Tuesday, April 11, 2023

कोरोना डायरीज, भाग ०२


@#😈😈😈😈😈😈😈😈😈😈#@
         *कोरोना, वो सात दिन, भाग ०२*
               *डॉ अनिल पावशेकर*
**************************************
बरोबर ९० वर्षांपुर्वी साबरमती आश्रम ते दांडी पर्यंत महात्माजींनी मिठाचा सत्याग्रह करत जुलमी इंग्रजी सत्तेच्या पायाला सुरूंग लावला होता. मात्र आमच्यावर आक्रमण केलेला कोरोना खाल्लेल्या मिठाला जागत आपली दहशत माजवण्यात मशगुल होता. २९ ऑगस्ट पासून सुरू झालेली कोरोना यात्रा सातव्या दिवशी म्हणजेच ४ सप्टेंबरला चांगलीच रंगात आली आणि फणफणत्या तापासोबत जेवणाचे बेरंग करून गेली. जगण्यासाठी खावे यापेक्षा खाण्यासाठी जगावे यावर आम्ही आजही ठाम असल्याने कोरोनाने सर्वात पहिले रसनाचा (जिभेचा) रसभंग करून आमची खाण्याची खोड चांगलीच जिरवली.

खरेतर आहारात चिल्ड पाणी म्हणजे आमचा जिव की प्राण. अगदी कुडकुडत्या थंडीतही चिल्ड पाणी आम्हाला अमृतासमान भासते. मात्र आता दिवस पालटले होते. चिल्ड ऐवजी उकळलेले गरम पाणी पिण्याची सक्ती म्हणजे खरेतर तोंड दाबून बुक्क्याचा मार होता. अखेर मान तुकवत, नाक मुरडत गरम पाण्याशी आम्ही दोस्ती केली. त्यातच काढा, गार्गल्स, वाफ घेणे आदी विशेषोपचार आमच्यासारख्या खादाड आणि आळशी व्यक्तीला काळ्या पाण्याच्या शिक्षेसारखे होते. यातच मग या साधारण परंतू असाधारण प्रभाव असलेल्या उपायांकडे दुर्लक्ष केले आणि आजार बळावण्यात एकप्रकारे स्वत:च्या पायावर धोंडा पाडून घेतला.

मुख्य म्हणजे बऱ्याचशा कोरोना रुग्णांना तोंडाची चव जाणे किंवा स्मेल (वास) न कळणे सारखी लक्षणे आढळतात. याबाबतीत माझी चांगलीच पंचाईत झाली होती. खाण्याचा प्रत्येक पदार्थ मला अतिशय खारट जाणवत होता. साधी पोळी असो की भात इतका खारट लागायचा की हे दोन्ही पदार्थ पाण्याने धुऊन  खायची इच्छा होत होती. आधीच जेवणात गरम पाणी आणि सोबतीला सगळे पदार्थ खारट लागत असल्याने आमच्या स्वयंस्फुर्त अन्न सत्याग्रहाला सुरूवात झाली. भुक तर लागत होती परंतु अन्नपदार्थ पाहताच जेवणाची इच्छा नष्ट होत होती. नशीब चांगले म्हणून केवळ ड्राय फ्रुट तेवढे घशाखाली जात होते आणि त्यावर दिवस काढणे सुरू होते.

एव्हाना एचसीक्यूएस औषधी सुरु करुन दोन दिवस झाले होते परंतू कोरोना दिल है के मानता नहीं प्रमाणे १०० डिग्री तापमान सोडायला तयार नव्हता. सतत दोन दिवसांच्या तापाने हळूहळू आपला प्रभाव दाखवणे सुरू केले होते. दिवसभर गुंगीत असल्यासारखे भासत होते. मात्र या उपचाराने फारसा फरक जाणवत नसल्याने पुन्हा एकदा तज्ञ डॉक्टरांशी सल्लामसलत केली आणि त्यानुसार एचसीक्यूएस बंद करून फॅबीफ्ल्यू (फेमीपीरॅवीर) आणि डॉक्झीसायक्लीन ही दोन औषधे इतर पुरक औषधांसोबत सुरु करण्यात आली.

नवीन दोन औषधी सुरु करताच मनाचा हुरुप वाढला, आपण आता लवकरच ठिक होणार असा आत्मविश्वास बळावला परंतु हा आनंद अल्पजीवी ठरला. राजा विक्रमाच्या पाठगुली बसलेल्या वेताळासारखा ताप काही केल्या पिच्छा सोडायला तयार नव्हता. समाधानाची बाब म्हणजे रक्त तपासणी नॉर्मल येत होत्या तर सर्दी,खोकला, अंगदुखी किंवा अशक्तपणा अजिबात जाणवत नव्हता. अखेर ३ ऑगस्टला सुरू झालेल्या तापाने सतत सातवा दिवस गाठला होता आणि नवीन दोन औषधांनाही जुमानत नव्हता.

आता मात्र माझा संयम सुटायला लागला होता. कोरोनाच्या विळख्यातून आता आपली सुटका होणार नाही याची मनोमन खात्री पटायला लागली होती. सोबतच नागपूरला रुग्णालयात बेड उपलब्ध नसणे, बेडअभावी रुग्णांची होणारी परवड पाहून मन आणखी खचून जात होते. शिवाय कोरोना ज्याप्रकारे वैद्यकीय व्यावसायिकांचा बळी घेत आहे ते पाहता आपले तर काही बरेवाईट होणार नाही ना अशी भिती सतत रहायची. सोबतच एकाच रुममध्ये बंदिस्त झाल्याने भ्रमिष्टासारखी स्थिती झाली होती. दिवस आहे की रात्र कळायला मार्ग नव्हता. आपण नक्की जिवंत आहोत की भास होत आहे काही समजत नव्हते. दिवसरात्र चरफडत जगण्यापेक्षा एकदाचा सोक्षमोक्ष लागलेला बरे असे वाटत होते. 

कोणाशी काय बोलावे सुचत नव्हते शिवाय अशावेळी इतरत्र फोन करणे म्हणजे अनाहूत सल्ल्यांची त्सुनामी येण्याची भिती असते. मात्र अशाही परिस्थितीत आप्तस्वकीय आणि डॉ अजय कुलवाल, डॉ प्रदिप पाटील यांचे फोन येताच आपण जीवंत आहोत आणि जीवंत राहू याची खात्री पटत असे. निश्र्चितच पैसा अमुल्य आहे मात्र आप्तस्वकीय आणि जिवाभावाची मित्रमंडळी किती अनमोल, मुल्यवान आहे याची अशा बिकट प्रसंगी खरोखरच प्रचिती येते. अखेर मनाला समजावत डोळ्यांच्या पाणावलेल्या कडा पुसत तापात सात दिवस काढले आणि अखेर एकदाचे ठरवले. आता पुन्हा एकदा उपचाराविषयी तज्ञ डॉक्टरांशी शेवटचा संवाद साधायचा आणि जे होईल त्यासाठी मनाची तयारी केली आणि मनात एक गाणे गात अंथरुणावर स्वत:ला झोकून दिले,,,
ऐ जिंदगी गले लगाले, हमने भी तेरे हर इक गमको  गले से लगाया है ,,, है ना
क्रमश: ,,,,,,
****************************************
दि. १८ सप्टेंबर २०२०
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
+++++++++++++++++++++++++++++

No comments:

Post a Comment

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...