@#😈😈😈😈😈😈😈😈#@
ये दिल मांगे मोर, भाग ०६
*********************************
बाळासाहेब ठाकरे गोरेवाडा आंतरराष्ट्रीय प्राणी उद्यान नागपूर इथल्या हर्बीवोर सफारीचं मोर हा पक्षी प्रमुख आकर्षण असतो. झुंडीत सात ते आठच्या संख्येने असलेले मोर सतत इकडून तिकडे झेपावत आपले लक्ष वेधून घेतात. खरेतर मोर हा पक्षांचा राजा पण पक्षांना उडण्याचे जे वरदान प्राप्त झाले आहे, त्यापासून मोर वंचित आहे. मोरांचे वजन जास्त असल्याने ते फारकाळ उडू शकत नाही. तरीपण काही काळ हवेत झेप घेऊन हे उडण्याची हौस पूर्ण करून घेतात. अतिशय सुंदर, सावध, लाजाळू, हुशार आणि उडण्यापेक्षा चालणे पसंत करणाऱ्या मोराचे शास्त्रीय नाव पावो क्रिस्टॅटस आहे.
सांस्कृतिक संदर्भात मोराला सरस्वती देवी आणि कार्तिकेयाचे वाहन मानले जाते. यामागे नैसर्गिक जीवनसाखळी अबाधित राखण्याचा प्रयत्न केला आहे . अनेक प्राणी, पक्षांना विशिष्ट देवी देवतांशी जोडून त्यांचे जतन, संवर्धन करण्याचा उद्देश असावा असे वाटते. २६ जानेवारी १९६३ ला मोराला भारताचा राष्ट्रीय पक्षी म्हणून घोषित केले गेले होते. १९७२ च्या वन्यजीव कायद्यांतर्गत मोरांचे संरक्षण केले जाते. मोरांची सतत घटणारी संख्या रोखण्यासाठी १९८२ ला मोराच्या शिकारीवर बंदी घातली गेली आहे. पुण्याच्या शिरूर तालुक्यात मोराची चिंचोली गावांत मोराच्या झुंडी आढळतात. बीड जिल्ह्यातील नायगाव मयुर अभयारण्य हे राज्यातील, देशातील एकमेव मयुर अभयारण्य आहे.
मोरांचे तीन प्रकार आढळतात. सर्वाधिक सुंदर आणि आकर्षक असलेले भारतीय मोर अथवा निळा मोर, दक्षिणपूर्व आशियातील हिरवा मोर आणि तिसरा प्रकार म्हणजे आफ्रिकेतल्या कांगो खोऱ्यातील आफ्रिकन मोर. भारता सोबतच नेपाळ, श्रीलंका, भुतान, म्यानमार आणि पाकिस्तान मध्ये मोर आढळतात. पानझडी जंगल, शेतबागां सोबतच पाणवठ्याजवळ त्यांचे वास्तव्य असते. मात्र मोरांमध्ये प्रतिकुल हवामानाशी जुळवून घेण्याची अद्वितीय क्षमता असल्याने ते युरोपच्या थंड हवामानात अथवा राजस्थान सारख्या उष्ण, कोरड्या वाळवंटातही तग धरू शकतात. मोराच्या खाद्यात झाडांची पाने, फळे, धान्य, भाज्या, कीटक, साप, सरडे, अळ्या यांचा समावेश होतो.
मोर हा कुक्कुटवर्गीय पक्षी असून याची लांबी जवळपास एक मीटर असते. लांब, इंद्रधनुषी शेपटी साठी प्रसिद्ध असलेल्या मोराचे डोळे तपकिरी गडद रंगाचे असते. डोके लहान असून त्यावर मुकुटा सारख्या हिरव्या तपकिरी रंगाचे पिसे असतात. मोरांच्या शेपटीची पिसे हिरवट निळ्या रंगाची असून त्यावर निळा डाग सहज नजरेत भरतो. पाय लांब आणि काटकुळे असतात. मान लांब आणि सुंदर निळ्या मखमली रंगाची असते. गळ्यातील निळ्या रंगामुळे त्याला निळकंठ म्हणतात तर तो सापांना मारून खातो म्हणून त्याला भुजंगभुक सुद्धा म्हणतात. मोरांच्या आवाजाला केकारव म्हणतात, जो म्यांव म्यांव किंवा म्युंहू म्युंहू असा असतो.
पावसाळ्याच्या सुरुवातीला (साधारणतः मे,जून) मोरांचा विणीचा हंगाम असतो. या हंगामात मोर नराला पिसारा असतो व विणीचा हंगाम संपताच तो झडून जातो. नर मोर, मादीला आकर्षित करण्यासाठी पिसारा फुलवून नृत्य करतो. मोरांच्या अंड्यांतून तिस दिवसांत पिल्ले बाहेर पडतात. मादी मोर (लांडोर) वर्षातून दोनदा अंडी घालतात. मोरांत दुरचे आवाज ऐकण्याची क्षमता असते. मोर दरवर्षी आपली पिसे बदलतो, जुनी पिसे पडून त्याजागी नवीन पिसे येतात. मोरांचे आयुष्यमान साधारणतः पंधरा ते वीस वर्षांचे असते. मोर शेतकऱ्यांचा मित्र असतो. पीक नष्ट करणारे कीटक मोर खातो. सजावटीसाठी मोरांच्या पिसांचा उपयोग होतो. सोबतच देवतांना नैवेद्य दाखवणे, गोलाकार पंखा बनवने अथवा फुलदाणीत सजावटीसाठी मोरांच्या पिसांचा उपयोग होतो.
असे म्हणतात की मोराच्या प्रभावाने मुघल बादशहा शहाजहानने मयुर सिंहासन तयार केले होते. त्याला तख्त ए ताऊस असे नाव दिले गेले. कारण फारसी मध्ये मोराला तौस म्हणतात. हे मयुर सिंहासन सात वर्षांत सोने, चांदी, हिरे, मोती, माणिक व इतर मौल्यवान जवाहिऱ्यांनी तयार केले गेले होते. लाल किल्ल्यातील दिवाण एक खास मध्ये स्थापित हे मयुर सिंहासन त्यावेळी अंदाजे एक कोटी रूपये किंमतीच्या सामनातून तयार केले गेल्याचे सांगण्यात येते. इ.स. १७३९ ला इराणचा बादशाह नादिर शहाने हिंदुस्थानवर आक्रमण केले. यांत त्याने कोहिनूर, दर्या ए नूर सोबतच मयुर सिंहासन लुटून ते इराणला नेले.
क्रमशः,,,,
*********************************
दि. २२ जून २०२३
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++++
No comments:
Post a Comment