@#😈😈😈😈😈😈😈😈😈#@
*अगंबाई अरेच्चा*
*एअर बॅग तारी त्याला कोण मारी*
***************************************
नागपुरात सध्या थंडीची लाट ओसरत असली तरी पहाटेला चांगलाच गारवा जाणवतोय. त्यातच आम्ही इतर कोणाच्याही व्यायामाचे खंदे समर्थक असलो तरी आमचा व्यायामाशी ३६ चा आकडा आहे. अर्थातच थंडीचा यथायोग्य आदर करत अंथरुणात पहुडणे जास्त पसंत करत असल्याने आमचा सुर्य सकाळी आठ नंतरच उगवतो. सोबतच सकाळची झोप म्हणजे आमच्यासारख्या आळशी लोकांना एक आनंदाची पर्वणीच असते. ना तख्तमे वो मजा है, ना ताज में वो मजा है, जो मजा सुबह उठके फिरसे सो जाने मे है हे आमचे ब्रीदवाक्य असल्याने यावेळी फोनची घंटी वाजली किंवा कोणी झोपमोड केली तर आम्ही युद्धास एका पायावर तयार असतो. अशाच एका रम्य पहाटेला साखरझोपेत असतांनाच फोन थरथरला म्हणजेच व्हायब्रेटला आणि मित्रासोबत जे संभाषण झाले ते पाहून खरोखरच थरथरायला लागले.
झाले काय तर आमचे परममित्र दि. १७ फेब्रुवारीला भल्या पहाटे नागपूरहून जळगावला कामानिमित्त पत्नी आणि मुलीसह कारने बाहेर पडले. सोबत नेहमीचाच ड्रायव्हर असल्याने सर्व निश्चिंत होते. मात्र बरेचदा चितलं ते घडत नाही असा अनुभव येतो. कारने कोंढाळी पार केले आणि सावळी खुर्द या खेड्याजवळ कारला भिषण अपघात झाला. कारमधले सर्वजण जखमी झाल्याने एकच खळबळ उडाली. अशाही बिकट परिस्थितीत मित्राने स्वत: जखमी असुनही पत्नी, मुलगी आणि ड्रायव्हरला स्थानिकांच्या मदतीने बाहेर काढले आणि लगेच त्याचे थोरले बंधू आणि मला मोबाईलवर कळविले. अचानक कळलेल्या बातमीने क्षणभर स्तब्धता निर्माण झाली परंतु लगेच स्वत:ला सावरत निघायची तयारी केली. सोबत होती नव्हती तेवढी रोख रक्कम, क्रेडीट कार्ड, डेबिट कार्ड खिशात कोंबत आम्ही तिघेजण दोन कार घेऊन घटनास्थळाकडे रवाना झालो.
एरवी ड्रायव्हिंगसाठी सुखावह असलेला नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्ग क्र. ६ भेसूर वाटायला लागला होता. मनात शंकाकुशंकांची वारेमाप वर्दळ सुरू झाली होती. एकेक क्षण एकेक वर्षाएवढा मोठा वाटत होता. एव्हाना लगेच संपणारा प्रवास एवढा लांबलचक का होतोय याचा उलगडा होत नव्हता. पहाटेची वेळ असल्याने तुरळक रहदारी, भयाण शांतता काळजात धडधड वाढवत होती. अखेर एकदाचे बाजारगाव टोल प्लाझा आले आणि आपण घटनास्थळाच्या जवळपास आल्याचे समाधान वाटले.
सध्या टोल प्लाझावर वाहतुकीचा वेळ वाचविण्यासाठी आणि रहदारी सुटसुटीत होण्यासाठी फास्टटॅगची संकल्पना राबवली गेली आहे मात्र अजुनही काही ठिकाणी जुनेच दुखणे कायम आहे. दरम्यान अपघातस्थळी ॲम्ब्युलन्स उपलब्ध न झाल्याने एका टॅक्सीने चौघेही जखमी अवस्थेत बाजारगाव पर्यंत पोहचले होते. आम्ही लगेच त्यांना गाठले आणि सर्वांना घेऊन नागपुरच्या दिशेने निघालो. एक तासात नागपूर गाठले आणि रविनगर चौकातल्या रूग्णालयात चौघांना दाखल करण्यात आले.
दैव बलवत्तर म्हणून एवढ्या भिषण अपघातात प्राणहानी झाली नाही मात्र आलीशान कारचा क्षणार्धात चुराडा झाला. Accident happens accidentally हे जरी खरे असले आणि काळवेळ आपल्या हातात नसली तरी सुरक्षेशी तडजोड आपल्या जीवावर बेतू शकते. शिवाय वाहतुकीचे, रहदारीचे नियम कटाक्षाने पाळणे किती गरजेचे आहे हे अपघात झाल्यास आपणास लगेच कळून येते. सध्या बहुतांश चारचाकी वाहनात सुरक्षेच्या दृष्टीने एअर बॅग आणि सिट बेल्टची सोय केलेली असते. शिवाय वाहनाचे सर्व दरवाजे व्यवस्थितपणे लॉक करणे, चाईल्ड लॉकचा उपयोग करणे इत्यादी खबरदारी घेणे जरुरी असते. बरेचदा अपघातानंतर वाहनात अडकून पडणे, दरवाजे न उघडणे किंवा अपघात ग्रस्त वाहनात आग लागण्यासारख्या प्रसंगाला सामोरे जावे लागते. याकरीता वाहनात कांच, पत्रा तोडण्याकरीता हातोडा, सीटबेल्ट कापण्यासाठी कैची, आगीपासून बचावाकरीता सिझफायर सारखी साधनं उपलब्ध असणं आवश्यक आहे. प्रत्येक सिटवर असलेल्या हेडरेस्टच्या मुळाशी अणकुचीदार छोटे रॉड असतात ते सुद्धा कांच तोडायला उपयोगी पडू शकतात.
खरेतर सिट बेल्ट आणि एअर बॅग ही सुरक्षेच्या दृष्टीने आपली कवचकुंडले असतात. मात्र किती प्रवासी आणि चालक याचा उपयोग करतात हे वेगळे सांगायला नको. सिट बेल्ट फक्त चालकाने लावले की आपली जबाबदारी संपली किंवा गाडीचे चालान होणार नाही याकडे आपले जास्त लक्ष असते. मात्र फक्त चालकच नाही तर सर्वांनीच सिटबेल्टचा उपयोग करायचा असतो ही भावनाच आपल्या मनात येत नाही. वास्तविकत: वाहनातून प्रवास करताना भौतिकशास्त्राच्या गतीचे नियम आपणास लागू होते. आपल्या शरीराचे वजन (मास), त्याला वाहनाद्वारे मिळालेली गती (व्हिलॉसीटी) यांचे रूपांतर कायनेटिक एनर्जीत होते. अर्थातच अपघात होताच आपले शरीर या कायनेटिक एनर्जीने फेकले जाते मात्र सिट बेल्ट मुळे आपण जागेवरच खिळून राहतो. सिट बेल्ट मुळे जरी सुरक्षा मिळत असली तरी डोके आणि मान वेगाने पुढे जाऊन परत मागे फेकल्या गेल्याने डोके, मान, मांसपेशींना गंभीर इजा होऊ शकते.
एअर बॅग बाबत बोलायचे झाले तर इथे केमीकल लोच्या असतो. एअर बॅग मध्ये एक्सलेरोमिटर असते. याद्वारे वाहनाची गती सामान्य गतीपेक्षा अचानक तिव्रतेने कमी झाली तर लगेच एअरबॅग सर्किट ॲक्टीव्हेट होते. एअर बॅगला सप्लीमेंट्री रिस्ट्रेंट सिस्टीम म्हणतात. यात सोडीयम एझाईड (NaN3) हे रासायनिक द्रव्य असते. वाहनाची धडक होताच सेंसर्स एक्टिव्हेट होऊन इग्निटरला इलेक्ट्रीक सिग्नल पाठवले जातात. यामुळे उष्णता निर्माण होताच सोडीयम एझाइडचे अपघटन होऊन सोडीयम मेटल आणि नायट्रोजन गॅस तयार होते ज्यामुळे नायलॉनच्या एअर बॅग तात्काळ फुगल्या जातात ज्या स्टिअरींग व्हिल आणि डॅश जवळ असतात. प्रवासी किंवा चालकाचे डोके एअर बॅगवर आदळताच त्यातली हवा निघून जाते आणि एअर बॅगचे कार्य संपते. मात्र याच एअर बॅग मुळे २४% मृत्युदर कमी होतो.
जखमींना रुग्णालयात दाखल केल्यानंतर पोलिस ठाणे, इन्शुरन्सचे सोपस्कार पार पाडावे लागतात. चालकाकडे वाहन परवाना आणि वाहनाचा विमा असणे अत्यंत आवश्यक आहे. शिवाय अचानक उद्भवलेल्या प्रसंगी विमा, मेडीक्लेमची उपयुक्तता लक्षात येते. अपघातग्रस्त वाहनाचे निरिक्षण केले तर यातुन कोणी जिवंत वाचले असतील यावर विश्वास बसत नाही. कारची समोरची उजवी बाजु संपूर्ण पणे दबलेली आढळली. बोनटच्या चिंधड्या उडालेल्या होत्या तर कारचे छप्पर दबलेले होते. आतमध्ये सर्वत्र काचेच्या तुकड्यांचा सडा पडलेला होता. समोर, मधल्या आणि मागच्या आसनावर रक्ताचे शिंतोडे अपघाताची भयानकता दाखवत होते. इतरत्र फेकले गेलेले प्लॅस्टिकचे तुकडे, कचरा, मोडलेले, भंगलेले कारचे विविध भाग, विस्कटलेले सामान विदारक वेगाची जाण करून देत होते. एवढे सर्व पाहून काळ आला होता पण वेळ आली नव्हती असेच म्हणावेसे वाटते. तरीपण सिट बेल्टचे भिऊ नकोस मी तुझ्या कमरेशी आहे तर एअर बॅग तारी त्याला कोण मारी हे विसरून कसे चालणार? अखेर पोलिस ठाणे आणि विमा संबंधित भानगडी आटोक्यात आणण्यासाठी आम्हाला चांगलाच घाम गाळावा लागला.
मात्र इतक्या जिवघेण्या प्रसंगातुनही आमचे मित्र, परिवार आणि चालक सही सलामत बाहेर पडले याचे समाधान होते. जाको राखे साईया मार सके ना कोय हे जरी खरे असले तरी लांबचा प्रवास असतांना सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक ती खबरदारी घेणे आपल्या हातात नक्कीच आहे. वाहनाचा वेग नियंत्रणात असणे, चालक सावध असणे, वाहन सुस्थितीत असणे यावर सर्वकाही अवलंबून असते. मात्र झालेल्या या दुर्देवी प्रसंगातून Forget the mistake remember the lesson एवढा धडा घेतला जाऊ शकतो.
***************************************
दि. २० फेब्रुवारी २०२०
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++++++
No comments:
Post a Comment