@#😈😈😈😈😈😈😈😈#@
*कांगारूंचा दिड दिवसांत खुर्दा!*
*डॉ अनिल पावशेकर*
*********************************
दिल्लीच्या अरुण जेटली मैदानावर खेळल्या गेलेल्या दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाने कांगारूंचा अडीच दिवसांत धुव्वा उडवत बॉर्डर गावस्कर चषक चौथ्यांदा आपल्याकडे राखला आहे. लागोपाठ दोन कसोटीत कांगारुंनी फिरकीपुढे सपशेल शरणागती पत्करली आहे. क्रिकेट विश्वात चॅम्पियन संघ म्हणून ओळखला गेलेला कांगारू संघ दोन्ही कसोटीत त्यांच्या दुसऱ्या डावात ज्याप्रकारे गळपटला ते पाहून डोळ्यांवर विश्वास बसत नाही. फिरकीपुढे आक्रमण करावे की बचाव करावे या द्विधा मनस्थितीत सापडल्याने त्यांचा केवळ अडीच दिवसांत खुर्दा उडाला आहे.
झाले काय तर बलाढ्य कांगारू संघाने भारतभूमी वर पाय ठेवताच त्यांनी खेळपट्ट्यांबाबत कुरबुर चालू केली होती. पण फिरकी खेळपट्ट्या भारतात नाही तर पर्थला मिळणार काय हा प्रश्न होता. त्यातच भित्यापाठी ब्रह्मराक्षस असतो आणि झालेही तसेच. अश्विन, जडेजाच्या जोडगोळीने दोन्ही कसोटीत तब्बल एकतीस बळी टिपून कांगारूंची हालत खस्ता केली. त्यातच मो.सिराज आणि मो.शमीने तिखट मारा करुन त्यांना सळो की पळो करून सोडले होते. दिल्ली कसोटीत पहिल्या दिवशी तर मो.सिराजने डेव्हिड वॉर्नरला अक्षरशः शेकून काढले. सिराजच्या आखूड टप्प्याच्या चेंडूने तर त्याला चांगलेच नाचवले. अखेर सिराजने त्याला हेल्मेट वर दणका देऊन त्याचा कसोटीतून बाहेर पडण्याचा मार्ग मोकळा केला. भलेही वॉर्नरला मो.शमीने बाद केले परंतु त्याचा पाया सिराजने रचला होता हे मान्य करावे लागेल.
आयसीसीच्या लॉज ऑफ क्रिकेट २४ नुसार (बदली क्षेत्ररक्षक, सबस्टीट्यूट) डोक्यावर मार लागल्याने कंकशन नियमानुसार (लाईक फॉर लाईक) वॉर्नर ऐवजी दुसऱ्या डावात मॅथ्यू रेनशॉ फलंदाजीला उतरला होता. पण रेनशॉ बरसण्याच्या पहिलेच अश्विनने त्याला पायचितात पकडले. पहिल्या डावात उस्मान ख्वाजा, पीटर हॅन्डसकॉम्ब यांनी थोडेफार हातपाय चालवल्याने त्यांनी कसेबसे अडीचशे धावांचा टप्पा ओलांडला. मात्र प्रत्युत्तरादाखल टीम इंडियाची सुद्धा घसरगुंडी झाली होती. मात्र रवी अश्विन आणि अक्षर पटेलने आठव्या गड्यासाठी ११४ धावांची भागीदारी करून संघाचे वस्त्रहरण थांबवले. कांगारूना प्रोत्साहन पर एक धावाची आघाडी मिळाली होती आणि दुसऱ्या डावात चांगली फलंदाजी करून टीम इंडियावर दबाव आणता आला असता.
पण दुसरा डाव म्हटले की 'मन के हारे सब हारे ' अशी स्थिती होती. दुसऱ्या दिवसअखेरीस एक बाद एकसष्ट अशा सुस्थितीत असणारा संघ तिसऱ्या दिवशी फिरकीसमोर एकोणीस षटकांत बावण बावण करत नऊ गडी आणि बावन्न धावात गारद झाला. शोले पिक्चरच्या गावकऱ्यांना जेवढी भिती गब्बरची वाटली नाही त्याच्या कैकपट फिरकीच्या दहशतीखाली कांगारू फलंदाज खेळले. खेळपट्टीवर अक्षरशः झिंगाचिका नाचत ते बाद झाले. खरेतर तिसऱ्या दिवशी दोन्ही फिरकीपटूंना सुरूवातीपासून कांगारूच्या उरावर बसवणे हा कर्णधार रोहीतचा मास्टर स्ट्रोक होता. पुढे जावे की मागे खेळावे या भानगडीत ते फुटवर्क विसरले. आक्रमण हा शेवटचा पर्याय म्हणून त्यांनी आक्रमणाला सुरूवात केली परंतु आक्रमण आणि आत्मघात यातला फरक त्यांना कळला नाही. माइंडेड ऑस्ट्रेलियन फलंदाजांनी ब्लाईंड गेम खेळला.
भलेही तीन पत्तीत बावन्न पैकी तीन पत्त्यात नशिब आजमावे लागते परंतु कांगारूंना फिरकीपुढे ब्लाईंड गेम खेळतांना आपले अकरा पत्ते नक्कीच माहिती होते. जडेजाच्या विकेट टू विकेट गोलंदाजीवर हल्ला करतांना कांगारूंची अवस्था 'न्हाणी ला बोळा आणि दरवाजा मोकळा ' अशी झाली. बॅटचा दांडपट्टा चालवितांना स्टंप उघडे पडले. वळवळणाऱ्या फिरकीला स्विप करण्याच्या मोहात त्यांचे फलंदाज त्रिफळाचित झाले. ट्रॅव्हिस हेड, लाबुशेन वगळता इतरांना दुहेरी आकडा गाठता आला नाही. नागपूर असो की दिल्ली दोन्ही जागी दुसऱ्या डावात ते बत्तीस षटकांपेक्षा जास्त तग धरू शकले नाही.
टीम इंडियाला मालिकेत २/० अशी आघाडी आणि जागतिक कसोटी अंतिम सामन्याच्या दृष्टीने एकशे पंधरा धावा हव्या होत्या. त्यातच भारतीय संघाच्या मस्तकावर राहुल ग्रह असल्याने थोडी धाकधूक वाटत होती. अखेर राहुल आपल्या नियमाला जागला आणि परत एकदा हात हलवत तंबूत परतला. काहीही असो एखादा व्यक्ती जर वारंवार संधी देऊन हमखास अपयशी ठरत असेल तर त्याचे नाव १००% राहुल असणार आता हे कोणीही सांगू शकतो. यातील गंमतीचा भाग वगळला तरी राहुलचे फलंदाजीतील नग्न सत्य कोणीही नाकारू शकत नाही. फार पूर्वी मोहींदर आमरनाथने निवड समितीला जोकर्स म्हटले होते, राहुलची सातत्याने होत असलेली निवड पाहून मो.अमरनाथ किती दूरदृष्टीचे होते याचा प्रत्यय येतो.
भारतीय फलंदाजांचा विचार केला तर राहुलला कच्चा निंबू म्हणून धरायला हरकत नाही. रोहीतला कर्णधाराची जबाबदारी देताच त्याची फलंदाजी बाळसे धरु लागली आहे. विराट बाबत एवढेच म्हणता येईल,,'हिरा है सदा के लिये ' तर शंभरावा कसोटी खेळणारा पुजारा कष्टकरी फलंदाज म्हणून ओळखला जातो. सर्वात कौतुक करावे लागेल ते नवोदित यष्टिरक्षक श्रीकर भरतचे. ०४ बाद ८८ धावफलक असतांना त्याने मैदान गाठले आणि एक सुरेख छोटेखानी खेळी करत त्याने आपली दखल घ्यायला लावली.
दोन्ही कसोटींचा विचार करता भारतीय फलंदाजीत कधी रोहीत, कधी विराट तर कधी अश्विन, जडेजा आणि अक्षर पटेलने संघाला तारुन नेले. भलेही अक्षर पटेलची गोलंदाजी 'गंगा घरी आली पण आंघोळ नाही केली' अशी झाली असली तरी त्याने दोन्ही कसोटीत जबरदस्त फलंदाजी करुन विरोधी संघाला जेरीस आणले. वास्तविकत: दोन्ही कसोटीत विजयाचा पाया त्याने रचला आहे. भारतीय फलंदाजांनी फिरकीला उत्तम फुटवर्कने निष्प्रभ केले. याउलट कांगारू फलंदाजांनी फिरकीसमोर हाराकिरी केली. वॉर्नर आणि स्टीव्ह स्मिथच्या भरवश्यावर त्यांचे फलंदाजीचे दुकान. मात्र यावेळी दोघेही कामी आले नाही. उस्मान ख्वाजा, हॅन्डसकॉम्बचे प्रयत्न थिटे पडले. तर गोलंदाजीत नॅथन लिओन, टॉड मर्फीने थोडीफार चमक जरुर दाखवली परंतु त्यांनी त्यांच्या वेगवान गोलंदाजांवर फारसा विश्वास दाखवला नाही. जागतिक कसोटी अंतिम सामन्यात स्थान निश्चिती साठी भारताला मालिकेत ३/० असा विजय आवश्यक आहे आणि भारतीय संघ त्यादृष्टीने उर्वरित कसोटीत प्रयत्न जरूर करतील अशी आशा आहे.
*********************************
दि. २० फेब्रुवारी २०२३
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
No comments:
Post a Comment