श्री भैय्यालाल भोतमांगे
The untold story 2006/17
*************************************
जवळपास दहाएक वर्षापूर्वी घडलेल्या भिषण हत्याकांडाच्या स्मृती भैय्यालाल यांच्या अकाली जाण्याने परत जाग्या झाल्या आहेत. झाले काय तर घरी अठराविश्व दारिद्र असलेल्या भोतमांगे कुटुंबियांवर त्यादिवशी आभाळ कोसळले होते. कुणाच्याही ध्यानीमनी नसतांना गावाखेड्यातल्या रानटी पशूंनी मानवजातीला लाजवणारे कृत्य केले. कारण,भांडण तंटा, कोण चुक, कोण बरोबर याचा कितीही उहापोह केला तरी या हत्याकांडाला माफी शक्यच नाही.
अशा प्रकारच्या दुर्घटना महाराष्ट्रात नवीन नाही. नामांतर आंदोलन असो, घाटकोपर ची घटना असो, पोचीराम कांबळे की मनोरमा कांबळे असो की खैरलांजी असो उभ्या मानवजातीची मान शरमेने नक्कीच खाली झाली आहे. नेहमीप्रमाणे केवळ आंबेडकरी समाजाशिवाय याची कुणीही दखल घेतली नाही. पण यामुळे संघर्ष थोडीच थांबणार होता. उभ्या महाराष्ट्राने भूतो न भविष्यती असा संघर्ष लढा अनुभवला आणि तोसुद्धा कोणत्याही नेत्याविना.
उलट याकाळात नेतागीरी करणाऱ्या भल्याभल्या नेत्यांची येथेच्छ धुलाई करण्यात आली होती. आबालवृद्ध या लढ्यात सामील झाले होते. प्रत्येक व्यक्ती सैनिकाचे रुप धारण करून आपापल्यापरीने हा मोर्चा सांभाळत होते.
उभा महाराष्ट्र पेटल्यावर तत्कालीन सरकारची कुंभकर्णी झोप उघडून जाग आली आणि नेहमीप्रमाणे अटक,निलंबन,बदल्या आणि आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडू लागल्या. एकदाचे प्रकरण न्यायप्रविष्ट झाले अन सगळ्यांनी सुटकेचा निःश्वास टाकला.
खरेतर ही लढाई जातपात, धर्माची कुस ओलांडून प्रस्थापित आणि विस्थापित, पोषीत आणि शोषीत वर्गात होती. अपेक्षेप्रमाने शोषीतांना न्याय मिळणे दुरापास्त होतेच. विविध कोर्टकचेर्यातून खेळखंडोबा होत ही केस काहींना जन्ठेमपेवर पोहोचवून थंडावली.
प्रश्न असा आहे की किती फासावर गेले किती अटकले आणि किती सुटले यापेक्षा पिडीत कुटुंबाला खरेच न्याय मिळाला का?
जलिकट्टूच्या नावावर गळे काढणार्यांना खैरलांजी कांडात प्रेते वाहणाऱ्या बैलगाडीच्या बैलांना अटक झाली होती आणि ते केव्हाचेच अटकेतच मरण पावले हे कित्येकांना माहीतच नसावे.
डॉ. च्या म्हणण्यानुसार भोतमांगेचा मृत्यू ह्रुदयविकाराच्या झटक्याने झाला. पण प्रचलित व्यवस्थेने त्यांचे ह्रुदय केव्हाच फाडले होते, मेंदुचा भुगा केला होता तर उर्वरित शरीराला पंगु केले होते. तरीही न्यायाच्या अपेक्षेत ही व्यक्ती जीवंतपणी नरकयातना भोगत होती. सरकारने कायतर आर्थिक मदत आणि नोकरी देऊन बोळवण केली. ही एक प्रकारची प्रतारणाच होती.
शेवटी तारीख पे तारीख च्या दुष्टचक्रात अडकून जीवंतपणी न्याय मिळण्याची अधुरी अपेक्षा ह्रुदयी ठेऊन भैय्यालालने जगाचा निरोप घेतला.
यानिमित्ताने काही बाबी अधोरेखित करता येईल. गरीबांना,शोषीतांना न्याय मिळणे मुश्किल ही नहीं नामुमकीन पण आहे. न्यायव्यवस्था सलमान, संजूबाबा सारख्यांची पाठराखन करते.
भैय्यालालजी ,,,,,या व्यवस्थेला माफ करा,,,तुम्हाला निर्णय मिळाला,,, न्याय नाही,,,, पण तुम्ही पेटवलेले हे अग्निकुंड विझणार नाही याची काळजी समाजधुरीणांनी घेणे गरजेच आहे.
+++++++++++++++++++++++++++++
दि.२२/०१/२०१७
No comments:
Post a Comment