Monday, April 10, 2023

क्रिकेटचा मृत्युंजय योद्धा, युवराज सिंग


    *क्रिकेटचा मृत्युंजय योद्धा, युवराजसिंग*
                डॉ अनिल पावशेकर 
**************************************
क्रिकेट विश्वात सिक्सरकिंग म्हणून ओळखला गेलेला आणि आपल्या तडाखेबंद फलंदाजीने विरोधी गोलंदाजांचा पालापाचोळा करणारा युवराजसिंग ऊर्फ युवीने २०१९ साली आंतरराष्ट्रीय सामन्यातून निवृत्ती जाहीर केलेली आहे. २००० ते २०१९ पर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या सर्व प्रकारात आपल्या अष्टपैलू खेळाने आगळावेगळा ठसा उमटवणारा हा शेरदिल पठ्ठ्या अखेर "कालाय तस्मै नमः" करत क्रिकेट मैदानापासून दुर झालेला आहे. अर्थातच ज्याला सुरवात आहे त्याला अंत आहे मात्र सन्मानाने निवृत्ती ही प्रत्येकाच्या वाट्याला येतेच असे नाही. मग तो द्रविड असो की लक्ष्मण किंवा युवराजसिंग. उगवत्या सुर्याला नमस्कार करणाऱ्या या दुनियेत कधीकाळी आपल्या दिव्य तेजपुंजाने अख्खे जग लखलखाटून टाकणाऱ्या या ताऱ्याला काळाच्या कठोर नियतीला सामोरे जावे लागले आणि अखेर हतबल होत निवृत्तीचा पर्याय स्विकारावा लागला.

"बाळाचे पाय पाळण्यात दिसतात" असे उगाचच नाही म्हटले जात. बालपणापासून खेळाची आवड असलेला आणि क्रिकेटचे बाळकडू पिता योगराजसिंग यांच्याकडून कोळून प्यालेल्या युवीला क्रिकेट फारसे नवे नव्हते. मात्र युवीची पहिल्यांदा दखल घेतली गेली ती १९ वर्षाखालील विश्वचषकात. मोहम्मद कैफच्या नेतृत्वाखाली २००० साली युवीच्या अष्टपैलू खेळीने भारतीय संघ २००० ला अंडर १९ चा जगज्जेता होताच युवीला सिनिअर संघाची लॉटरी लागली आणि मग त्याने कधीच मागे वळून पाहिले नाही. २००० ला केनियात झालेल्या आयसीसी नॉकआऊट स्पर्धेत उपांत्यपुर्व सामन्यात कांगारुविरूद्ध युवीने पहिल्यांदा गोलंदाजांना आपल्या बॅटचे पाणी पाजले. या सामन्यात सचिन, सौरभ, द्रविड, विनोद कांबळी सारखे दिग्गज तंबूत परतले असताना युवीने खणखणीत १२ चौकारांसह ८० चेंडूत ८४ धावांची तुफानी खेळी केली, ती सुद्धा समोर ग्लेन मॅकग्रा, ब्रेटली, जेसन गिलेप्सी सारखे धुरंधर गोलंदाज असतांना.

"२००२ चा नॅटवेस्ट सिरीजचा अंतिम सामना खऱ्या अर्थाने टीम इंडीयाच्या एकदिवसीय सामन्यातल्या कक्षा रूंदावणारा सामना म्हणून ओळखला जातो." इथे ३२५ धावांचा पाठलाग करतांना गांगुली, सेहवाग, दिनेश मोंगीया, द्रविड, सचिन सारखे खंदे फलंदाज धारातीर्थी पडले असतांना युवी आणि मोहम्मद कैफने "युवा जोश" काय असते हे दाखवत हा सामना आश्चर्यकारक पणे भारताकडे फिरवला होता. डॅरेन गॉघ, ऐलेक्स ट्युडर, फ्लिंटॉफ, ऐशले जाईल्स आणि पॉल कलिंगवुड सारख्या नामचीन गोलंदाजांना भिक न घालता या जोडीने हा भीमपराक्रम केला होता. युवीची कहाणी आणि २००७ च्या टी ट्वेन्टी विश्वचषकात स्टुअर्ट ब्राँडला हाणलेले ते सहा षटकार आता आख्यायिका झालेले आहेत. मात्र या रोमांचक घटनेची बीजे २००७ च्या भारताच्या इंग्लंड दौऱ्यात रोवली गेली होती.  ०५ सप्टेंबर २००७ ला भारत आणि इंग्लंड दरम्यानच्या सहाव्या सामन्यात इंग्लंडच्या डिमीट्री मस्करेन्हासने युवीने टाकलेल्या पन्नासव्या षटकात लागोपाठ पाच षटकार ठोकले होते. अर्थातच याचा वचपा काढण्याची आयती संधी टी ट्वेंटीच्या विश्वचषकात अँड्र्यू फ्लिंटॉफने विनाकारण युवीला डिवचत उपलब्ध करून दिलेली होती. 

खरेतर त्यावेळी आपल्याकडे श्रीगणेश, गौरीचे आगमन झालेले होते. सर्वत्र आनंदी उत्साहाचे वातावरण होते आणि तिकडे फ्लिंटॉफ च्या स्लेजींगने अचानक मैदानात आगीचा भडका उडाला. स्लेजींगचे बुस्टरडोझ बालपणापासून घेतलेल्या युवीचे पित्त खवळले आणि "वड्याचे तेल वांग्यावर काढण्यात आले." समोर होता कोवळा स्टुअर्ट ब्रॉड, मग काय  कसायाने निर्दयपणे बकरा कापावा तसे स्टुअर्ट ब्रॉडचा फडशा पाडला गेला. इंग्रजांना "याची देही याची डोळी"  जन्मभराची अद्दल घडवल्या गेली. दीडशे वर्षे हिंदुस्थानावर राज्य केलेल्या इंग्रजांचे लगान अवघ्या सहा चेंडूत फेडण्यात आले होते. तमाम भारतीय या घटनेने बेभाण झाले, इंग्रजी बॉलरला पंजाबी तडका देत युवराजने इंग्लंडचा नक्षा क्षणात उतरवला. आजही रवी शास्त्रीचे ते अंगावर शहारे आणणारे समालोचन आणि युवीचा विस्फोटक अंदाज पाहणे आपल्या शरीरात एड्रीनँलीन रश करायला पुरेसे आहेत.

या खेळीने जगभर युवीचा आदरयुक्त दरारा निर्माण झाला. त्याची ती हाय बॅकलिफ्ट, कव्हर ड्राईव्हचा ट्रेडमार्क फटका, सुरेख पुल, हळुवार फ्लिक, चाबकासारखे कटशॉट आणि मोठी,महत्वाची खेळी करताच जग जिंकल्याच्या आवेशातले सेलिब्रेशन,,, पाहणाऱ्याला आपण प्रत्यक्ष युवीच्या जागी खेळत असल्याची प्रचिती येत असते. 

२०११ ची विश्वचषक स्पर्धा ही त्याच्या आयुष्यातला परमोच्च बिंदु होता. ३६२ धावा, १५ बळी, चारदा मॅन ऑफ दी मॅच आणि मॅन ऑफ दी टुर्नामेंट अशा भरगच्च कामगिरीने त्याने विश्वचषक भारताकडे खेचून आणला. त्याचे हे प्रदर्शन खरोखरच दृष्ट लागण्यासारखे होते आणि दुर्दैवाने झालेही तसेच. प्वाँईंट आणि कव्हरला जबरदस्त क्षेत्ररक्षण करणारा आणि कुठलाही फटका लिलया अडवणारा हा खेळाडू खऱ्याखुऱ्या आयुष्यात फुफ्फुसाच्या कर्कारोगाला अडवू शकला नाही. क्रुर नियतीचा स्ट्रेट ड्राईव्ह त्याच्या काळजाच्या आरपार गेला. "चित्याच्या चपळाईने चेंडूवर झेपावणाऱ्या युवीला कधी कर्कारोगाने चित केले" हे कळलेच नाही. अखेर अप्रिय पण अटळ अशा कर्करोगाशी युवी लढला. शारीरिक, मानसिक यातना सोसत तो त्यातून बाहेर पडला आणि अजिंक्य योद्ध्याप्रमाणे पुन्हा एकदा २०१२ ला मैदानात उतरला. 

वास्तविकतः युवीऐवजी दुसरा कोणी असता तर केंव्हाच क्रिकेटला रामराम ठोकला असता. परंतु या गड्याने हिंमत न हारत दुसरी इनिंग सुरु केली. मात्र एवढे शारीरिक आणि मानसिक घाव सोसल्यावर त्याची जिद्द जरी कायम असली तरी पुर्वीचे प्रदर्शन तो पुन्हा दाखवू शकला नाही. सोबतच नवनवीन खेळाडूंनी आपल्या प्रदर्शनाने युवीच्या सिंहासनावर हक्क गाजवणे सुरू केले होते. तरीही पण २०१७ ला चँम्पियन ट्राँफीतील  पाकिस्तान विरूद्ध साखळी सामन्यातली त्याची ५३ धावांची घणाघाती खेळी त्याचा दरारा दाखवून गेली. यानंतर मात्र युवीचे घसरते प्रदर्शन त्याला संघात स्थान देऊ शकले नाही. एवढेच काय तर कधीकाळी आयपीएल ची सर्वोच्च बोली लागलेला हा खेळाडू कोणी संघात घ्यायलाही मागेपुढे पाहत होते. अखेर सचिनच्या आग्रहाखातर मुंबई इंडीयन्सने त्याला संघात घेतले परंतु तो फारकाही सामने खेळू शकला नाही. २०१९ विश्वचषकात खेळण्याची त्याची मनोमन इच्छा होती मात्र काळवेळ किती निष्ठूर असते याची त्याला लगेच प्रचिती आली असेल. आपल्या चपळ क्षेत्ररक्षणाने संघात लाईव्ह वायर असणारा हा खेळाडू त्याची होणारी उपेक्षा पाहून नक्कीच दुखावला असेल आणि यातुनच मग त्याने निवृत्तीचा कठोर निर्णय घेतला असेल.
निश्चितच टीम इंडीया सध्या तुफान फॉर्मात आहे अशा प्रसंगी युवीने निवृत्त होणे मनाला चटका लावून जाते. टीम इंडीयात यापुढेही अनेक अष्टपैलू खेळाडू येतील आणि जातील. मात्र खणखणीत षटकार ठोकणारा, अभेद्य भिंतीसारखा क्षेत्ररक्षण करणारा, डोळ्याची पापणी लवते न लवते तोच धावबाद करणारा, मैदानात संघासाठी उत्साह, आनंद, सळसळते चैतन्य भरभरून ओतणारा युवी पुन्हा होणे नाही.


No comments:

Post a Comment

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...