Saturday, February 18, 2023

ट्रेलर हिट पिक्चर सुपरहिट!

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
        *ट्रेलर हिट, पिक्चर सुपरहिट*
             *डॉ अनिल पावशेकर*
********************************
शाहरुखच्या 'पठाणचे' कवित्व संपते न संपते तोच मुख्यमंत्री शिंदेंचा 'गुवाहाटी की गोद में' हा राजकिय पिक्चर सुपरहिट झाला असून आता तर चक्क निवडणूक आयोगानेच त्यावर शिक्कामोर्तब केले आहे. जुन २०२२ ते फेब्रुवारी २०२३ या नऊ महिन्याच्या काळात सेनेच्या दोन्ही गटांनी प्रचंड प्रसुती कळा सोसल्या. दोघांनीही सुप्रीम कोर्ट ते निवडणूक आयोग अशा येरझाऱ्या घातल्या. अखेर निवडणूक आयोगाने नॉर्मल डिलिव्हरीची अपेक्षा सोडून सिझर करत हा वाद निकालात काढला. खऱ्याखुऱ्या शिमग्याला वेळ असला तरी विरोधकांनी निकाल लागताच शिमगा सुरू केला परंतु 'जब
चिडीया चुग गयी खेत अब पछताने से क्या फायदा' अशी अवस्था झाली आहे.

झाले काय तर सेना भाजपा युतीने २०१९ ला विधानसभेत दिडशेवर जागा जिंकून कॉंग्रेस राष्ट्रवादीला धुळ चारली होती. जनतेलाही आता युतीचेच सरकार स्थापन होणार असे वाटत होते. मात्र युतीत मधुचंद्राऐवजी चक्क काडीमोड झाला. आयुष्यभर मा.बाळासाहेबांनी ज्या कॉंग्रेस राष्ट्रवादीला थारा दिला नाही, त्याच्या वळचणीला सेना उभी राहिली. होत्याचे नव्हते झाले. कधी बंद दाराआडचे वचन, तर कधी मुख्यमंत्री पदाची ओढ. सत्तेचा पेचप्रसंग काही सुटत नव्हता. अखेर जनमताचा कौल पायदळी तुडवण्यात आला. तीन नापासांनी मिळून मेरिटचे स्थान हिसकावले होते. तीन दिशाला तीन तोंडे असणारे अमर अकबर अँथनी सरकार जन्माला आले होते. मात्र अमर अकबर अँथनीचा बाप किशनलाल अजूनही जीवंत आहे हे ते विसरले होते.

तिघाडीचे महाआघाडी सरकार स्थापन जरी झाले असले तरी काॅंग्रेस, राष्ट्रवादी पक्ष आपल्या अजेंड्यावर ठाम होते. खरी गोची झाली ती सेनेची. हिंदुत्वाला हात लावतो म्हटले तर खुर्ची धोक्यात आणि हिंदुत्व सोडले तर मतदारांची प्रतारणा. अखेर खुर्ची जिंकली आणि हिंदुत्वाला तिलांजली दिली गेली. हिंदुत्व हीच सेनेची ओळख असतांना उगाचच धर्मनिरपेक्षतेची झुल ओढली गेली. सेनेचा ढाण्या वाघ ओशाळून चक्क शुद्ध शाकाहारी झाला होता. पक्षातील निष्ठावंतांना सेनेचे पतन उघड्या डोळ्यांनी दिसत होते मात्र त्यावर त्यांचा नाईलाज होता. आधीच पालघर साधु हत्याकांडाने जनमानस क्षुब्ध होते. त्यात अर्णव, कंगणा आणि केतकी प्रकरणाने आणखी भर घातली.

सचिन वाझे असो की राष्ट्रवादीच्या मंत्र्यासंत्र्यांची जेलयात्रा असो अथवा आणखी काही भानगडी, सरकार प्रमुख म्हणून बील मुख्यमंत्र्यांच्या नावाने फाडले गेले. तिघाडी सरकारमध्ये सर्वात जास्त नाव सेनेचे खराब होत होते. वर्षानुवर्षे सेनेसाठी खस्ता खालेल्यांना तोंड दाबून बुक्यांचा मार सहन करावा लागत होता. अखेर या खदखदीचा ज्वालामुखी कधीतरी फुटणारच होता. राज्यसभेची निवडणूक हे एक नाममात्र कारण होते. त्यातच स्वयंघोषित ब्रह्मांड प्रवक्त्यांच्या जीभेचा दांडपट्टा बेकाबू झाला होता. जेमतेम पन्नास जागा आणि कॉग्रेस राष्ट्रवादीच्या कुबड्यांवर सत्ता मिळालेल्यांना पुढील पंचवीस वर्षे मुख्यमंत्री आमचाच म्हणून डोहाळे लागले होते. सत्तेची झिंग काही केल्या उतरत नव्हती. १०५ घरी बसवल्याची नशा काही औरच होती. पक्षांतर्गत एवढी खदखद असूनही नेतृत्व कसे काय गाफिल राहिले हे एक आश्चर्यच आहे. 

राज्यसभा, विधान परिषदेची निवडणूक होताच सेनेचा पोळा फुटला. मुंबई ते गुवाहाटी व्हाया सुरत सत्तासंघर्ष सुरू झाला. डोंगर, झाडी, हॉटेल, गद्दार, खोके आदी शब्दांच्या फैऱ्या झडू लागल्या. सेनेला सुख के सब साथी दुख मे न कोय चा प्रत्यय येऊ लागला होता. मात्र आता उशीर झाला होता. चाळीस आमदार आणि तेरा खासदार शिंदे गटात सामील झाले होते. राज्यसभा, विधान परिषदेचा ट्रेलर हिट होताच गुवाहाटीचा पिक्चर सुपरहिट होणार होता. न्यायनिवाड्यासाठी तारीख पे तारीख सुरु झाले होते. तोपर्यंत एकनाथ शिंदेंनी राजमुकुट धारण केला होता. तेलं ही गेलं तुप ही गेलं अशी सेनेची अवस्था झाली होती. आता सर्वकाही सुप्रीम कोर्ट आणि निवडणूक आयोगास ठरवायचे होते. दावे प्रतिदावे मांडले गेले आणि तिथे पुराव्यांवर न्यायनिवाडा झाला. शिवसेना या नावासहीत धनुष्यबाण हे चिन्ह शिंदे गटाच्या झोळीत पडले.

या सर्व सत्तासंघर्षात सेनेचे सर्वात जास्त नुकसान झाले. नवीन चिन्ह, नवा डाव त्यांना सुरू करावा लागणार आहे. सत्तेची चुंबकीय शक्ती फार मोठी आहे आणि सध्या सत्ता शिंदेंकडे आहे. त्यामुळे सेनेचे काम आणखी अवघड आहे.  राहिली बाब राष्ट्रवादी आणि काँग्रेसची तर त्यांना तसेही जनतेने विरोधी पक्षात बसायचा कौल दिला होता. अचानक लॉटरी लागावी तशी त्यांना सत्ता मिळाली होती. आत्ताही राष्ट्रवादीकडे त्यांचा हुकुमाचा एक्का असल्याने ते डॅमेज कंट्रोल करू शकतात. कॉंग्रेसचे मात्र काम कठीण दिसते. इकडे भारत जोडो यात्रा आली गेली आणि तिकडे नाशिकच्या निवडणूकीने अंतर्गत खदखद आणखी वाढली आहे. भाजपला सुरवातीच्या पिछेहाटी नंतर आता अच्छे दिन आले आहे. जरी देवेंद्रजी उपमुख्यमंत्री असले तरी स्टीअरींग व्हिलवर ताबा त्यांचाच आहे.

या सत्तासंघर्षाचा जर कुठलाही प्रभाव, परिणाम नाही पडला तर तो मनसे पक्षावर. नेहमीप्रमाणे हा पक्ष नो प्रॉफिट नो लॉस मध्ये आहे. सध्यातरी शिंदे गटाला अधिकृतपणे शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मिळाल्याने ते या सत्तासंघर्षाचे सर्वात जास्त लाभार्थी ठरले आहेत. सेनेची अवस्था मात्र बिकट झाली आहे. ज्या धनुष्यबाणाने त्यांना विजयी केले, सत्ता दिली, तोच त्यांच्याकडे उरला नाही. असंगाशी संग आणि हिंदुत्वाची प्रतारणा सेनेच्या अंगलट आली. युती करुन चांगले बहुमत असतांनाही सेनेने चुकीचे पाऊल उचलले. अखेर जे व्हायचे तेच झाले. आता पश्चात्ताप करुन फायदा नाही. गद्दार, खोके, पाठीत खंजीर खुपसला यातून बाहेर पडले तरच उर्वरित सेनेचा पुढचा मार्ग सुकर होऊ शकतो. 
**********************************
दि. १८ फेब्रुवारी २०२३
मो.९८२२९३८२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++

No comments:

Post a Comment

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...