Monday, March 20, 2023

मिशेल स्टार्क‌‌‌ नव्हे तर माइटी शार्क!

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
   *मिचेल स्टार्क नव्हे तर माइटी शार्क*
               *डॉ अनिल पावशेकर*
**********************************
आमिरच्या दंगल चित्रपटातील एका दृश्यात आमिर त्याच्या गर्विष्ठ सहकाऱ्याला चीत करतो. तेव्हा तो सहकारी त्याला म्हणतो, दम है तेरे में, स्टेट लेव्हल चॅम्पियन को हराया तुने. त्यावर आमिर उत्तरतो, दिल छोटा मत कर, नॅशनल चॅम्पियन से हारा है तू. हे सांगायचे तात्पर्य इतकंच की, भारत ऑस्ट्रेलिया दरम्यानचा दुसरा सामना पाहिला तर आपल्या क्रिकेट रसिकांना एवढेच म्हणता येईल, दिल छोटा ना करो, चॅम्पियन टीम से हारी है अपनी टीम. पहिल्या सामन्यात जीवावर आले पण बोटावर निभावले असं असताना टीम इंडियाची फलंदाजी पुन्हा एकदा कोसळली आणि कांगारूंनी मालिकेत बरोबरी साधली. खरेतर सामना म्हटला की हारजीत तर होणारच, मात्र आपले रथी महारथी फलंदाजीत एखाद्या धबधब्या सारखे कोसळले त्याचे वाईट वाटते.

झाले काय तर आपण अतिथी देवो भव: परंपरेला कट्टरपणे जागतो. कसोटी मालिकेतही ऑसी संघाला दोनदा आपटले आणि तिसऱ्यात आपण पटकनी खाल्ली. असेच काहीसे एकदिवसीय मालिकेत पहायला मिळत आहे. आपला संघ विजयात, प्रदर्शनात सातत्य केव्हा आणणार हा प्रश्नच आहे. कदाचित पाहुण्या संघाला नाराज न करण्याचा त्यामागे उदात्त हेतू तर नसेल ना असा संशय येतो. तसेही आपल्या कडे सध्या जी २० चा उरुस चालू आहे आणि त्यात ऑस्ट्रेलिया सहभागी आहे. मग कसेकाय आपण पाहुण्यांना नाराज करणार? शिवाय दुसरा सामना आपण जिंकला असता तर मालिकेची शेवटची लढत निव्वळ औपचारिकता ठरली असती. आता मालिका बरोबरीत आल्याने तिसऱ्या सामन्याचे महत्व अचानक वाढून टीम इंडियाने मालिकेत चुरस निर्माण केली असेच म्हणावे लागेल.

अर्थातच यातील गंमतीचा भाग सोडला तरी आपल्या फलंदाजांचे पाप लपवता येत नाही. डाव्याखुऱ्या वेगवान गोलंदाजांनी आपल्या फलंदाजांना नेहमीच भंडावून सोडले आहे. मग तो चमिंडा वास असो की वासिम अक्रम अथवा ट्रेंट बोल्ट. मागे शाहिन आफ्रिदी आणि आता मिशेल स्टार्क. या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांत मिशेल स्टार्कचा झंझावात पाहता आणि त्याने ज्याप्रकारे दोन्ही सामन्यांत भारतीय फलंदाजांना गिळंकृत केले ते पाहता त्याला माइटी शार्क म्हणणं जास्त संयुक्तिक ठरेल असे वाटते. स्टार्कसमोर आपल्या फलंदाजांना ताथैय्या ताथैय्या करतांना पाहिल्यावर जगातील तमाम वेगवान डाव्याखुऱ्या गोलंदाजांना बसल्या जागी गुदगुल्या झाल्या असतील. स्टार्कला खेळणे म्हणजे इकडे आड तिकडे विहीर असे असते, त्याचे चेंडू कधी झपकन आत येतात तर कधी बॅटची कड घेऊन स्लीपमध्ये क्षेत्ररक्षकाच्या हातात विसावतात.

तेहत्तीस वर्षीय, सहा फुट सहा इंच उंचीचा मिशेल स्टार्क म्हणजे गोलंदाजीतील आधुनिक आग्यावेताळ समजावा‌. भन्नाट वेगासोबत लाईन आणि लेंथमध्ये त्याच्या कमालीच्या नियंत्रणाने त्याला खेळून काढणे तारेवरची कसरत असते. शिवाय पहिल्या सामन्यात त्याच्या तोंडाला भारतीय फलंदाजांचे रक्त लागल्याने दुसऱ्या सामन्यात त्याने आपल्या फलंदाजांचा फडशा पाडला. गिल, रोहीत, सूर्या आणि राहुलला त्याने लिलया चकवले. त्यातही गील आणि सूर्याने अगदी पहिल्या सामन्यासारखे बाद होत निराश केले. स्टार्कने मागच्या सामन्यात विराट,सूर्याला तर या सामन्यात रोहीत, सूर्याला लागोपाठच्या दोन चेंडूत बाद करत आपली दहशत कायम ठेवली. दोन्ही वेळेस राहुलने त्याला हॅटट्रिक घेण्यापासून थोपवले ‌ मात्र राहुलवर विसंबून राहणे म्हणजे जागते रहो मेरे भरोसे मत रहो सारखे असते.

स्टार्कने हाहाकार माजवताच भारतीय गोटात पळापळी सुरू झाली. याचाच फायदा घेत सिन ॲबॉट, नॅथन इलिसने उर्वरित अर्धी फळी कापून काढली. थोडाफार प्रतिकार केला तो विराट आणि अक्षर पटेलने. मात्र आभाळच फाटलं तर ठिगळ लावणार तरी कुठे कुठे? पन्नास षटकांचा सामना आणि आपला संघ अवघ्या पंचवीस षटकांत, ११७ धावांत गुंडाळला जातो याचा उद्वेग वाटतो. अर्थातच हा आपला एकदिवसीय सामन्यातला चौथा निचांक आहे. यापुर्वी वरची फळी कोसळली की युवराज आणि धोनी, संताजी धनाजी सारखे धावून यायचे आणि संघाला तारुन नेत होते. या दोघानंतर संघात ह्या दोन जागा अजूनही भरल्या गेल्या नाहीत. किंबहुना रोहित, विराट सोडले तर बाकी उंची दुकान फिकी पकवान वाटतात. धुमकेतू सारखे उगवतात, थोडेफार प्रदर्शन करतात आणि पुन्हा गडप होऊन जातात. कदाचित टी ट्वेंटी च्या संस्काराने आत्ताचे फलंदाज तेवढा संयम, शिस्त, स्टॅमीना गमावून बसले असणार.

शेवटी काय तर आंध्रप्रदेशच्या वाय एस राजा रेड्डी स्टेडियम, कडप्पाला भारतीय फलंदाजांनी कडबाकुटार केला. आपली माती आपली माणसं म्हणतात ते यालाच. त्यातही दहा विकेट्सनी हरणे म्हणजे जखमेवर मीठ चोळणे होय. वास्तविकत: आपला संघ सुद्धा नऊ वेळा दहा विकेट्सनी जिंकला आहे. मात्र सध्याच्या काळात २०२०/२१/२२/२३ असे सतत  चार वर्षे दोनदा एकदिवसीय सामन्यात तर दोनवेळा टी ट्वेंटी सामन्यात आपल्या संघाने दहा विकेट्सनी मार खाल्लेला आहे. फलंदाजांनी नांगी टाकल्याने  गोलंदाजांना कसे स्फुरण चढणार? लढायसाठी कमीतकमी फळ्यावर धावा तरी असायला हव्या ना? इथे तर मोठ्या मुश्किलीने आपल्या संघाने शंभरी गाठली होती. मग ना वेगवान गोलंदाज कामी आले ना फिरकीपटू. 

मालिकेतला अंतिम सामना २२ मार्चला चेन्नईत खेळला जाईल. दोन्ही संघ एक एक सामना जिंकून बरोबरीने असले तरी दुसऱ्या सामन्यातील विजयाने कांगारूंचे मनोबल निश्चितच वाढले असणार. पण भारतीय संघाला खचून कसे चालणार? कारण क्रिकेट मध्ये रावाचा रंक, रंकाचा राव व्हायला वेळ लागत नाही. मात्र झालेल्या चुकांतून काही शिकले तरच फायदा होईल. शुभमन गील, सूर्या, राहुल यांनी रोहीत, विराटला साथ देणे अपेक्षित आहे. तर जडेजा, पांड्याला आपल्या अष्टपैलूत्वाला न्याय द्यावा लागेल. दुसऱ्या सामन्यात आपल्या गोलंदाजांची पाटी कोरी असली तरी ते पुनरागमन नक्कीच करू शकतात. एकंदरीत काय तर बलाढ्य कांगारूंचा पाडाव करायचा असेल तर टीम इंडियाला आपले प्रदर्शन सुद्धा चॅम्पियन संघासारखे दाखवावे लागेल तेव्हाच कुठे ही मालिका आपण जिंकू शकतो.
**********************************
दि‌. २० मार्च २०२३
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++++

No comments:

Post a Comment

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...