Friday, April 14, 2023

मेरे रश्के कमर, तुने पहिली नजर,,


     "मेरे रश्क ऐ कमर तुने पहली नझर"
      "जो नझरसे मिलाई मजा आ गया"
***********************************
सध्या सोशल मिडीयावर उपरोक्त गीत धुमाकूळ घालत असुन कान देऊन ऐकल्यास खरोखरच त्याचा मतितार्थ समजून येईल. मानवी भावविश्वात प्रेमाचे अमूल्य योगदान आहे. प्रेमाची अनुभूती येणे हा सुखद अनुभव आहे. प्रत्येक जण यातून मार्गक्रमण करत असतो. अशा या प्रेमविश्वात  प्रवेश करतांना नजर, दृष्टी, कटाक्ष  अर्थातच नयनबाणाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे.

'लव्ह ॲट फर्स्ट साईट' असो की 'पहिल्या नजरेत प्रेम' असो...नयनबाणांनी घायाळ होणाऱ्यांची संख्या अमाप आहे. प्रेमासाठी 'पासपोर्ट म्हणा की व्हिसा' डोळे प्रमुख भुमिका निभावतांना दिसतात. 'डोळे हे जुल्मी गडे' किंवा 'ती पाहताच बाला ,,कालीजा खल्लास झाला' म्हणतात ते याचसाठी. 
खरेतर या नाजूक विषयावर संशोधकांना यामागे 'हार्मोन्स चा केमिकल लोच्या' असल्याचा अंदाज आहे. तरीपण प्रेम ही एक नैसर्गिक भावना आहे आणि योग्यवेळी ती प्रकट होतेच. आता ही वेळ व्यक्तीसापेक्ष असल्याने याचे टाईमटेबल असणे शक्य नाही. कोणाच्या प्रेमाशी कोणाचीही तुलनासुद्धा करता येत नाही.

कारण 'प्रेम हे प्रेम असत,,,तुमच आमच सेम असत' तरीपण 'जाने कब कहा किसीको,,किसीसे प्यार हो जाए' याची गॅरन्टी देता येत नाही. फ्रान्स चे सध्याचे राष्ट्रपती हे तर चक्क त्यांच्यापेक्षा कितीतरी वयस्कर वर्गशिक्षीकेच्या प्रेमात पडले आणि लग्नसुद्धा करून मोकळे झाले. डोनाल्ड ट्रम्प आणि  मेलॅनीयाचेही उदाहरण फार बोलके आहे. आपल्याकडे 'प्रोफेसर मटुकनाथचे आपल्या वयापेक्षा अर्धे वय असलेल्या शिष्येसोबतचे प्रेमप्रकरण असो की डिआयजींचे ओढणी घेऊन केलेले राधाप्रेम'. भारतीय समाज मात्र अशा प्रेमप्रकरणांना फॅमीलीअर नसल्याने नावबोट ठेवण्यात धन्यता मानतो. 

बाॅलीवुड आणि क्रिकेटतरी या विषयापासून दुर कसे राहणार. 'प्रेम आणि नजरे' च्या महती सांगणारी कित्येक गीते चांगलीच गाजली आहे. अगदी 'निगाहे मिलानेको जी चाहता है' पासून 'नयनोमे सपना,,सपनोमे सजना' पर्यंत लांबलचक यादी आहे. कधी धीरगंभीर प्रकारात 'झुकी झुकी ये नजर' असते तर कधी 'आखोंमे हमने आपके सपने सजाऐ है...बस आप आपही दिलमे समाऐ है' म्हणत  प्रेमवेदना व्यक्त होतात. 'गुलाबी आंखे जो तेरी देखी,,,शराबी ये दिल हो गया' म्हणत नायक पिंगा घालतांना दिसतो. तर कधी 'नजरोसे कहदो प्यारमे मिलनेका मौसम ,,,,मिलनेका मौसम आ गया' म्हणत मिलनाची सुचना दिली जाते. 'दो नयना ईक कहानी,,,' कधीकधी मन व्याकूळ करते. 'नयना बरसे रिमझिम रिमझिम' म्हणत मनाला समजावले जाते.  

क्रिकेटपटूंना आपल्याकडे "हिरो" चा दर्जा असल्याने ते तरी कसे मागे राहतील? अगदी 'व्हिव्हियन रिचर्डस, नैना' पासून सुरु झालेली परंपरा आजतागायत कायम आहे आणि पुढेही राहील. कारकीर्द ऐन भरात असतांना संदिप पाटील 'कभी अजनबी थे' ला विसरू शकला नाही. मास्टर ब्लास्टरला अंजलीने कधी क्लिन बोल्ड केले हे कळले नाही तर भल्याभल्यांना हातोहात यष्टीचीत करणाऱ्या माही ला साक्षीने अलगद जाळ्यात ओढले. तर या सर्वांचे अपडेटेड व्हर्जन विराटच्या रुपात पहायला मिळते. 'खुल्लम खुल्ला प्यार करेंगे हम दोनो' म्हणत चिकू मैदान आणि मैदानाबाहेरही गाजत आहे. 'निर्लज्जम सदा सुखी' प्रमाणे  शेनवाॅर्न जागोजागी आपल्या प्रेमाचे चेंडू वळवत होता. तर प्रेमासाठी सानिया शोएब देशाच्या सिमा ओलांडतात. 

प्रेमाचे भाग्य सर्वांनाच लाभते असेही नाही. 'हेड या टेल प्यार मोहब्बत दिलका खेल',,,इस खेलमे कोई है पास तो कोई है फेल' असा प्रकार असतो. पुर्वी भारत पाक क्रिकेट सामन्यात इम्रान झिनत भाई भाई असा नारा हमखास लागायचा तर अमिताभ रेखाचा सिलसिला कित्येकांच्या आयुष्याची अव्यक्त कहाणी असते. ड्रिमगर्ल साठी जितेंद्र, संजीवकुमार आणि धर्मेंद्रने घातलेले खेटे कोण विसरू शकतो? शिशा हो या दिल हो आखिर टुट जाता है म्हणणारी रिना राॅय तमाम प्रेमपिडीतांची कहाणी आहे. तडप तडपके इस दिलसे आह निकलती रही म्हणणारा सलमान कोण विसरेल. तू प्यार है किसी औरका तुझे चाहता कोई और है  म्हणत कित्येक युवा स्वतःला समजावणी घालतांना दिसतात. 

योग्य वयात योग्य व्यक्तीशी प्रेम होणे म्हणजे 'दुग्धशर्करा योग' होय. पण बरेचदा 'Love is blind' ची प्रचिती येते आणि मग पश्चाताप करण्याशिवाय  काही उरत नाही. म्हणूनच प्रेमाची वाट आल्हाददायक असली तरी निसरडी नक्कीच आहे. वनवे असल्याने परतणे कठीण असते. यामुळेच या मार्गावर at your own risk चे सल्ले सगळे देतात. 

वयापरत्वे कर्तव्याची, जबाबदारीची जाण म्हणा की मॅच्युरीटी म्हणा 'नैनमटक्का' हळूहळू काचबिंदू, मोतीयाबिंदूत परिवर्तीत होण्याला सुरवात होते. सामाजिक भानाची लेन्स त्याला प्रेमाच्या आठवणी धुसर करायला लावते. मनाला समजावण्याचे कितीही प्रयत्न केला तरी जुने काँटॅक्ट,,,, कितीही महागडे काँटॅक्ट लेन्स लावून लपवता येत नाही.ह्रुदयस्थ प्रेमाला कधीही बायपास  करता येत नाही. पहिले प्रेम कधी विसरता येत नाही असे म्हणतात ते बहुदा याचसाठी असावे.पहिल्या नजरेतून दृष्टीपटलावर  आलेल प्रेम मात्र मनाच्या पटलावरून कधीही पुसता येत नाही. असा हा नजरेचा प्रवास,,, एकदातरी नजरेखालून घालायला काय हरकत आहे...तोपर्यंत
बर्कसी गिर गई,,कामही कर गई
आग ऐसी लगाई मजा आ गया
जाममे घोलकर हुस्नकी मस्तिया
चांदणी मुस्कराई मजा आ गया
मेरे रस्क ऐ कमर तूने पहली नझर
जो नझरसे मिलाई मजा आ गया
***********************************
दि. ०८ जून २०१७
डॉ अनिल पावशेकर, नागपूर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++++

No comments:

Post a Comment

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...