धावा पाहता आयसीसीने चौसष्टाव्या जारण मारण या कलेला विराट मर्दन कला म्हणून गौरविल्यास वावगे वाटू नये. भलेही विराट सेहवाग किंवा ख्रिस गेलसारखी गोलंदाजांची कत्तल करत नाही परंतु कोळ्यासारखे जाळे विणून गोलंदाजांना नामोहरम करतो.
सामन्याचा पुर्वार्ध निश्चितच टीम इंडियाने गाजवला मात्र खरी मजा उत्तरार्धात आली. ऐनवेळी बांगलादेशी सलामीवीरांनी टायगर अभी जींदा है दाखवून देत भारतीय गोलंदाजांना पळती भुई थोडी केली. बांगलादेशच्या धडधडत सुटलेल्या मिताली एक्स्प्रेसने रोहीतची धडधड वाढवली होती.(दोन्ही देशांच्या दरम्यान मैत्री, बंधन, मिताली अशा तीन एक्स्प्रेस चालतात.) त्यातही लीटन दासने भारतीय गोलंदाजांना आपले दास बनवल्याने आपल्या गोलंदाजांकडे दे रे कान्हा चोळी लुगडी म्हणण्याशिवाय दुसरा पर्याय उरला नव्हता. तसेच त्याने मागेल त्याला चौकार षटकार देऊ केल्याने नक्की कोणाला गोलंदाजी द्यावी हा रोहित पुढे यक्षप्रश्नच होता. मैदानावर जणुकाही आमार शोनार बांग्लाची स्वप्नपूर्ती होते की काय अशी भिती वाटू लागली होती.
अखेर दवा काम नहीं करती, दुवां काम करती है हेच खरे ठरले. वरुणराजाने वाईल्ड कार्ड एंट्री मारताच बांग्लादेशचा संघ ओल्या दुष्काळात सापडला. तर तिकडे क्रिकेटचे राहुकेतू म्हणजेच डकवर्थ लुईस नियमाने सामन्याचा ताबा घेतला. वास्तविकत: या नियमाने प्रथमच दोन्ही संघांना फायदा झाला. बांगलादेशला सोपा पेपर मिळाला मात्र पावसाच्या व्यत्ययाने बांगला संघ फलंदाजीचा टेम्पो हरवून बसल्याचा फायदा आपल्याला झाला. सामना पुन्हा सुरू होताच दुसऱ्या चेंडूवर राहुलने अफलातून थ्रो करत लीटन दासला रिटर्न दास केले. खरेतर इथुनच बांग्लादेशाची गाडी रुळावरून घसरू लागली. राहुलचा हा रॉकेट थ्रो टीम इंडियासाठी विजयाचा पोस्ट डेटेड चेक होता. इथुनच भारतीय संघाचे मनोबल सातव्या अस्मानावर गेले. लगेचच दहाव्या षटकात मो.शमीने नजमूल हसनला जाळ्यात ओढत बांग्लादेशला दुसरा धक्का दिला.
सामना सोळा षटकांपुरता मर्यादित झाल्याने मैदानावर प्रचंड कापाकापी अपेक्षीत होती. मात्र बारावे षटक बांगलादेशचे बारा वाजवून गेले आणि याचे श्रेय जाते सिंग इज किंग अर्शदिपला.त्याने अफीफ हसन आणि शाकिब अल हसनला आपला बकरा बनवले. मुख्य म्हणजे आज गोलंदाजांच्या मेहनतीला न्याय देण्याचे प्रामाणिक प्रयत्न क्षेत्ररक्षकांनी केले. राहुलच्या परफेक्ट थ्रो ने चार्ज झालेल्या सूर्यकुमार आणि दिपक हुड्डाने डिपमध्ये सामन्याचा दबाव झेलत उत्कृष्ट झेल पकडले. अर्शदिपचाच कित्ता गिरवत पांड्या ने तेराव्या षटकांत डबल धमाका करत बांग्ला संघाची तिरडी बांधणे सुरू केले.
चौदाव्या षटकांत अर्शदिपने टिच्चून मारा केला आणि बांग्ला संघाला शेवटच्या दोन षटकांत जवळपास एकतीस धावा हव्या होत्या. प्रसंग बिकट होता. कारण चेंडू पांड्याच्या हाती होता. खरेतर पांड्या असो वा भुवनेश्वर कुमार, शेवटून दुसरे षटक यांच्या हाती देणे म्हणजे विजय माल्याला भरमसाठ कर्ज देण्यासारखे जोखमीचे काम होते. मात्र पांड्या आपल्या व्यापारी वृत्तीला जागला. पंधराव्या षटकात त्याने एक चौकर षटकार खाऊनही फक्त अकरा धावा दिल्या. शेवटचे षटक अर्शदिपच्या वाट्याला आले आणि पुन्हा एकदा त्याला हिरो बनन्याचा चान्स मिळाला. त्याला दुसऱ्या चेंडूवर षटकार बसुनही पठ्ठ्याने धीर सोडला नाही आणि खोलवर टप्पा ठेवत बांग्ला संघाची कबर खोदली.
मध्यंतरानंतर थरारक झालेल्या या लढतीत बांग्ला संघाची मध्यफळी अचानक कोसळली. मुख्य म्हणजे कर्णधार शाकिब
अल हसन खेळपट्टीवर असेपर्यंत भारतीय गोटात चिंतेचे वातावरण होते. मात्र अर्शदिप, पांड्या ने बाराव्या आणि तेराव्या षटकांत प्रत्येकी दोन बळी घेत बांगला टायगर्सला काबूत ठेवले. मैदान ओले झाल्याने आपल्या फिरकीपटूंना फारसा वाव मिळाला नाही. मात्र खेळपट्टीची साथ नसली की भुवनेश्वर कुमार कधीही आपला सेल चालू करू शकण्याची भीती राहते. तर दिनेश कार्तिकच्या किपींगवर वयाच्या सुरकुत्या दिसू लागल्या आहेत. सामना जरी आपण जिंकला असला तरी विराट सूर्यकुमार वगळता इतर फलंदाजांना सुर गवसने गरजेचे आहे. तर राहुलने आपले प्रदर्शनात सातत्य ठेवल्यास सलामीची डोकेदुखी कमी होईल.
समाधानाची बाब म्हणजे आज क्षेत्ररक्षणात एक धावबाद आणि चार झेल टिपत भारतीय संघाने मेरीटची कामगिरी केली आहे. याउलट बांग्लादेशी फलंदाजांनी पुढे पाठ मागे सपाट केल्याने चांगल्या प्रारंभानंतरही ते सामना जिंकू शकले नाही. राहुलची सलामीची धडाकेबाज खेळी सामन्याची रूपरेषा लिहून गेली. सलामीच्या फलंदाजाने धावा केल्या तर त्याचा सकारात्मक परिणाम इतर फलंदाजांवर होतो तेंव्हा कुठे आपण १८४ धावा सहज जमवू शकलो. थोडक्यात काय तर राहुल गड्याला जाग आली जी टीम इंडियाच्या पथ्यावर पडली. भारतीय संघाचे हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.
*********************************
दि. ०३ नोव्हेंबर २०२२
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
No comments:
Post a Comment