@#😈😈😈😈😈😈😈😈😈😈#@
*कोरोना, डरना जरुरी है, भाग ०१*
*डॉ अनिल पावशेकर*
************************************
भारतात कोरोनाचे आगमन होऊन अर्धे वर्ष लोटले होते. सहाजिकच याबाबतीत काय काळजी घ्यायला हवी किंवा कोणते प्रतिबंधक उपाय योजावे याबाबत भरपूर माहिती उपलब्ध होती. तरीपण कोरोना चोरवाटेने का होईना कसाकाय दाखल होतो याची उत्सुकता होतीच. मात्र पीपीई किट, ग्लोव्हज, फेसमास्क, सॅनिटाईझर, डिसइन्फेक्टंट, सोशल डिस्टंसिंगचा वापर करत अर्धे वर्ष नॉट आऊट असल्याने मनातील बरीच धास्ती कमी झाली होती.
ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून रुग्णांची संख्या लक्षणीयरीत्या वाढू लागल्याने मनात जी भिती दडली होती ती खरी होते की काय अशी काळजी वाटायला लागली होती. अखेर आलीया भोगाशी असावे सादर म्हणत आपली दैनंदिनी सुरू ठेवली होती. दि. २९ ऑगस्टला सकाळी उठताच हलकी सर्दी, खोकला सुरु झाला होता. मात्र दुर्लक्ष नको म्हणून अगदी पहिल्या दिवसापासून ॲझीथ्रोमायसीन आणि पुरक औषधी सुरु केल्या होत्या. सुरवातीला नेहमीप्रमाणे व्हायरल इंफेक्शन समजून मनाची समजूत काढली परंतु मनात रुखरुख वाढायला लागली होती आणि मनी चिंतते ते वैरी न चिंतते प्रमाणे मनात चांगलाच संशयकल्लोळ माजला होता.
तिन दिवसांत लक्षणे कमी झाल्याने मनाचा हुरुप वाढला होता शिवाय ॲंटीजीन टेस्ट निगेटिव्ह आल्याने आपण कोरोनाला सहज चकवले असा आत्मविश्वास निर्माण झाला होता. मात्र अज्ञानासारखे दुसरे सुख नाही असे का म्हणतात हे ध्यानात यायला वेळ लागला नाही. चौथ्या दिवसापासून म्हणजेच एक सप्टेंबरपासून सर्दी, खोकला आदी लक्षणे गायब होऊन हलकी अंगदुखी सुरु झाली. चला यानिमित्ताने आपण आराम करावा म्हणून दोन दिवस दवाखान्याला सुट्टी घ्यायची ठरवली. मात्र अंगदुखीचे हे प्रकरण काहीतरी वेगळेच आहे आणि आपण नॉर्मल नाही याची खात्री पटायला लागली होती. अखेर हो नाही करत मनाची तयारी केली आणि दोन सप्टेंबरला संध्याकाळी कोरोनाची आरटीपीसीआर टेस्ट केली.
तिन सप्टेंबरला आरटीपीसीआर टेस्ट पॉझिटिव्ह असल्याचे कळले आणि मनावर आभाळच कोसळले. काही क्षणभर तर आपला रिपोर्ट चुक तर नसेल ना म्हणून मनाची समजूत काढली. रिपोर्ट मधला सीटी स्कोअर पाहता खुप जास्त वायरल लोड असल्याचे स्पष्ट झाले होते आणि आता आपण स्वत: एक वायरल बॉम्ब असल्याची भिती मनात घर करून बसली होती. आतापर्यंत दडलेल्या तापाने हळूहळू १०० डिग्रीकडे वाटचाल सुरू केल्याने सत्य नाकारता येत नव्हते. अखेर वारंवार थर्मर गन आणि थर्मामिटरवर ताप सेंच्युरी झळकवू लागताच हातापायातले त्राण सरू लागले होते. लगेच मी घरातील सदस्यांना आणि निवडक मित्रांना याची कल्पना दिली आणि विलगीकरण अर्थातच एकांतवासाच्या दिशेने आमचा खडतर प्रवास सुरू झाला.
अत्यंत गोंधळलेल्या अवस्थेत काही तज्ञ डॉक्टरांशी सल्लामसलत करून उपचारांची चौकट ठरवली गेली. मात्र नक्की कोणती उपचार पद्धती रामबाण ठरेल याबाबत द्विधा मनःस्थितीत होतो. त्यातच समाधानाची बाब म्हणजे रक्ततपासणी केली असता जवळपास सर्वच रिपोर्ट नॉर्मल असल्याने थोडेफार समाधान होते. अखेर एचसीक्यूएस या औषधाच्या साहय्याने आम्ही कोरोनाविरूद्ध लढण्यास सज्ज झालो. कोरोनामुळे नक्की किती प्रभाव फुफ्फुसांवर झाला असावा याकरिता सिटी स्कॅन करणे आवश्यक होते आणि याकरिता दुसऱ्या दिवशी सकाळी धंतोलीला जायचे ठरवले.
खरेतर व्हायरल लोड खुप जास्त असल्याने कडक विलिनीकरण पाळणे जरूरी होते. आता सर्व संसार एका खोलीत एकवटल्याने अवघडल्यासारखं वाटायचं, मात्र त्रागा करून काही उपयोग नव्हता. अखेर चरफडत, जागत रात्र काढली. सकाळी लवकर उठून सीटी स्कॅन करीता स्वत: कार चालवत धंतोलीला पोहोचलो आणि रिपोर्ट हाती येताच आणखी अवसान गळाले. सीटी स्कोअर पंचवीस पैकी सहा असला तरी कोरोना महाशय आपली निशाणी फुफ्फुसांवर सोडण्यात यशस्वी ठरले होते. मात्र याचा हळूहळू परिणाम मनावर जाणवू लागला, मनात अचानकपणे निरनिराळे विचार येऊ लागले, कोरोनाने शारीरिक आघातापेक्षा माझे मानसिक खच्चिकरण जास्त वेगाने करणे सुरू केले आणि घरी परतताना कार अर्धवट शुध्दीत असल्यासारखं चालवत घरी पोहोचलो.
क्रमश:,,,,
(वाचकांना नम्र सूचना,,, या लेखात उल्लेखीत औषधांची नावे फक्त माहिती करीता दिलेली आहे. उपरोक्त औषधांचा उपयोग तज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार करणे हितावह आहे.)
****************************************
दि. १७ सप्टेंबर २०२०
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
No comments:
Post a Comment