Monday, April 10, 2023

क्रिकेट प्रेमींच्या गळ्यातला ताईत, ए बी डीव्हीलीअर्स

     
*क्रिकेट प्रेमींच्या गळ्यातला ताईत "एबीडी"*
                डॉ अनिल पावशेकर 
************************************
२०१८ सालचा मे महिना कर्नाटकच्या दोन महत्वपूर्ण घटनांचा साक्षीदार ठरला. मग ते राजकीय बाबतीत भाजप सरकारचे पायउतार होणे असो की रॉयल चॅलेंजर्स बेंगलूरुची आयपीएल मधून एक्झिट होणे असो. अर्थातच कर्नाटक भाजपाचे कॅप्टन येदुरप्पा आणि आरसिबीचा आधारस्तंभ एबी डिव्हिलीयर्स आपापल्या संघांना जिंकून देऊ शकले नाही आणि या दोन्ही घटना आता इतिहास जमा झालेल्या आहेत. मात्र २०१९ विश्वचषकाला अवघे एकदिड वर्षे उरलेली असतांना अचानक एबी डिव्हिलीयर्स ने क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्तीची घोषणा करत अवघ्या क्रिकेट विश्वाला बुचकाळ्यात पाडले होते.

दक्षिण आफ्रिकेत प्रिटोरीया इथे १९८४ साली जन्मलेले एबीडी नावाचे हे नररत्न संपूर्ण क्रिकेट जगतात चांगलेच लोकप्रिय आहे. गोल्फ, रग्बी आणि टेनिसचा उत्तम खेळाडू असलेला हा पठ्ठ्या आपल्या जादुई फलंदाजीने सर्वांना हवाहवासा वाटतो. केवळ फलंदाजीच नव्हे तर उत्तम यष्टीरक्षण आणि चपळाईचे क्षेत्ररक्षण त्याला इतर समकालीन खेळाडूंपेक्षा वेगळ्या उंचीवर घेऊन जाते. कमालीचे हँड आय कॉर्डीनेशन आणि शारीरिक लवचिकतेचा पुरेपूर फायदा घेत एबीडी विकेटच्या दोन्ही बाजुला चौफेर फलंदाजी करायचा. गंमतीने त्याच्या फलंदाजीला 360 डिग्रीची उपमा मिळाली होती. फलंदाज म्हटले की आपल्या डोळ्यासमोर पटकन धावांच्या राशी, शतके दिसायला लागतात. मात्र एबीडी कधीच या फुटपट्टीत मोजल्या जाऊ शकत नाही. कसोटी, वनडे असो की टी ट्वेन्टी,,, एबीडीची फलंदाजीत भट्टी जमली की कोण जिंकतो कोण हरतो हा प्रश्न गौण असायचा. वेगवान अर्ध शतक, शतक आणि दिडशतकाचा पराक्रम जरी एबीडीच्या नावावर असला तरी त्याचे फलंदाजीला विकेटवर उभे राहणे क्रिकेट प्रेमींना सुखावून जात असे. खेळाचा, फलंदाजीचा अथवा क्षेत्ररक्षणाचा निखळ आनंद केवळ आणि केवळ एबीडी हमखास देऊ शकत होता.

फलंदाज म्हटले की जहाल आणि मवाळ असे दोन गट आलेच. सेहवाग, ख्रिस गेल, वाॅर्नर हे जहाल गटातले खाटीक जातकुळीतले तर रोहीत शर्मा, एबीडी हे सुसंस्कृत मवाळ गटाचे. जहाल फलंदाज ज्याप्रमाणे शत्रुवर आत्मघातकी पथक बनून तुटून पडतात त्याच्या अगदी उलट मवाळ फलंदाज गुपचूप सर्जीकल स्ट्राईक करतात. एबीडी च्या फलंदाजीने विरोधी गोलंदाज घायाळ नाही तर त्याचे कायल म्हणजेच चाहते होत होते. चांगल्या चेंडुवरसुद्धा तडाखेबंद फटके हाणत तो गोलंदाजीची पिसे काढत होता. पापणी लवते न लवते तोच चेंडू कधी सिमापार व्हायचा ते क्षेत्ररक्षकांना कळतच नव्हते. खेळतांना विक्रमांच्या मागे न धावता संघहिताला प्राधान्य देणारा एबीडी कोणत्याही स्थितीत आणि स्थानावर फलंदाजीचा आनंद लुटायचा. वांझोटी आणि काँस्टिपेटेड शतके ठोकण्याचा भानगडीत न पडता त्याने संघाची नाव कित्येकदा पैलतीरावर लावली. भारतातल्या गजबजलेल्या क्रिकेट मैदानावर सचिन, धोनी पाठोपाठ कोणाचा जयघोष होत असेल तर तो फक्त एबीडी आणि एबीडीचाच,,,हे भाग्य प्रत्येक खेळाडूला थोडीच लाभते. 

खरेतर वयाची तिशी ओलांडली की क्रिकेटपटुंना उतरती कळा लागते. मात्र पैसा आणि प्रसिद्धीच्या लोभापायी कित्येक नामचीन खेळाडू संघात जागा अडवून बसतात. याच संकल्पनेला फाटा देत एबीडीने प्रांजळपणे आपली व्यथा कबूल करत निवृत्ती जाहीर केली होती. शरीर थकले आहे आणि नवोदितांना संधी मिळायला हवी असे त्याचे म्हणणे आहे. नाहीतर वाढलेले वय, कमी झालेले रिफ्लेक्सेस, ढासळते प्रदर्शन आणि फिटनेसची वाणवा असुनही मातब्बर खेळाडू फेविकॉल सारखे संघाला चिकटून बसतात,, किंवा आपल्या निवृत्तीचा इव्हेंट साजरा करतात. एबीडी मात्र या बाबतीत सरस ठरला. उगाचाच गाजावाजा नको की विविध चॅनेल्सवर वांझोट्या चर्चा नको की विश्वचषक खेळण्याची इच्छा नको. निवृत्ती कधी घेणार यापेक्षा इतक्या लवकर का घेतली असे वागणारे खेळाडू सन्मानित होतात.

असा हा एबीडी अर्थातच अब्राहम बेंजामिन डी व्हिलीअर्स क्रिकेट मधुन निवृत्त झाला असला तरी चाहत्यांना अभी ना जाओ छोडकर, के दिल अभी भरा नही असेच म्हणावे वाटत असणार. प्रचंड लोकप्रिय आणि यशस्वी असलेल्या या खेळाडूच्या मनात एक सल नक्कीच असणार. कारण चोकर्सचा ठपका लागलेल्या दक्षिण आफ्रिका संघाकडून तो खेळला मात्र हा संघ प्रचंड गुणवत्ता असूनही विश्वचषक एकदाही हस्तगत करू शकला नाही. ऐन वेळी गळपटण्याची त्यांची सवय त्यांना नेहमीच नडली. परंतु यामुळे एबीडीचे महत्त्व आणि उपयुक्तता जराही कमी होत नाही. कभी किसीको मुकम्मल जहाँ नही मिलता, कही जमीं तो कही "वर्ल्डकप" नही मिलता म्हणतात ते याचसाठी. तमाम क्रिकेट प्रेमींतर्फे एबीडीला पुढील वाटचालींकरीता मनःपुर्वक शुभेच्छा. चाहत्यांच्या ह्रुदयातील हा अढळतारा जेव्हा जेव्हा क्रिकेट च्या गप्पा होईल तेव्हा याची आठवण हमखास निघेल यात शंका नाही.

No comments:

Post a Comment

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...