@#😈😈😈😈😈😈😈😈#@
*जिन्दगी मौत ना बन जाये सम्भालो यारों*
*डॉ अनिल पावशेकर*
*********************************
सध्या घरोघरी चारचाकी वाहनांचा सुळसुळाट झाल्याने घर घर से ड्रायव्हर निकलेगा अशी परिस्थिती आहे. मात्र गाडी विकत घेतली आणि ड्रायव्हिंग लायसन्स घेतले की सर्व काही जमलं असं नाही. त्यातही गाव शहरात गाडी चालवणं आणि द्रुतगती महामार्गावर गाडी चालवणं हे विहिरीत पोहणं आणि नदीत पोहण्यासारखं वेगवेगळं आहे. गाडी चालवणं म्हणजे सेल्फ मारुन ॲक्सलेटर दाबणे एवढं सोप्प काम नक्कीच नाही तर त्यासाठी प्रशिक्षण लागते, ती एक कला,कसब आहे . सोबतच फाईव्ह स्टार सेफ्टी रेटिंग ची गाडी असली की बिनधास्तपणे चालवा असेही नाही. थोडक्यात काय तर ड्रायव्हिंग करतांना ऊतू नका मातू नका, नाही तर आयुष्याची माती ठरलीच आहे असे समजा.
झाले काय तर समृद्धी महामार्ग आणि अपघात हे जणुकाही एक समीकरणच झाले आहे. या महामार्गाच्या पहिल्या शंभर दिवसांत जवळपास नव्वद अपघात झाले असून अंदाजे एकतीस व्यक्ती प्राणांस मुकल्या आहेत. दिवसेंदिवस अपघातांची मालिका काही केल्या थांबायचे लक्षण दिसत नाही. अशी काय भुताटकी या महामार्गावर दडली आहे याचा अभ्यास केला तर काही बाबी स्पष्टपणे समोर येतात. एकंदरीत या महामार्गाची रचना, वाहनांत यांत्रिक बिघाड, मानवी चुका यांसोबत वन्यजीवांचा वावर इ. प्रमुख कारणे आहेत.
या महामार्गाची रचना जेवढी देखणी आहे, तितकीच जीवघेणी सुद्धा आहे. एकतर सरळ रेषेतला मार्ग, कुठेही गतीरोधक नाही की फारसा वळणमार्ग नाही. त्यातही गुळगुळीत रस्त्यांमुळे गाडी वेगात असली तरी पोटातलं पाणी हलत नाही आणि यामुळे चालकाला गाडीच्या वेगाचा निश्चित अंदाज येत नाही. सोबतच समोर एकसारखे दृश्य तसेच गाडीत एसी सुरू असल्यास रोड हिप्नॉसीसची स्थिती निर्माण होते. जर दुपारची वेळ असेल आणि थोडं फार जरी ऊन असेल तर ड्रायव्हिंग करतांना महामार्गाच्या पांढुरक्या रंगाने डोळे दिपून जातात. याकरिता गॉगल्स वापरणे हितकर असते. मी शक्यतोवर ७०/८० च्या वेगाने कार चालवतो. पण छत्रपती संभाजी नगर ते नागपूर कार चालवतांना वेगळाच अनुभव आला. गाडी एकदा या मार्गावर लागली तर ती कधी १२० च्या वर जाते हे कळतच नव्हते. याकरिता स्पीडो मीटर कडे अधुनमधुन एक नजर टाकून गाडी नियंत्रित वेगात ठेवणे केंव्हाही योग्य ठरते.
वाहनांतील यांत्रिक बिघाड अपघातास आमंत्रण देतो. ११ डिसेंबर ते २० मार्च २०२३ या काळात या मार्गावर वाहनांच्या अतिवेगाने यांत्रिक बिघाड होऊन जवळपास ४०० अपघात झाले आहेत. तर वाहने पंक्चर होण्याने १३० तर टायर फुटल्याने १०८ अपघात झालेले आहेत. यासोबतच वाहनातील इंधन संपल्याने, ते मार्गावर विना संकेताने उभे केल्या जवळपास १२० अपघात नोंदवले गेले आहेत. एकतर वाहनांत पुरेसं इंधन नसणे किंवा अतिवेगाने, एसी सहित गाडी पळवल्यास गाडी ॲव्हरेज पण कमी देते आणि इंधन पण लवकर संपते. शिवाय या महामार्गावर सध्यातरी पेट्रोल पंप कमी प्रमाणात असल्याने इंधन संपताच वेगळेच संकट उभे राहते. याप्रकारच्या अपघातात वाहनांना मागून धडक मारणे, चालकांना गु़ंगी येणे, नादुरुस्त वाहने इ. बाबींचा समावेश होतो. प्रवासाला निघताना टायरमधला हवेचा दाब चेक करणे, नायट्रोजन हवा भरणे केंव्हाही उत्तम. कारण अतिवेगाने आणि दीर्घकाळ गाडी चालवल्याने टायरमधली हवा प्रसरण पावते, टायर गरम गरम होतात आणि यामुळे टायर फुटण्याची शक्यता वाढते.
अपघातासंबंधी सर्वात महत्त्वाचे कारण म्हणजे मानवी चुका, निष्काळजीपणा, दुर्लक्ष आणि ड्रंक अँड ड्राइव्ह. खरेतर आजकालच्या ड्रायव्हिंगला इगो ड्रायव्हिंग अथवा सेलफोन ड्रायव्हिंग म्हटले तर वावगे ठरणार नाही. रस्ते, महामार्ग हे जणुकाही मस्ती, रग, माज, श्रीमंती दाखवण्यासाठीच आहे असेच वाटते. जितकी मोठी गाडी तितका माजोरडेपणा जास्त. त्यातही गाडीवर भाऊ, दादा, लोकप्रिय, आशास्थान, प्रेरणास्थान वगैरे वगैरे लिहिले असले तर तसेही वाहतुकीचे नियम पाळण्याची गरज भासत नाही. कर चले हम फिदा जानो तन साथीयों, अब तुम्हारे हवाले वतन साथीयों करत बेधुंद, बेफाम, बेदरकार वाहने चालवणे ही आजकालची फॅशन झाली आहे. सीटबेल्ट लावणे, इंडीकेटर दाखवणे, नियमानुसार गाडी चालवणं जणुकाही बाबवळटपणाचे किंवा नवशिक्याचे लक्षण समजले जाते.
ड्रायव्हिंग करतांना स्पीड थ्रिल्स, बट किल्स हे नेहमी ध्यानात ठेवले पाहिजे. जितका वेग जास्त तितके वाहनाचे नियंत्रण गमावण्याची शक्यता जास्त असते. समृद्धी महामार्गावर ड्रायव्हिंग करतांना स्पीडोमीटरचे फोटो आणि व्हिडिओ काढून सोशल मिडीयावर टाकण्याची जीवघेणी टूम निघाली आहे. मात्र यात चालकाचे लक्ष विचलित होऊन कधीही अपघात घडू शकतो. तसेही ज्यांना वेग बघायचा आहे, ते मायकल शूमाकर ला बघतील, तुम्हाला नाही एवढे जरी लक्षात ठेवले तरी पुरेसे आहे. देशातील प्रत्येक तिसरा मृत्यू हा राष्ट्रीय महामार्ग किंवा द्रुतगती महामार्गावर होतो. यातही सर्वाधिक मृत्यू २३ ते ३५ या वयोगटातील आहेत. याबाबतीत ही रिचेस वन थर्टी, ओन्ली टू डाय ॲट थर्टी असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
प्रवासापूर्वी चालकाने पुरेशी विश्रांती घेणे गरजेचे आहे. तसेच या महामार्गावर नवख्या चालकांनी उगाचच धाडस अजिबात करू नये. कारण इथले नियम वेगळे आहेत. सर्वात उजवीकडची मार्गिका फक्त ओव्हर टेक करण्यासाठी, मधली कार, एसयुव्ही आदी हलक्या वाहनांसाठी तर सर्वात डावीकडची मालवाहतुकीसाठी आहे. यासोबतच कार साठी वेगमर्यादा १२० तर मालवाहतुकीसाठी ८० इतकी निश्चित केली आहे. मात्र याचे किती पालन होते हे सांगणे कठीण आहे. चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करणे, वेगाचे उल्लंघन करणे ह्या बाबी इथे सर्रास होतांना दिसतात आणि यातूनच मग अपघातांचे प्रमाण वाढत जातात.
राहिली बाब वन्यजीवांची तर समृद्धी महामार्ग सामान्य महामार्गापेक्षा उंचावर बांधला गेला आहे जेणेकरून पादचारी, भटकी जनावरे किंवा वन्यप्राण्यांच्या अडथळा नको म्हणून. तसेच वन्यजीवांसाठी जवळपास शंभर अंडरपास आहेत तसेच आता सहा फूट उंचीचे तारेचे कुंपण पण बांधण्यात येत आहे. माझ्या प्रवासात मला या महामार्गावर भटक्या कुत्र्यांची टोळी आणि माकडांच्या समूहाचे दर्शन झाले होते. पण गाडीचा वेग मर्यादित असल्याने काही विपरीत घडले नाही. मात्र इतर चालकांनी कधी हरीण तर कधी नीलगाय, रोही अथवा रानडुक्करांचा शिरकाव झाल्याची नोंद केलेली आहे.
अर्थातच प्रशासनाने नित्यनेमाने होणाऱ्या अपघातांची दखल घेतली असून यावर एक मास्टर प्लॅन राबवला जात आहे. याअंतर्गत नागपूर ते शिर्डी या मार्गातील आठ एंट्री प्वाईंट वर चालकांना समुपदेशन केले जाणार आहे. यांत रस्ते सुरक्षा संबंधित शॉर्ट फिल्म दाखवली जाणार आहे. यानंतर चालकांना एक प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी देण्यात येईल. तसेच त्यांच्या कडून धोकादायक ड्रायव्हिंग न करण्याचे वचन पत्र भरून घेतले जाईल. तसेच गाडीच्या देखरेख संबंधी सूचना, मार्गदर्शन केले जाईल. सोबतच महामार्गावर स्पीड गन आणि पंधरा इन्टरसेप्शन वाहने, बॉडी कॅम महामार्ग पोलिसांच्या दिमतीला राहणार आहेत.
अर्थातच सुरक्षित प्रवासासाठी केवळ प्रशासनावर अवलंबून कसे काय राहता येणार? आपले कुटुंब आपली जबाबदारी प्रमाणे आपले वाहन आपली जबाबदारी असणार. करून दाखवलं सारखंच, सुरक्षेत चालवून दाखवलं हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. काळवेळ सांगून येत नाही हे खरे असले तरी काळवेळेला आमंत्रण दिल्यास ते अजिबात नाकारत नाही. अतिवेग हे तर काळाला आग्रहाचे निमंत्रण असते. याच वेगाने हॉलीवूडचा प्रख्यात अभिनेता, फास्ट ॲन्ड फ्युरीअस फेम पॉल वॉकर, टाटा समुहाचे माजी प्रमुख सायरस मिस्त्री यांना आपले प्राण गमवावे लागले होते. तर टीम इंडियाचा युवा क्रिकेटपटू रिषभ पंत भरधाव कार अपघातातून केवळ दैव बलवत्तर म्हणून बचावला. थोडक्यात काय तर आवरा वेगाला, सावरा जिवाला. वेळ मुल्यवान आहे परंतु जीवन अमुल्य आहे. वेगाशी स्पर्धा तर नकोच, कारण ही शर्यत साक्षात मृत्युचे दर्शन घडवू शकते आणि हा रस्ता तुमच्यासाठी आखरी रास्ता ठरु शकतो.
*********************************
दि. ०७ एप्रिल २०२३
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
No comments:
Post a Comment