हम तुम्हे चाहते है ऐसे
मरनेवाला कोई जिंदगी चाहता हो जैसै
**************************************
बाॅलीवुडचे जेष्ठ अभिनेते आणि राजनेते विनोद खन्ना यांचे कर्करोगाने वयाच्या सत्तराव्या वर्षी, २७ एप्रिल २०१७ ला दुःखद निधन झाले होते. अवघी सिनेस्रुष्टी आणि चाहते ही बातमी कळताच कमालीचे हळहळले होते. १९४६ ते २०१७ पर्यंतचा त्यांचा जिवनप्रवास अखेर कर्कारोगाशी झुंजतांना विसावला होता.
पाकिस्तानातील पेशावर इथे जन्मलेला हा कलावंत खानदानी व्यवसायिक होता परंतु त्यांच्यात दडलेल्या कलाकाराने त्यांना मुंबई सिनेसृष्टीत आणले होते. उत्तरेकडे हमखास आढळणारी "उंची आणि देखणेपण" त्यांच्यात ठास्सून भरले होते. मर्दानी सौंदर्याचे ते नितांतसुंदर उदाहरण होते. "मदनाचा पुतळा" म्हणा की "अस्सल हँन्डसमनेस" यात यत्किंचितही शंका नव्हती. समकालीन नायकांपेक्षा ते दिसण्यात काकणभर सरसच होते.
आपल्या कारकिर्दीची सुरवात भलेही त्यांनी खलनायक म्हणून केली पण अल्पावधीतच ते आघाडीचे नायक म्हणून नावारूपाला आले होते. जवळपास एकशे एक्केचाळीस चित्रपटात त्यांनी आपल्या अभिनयाची जादू दाखविली होती.
कारकिर्दीच्या सर्वोच्च पातळीवर असतांना अचानक त्यांना आध्यात्मिकतेची ओढ लागली आणि पुण्यातील ओशो आश्रमात काही काळ त्यांचा वावर होता. आपल्या ओशो गुरुंसोबत त्यांनी अमेरिका सुद्धा गाठली परंतू भ्रमनिरास झाल्याने ते परत आपल्या सांसारिक दुनियेत वापस आले होते.
जवळपास पाच वर्षांनी कमबॅक करतांना "दयावान", "इंसाफ" "चांदणी" सारख्या चित्रपटातून आपला ठसा उमटवला होता. मात्र "Time & Tide waits for no man" प्रमाणे त्यांना पहिलेसारखे प्रसिद्धी वलय मिळाले नव्हते आणि बॉलिवूड मधली त्यांची जादू ओसरायला लागली होती.
या दुसऱ्या इनिंगमध्ये काही काळ रमल्यावर त्यांनी राजकारणात उडी घेतली आणि यात ते कमालीचे यशस्वी ठरले होते. आपल्या मनमिळावू स्वभाव, सकारात्मक राजकारण आणि जनतेशी समरस होण्याच्या कलेने ते गुरुदासपूर मधून लागोपाठ चौथ्यांदा खासदार झाले होते. अधुनमधून ते काही चित्रपटात झळकलेसुद्धा होते.
मृत्यूपूर्वी अगदी एक महिना पहिलेचा त्यांचा हाॅस्पिटलमधला फोटो पाहून तमाम रसिकांना आपल्या डोळ्यावर विश्वासच बसत नव्हता. कदाचित हे खरे ठरू नये अशी मनोमन सर्वच प्रार्थना करत होते. पण नियती किती निष्ठूर असते याचा परत एकदा प्रत्यय आला. "अमर अकबर अँथनी" मधला हा "अमर" खरोखरच "अमर" झाला यावर विश्वासच बसत नाही.
कलेवर मनस्वी प्रेम करणाऱ्या, दिलदार कलाकाराची कारकीर्द "मन के मीत" ते "दिलवाले" अशी "दबंग" राहीलेली आहे. "मुकद्दर का सिकंदर" असणारा हा पठ्ठ्या "दयावान" होता. "चांदणी" च्या प्रेमात पडणारा हा अस्सल "दिलवाले" होता. "मेरा गाव मेरा देश" चा हा वीर आपल्या लोकांसाठी "इंसाफ" देणारा होता. कधीही "हेराफेरी" न करणारा , "हम तुम और वो" साठी जीव ओवाळून टाकणारा होता.
चाहत्यांसाठी कोणतीही "कुर्बानी" द्यायला सदैव तत्पर असायचा. मात्र आयुष्याच्या अखेरीस कँन्सरच्या "द बर्निंग ट्रेन" मध्ये या कलाकाराची आहुती पडली होती. अशा या हरहुन्नरी कलावंत, आध्यात्मिक व्यक्ती आणि राजनेत्याला तमाम चाहत्यांतर्फे भावपुर्ण श्रद्धांजली.
**************************************
दि. २७ एप्रिल २०१७
डॉ अनिल पावशेकर, नागपूर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
No comments:
Post a Comment