तरण्या झाल्या बरण्या म्हाताऱ्या झाल्या हरण्या.
**************************************
सध्याच्या धावपळीच्या आधुनिक युगात अनेक स्वास्थ्य समस्या निर्माण झाल्या आहेत. "झिरो फिगरच्या" जमान्यात "स्थुलता, लठ्ठपणा म्हणा की जाड्यता",,,, ही बहुतांश महिलांना भेडसवणारी प्रमुख समस्या झाली आहे. विषेशतः विवाहानंतर येणाऱ्या स्थुलपणाने बहुतेक महिलावर्ग हैराण झाले आहे. "चंद्र वाढतो कले कलेने अन सुनबाई वाढते किलो किलोने" अशी परिस्थिती जिकडे तिकडे बघायला मिळते. काँलेजमध्ये असणारी हिरवी मिर्ची कधी ढोबळी मिर्ची झाली आणि गुलाबाचे फुल कधी फुलकोबी झाले हे कळतच नाही.
थोडे आपण भुतकाळात डोकावले तर ही समस्या का उदभवली याचे उत्तर सहज मिळेल. पुर्वीच्या काळी "सुर्योदय ते सुर्यास्त" म्हणजेच "AM to PM" सर्व कामे घरी महिला स्वतः करत होत्या. आलार्मचा मागमूसही नसतांना भल्या पहाटे जात्यावर दळण दळले जायचे. अंगणात सडा शिंपणे असो की रांगोळी घालने ही साधी कामेसुद्धा अगदी वेळेवर, मन लाऊन केल्या जात होती. बरीचशी कुटुंबे चाळ किंवा फ्लॅट मध्ये स्थलांतरित झालेल्याने ना अंगणाचा प्रश्न राहीला ना सडा,रांगोळीचा. विहीरीचे पाणी भरणे, भांडी,कपडे धुणे,स्वयंपाक इ. कामे घरच्या घरीच होत असल्याने बर्यापैकी अंगमेहनत होत असे. यासोबतच धान्य निवडणे, साफ करणे, शिवणकाम, घर व्यवस्थित ठेवणे यात मेहनत होत असे. उन्हाळा आला की विविध वाळवणाचे पदार्थ करण्यात महिलावर्ग गुंतून जायचा. संयुक्त कुटुंब पद्धती मुळे मुलाबाळांना सांभाळून ही सर्व कामे उरकल्या जात होती. लग्नसमारंभ आणि तत्सम इतर वेळेसही बरीचशी घरगुती कामे महिला सक्षमपणे पुर्ण करत.
मात्र हळूहळू आधुनिकतेचा शिरकाव होत गेला आणि शिक्षण, नोकरीधंद्यानिमित्त कुटुंब दुरावत चालले. अंगमेहनतीची कामे मागे पडून फटाफट कामे करणारी यंत्रे उपलब्ध झाली. पाटा वरवंट्याची जागा मिक्सरने घेतली तर चुल हद्दपार होऊन गँस विराजमान झाले. वाॅशींग मशीन, डीश वाॅशरने पारंपारिक धुण्याभांडीची कल्पना मोडीत काढली. अशी एक ना अनेक किचनवेअर्स, यंत्रांनी किचनचा कब्जा घेतल्याने होणारी अंगमेहनत झिरो झाली. आजकाल तर हवे ते पदार्थ आपण ऑर्डर करुन मागवू शकल्याने परिश्रमाची बचतच होऊ लागली.
शिक्षण, नोकरी आणि व्यवसायात महिलांचा सहभाग वाढल्याने घरच्या कामासाठी आता नोकरांवर अवलंबून रहावे लागते किंबहुना धुणीभांडी करणारे आपल्या परिवाराचा अभिन्न अंग झाले आहे असे म्हटले तर वावगे ठरु नये.
यासोबतच महिलांमध्ये थायरॉईड, मधुमेह, ओबेसिटी यांचा धोका वाढला आहे. फास्टफुड, व्यायामाचा अभाव, तासनतास टिव्हीवर मालीका बघत राहणे,हार्मोन्स चे असंतुलन हेसुद्धा लठ्ठपणा वाढविण्यासाठी हातभार लावतातच. यामुळेच आत्ताची पिढी आणि जुन्या पिढीत आपल्याला आरोग्याच्या दृष्टीने हे अंतर पहायला मिळते.
संतुलित आहार घेणे, नियमित व्यायाम करणे, योगा, प्राणायामाचा दिनचर्येत समावेश करणे , नियमित आरोग्य तपासणी करणे याप्रकारे या समस्येवर तोडगा काढला जाऊ शकतो.
**********************************
दि. ९ मे २०२०
डॉ अनिल पावशेकर, नागपूर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
No comments:
Post a Comment