Wednesday, March 22, 2023

आ अब लौट चले, अंतिम भाग

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
       *आ अब लौट चले, अंतिम भाग*
                *डॉ अनिल पावशेकर*
**********************************
प्रवासाचा शेवटचा दिवस हा लगबगीचा असतो. यांत सर्वात अवघड काम असते ते आपल्या सामानाची आवराआवर करणे. शॉपिंग चा कितीही मोह आवरला तरी प्रथा म्हणून किंवा इतरांचे पाहून घेतलेल्या सटरफटर वस्तू अथवा कपडे बॅगचे पोट फुगवून टाकतात. त्यातही वापरलेले कपडे, वस्तू जाते वेळी प्रसरण पावून बॅगची चेन लावणे कठीण करून टाकतात. बरे झाले न्युटनने फारसा प्रवास केला नसावा, अन्यथा प्रवासात वस्तूंच्या प्रसरण पावण्याचा चौथा नियम त्याने शोधून काढला असता. आठवणीने एक एक सामान कोंबल्याने आपली बॅग विहिनबाई सारखी टम्म फुगून बसते. यांत गंमत म्हणजे ओढूनताणून एकदाची बॅग कुलुप बंद केल्यानंतर ऐनवेळी एखादी महत्त्वाची वस्तू एकतर  बाहेर राहून जाते अथवा आंत. मग पुन्हा एकदा सामानाचे इनकमींग आउटगोइंग करत बॅग बळजबरीने बंद करावी लागते.

या सर्व धावपळीत पेन, घड्याळ, चष्मा, मोबाईल चार्जर, पॉवर बॅंक, टुथब्रश आदि बारीकसारीक वस्तू लपाछपी खेळतात. कधी उशीखाली तर कधी बेडच्या खाली अथवा कपाटात लपून बसतात. एकवेळ जत्रेत हरवलेली मुलं शोधणं सोपं असतं परंतु अशा वस्तू शोधणं एक वैताग आणणारं काम असतं. अखेर एक वेळ अशी येते की घेतलं ते आपलं राहिलं ते दुसऱ्याला पावलं म्हणून रुम सोडून बाहेर निघावं लागतं. शेवटच्या दिवशी कसौलीहून संध्याकाळी पाचला चंदिगढला परतलो आणि आता वेध लागले होते घरी परतण्याचे. अर्थातच शेवटचा दिवस आपल्याला थोडा भावनिक करून जातो. एक मन म्हणते की एक दिवस अजून राहून जाऊ तर दुसरीकडे घराची ओढ लागलेली असते.

चंदिगढ ते दिल्ली परततांना शताब्दी एक्सप्रेसने जायचे ठरले होते. कारण एकतर संध्याकाळची वेळ आणि महामार्गावर वाहतुकीची दुरावस्था पाहता हा निर्णय योग्य ठरला होता. शताब्दी एक्सप्रेस १९८९ साली भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरुजींच्या शंभराव्या जयंतीनिमित्त सुरू करण्यात आली होती. सध्या अशा प्रकारच्या पंचवीस शताब्दी एक्सप्रेस रुळावर धावत आहेत. या रेल्वेत राजधानी एक्सप्रेस सारख्या सुविधा असतात. कालका नवी दिल्ली शताब्दी एक्सप्रेस चंदीगढला साडे सहाला येणार होती. आम्ही सर्वजण रेल्वे स्थानकावर पोहचतो न पोहचतो तोच अगदी वेळेवर ही एक्स्प्रेस आमच्या समोर उभी ठाकली.

मी प्रथमच एसी चेअर कार ने प्रवास करत असल्याने या प्रवासाबाबत उत्सुकता होती. प्रवास सुरू होऊन अर्धा तास होताच फराळाचा ट्रे समोर आला. फरसाण, भेळ आणि गोड पदार्थ पाहून तोंडाला पाणी सुटले. सोबतच चहा, कॉफी, आईस्क्रीम दिमतीला असल्याने मन गदगदून गेले. अन्न पुर्ण ब्रह्म म्हणतात ते याचसाठी. अर्थातच या फराळाचा फडशा पाडायला फारसा वेळ लागला नाही. खरेतर रेल्वेकडून इतक्या उत्तम सेवेची अपेक्षा नसल्याने थोडे अवखळ्यासारखे वाटत होते परंतु बदलाचे स्वागत करायलाच हवे. फराळाच्या एका तासातच पुन्हा एकदा रेल्वेने जेवणाची सोय केल्याने पोट तुडुंब भरून आले. पूर्ण कोच एसी,काचबंद असल्याने आणि रात्र झाल्याने बाहेर पाहण्याची सोय नव्हती. मात्र वाटेत कुरूक्षेत्र, पानिपत इथे थांबे असल्याने तेवढा काळ वगळता बाकी वेळ मोबाईलमध्ये गुंतून रहावे लागले.

शताब्दी एक्सप्रेसने अगदी नियोजित वेळेत दिल्ली गाठल्याने हायसे वाटले. नागपूरचे विमान दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ ला असल्याने रात्री निश्चिंतपणे झोप लागली. सकाळी साडेसातला विमानतळावर पोहचलो आणि सर्व सोपस्कार आटोपत एकदाचे विमानात बसलो. प्रवासाच्या अखेरच्या टप्प्याला सुरुवात झाली. मात्र सगळं ठरल्याप्रमाणे झालं तर त्यात नावीन्य कसले? कहानी में ट्वीस्ट अभी बाकी था! बोर्डिंग कंम्प्लीटेडची घोषणा झाली. सगळे स्थानापन्न झाले तरीपण विमान हलण्याचे नावाच घेईना. नऊ चे साडेनऊ झाले आणि वैमानिकाने घोषणा केली की तांत्रिक अडचणी मुळे उड्डाणाला विलंब होत आहे. विमान कधी उचक्या दिल्यासारखे तर कधी हुडहुडी भरल्यासारखे करत असल्याने हा तांत्रिक बिघाड कधी दुरूस्त होईल याचा अंदाज येत नव्हता. अखेर दहाच्या सुमारास विमानाने धावपट्टीवर चालणे सुरू केले आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला.

फारतर दुपारी बारा पर्यंत नागपूरला पोहोचू असे समजून डोळे मिटून शांत बसलो होतो. एवढ्यात एका मित्राने सांगितले की विमान धावपट्टीकडे न जाता परत फिरत आहे. खरेतर ही चेष्टा मस्करी समजून मी डोळे उघडले नाही. पण थोड्या वेळाने डोळे किलकिले करून पाहिले तर मित्राचे म्हणणे खरे होते. वैमानिकाने सूचना दिली की वायुसेनेच्या कवायती साठी साडे बारा पर्यंत एअरस्पेस बंद करण्यात येत आहे आणि त्यानंतर कंट्रोल टॉवर कडून निर्देश आल्यावर उड्डाण केले जाईल. खरेतर हसावे की रडावे हेच समजत नव्हते. कमीतकमी अडीच तास एकाच जागेवर बसणे म्हणजे कंटाळवाणा प्रकार, त्यातही उड्डाणाची वेळ नक्की नसल्याने प्रवाशांत चुळबुळ सुरु झाली.

प्रवाशांनी प्रश्नांचा भडीमार करून एअर होस्टेसना भंडावून सोडले. एरवी चकार शब्दही न काढणाऱ्यांचा आवाज वाढत गेला. अखेर प्रवाशांचा असंतोष पाहता सर्वांना स्नॅक्स चे पाऊच देण्यात आले. बिस्कीट, कुकीज, फरसाण, स्वीट,फ्रुटी, चहा, कॉफीचे आंदण होताच प्रवाशांचा आवाज कमी झाला. मौका मिळताच मी दोन पाऊच मागून आपल्या पोटपूजेची सोय करून घेतली. एकतर फ्री, त्यात दोन दोन पाऊच, काय तो आनंद वर्णावा! सोबतच वातावरणातील ताण तणाव निवळावा म्हणून प्रवाशांना विमानाखाली उतरू दिले. पहिले पोटपूजा आणि नंतर फोटोबा! प्रवासी सेल्फीत दंग झाले. काही प्रवासी, ज्यांचा नियोजित प्रवासाचा खेळखंडोबा झाला ते वैतागून विमानतळ कर्मचाऱ्यांशी हुज्जत घालत होते. मात्र सर्वच हतबल होते. विनाकारण वादावादीत काहीच अर्थ नव्हता. अखेर या गोंधळात साडेबारा वाजले आणि या नाट्यावर पडदा पडला. विमानाला ग्रीन सिग्नल मिळताच ते आकाशी उंच झेपावले आणि नागपूर चंदीगढ नागपूर छोटेखानी प्रवासाला पुर्णविराम मिळाला.
प्रवास वर्णन समाप्त.
**********************************
दि. २२ मार्च २०२३
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++

No comments:

Post a Comment

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...