@#😈😈😈😈😈😈😈😈#@
इंग्लंडवर बॅझबॉलचे बुमरॅंग
डॉ अनिल पावशेकर
*********************************
१९७६ ला प्रदर्शित कालीचरण या हिंदी चित्रपटात अभिनेते अजित (दिनदयाल सेठ) यांचा एक प्रसिद्ध डायलॉग आहे. सारा शहर मुझे लाॅयन के नाम से जानता है और इस शहर में मेरी वहीं हैसीयत है, जो जंगल में शेर की होती है! सांगायचं तात्पर्य इतकंच की नुकतीच ॲशेस मालिकेतल्या पहिल्या कसोटीत इंग्लंडच्या बॅझबॉलचा उदोउदो होत असला तरी कांगारूंच्या विजयांत फिरकीपटू नॅथन लॉयन हा छुपा रुस्तम ठरला आहे. सायलेंट किलर ठरलेल्या या लॉयनने दोन्ही डाव मिळून इंग्लंडचे आठ फलंदाज गारद केले. तसेच शेवटच्या दिवशी धीरोदात्तपणे फलंदाजी करत इंग्लंडच्या हातातोंडाशी आलेला विजय हिरावून घेतला.
झाले काय तर ॲशेस मालिका म्हणजे इंग्लंड, ऑस्ट्रेलियासाठी जीव की प्राण असतो. त्यातही कांगारूंनी जागतिक कसोटी अजिंक्यपद जिंकून अश्वमेधाचा घोडा थेट एजबस्टन बर्मिंगमला उतरवला होता. अर्थातच ॲशेस जिंकून जागतिक क्रिकेटचे इंद्रपद मिळवणे हे कांगारूंचे स्वप्न होते. मात्र प्रतिस्पर्धी इंग्लंडचा संघ कच्च्या गुरूचा चेला नव्हता. कांगारूंचा हाडवैरी असलेला, किवीजचा तडाखेबंद फलंदाज ब्रेंडन मॅक्युलन ने इंग्लंड संघारी धुरा सांभाळताच इंग्लिश संघात अमुलाग्र बदल केले होते. नजर बदलो, नजरीया बदल जाएगा प्रमाणे त्याने क्रिकेट खेळण्याची बाराखडी बदलवून टाकली. फलंदाजी करताना विरोधी गोलंदाजांना उठता लाथ बसता बुक्की हे त्याचे सरधोपट समीकरण.
याच गुरूमंत्राला जागत इंग्लिश संघाने अवघं क्रिकेट जगत दणाणून सोडलं होतं. त्यांच्या आक्रमक आणि फिअरलेस क्रिकेटने टी ट्वेंटी, एकदिवसीय क्रिकेट पाठोपाठ कसोटी सामने जिंकण्याचा सपाटा लावला होता. धडाकेबाज फलंदाज ब्रेंडन मॅक्युलनचे टोपणनाव बॅझ आणि याचंच प्रतिबिंब म्हणून इंग्लंडच्या दणकेबाज खेळाला बॅझबॉल क्रिकेट हे नाव मिळाले. मात्र बॅझबॉल क्रिकेट हे एकप्रकारे दुधारी तलवार आहे. कारण बरेचदा शक्ती पेक्षा युक्ति श्रेष्ठ ठरते आणि यामुळेच ॲशेसच्या पहिल्या कसोटीत कांगारू वरचढ ठरले. एकीकडे इंग्लंड संघ आक्रमक क्रिकेट खेळतांना कांगारूंनी ठंडा करके खाओ ची भुमिका घेतल्याने पहिल्या लढतीत कांगारूंची सरशी झाली.
वास्तविकत: दोन्ही संघ तुल्यबळ होते. इंग्लंडच्या जो रूट, क्राउली, हॅरी ब्रुकच्या तुलनेत कांगारूंचे वॉर्नर, ख्वाजा, स्मिथ तोडीस तोड होते. जेम्स ॲंडरसन, स्टुअर्ट ब्रॉडच्या तुल्यबळ जोश हेझलवूड, बोलॅंड होते. दोन्ही संघांकडे बेन स्टोक्स, मोईन अली, कॅमरून ग्रीन, पॅट कमीन्स सारखे अष्टपैलू खेळाडू होते. जॉन बेअरस्टो, ॲलेक्स कॅरी दोघेही उत्तम यष्टीरक्षक फलंदाज होते. तरीपण कांगारूंचा नॅथन लायन हा हुकमाचा एक्का या सामन्यात निर्णायक ठरला. गोलंदाजीतील विविधता कांगारूंच्या पथ्यावर पडली आणि ही तुल्यबळ लढत अखेर कांगारूंनी जिंकली.
फर्स्ट डे फर्स्ट शो ला इंग्लंडने नाणेफेक जिंकून फलंदाजी पत्करली आणि अवघ्या ७८ षटकांत आठ बाद ३९३ धावांवर डाव घोषित केला. जो रूट चांगला लयीत असतांना डाव घोषित करण्यास नक्कीच वाघाचं काळीज लागतं आणि ते बेन स्टोक्स ने दाखवून दिले. कंटाळवाणे आणि रटाळ क्रिकेटला मुठमाती देण्याचं इंग्लंडच्या या कृतीचे अस्सल क्रिकेट प्रेमी नक्कीच स्वागत करतील. लगेच इंग्लंडने ऑसींना दबावात आणून ३८६ धावांत रोखले. खरी कसोटी यानंतरच होती. कारण दोन्ही संघांच्या पहिला डावातील धावसंख्येत फारसा फरक नसल्याने दुसरा डाव निर्णायक ठरणार होता आणि इथेच दोन्ही संघांचा कस लागणार होता.
इंग्लंडच्या पहिल्या डावात जो रूट ने तर कांगारूतर्फे उस्मान ख्वाजाने शतक झळकावले होते. मात्र इंग्लिश संघ दुसऱ्या डावात फलंदाजीत ढेपाळला. जो रुट, हॅरी ब्रुक आणि बेन स्टोक्सने चाळीशी गाठली परंतु कांगारूंना आव्हान देण्याइतपत लक्ष्य ते गाठू शकले नाही. चौथ्या डावात २८० धावांचे आव्हान कांगारूं साठी त्यामानाने सोप्पा पेपर होता त्यांतही ख्वाजा,वॉर्नरने प्रारंभीच ६१ धावांची सुरेख सलामी देत सामन्यावर पकड मिळवली होती. इंग्लंडचं खरं दुखणं म्हणजे त्यांचे भरवश्याचे गोलंदाज जेम्स ॲंडरसन आणि मोईन अली निष्प्रभ ठरणे होय. ब्रॉड आणि रॉबिन्सन ने कांगारूंचा अर्धा संघ बाद केला परंतु कांगारूंचा शेपटाकडून त्यांना कडवी झुंज मिळाली.
ॲलेक्स कॅरी च्या रूपात आठवा ऑसी फलंदाज बाद झाला आणि अजूनही त्यांना जवळपास पन्नास धावा हव्या होत्या. मात्र इथेच चमत्कार घडला. कर्णधार पॅट कमीन्स आणि चिवट नॅथन लॉयनने अभेद्य भागिदारी करत इंग्लंडच्या तोंडचे पाणी पळवले. शेवटच्या काही षटकांत तर ऑन, लेगला तटबंदी उभारून दोन्ही फलंदाजांच्या बरगड्यांना लक्ष केले गेले. शेवटची लाईफलाईन म्हणून नॅथन लॉयनचा झेल इंग्लंडच्या सर्वोत्कृष्ट क्षेत्ररक्षकाकडे म्हणजेच बेन स्टोक्स कडे उडाला परंतु तो दिवस इंग्लंडचा नव्हताच. कमीन्स, लायन्सने इंग्लिश गोलंदाजांना भीक न घालत दृढनिश्चयी खेळी केली आणि कांगारू संघाला चॅम्पियन संघ का म्हणतात हे दाखवून दिले.
थोडक्यात काय तर इंग्लंड संघाने बॅझबॉल क्रिकेट खेळत क्रिकेट मध्ये नवीन ट्रेंड आणला आहे. यामुळे क्रिकेट रसिकांना गतिमान खेळ पहायला मिळत आहे. निश्चितच यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये रंगत येऊन कसोटी सामन्यांना अच्छे दिन येतील अशी अपेक्षा आहे. दोन्ही संघांच्या जय पराजयात उस्मान ख्वाजा आणि नॅथन लायन हे दोन बिंदू महत्वाचे ठरले. जो रुटची सशा सारखी चपळ वेगवान खेळी आणि ख्वाजाची शांत संयमी कासव खेळी, ससा कासव शर्यतीची आठवण करून गेली. जो रूट चे फ्लिक आणि ख्वाजाचे पुल फलंदाजीची मेजवानी देऊन गेले.
उस्मान ख्वाजा दोन्ही डावात इंग्लंडच्या गोलंदाजांना पुरून उरला. दोन्ही डावात त्याने प्रत्येकी दोन महत्वपूर्ण भागिदाऱ्या करत आपल्या संघाला सावरले. मात्र वेगवान गोलंदाजांच्या भाऊगर्दीत फिरकीपटू लायन सर्वात यशस्वी ठरला. प्लेअर ऑफ दी मॅच भलेही उस्मान ख्वाजा ठरला असला तरी या सामन्याचे सिंहावलोकन करताना नॅथन लॉयनचा उल्लेख करणे क्रमप्राप्त ठरते. पहिल्या डावात इंग्लंडचे डाव लवकर घोषित करणे, तर दुसऱ्या डावात पुरेशी धावसंख्या न उभारणे आणि सरतेशेवटी कांगारू शेपटाचे वळवळणे इंग्लंडच्या मुळावर आले. मात्र इंग्लिश संघावर बॅझबॉलचे बुमरॅंग झाले असले तरी उर्वरित सामन्यात कांगारूंचा हिशोब करण्यास ते सक्षम आहेत.
***********************************
दि. २३ जून २०२३
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
No comments:
Post a Comment