@#😈😈😈😈😈😈😈😈#@
*निमा संघटनेचे आधारवड*
*डॉ विनायक टेंभुर्णीकर सर*
***********************************
साल २०११, स्थळ कोल्हापूर, वेळ सकाळी १० वाजताची आणि निमित्त होते निमा राज्य शाखेच्या वार्षिक बैठकीचे. राज्यभरातील निमाचे प्रतिनिधी याकरिता प्रचंड संख्येने उपस्थित होते. मुख्य म्हणजे पुढच्या वर्षाकरीता नविन अध्यक्ष आणि कार्यकारिणीची निवड करायची असल्याने वातावरण चांगलेच धुमसत होते. शिवाय या बैठकीला यवतमाळ येथील वार्षिक बैठकीत झालेला अभुतपुर्व गोंधळ तसेच निमाच्या एका जेष्ठ पदाधिकाऱ्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याची कटू पार्श्वभूमी लाभल्याने सभास्थानी ताणतणाव जाणवत होता. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून तत्कालीन गृहराज्यमंत्री मा.सतेज पाटील हे उपस्थित होते.
एकदाचा उद्घाटनाचा औपचारिक प्रसंग पार पडला आणि मा.गृहराज्यमंत्री सभागृहातून बाहेर पडताच प्रचंड गोंधळाला सुरुवात झाली. याचे कारण असे होते की तत्कालीन निमा राज्य शाखेचे अध्यक्ष यांनी परत एकदा अध्यक्षपदासाठी निवडणूक लढण्याचे सुतोवाच केले होते. मात्र यवतमाळला सहजरीत्या जिंकलेली लढाई यावेळी त्यांना सोपी नव्हती. त्यांच्या उमेदवारीला काही सदस्यांचा तीव्र विरोध होता. तसेच यादरम्यान काही मंडळींनी पेपरबाजी केल्याने वातावरण आणखी प्रक्षोभक झाले होते. मा. अध्यक्ष बोलायला उभे राहताच विरोधकांचा संताप अनावर झाला आणि एकच गोंधळ उडाला. कोणीही कोणाचे ऐकून घ्यायला तयार नव्हते. जो तो स्टेजवर चढण्यासाठी उत्सुक होता. जिंदाबाद, मुर्दाबाद चे नारे सभागृहात निनादले जाऊ लागले होते. परिस्थिती स्फोटक होत असल्याचे पाहताच कोणीतरी पोलिसांना पाचारण केले मात्र यामुळे परिस्थिती आणखी चिघळली.
अखेर स्टेजवरील एक व्यक्ती उभी राहीली आणि आपल्या अधिकारवाणीने त्यांनी संतप्त सभागृहाला सांभाळले. सर्वात पहिले त्यांनी सभागृहात दाखल झालेल्या पोलिसांना परत पाठवल्याने वातावरण निवळण्यास मदत झाली. या व्यक्तीने सभागृहातील सदस्यांच्या तीव्र भावना लक्षात घेता मोठ्या कौशल्याने ती आणिबाणीची परिस्थिती हाताळली आणि अपेक्षित असलेल्या एका मोठ्या संघर्षाला विराम दिला होता. तसेच अध्यक्ष निवडीवरून जो असंतोष खदखदत होता त्यावर तोडगासुद्धा काढला. अखेर या सर्व अप्रिय घटनेवर पडदा टाकण्यासाठी तत्कालीन निमा राज्य शाखेच्या अध्यक्षांनी समजुतदारपणा दाखवत आपली उमेदवारी मागे घेतल्याची घोषणा केली आणि संपूर्ण सभागृह जल्लोषात डुंबून गेले.
मित्रांनो त्यावेळी संकटमोचक म्हणून जी व्यक्ती धावून आली होती, ती व्यक्ती म्हणजेच डॉ विनायक टेंभुर्णीकर सर होय. त्या दिवशी सरांनी आपल्या समयसूचकतेचा परिचय देत सभागृहाला आटोक्यात आणले होते. सर निमा संघटनेचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि या संघटनेचा व्याप आणि व्याप्ती पाहता त्यांनी हे शिवधनुष्य यशस्वीपणे पेलले आहे. खरेतर निमा संघटनेचा जन्मच आयुर्वेद युनानी विद्यार्थी, व्यावसायीक, शिक्षक यांच्या भल्यासाठी झाला आहे. तसेही आयुर्वेद म्हटले की संघर्ष पाचविलाच पुजला आहे. मात्र या सर्व संघर्षाला पुरून उरत निमा संघटना आजही सरांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीपणे कार्यरत आहे.
वास्तविकत: २०१५ ला आयुर्वेद स्नातकांना इंटीग्रेटेड प्रॅक्टिसचा कायदा महाराष्ट्रात करण्यात आला होता. मात्र इतर राज्यात परिस्थिती फारशी अनुकूल नव्हती. त्यातच आयुर्वेद द्वेष्ट्यांनी एनसीआयएसएम चे पिल्लू सोडून गोंधळात आणखी भर घातली. खरेतर हा आयुर्वेद पदविधारकांच्या जिवन मरणाचा प्रश्न होता. कित्येक कुटुंब देशोधडीला लागण्याची परिस्थिती उद्भवली होती. आयुर्वेदाच्या नावाने बाशिंग बांधून बसलेल्या इतर संघटना यावेळी मुग गिळून गप्प बसल्या होत्या. तरीही आयुर्वेद पदविधारकांना एकमेव अपेक्षा आणि आशा होती ती फक्त एकाच संघटनेकडून आणि ती म्हणजे निमा कडून.
याकरिता सरांच्या मार्गदर्शनाखाली संघर्षाची रुपरेषा आखण्यात आली. सर्वप्रथम स्थानिक लोकप्रतिनिधी मग ते आमदार असो की खासदार यांच्या भेटीगाठी घेऊन सत्यपरिस्थितीची त्यांना जाणीव करून देण्यात आली. तसेच सरांच्या नेतृत्वाखाली एक शिष्टमंडळ दिल्लीत तळ ठोकून होते. मात्र अपेक्षित प्रतिसाद मिळत नव्हता. कारण सरकार दरबारी आयुर्वेदाला नेहमीच सापत्न वागणूक मिळत आली आहे. पुढच्या रणनिती नुसार प्रत्येक जिल्ह्यात मा.जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन द्यायचा मार्ग अवलंबला गेला. याप्रसंगी निमा नागपूरने ६ ऑक्टोबर २०१७ ला एक भव्य मोर्चा आयोजीत करून पुढील लढ्याचे रणशिंग फुंकले होते.
दरम्यान निमाने एमसीआयएसएचा लढा आणखी तीव्र करण्याचा निर्धार केला. याकरीता चलो दिल्लीचा नारा देण्यात आला. मात्र आपला व्यवसाय सांभाळून किती व्यावसायीक यात सामील होतील याबाबत सर्वच साशंक होते. या आरपारच्या लढाईसाठी सरांनी देशभरातल्या शाखांना काही मार्गदर्शक तत्वांसोबत एकत्र येण्याचे आवाहन केले होते. सरांच्या आवाहनाला प्रतिसाद देत ६ नोव्हेंबरला २०१७ ला दिल्लीत निमाने भुतो न भविष्यती असा हजारोंचा महामोर्चा आयोजित करून दाखवला होता. आयुर्वेदाच्या इतिहासात इतक्या मोठ्या संख्येने आपल्या न्याय्य हक्कांसाठी निघालेला हा एकमेव मोर्चा म्हणून याची दखल घेतली गेली.
अर्थातच या रस्त्यावरच्या लढाईनंतर खरी लढाई होती ती कागदपत्रांची. मग यातच निमाच्या लिगल सेलने आपले सर्वस्व झोकून दिले. अखेर प्रचंड खलबते, विचार विमर्श आणि अडथळ्यांना पार पाडत निमाने आपल्या मागण्या सरकार दरबारी राजी करून घेण्यास सरकारला भाग पाडले. मात्र यासाठी महिनोमहिने दिल्लीचे उंबरठे झिजवावे लागले. आयुर्वेद युनानी ची मातृसंघटना असलेल्या निमाने तनमनधनाने हा लढा शेवटपर्यंत तडीस नेल्याने या संघर्षाचे सार्थक झाले. निश्चितच या लढ्यात तळागाळातील निमा कार्यकर्ते असो की सर्वोच्च पदावरील नेते असोत, आपल्या हक्कासाठी लढलेल्या या लढ्याला तोड नाही.
अर्थातच या लढ्याचे डॉ विनायक टेंभुर्णीकर सरांनी यशस्वी सारथ्य करून समस्त आयुर्वेद युनानी जगताला जगण्याचे बळ दिले आहे. प्रसंग कितीही बाका असो, त्याचा धिरोदात्तपणे सामना करत त्यावर मात करणे यात सरांची हातोटी आहे. प्रश्न स्थानिक असो वा केंद्रीय, तेवढ्याच कल्पकतेने समस्येचे निराकरण करण्यात सरांचा हात कोणी पकडू शकत नाही. राज्य शाखेचे व्यवस्थापन सांभाळत अखिल भारतीय स्तरावर समन्वय राखणे म्हणजे करंगळी वर गोवर्धन पर्वत उचलण्यासारखे आहे. मात्र सरांनी राज्य आणि केंद्र दोन्ही जागी अचूक बॅटींग करत निमाचा डोलारा कल्पकतेने सांभाळला आहे.
निमा संघटनेच्या भरभराटीसाठी अनेकविध उपक्रम आणि योजना सरांच्या कारकिर्दीत पार पडल्या आहेत. मग ते निमा विमेन्स फोरमची स्थापना असो की स्टुडंट विंग ला बळकटी देणे असो. याशिवाय आयुर्वेदाच्या प्रत्येक विभागासाठी निमा प्रोक्टॉलॉजी सोसायटी सारख्या स्वतंत्र शाखा स्थापन करणे असो. सोबतच कोरोना काळात बीएएमएस डॉक्टरांना शासनदरबारी नोकरीतील हक्क, अधिकार मिळवून देणे असो, अथवा आयुर्वेद विद्यार्थ्यांचा आरोग्य विद्यापीठाने केलेला खेळखंडोबा असो, सरांच्या दृढपाठींब्याने निमा संघटना समस्या सोडविण्यासाठी सतत प्रयत्नशील आहे.
आज सरांचा वाढदिवस आहे. आपण सर्वांतर्फे सरांना निरोगी, दिर्घायुष्य लाभो ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो आहे. सरांच्या अमूल्य मार्गदर्शनाखाली निमा संघटना आणखी भरारी घेईल याची आम्हा सर्वांना खात्री आहे.
धन्यवाद 🙏🌹
********************************
दि. २२ जुन २०२३
डॉ अनिल पावशेकर
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
No comments:
Post a Comment