सलामीचा अढळतारा, खेलरत्न 'रोहीत शर्मा'
@ *डॉ अनिल पावशेकर* @
*************************************
साल २००७, स्थळ बेलफास्ट, आयर्लंड आणि निमित्त होते क्रिकेट फ्युचर कप चे. या स्पर्धेत नागपुरला जन्मलेल्या आणि मुंबईला कर्मभूमी मानलेल्या एका फलंदाजाने पदार्पण केले होते. खरेतर या फ्युचर कपमध्ये या खेळाडूने विशेष रंग दाखविले नाही. मात्र भविष्यात आपल्या दमदार फलंदाजीने इंद्रधनुष्यी रंग दाखवत क्रिकेटरसिकांना चांगलेच रिझवले आहे. एवढेच नव्हे तर एकदिवसीय क्रिकेटमध्ये सलामीला विश्वविक्रमी कामगिरी करत अढळपद प्राप्त केले आहे. या पराक्रमी खेळाडूचे नाव आहे रोहीत गुरुनाथ शर्मा ज्याला नुकतेच भारताचा क्रीडा प्रकारातील सर्वोच्च सन्मान राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे. क्रिकेटमध्ये सचिन, धोनी आणि विराट नंतर हा पुरस्कार मिळवणारा रोहीत हा चौथा खेळाडू ठरला आहे.
एकदिवसीय सामने म्हटले की तडाखेबंद सलामी फलंदाजांची चलती असते आणि या जातकुळीत सचिन, सेहवाग, ख्रिस गेल, जयसूर्या, गिलख्रिस्ट, वॉर्नर, ब्रॅंडन मॅक्युलम आदी फलंदाजांनी मैदाने गाजवलेली आहेत. सचिन, सेहवागच्या निवृत्ती नंतर टीम इंडियाकडे सर्वात जास्त भरवश्याचा आणि जागतिक दर्जाचा सलामीवीर म्हणून कोणाचे नाव घ्यायचे ठरले तर आजच्या घडीला रोहीत शर्माचे नाव नक्कीच ओठांवर येते. केवळ फलंदाजीच नव्हे तर आपल्या नेतृत्वकौशल्याने त्याने मुंबई इंडियन्स संघाला सर्वात जास्त म्हणजेच पाचवेळा आयपीएलचे जेतेपद मिळवून दिले आहे. कदाचित पहिले धोनी आणि नंतर विराटने टीम इंडियाची सुत्रे हाती घेतल्याने रोहीतला भारतीय संघाचे सारथ्य करायची फारशी संधी मिळाली नाही. मात्र तो खरोखरच टीम इंडियाला न लाभलेला एक उत्कृष्ट कर्णधार ठरला आहे.
वास्तविकत: एकदिवसीय सामन्यात २००७ ला श्रीगणेशा करूनही कसोटी प्रवेशासाठी त्याला जवळपास सहा वर्षे प्रतिक्षा करावी लागली. रोहीत असो की युवराजसिंग, या दोघांनाही वनडे चे वरदान लाभले असले तरीही कसोटीच्या दृष्टीने हे दोघेही शापीत राजपुत्र ठरले आहेत. आतापर्यंत कारकिर्दीत रोहीतने २२४ एकदिवसीय आणि १०७ टी ट्वेंटी सामने खेळले आहेत तर पांढऱ्याशुभ्र ड्रेसमध्ये केवळ ३२ कसोटींचा त्याला टिळा लागला आहे. वनडे आणि टी ट्वेंटीत २००७ ला खेळणाऱ्या रोहीतला कसोटी प्रवेशासाठी २०१३ साल उजाडावे लागले. सचिनच्या अखेरच्या मालिकेत विंडीजविरूद्ध कलकत्त्याला ईडन गार्डन वर रोहीतने कसोटीत पदार्पण केले. मात्र ईडन गार्डन वर फुललेले हे रोहीतफुल कसोटीच्या बागेत फारसे रमले नाही.
कसोटीत आतबाहेरचा लपंडाव करणारा रोहीत मात्र वनडेता सुसाट निघाला होता. २०१३ चॅम्पियन ट्रॉफी त्याच्या कारकीर्दीला कलाटणी देणारी ठरली. मध्यफळीतून सलामीला पदोन्नती होताच रोहीतने फलंदाजीत टॉप गिअर टाकत कसोटीतील अपयश पुसून करुन टाकले. आपल्या बॅटच्या हायव्होल्टेज तडाख्याने त्याने जगभरातील गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले आहे. मुख्य म्हणजे ५० षटकांच्या खेळात तब्बल तिन द्विशतके ठोकण्याच्या विश्वविक्रमाचा तो धनी आहे. त्यातही लंका आणि कांगारू संघ ही त्याची फेवरेट डिश आहे. त्याच्या एकूण आंतरराष्ट्रीय ३९ शतकांपैकी १६ शतके या दोन संघांविरूद्धची आहेत. वन-डे त त्याने लंकेविरुद्ध द्विशतक करताना १७३ चेंडूत चोपलेल्या २६४ धावा, आजपर्यंत फलंदाजांसाठी वनडे मधील सर्वोच्च धावसंख्या आहे.
अर्थातच वन-डे मध्ये एवढा पराक्रम गाजवणाऱ्या रोहीतची फलंदाजीही तेवढीच देखणी आहे. भक्कम ताकद, अचूक टायमिंग आणि जबरदस्त शॉट सिलेक्शनच्या जोरावर त्याच्या डावाची आखणी असते. सुरवातीला सावध, गोलंदाजांचा माग घेत तो हळूवारपणे डावाची गुंफण करतो आणि एकदा मैदानात नजर खिळली की मग गोलंदाजांचे हाडे खिळखिळी करतो. हुक आणि पुल ही त्याच्या फलंदाजीतील मोरपिसे आहेत. रोहीत जरी उजव्या हाताने फलंदाजी करत असला तरी षटकार ठोकणे हा त्याच्या बाए हातका खेल आहे. वनडेत एका डावात सर्वाधिक षटकार ठोकण्याच्या यादीत इंग्लंडच्या इऑन मॉर्गन (१७ षटकार) नंतर तो दुसऱ्या क्रमांकावर (१६ षटकार) आहे. तसेच टी ट्वेंटीत जलदगती शतक (३५ चेंडूत) करण्याचा पराक्रम रोहीत आणि द.आफ्रिकेच्या डेव्हिड मिलरच्या नावे आहे. गेल किंवा सेहवाग ज्याप्रमाणे आत्मघातकी पथक बनून प्रतिस्पर्ध्यांच्या गोटात हल्ले करायचे अगदी त्याऊलट रोहीत सायलेंट किलर प्रमाणे विरोधी संघाची धुळधाण करण्यात तरबेज आहे.
२०१९ च्या विश्र्वचषकात रोहीतने सर्वाधिक ६४८ धावा ठोकत गोल्डन बॅट पुरस्कार प्राप्त केला होता. यापुर्वी ही किमया सचिनने दोनदा तर राहुल द्रविडने एकदा करून दाखवली आहे. सोबतच त्याने विश्वचषकात पाच शतके करण्याच्या सचिनच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. खरेतर त्या विश्र्वचषकात शिखर धवन जायबंदी झाल्याने रोहीत आणि विराटवर संघाची संपूर्ण मदार होती. मध्यफळीत सावळागोंधळ होता तर धोनीच्या फलंदाजीला मर्यादा आल्या होत्या. अखेर गोलंदाजांनी चांगले प्रदर्शन करूनही विश्वचषकात टीम इंडिया उपांत्य फेरीत गारद झाली. उपांत्य फेरीपुर्वी मैदान गाजवणारी रोहीतची बॅटरूपी तलवार उपांत्य सामन्यात प्रारंभीच म्यान झाली आणि तिथेच टीम इंडियाचे पानिपत अटळ होते.
सचिन सेहवागच्या सलामी जोडीनंतर रोहीत शिखर धवनची जोडी हिट ठरली आहे. रोहीतला सचिनसोबत सलामीला खेळण्याचे भाग्य जरी लाभले नसले तरी धवनसोबत सलामीला त्याची भट्टी चांगली जमते. सचिन सेहवाग जोडीसारखी ही जोडी सुरवातीलाच धावांचे अग्निकुंड धडधडीतपणे पेटवत नसले तरी समईसारखे मंद मंद पेटत शेवटी विरोधी गोटात अग्नितांडव नक्कीच माजवते. काळापरत्वे टिम इंडीयातून सेहवागचा सुर्य मावळतीला लागला होता आणि अगदी त्याचकाळात रोहीत नावाचा बालसुर्य आकार घेत होता. जशीजशी क्षितीजावर सेहवागची सावली मोठी होत गेली तसतशी रोहीतची बॅट तळपायला लागली होती. भलेही सचिन, सेहवाग एवढी लोकप्रियता आणि कौतुक रोहीतच्या वाट्याला आले नसेलही परंतु यामुळे त्याच्या योग्यतेत आणि दर्जात फारसा फरक पडत नाही.
रोहीतच्या धडाकेबाज कामगिरीची दखल घेत त्याला २०१५ ला अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. तो कसोटीत प्रत्येकी एकदा सामनावीर आणि मालिकावीर बहुमानाचा मानकरी ठरलेला आहे. तर वनडेत आणि टी ट्वेंटीत एकंदरीत १८ वेळा तो सामनावीर, ४ वेळा मालिकावीर ठरलेला आहे. त्याला नुकतेच राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार जाहीर झाला असून टीम इंडियाचा हा सलामीचा अढळतारा आपल्या जिगरबाज खेळीने भविष्यात संघाचे नाव आणखी उज्ज्वल करेल यात शंका नाही.
***************************************
No comments:
Post a Comment