@#👿👿👿👿👿👿👿👿👿#
कहते है मुझको "हवाहवाई"
डॉ अनिल पावशेकर
*************************************
सिनेसृष्टीतील प्रख्यात अभिनेत्री आणि पहिली महिला सुपरस्टार म्हणून गौरवली गेलेली श्रीदेवी यांचे शनिवारी मध्यरात्रीला आकस्मिक निधन झाले असून सिनेसृष्टीसह तिचे असंख्य चाहते शोकसागरात बुडालेले आहेत. करोडो सिनेरसिकांच्या ह्रदयावर आपल्या अभिनयाने अधिराज्य गाजवणारी श्रीदेवी आता आपल्यात नाही यावर खरेतर विश्वास ठेवणे कठीणच आहे. मात्र ऐश्वर्य, सुखसंपदा, ग्लॅमर नियतीसमोर कसे खुजे आहे याचा दुर्दैवी प्रत्यय यानिमित्ताने आपणास येतो. लग्नासारख्या शुभकार्यात सामील व्हायला गेलेल्या श्रीदेवीला मृत्यु असा अचानक गाठेल यावर विश्वास तरी कोण ठेवणार,, परंतु शेवटी पराधीन आहे जगती पुत्र मानवाचा हेच खरे ठरले.
बालकलाकार म्हणून वयाच्या अवघ्या चौथ्या वर्षी सिनेसृष्टीत पदार्पण करणाऱ्या या अभिनेत्रीने तामिळ, तेलगू, हिंदी, मल्याळम आणि कन्नड भाषेत जवळपास तिनशे चित्रपटात आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला होता. सुरवातीला तामिळ, तेलगू चित्रपटात नाम कमावल्यावर १९७९ ला सोलवा सावन द्वारे तिची बॉलीवुडमध्ये एंट्री झाली. मात्र १९८३ च्या हिम्मतवाला पासून तिच्या अभिनयाची गाडी सुसाट निघाली ती थेट २०१७ च्या माॅम पर्यंत. १९७९ ते १९९७ पर्यंत म्हणजेच १८-१९ वर्षे ती बाॅलीवुडची अनभिषिक्त सम्राज्ञी राहिली. आपल्या नैसर्गिक अभिनयाने आणि उत्तम नृत्य कौशल्याने तिने एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट आपल्या नावे केले होते. तब्बल पाचदा "फिल्मफेअर" अवार्डची मानकरी ठरलेल्या श्रीदेवीला २०१३ ला पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
ड्रेस सेंसबाबत कमालीची दक्ष असलेली श्रीदेवी नृत्य कलेत पारंगत होती. हिम्मतवाला मधील *शनैनोमे सपना सपनोमे सजना हे रोमँटिक गाणे त्याकाळी प्रचंड गाजले होते. जितेंद्र सोबत तिची केमेस्ट्री छान जमली होती. "जाँबाज" मध्ये लाल साडी घालून चित्रीत केलेले हर किसीको नही मिलता यहा प्यार जिंदगीमे गाणे तमाम आशिकांचे आजही आधारस्थान आहे. मि. इंडीयातले कहते है मुझको हवाहवाई हे गाणे तिच्या नटखट नाचण्याने कायम लक्षात राहते,,,,तर निळी साडी नेसून काटे नही कटते ये दिनरात हे गाणे पाऊस आणि प्रणयाचा उत्तम मिलाफ म्हणता येईल. "चांदणी" मधील मेरे हाथोंमे नौ नौ चुडीया है हे गित तिच्या सर्वोत्कृष्ट नृत्यापैकी एक आहे. "लम्हे" मधील मोरनी बागामे नाचे आधी रातमा हे लोकगितावर आधारित नृत्य लाजवाब ठरते. मै नागीन तू सपेरा या गाण्यात तिच्या नृत्याएवढेच तिचे भेदक डोळे पाहण्यासारखे होते. तू मुझे कबूल मै तुझे कबूल या गाण्यात तर तिचा अमिताभच्या तोडीस तोड अभिनय बघायला मिळतो.
अभिनयाची उपजत देणगी लाभलेली ही अभिनेत्री "सदमा" मध्ये मनोरूग्णाची भूमिका करतांना हरवून जाते. तर "चांदणी" मध्ये प्रियकरावर जीवापाड प्रेम करणारी व्यक्तीरेखा सहज साकारते. "चालबाजमध्ये" कधी चुळबुळ नटखट तर कधी सोज्वळ अभिनयाने ती रजनी आणि सनी दोघांवरही मात करते. "जुदाईमध्ये" हावरट पत्नीच्या भुमिकेत १००℅ फिट बसते. जाग उठा इन्सान करतांना खरेतर तिचे मिथुनसोबतचे प्रेमप्रकरण जागे झाले होते परंतु शेवटी कभी किसीको मुकम्मल जहाँ नही मिलता हेच खरे ठरले. लाडला मध्ये कंपनीच्या कडक शिस्तीच्या मॅनेजरची भुमिका तिने लिलया वठवली तर "इंग्लिश विंग्लिश" आणि "माॅम" मध्ये उतरत्या वयातही अभिनयाची जादू तसूभरही कमी झाली नाही हे तिने दाखवून दिले होते.
वयाच्या अवघ्या ५४ व्या वर्षी एक्झिट घेणाऱ्या या चंद्रमुखी ची जुदाई रसिकांना कठीण जाईल. अनोखा हा चांदका टुकडा आपणास सदमा देऊन आखरी रास्ता वर मार्गक्रमण करेल असे मि. इंडीया किंवा जस्टिस चौधरी यांनासुद्धा वाटले नसणार. आपल्या मकसद साठी मवाली, जाँबाज, हिम्मतवाला, चालबाज, अकलमंद, हिरा रांझा आणि धर्म अधिकारी यांच्याशी ती निगाहे भिडवून उभी ठाकली होती. रुपकी रानी असलेली ही सुहागन एक चांगली मॉम तर होतीच शिवाय इंग्लिश विंग्लिश पण सुरेख बोलायची. आकाशातली चांदणी आणि कलेतला हा नगीना घर संसार मध्ये चांगला रमला होता. दोन औलाद असणारी ही कधीच गुमराह झाली नाही. हिट फिल्मचा तोहफा देणारी श्रीदेवी लाडला रसिकांच्या नेहमी स्मरणात राहील. दिसण्यात आग और शोला असुनही गैर कानुनी कामात कधी आढळली नाही. कर्मा वर निस्सीम विश्वास असणारी ही अभिनेत्री आपल्यात नसून तिच्या अभिनयाचे हसीन लम्हे मात्र चिरकाळ आपणास तिचे स्मरण करून देतील. तिची अभिनयाची सल्तनत दिर्घकाळ चाहत्यांच्या ह्रदयावर राज करेल यात वाद नाही. तमाम रसिकांतर्फे श्रीदेवीला विनम्र श्रद्धांजली.
*************************************
दि. २५ फेब्रुवारी २०१८
डॉ अनिल पावशेकर
मो. 9822939287
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++++++
No comments:
Post a Comment