स्पीड आणि स्विंगचा बादशहा, मोहम्मद आमीर
डॉ अनिल पावशेकर
**************************************
२०१७ ला पाकिस्तानने चँम्पीअन्स ट्राॅफी जिंकत क्रिकेट विश्वात आपले गतवैभव प्राप्त केले होते. यात फलंदाज फखर झमनसोबत वेगवान गोलंदाज मोहम्मद आमीरचा सिंहाचा वाटा होता. तब्बल सहा वर्षानंतर क्रिकेटमध्ये पुनरागमन करतांना मोहम्मद आमीरने दाखविलेली जिद्द, खेळाप्रती असलेली चिकाटी वाखाणण्याजोगी आहे. स्पाॅट फिक्सिंगच्या जाळ्यातून अग्निपरीक्षा देत तावून सलाखून निघणाऱ्या या क्रिकेटपटूची कारकीर्द कोणालाही नक्कीच प्रेरणादायी ठरेल.
पाकिस्तानला जागतिक दर्जाच्या वेगवान गोलंदाजांची खाण म्हटले जाते ते उगाचच नाही. इम्रान खान, वासिम अक्रम, वकार युनूस, शोएब अख्तरसारख्या गोलंदाजांच्या पंक्तीतला मोहम्मद आमिर हा उगवता तारा होता. टेररीझम असो की टेरर बाॅलींग पाकीस्तान ची भुमी या बाबतींत नेहमीच सुजलाम सुफलाम राहिली आहे. मो. आमिरचा क्रिकेटच्या दुनियेत २००७/०८ ला उदय झाला. अंडर १९ संघासाठी त्याची इंग्लंडच्या दौऱ्यासाठी निवड पण झाली होती. म्हणतात ना हिरे की परख जोहरी को ही होती है प्रमाणे वासिम अक्रमने त्याला स्पेशल टॅलेंट अंतर्गत क्रिकेटच्या मुख्य प्रवाहात आणले.
२००९ मध्ये मो. आमीरने घरगुती क्रिकेटमध्ये आपल्या तुफानी कामगिरीने पदार्पणातच तब्बल पंचावन्न बळी घेत सर्वांचे लक्ष वेधुन घेतले. २०१० ला कसोटी क्रिकेटमध्ये पदार्पण करतांना दणक्यात सहा बळी घेऊन आपली चुणूक दाखवली. आपल्या वादळी गोलंदाजीने मो. आमीरने श्रीलंका, न्युझीलंड, आँस्ट्रेलिया आणि इंग्लंडमध्ये हाहाकार उडवून दिला. सर्वात कमी वयात म्हणजेच अवघ्या अठराव्या वर्षी पन्नास बळी घेण्याचा विक्रमसुद्धा याच्याच नावावर आहे. यश मिळवणे सोपे असते परंतु टिकवणे कठीण असते हे मो. आमीरच्या उदाहरणाने स्पष्ट होते.
अल्पावधीतच कारकीर्द भरभराटीला लागली असतांना त्याला काय दुर्बुद्धी सुचली कोण जाणे. इंग्लंडविरुद्धच्या लाॅर्डवरील कसोटीत तो स्पाॅट फिक्सिंग मध्ये अडकला. जाणूनबुजून नोबाॅल टाकण्याचा त्याच्यावर आरोप झाला. दरम्यान आयसीसीच्या लवादापुढे तो दोषी आढळताच त्याला तब्बल पाच वर्षे क्रिकेट खेळण्यासाठी बंदी आणि सहा महिन्याचा तुरूंगवास भोगावा लागला. अशा दुष्टचक्रातून निघणे जवळपास अशक्य असते. आपल्याकडे मो. अझरुद्दीन, नयन मोंगीया, अजय शर्मा, अजय जडेजा अशी काही ठळक उदाहरणे आहेत जे मॅच फिक्सिंग च्या आरोपातून कधीच बाहेर येऊ शकले नाही.
अखेर सप्टेंबर २०१५ ला मो. आमीरचा अज्ञातवास संपला. परंतु सार्वजनिक जिवनात दाग अच्छे नही होते चा प्रत्यय त्याला जागोजागी आला. शेवटी २०१६ साल उगवताच त्याच्या क्रिकेटची कारकीर्द परत एकदा सुरू झाली. न्युझीलंड विरुद्ध एकदिवसीय मालिकेसाठी त्याची निवड होताच हा गडी आपल्या मुळ अवतारात परत आला. तब्बल सहा वर्षे गुमनाम जिंदगी जगुनही त्याचा वेग, आवेग,जोश जराही कमी झाला नव्हता. गोलंदाजीत तिच धार होती फक्त आता त्याला संयमाची जोड होती. आशिया कपमध्ये त्याचे तिखट स्पेल आताही आपले सलामीविर विसरले नसणार.
एकतर डावखोरा त्यात भन्नाट स्पिड आणि खतरनाक स्विंग असलेला हा बाॅलर खरोखरच फलंदाजांसाठी एकप्रकारे दुःस्वप्नच होता. जेंव्हा हा आपल्या गोलंदाजीत लयात असतो तेंव्हा हरेक बाॅल काफी होता है विकेट लेने के लिए असा प्रकार असतो. एक तो करेला उपरसे निम चढा प्रमाणे स्विंग आणि स्पिडचा हा बेताज बादशाह आपल्या कडव्या परंतु झुंजार गोलंदाजीने नामचीन फलंदाजांना सळो की पळो करून सोडतो. चँम्पीअन्स ट्राँफीत भारताविरुद्ध पहिल्या सामन्यातले पहिले षटक आठवा. *शदाने दानेपे लिखा है खानेवालेका नाम सारखे पहिल्या षटकाच्या प्रत्येक चेंडूवर तो रोहीतची विकेट घेत होता. दुर्दैवाने जखमी झाल्याने तो उर्वरित सामने खेळू शकला नाही परंतु याची कसर त्याने फायनलमध्ये पुर्ण केली. रोहीत, विराट आणि धवनसारख्या दादा फलंदाजांना लीलया चकवत त्याने चँम्पीअन्स ट्राॅफी भारताकडून हिसकावून घेतली. विराटला तर लागोपाठ दोन चेंडूत दोनदा फसवून बाद करत आपला पठाणी हिसका दाखवला होता. मो. आमीरचा जलवा २०१९ विश्र्वचषकातसुद्धा बघायला मिळाला होता. कांगारू विरुद्ध खेळताना साखळी सामन्यात त्याने ५ फलंदाजांना तंबूत परत धाडले होते तसेच पाकतर्फे त्या विश्र्वचषकात त्याने ८ सामन्यात सर्वाधिक १७ बळी घेतले होते.
२०१० ला क्रिकेट पंढरीत अर्थातच ऐतिहासिक लाॅर्डस मैदानावर त्याची कारकीर्द स्पाॅट फिक्सिंग मुळे काळवंडली. त्याने याकरिता सहा महिन्याचा तुरंगवासासोबत तब्बल सहा वर्षे अज्ञातवासही भोगला,,,,परंतु या सर्व गोष्टींवर मात करत त्याने धडाक्यात पुनरागमन केले. दुर्दम्य इच्छाशक्ती, कणखर मानसिकता आणि प्रचंड क्रिकेटवेडापायी हा पठ्ठ्या मैदानात परतला. म्हणूणच मो. आमीरची शापित कारकीर्द पाहता एवढेच म्हणता येईल....
उषःकाल होता होता काळरात्र झाली
अरे पुन्हा आयुष्याच्या पेटवा मशाली
No comments:
Post a Comment