मॅन्चेस्टरला पानिपत का झाले?
***************************************
तमाम भारतीय क्रिकेट रसिकांच्या दृष्टीने आता विश्र्वचषकाचे कवित्व संपलेले असून मॅंचेस्टरचा मानहानीकारक पराभव चाहत्यांच्या चांगलाच जिव्हारी लागलेला आहे. साखळी सामन्यात "दमदार" कामगिरी करणाऱ्या टीम इंडियाला २४० धावा काढतांना "धापा" का लागल्या यांचे निदान दिड दोन वर्षांपूर्वी होऊनही तात्पुरती मलमपट्टी करून काम भागवले गेले आणि शेवटी होत्याचे नव्हते झाले. टॉप ऑर्डरच्या खेळीने आपल्या मध्यफळीचे अपयश वारंवार झाकले गेले होते आणि ऐन सेमीफायनलला हाच टाॅप आॉर्डर कोसळताच "मध्यफळीचे उघडे नागडे रुप जगजाहीर झाले" आणि आपण एका केविलवाण्या पराभवाचे धनी ठरलो.
खरेतर शिखर धवनचे जखमी होऊन माघारी परतने टीम इंडियासाठी कधीही भरून न निघणारी हानी होती. इनमिन तिन फलंदाज म्हणजेच रोहीत, धवन आणि विराटच्या जिवावर आपण विश्र्वचषक जिंकायला निघालो होतो. यातही मग धवन नसणे म्हणजे "दुष्काळात तेरावा महिना" अशी परिस्थिती झाली. धवन बाहेर होताच केएल राहुलला लगेचच उचलून सलामीला आणले गेले परंतु ही योग्य अदलाबदल नव्हती तर तात्पुरती सोय होती. मग "राहुलची" पोकळी भरायला रिषभ पंतला पाचारण करण्यात आले तरीपण "राहुकेतू" मध्यफळीचा पिच्छा सोडायला तयार नव्हते. शिवाय विजय शंकर, दिनेश कार्तिक आणि केदार जाधव म्हणजे खायला काळ आणि भुईला भार ठरल्याने टीम इंडियाची चांगलीच गोची झाली. तर मध्यफळीचा दिपस्तंभ किंवा बेस्ट फिनीशर म्हणून गणला गेलेला महेंद्रसिगं धोनी आताही आपल्याला त्याच्या फलंदाजीच्या भरवश्यावर सामना जिंकून देणे हे राहुल गांधींनी काॅंग्रेसला एकहाती बहुमत मिळवून देण्याऐवढे अशक्यप्राय आहे या गोड गैरसमजुतीतून बाहेर निघायला कोणीही तयार नव्हते. मध्यफळीत टीम इंडियाने भरती केलेल्या "बेडकांनी फुगून बैल होण्याचा प्रयत्न केला"आणि त्यांचे परिणाम सर्वांसमोर आहेतच.
निश्चितच रिषभ पंत आणि हार्दिक पांड्या युवा, प्रतिभावान योद्धे आहेत मात्र अजुनही ते "राॅ मटेरियल"आहे आणि "फिनिश्ड प्राॅडक्ट" व्हायला त्यांना पुरेसा वेळ देणे अत्यंत गरजेचे आहे. तर महेंद्रसिगं धोनीचा सुर्य मावळतीला आहे याची साक्ष त्याची संथ फलंदाजी स्वत: देत आहे. ३८ वर्षाच्या धोनीकडून पहिले सारख्या तडाखेबंद फलंदाजीची अपेक्षा करणे धाडसाचे ठरते, जास्तीत जास्त म्हणजे तो फलंदाजी तर करू शकतो पण जिंकून देऊ शकत नाही ही "काळ्या दगडावरची रेघ आहे."
वास्तविकता: सेमीफायनलला आपल्या गोलंदाजांनी सुरेख कामगिरी करत सामना भारताच्या नियंत्रणात आणला होता. सोबतच खेळपट्टी एवढी खतरनाक नव्हती की २४० धावा निघाल्या नसत्या. मात्र तो दिवस न्युझीलंडचाच होता. रोहीत, विराट, राहुल प्रत्येकी एक एक धाव काढून परत येतील असे कुणाला स्वप्नातही वाटले नसणार. मात्र हेच सत्य होते. दिनेश कार्तिक, रिषभ पंत आणि हार्दिक पांड्याने किवींचा तिखट मारा तर खेळून काढला मात्र धावा काढायला ते विसरले आणि इथेच आपण पराभवाकडे आपोआप खेचले गेलो. कदाचित रनरेटच्या आसपासही धावगती राखली गेली असती तर जडेजा धोनीच्या जिगरबाज खेळीने विजयाला गवसणी घातली गेली असती. मात्र अशा जरतर च्या गोष्टींना आता काहीच अर्थ नाही. मध्यफळी ही आपली कमजोर कडी होती आणि हिच बाब आपल्याला विश्र्वचषक स्पर्धेबाहेर काढण्यास पुरेसी ठरली.
भारतीय गोलंदाजांनी मात्र खरोखरच स्वप्नवत कामगिरी करत चाहत्यांना खुश केले. भुवनेश्वर कुमार, बुमराह, मो. सामी या त्रिकुटासोबतच कुलदिप, जडेजा आणि चहलने फिरकीचा प्रभावी मारा करत भारताला सामने जिंकून दिले. टीम इंडियाचे क्षेत्ररक्षण सुद्धा दृष्ट लागावे असेच होते. शेवटी खेळ म्हटले की हारजीत तर आलीच. केवळ एका सामन्यात अपयशी ठरल्याने टीम इंडियावर टिका करणे योग्य नाही, मात्र पुढचा की ट्वेंटी विश्र्वचषक लक्षात घेता संघात अमुलाग्र बदल होणे क्रिकेटप्रेमींना अपेक्षित आहे.
***************************************
दि. १२ जुलै २०१९
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
No comments:
Post a Comment