नागपूर तो झांकी है,,,,,,!
डॉ अनिल पावशेकर
*************************************
नागपूर पदवीधर मतदार संघाची निवडणूक नुकतीच आटोपली असून वर्षानुवर्षे अभेद्य असलेला भाजपाचा हा गड अचानक गडगडला आहे. कांग्रेसचे उमेदवार 'वं'जारी यांनी नंबर 'वन' कामगिरी करत सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे तर भाजपच्या भरवश्याच्या म्हशीला टोणगा का झाला याचे चिंतन नक्कीच सुरू झाले असणार. मात्र दुसऱ्याच्या डोळ्यातले कुसळ शोधण्यापेक्षा आपल्या डोळ्यातल्या मुसळाचा प्रामाणिकपणे शोध घेतला तर पराभवाची नामुष्की का पत्करावी लागली याचा उलगडा सहजच होऊ शकतो.
अर्थातच अहंकारासारखा मोठा शत्रू कोणी नाही आणि मुख्य म्हणजे अतिआत्मविश्वासाचे अहंकारात रुपांतर केंव्हा होते हे भल्याभल्यांना कळतच नाही. किंबहुना कळले तरी जोपर्यंत ठेच लागत नाही तोपर्यंत अक्कल येत नाही अशी स्थिती असते. शिवाय शत्रूला कमजोर समजणे किती आत्मघातकी ठरते हे या निकालाने स्पष्ट केले आहे. खरेतर भाजपाचे हे खासमखास संस्थान का खालसा झाले याची अनेक कारणे असली तरी काही बाबी ठळकपणे जाणवतात.
कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर झालेला महापौर, मनपा आयुक्तांचा वादविदंग या निवडणूकीची पटकथा लिहून गेला. अर्थातच या हेवीवेट धुमश्चक्रीत कोण चुक कोण बरोबर हे सांगणे कठीण असले तर आयुक्त नायक ठरले तर महापौर खलनायक ठरल्या गेले. कोरोनाने धुमाकूळ घातला असताना सामान्य नागरिक असो की आणखी कोणी असो अथवा डॉक्टर असो यांना गुराढोरांसारखे उचलून क्वारंटाईनच्या नावाखाली छळण्यात आले. कित्येक डॉक्टरांचे तिन तिन कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह असूनही त्यांना १४ दिवसांचा वनवास घडवल्या गेला. सिमा सिल करायच्या नादात सामान्यांचा श्वास कोंडवून टाकण्यात आला. आपल्याच नागरिकांना आपल्याच शहरात चोर, कैद्यांसारखी मिळणारी वागणूक संतापजनक होती. जरी यातले कारस्थानी कोणी इतरही असले तरी बदनामीचे हे बिल महापौरांच्या नावाने फाडले गेले.
निश्चितच एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या नादात जनता भरडली गेली आणि जनमत आपोआप स्थानिक प्रशासन, सत्ताधाऱ्याच्या विरूद्ध गेले. सोबतच कांग्रेस वर नेहमीच जातीपातीचा आरोप होतो मात्र महापौर पद असो की पदवीधर मतदार संघाची निवडणूक असो,,प्रमुख पक्षांना जातीपात, घराणेशाहीचा परिघ ओलांडताच आला नाही. नेहमीप्रमाणेच हाडाचे कार्येकर्ते हाडे झिजवत राहीले तर तळागाळातले आणखी तळागाळातच कसे रूतून बसतील याची दक्षता घेण्यात आली.
याशिवाय लोकप्रिय आणि जनाधार असलेल्या नेत्यांचा अड आणि सड करण्यात आला किंवा त्यांना बिन पगारी, फुल्ल अधिकारी करण्यात आले. यामुळे ज्याप्रमाणे बिगारीचे कुत्रं ससे धरत नाही त्याप्रमाणेच जमविलेले कार्येकर्ते असो की प्रचारमंडळी असो अथवा गाठीभेटी असो. कोण किती तन्मयतेने झटले हे ज्याचे त्यालाच चांगले माहीत असावे. याशिवाय उमेदवार निवडीबाबतच्या संभ्रमामुळे जो काळ वाया गेला तोपर्यंत कांग्रेस आपली मजबुत फिल्डींग लाऊन मोकळी झाली होती. काही प्रमाणात या लढतीत प्रमुख खेळाडूंनी स्पॉट फिक्सिंग केल्याच्याही अफवा आहेत.
मात्र पराभवाचे रडगाणे गात बसण्यापेक्षा काँग्रेस उमेदवाराच्या मेहनतीकडे दुर्लक्ष कसे काय करता येईल? शिवाय भाजपाच्या होम पिचवर 'वंजारी' यांनी मिळवलेल्या 'अभिजीत' विजयाचे कौतुकच करायला हवे. खरेतर पदवीधर मतदार संघाचा चेहरामोहरा वेगळा असतो, मतदानाचे संदर्भ वेगवेगळे असतात, मतदानाची पद्धतसुद्धा निराळीच असते. विशेष म्हणजे यावेळी जसे बंपर मतदान झाले तसेच अवैध मतांची संख्या लक्षणीय होती. पदवीधर असुनही जर इतक्या जास्त प्रमाणात मते अवैध ठरत असतील तर काय अर्थ आहे तुमच्या पदवीधर असण्याचा. किंबहुना काही वैध मते जाणीवपूर्वक अवैध तर ठरवण्याचा प्रयत्न तर केला गेला नसावा अशीही दाट शंका आहे. कारण एव्हरीथींग इज फेअर इन लव्ह ॲंड वार असे उगाचच नाही म्हटल्या जात.
तसेही निवडणूका म्हटले की जातीपातीचा चिखल अटळ असतो. मात्र याच जातीपातीच्या चिखलात आजपर्यंत कमळ उगवत आले हे विसरून कसे चालणार? फरक एवढाच की यावेळी भाजपच्या कमळाऐवजी कांग्रेसचे ब्रह्मकमळ टवटवीत पणे फुलले. या परिवर्तनाला कोण जबाबदार आहे याचे मंथन करायला हरकत नसावी. निश्चितच भाजपाच्या बालेकिल्ल्यात कांग्रेसने बाजी मारत सौ सुनारकी इक लौहारकी असते हे दाखवून दिले. तसेही प्रतिस्पर्धी जोशी असल्याने भाजपाला आपला पंजा दाखवायला काँग्रेसला फारसे कष्ट घ्यावे लागले नाही.
नागपूरच कशाला, इतरत्रही जातीपातीची संस्थाने जीवापाड जपली जातात. मात्र ही खेळी यशस्वी झाली तर त्याला करिश्मा म्हटले जाते आणि उलटली की विरोधकांवर जातीयवादाचा दोष मढवून नामनिराळे होता येते. ही निवडणूक येणाऱ्या भविष्याची नांदी नसली तरी झालेल्या चुका सुधारून आगामी काळातील निवडणूकात डॅमेज कंट्रोल नक्कीच करता येईल शिवाय घरभेद्यांसाठी पेस्ट कंट्रोल कसे करता येईल याचाही विचार करावा लागेल.
तसेच वारंवार तेच ते चेहरे पाहून जनता कंटाळली आहे याची दखल कोण घेणार? नवीन चेहऱ्यांना संधी कधी मिळणार, आयुष्यभर पक्षाचे ओझे निष्ठेने वाहणाऱ्यांना महत्त्वाचे पद किंवा तिकिटरूपी पेंशन कधी मिळणार याचाही ऊहापोह होणे जरूरी आहे. कारण पदवीधर निवडणूका झांकी आहेत तर मनपा निवडणूका बाकी आहेत हे संबंधीतांनी ध्यानात ठेवणे गरजेचे आहे अन्यथा तिथेही पानिपतची पुनरावृत्ती होऊ शकते.
*************************************
दि. ०७ डिसेंबर २०२०
मो ९८२२९३९२८७
No comments:
Post a Comment