Tuesday, September 12, 2023

ये बनाऐंगे इक आशिया!

@#😈😈😈😈😈😈😈😈#@
           *ये बनाऐंगे इक आशिया!*
              *डॉ अनिल पावशेकर*
*********************************
कोलोंबोच्या प्रेमदासा स्टेडियमवर सुपर फोर सामन्यात सुपरहिट कामगिरी करत टीम इंडियाने पाक ची खोड जिरवली आहे. शाहिन आफ्रिदी, नसीम शहा आणि हॅरिस रौफच्या वेगावर उन्मत्त झालेल्या पाक संघाची भारतीय फलंदाजांनी नांगी ठेचून दिमाखदार विजय मिळवला आहे. गत एक दोन वर्षात कभी खुशी कभी गम अशी कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाने अचानक कात टाकून पाकविरूद्ध लखलखीत यश मिळवले आहे. सामन्यावर पावसाचे सावट असतांना रोहित, शुभमन, राहुल आणि कोहलीने विराट फलंदाजी करत पाक संघाला नमविले आहे.

झाले काय तर या स्पर्धेचे नांव जरी आशिया चषक असले तरी भारत विरुद्ध पाक म्हणजे हिट अँड हॉट सामना असतो. त्यातही पाकचे अस्सल वेगवान त्रिकुट आणि आपली फलंदाजी यातील जुगलबंदी पाहण्यासारखी असते. या स्पर्धेच्या पहिल्या लढतीत पाकच्या त्रिकुटाने आपल्या संघाचे दहा बळी टिपून आपली चुणूक दाखवली होती. त्यावेळी शाहिन आफ्रिदीने बाहरसे कोई अंदर ना आ सके, अंदसे कोई बाहर ना जा सके सारखी स्विंग गोलंदाजी करत भारतीय फलंदाजीला खिंडार पाडले होते. त्याला हॅरिस रौफने उत्तम साथ देत आपल्या संघाचे चार गडी बाद केले होते. नशिबाने त्यावेळी ईशान, पांड्याला जाग आली आणि अनर्थ टळला. त्यावेळी वरची फळी कोसळूनही आपल्या संघाने अडीचशेचा टप्पा ओलांडला होता ही त्यामानाने समाधानाची बाब होती.

भारत पाक दुसऱ्या लढतीत पुन्हा एकदा तोच स्टेज सजवला गेला होता. शाहिन आफ्रिदी भारतीय फलंदाजांच्या बॅट आणि पॅड मधून आठशे खिडक्या नऊशे दार शोधत आपली हुकूमत गाजवण्यास तयार होता. तर नसीम शहा आणि रौफचे हात  ढगाळ,पावसाळी वातावरणाचा लाभ घेण्यास शिवशिवत होते. तरीपण प्रारंभीची षटकं सावधपणे खेळून काढणं ही यशाची गुरुकिल्ली होती. आपल्या सलामीवीरांनी नेमकं तेच केलं. यावेळी शाहिन आफ्रिदीची धार बोथट वाटत होती मात्र नसीम शहाने कहर केला होता. त्याचं स्विंग, सिम आणि कॅरी दृष्ट लागण्यासारखं होतं. त्याने हाय काय नाय काय करत रोहितचा पार झिंगाचिका करून टाकला होता.

नसीमसमोर रोहितने लेझीम खेळत बचाव जरुर केला मात्र त्याचा प्रत्येक चेंडू रोहीतला अक्षरशः छळत होता. आऊटस्विंग छोड दो आंचल सारखा दूर जायचा तर इनस्विंग मै तुलसी तेरे आंगण की प्रमाणे यष्ट्यांवर आदळायला तत्पर होता. कधी चेंडू जम्बोजेट सारखा उसळायचा तर कधी लाजत मुरडत यष्टीरक्षक रिझवानला बिलगायचा. गोलंदाजी सुद्धा प्रेक्षणीय आणि सौंदर्ययुक्त असते याची त्यावेळी प्रचिती आली होती. एवढी चांगली गोलंदाजी करुनही त्याला बळी मात्र मिळाले नाही. त्याच्या पहिल्याच षटकांत शुभमनला जीवदान मिळाले जे पाक ला नंतर महागात पडले. या जीवदानाचा फायदा घेत शुभमनने कॉशन विथ ॲग्रेशन रुप घेत फलंदाजीचे गिअर बदलले आणि रोहीतची नसीमच्या छळातून सुटका केली.

एव्हाना पाकच्या दोन्ही सलामी गोलंदाजांचा जोश उतरला होता आणि हीच वेळ होती बदला घ्यायची. भयमुक्त शुभमन आणि छळमुक्त रोहितने चेंडूच्या वळवळी थांबताच आपली रन चळवळ चालू केली. विरोधी गोलंदाजांचा खेळपट्टीशी रोमान्स फारकाळ टिकला नाही. कारण रोहित शुभमनच्या रुपात घरात पाव्हणा आणि दारात मेव्हणा या दोघांवर टपून होता. हे दोघही फलंदाज भरात येताच आक्रमक असणारी पाक गोलंदाजी अतिसामान्य भासायला लागली. चौकार षटकारांची बरसात व्हायला लागताच सामन्याची सुत्रे पाककडून आपल्या संघाकडे यायला लागली. या दोघांनी जवळपास सव्वाशे धावांची सलामी देत फलंदाजीचा भक्कम पाया रोवला. पाक ला  दोघांचेही बळी टिपण्यात यश आले मात्र तोपर्यंत वेळ निघून गेली होती.

एखादा हायव्होल्टेज सामना असो अथवा पाकविरूद्ध लढत,,विराट नेहमीच पेटून उठत असतो आणि यावेळीही तसेच झाले. त्याने राहुल सोबत तब्बल द्विशतकी भागिदारी करत पाक च्या तोंडचे पाणी पळवले. दोघांनीही पाक गोलंदाजांना गुलामासारखे राबवून मनसोक्तपणे शतके झळकावली. मुख्य म्हणजे कमबॅक करणाऱ्या राहुलने ही वाहत्या गंगेत हात धुवून घेतले.  सलामीवीरांनी घातलेल्या भक्कम पायावर विराट राहुल जोडीने साडेतीनशे धावांची गगनचुंबी इमारत बांधली. निश्चितच भारतीय फलंदाजांनी खेळपट्टीशी समझौता करत आपला डाव रचला परंतु पाक गोलंदाज आणि त्यांच्या क्षेत्ररक्षकांनी मिळालेल्या संधी मातीत घातल्या.

गोलंदाजी ही पाक ची जमेची बाजू होती. मात्र गोलंदाजीत वस्त्रहरण झाल्याने त्यांच्या फलंदाजांवर आपोआप दडपण आले. त्यातही पाठलाग करताना साडेतीनशेच्या वरचे लक्ष्य कधीच सोपे नसते. बाबर आझम आणि रिझवान वगळता इतर फलंदाजांत नांव, दर्जा आणि कुवत कितपत आहे ते सांगणं कठीण होतं. टी ट्वेंटीत कधीही आणि कोणत्याही संघाला विजयाचा लकी ड्रॉ लागू शकतो परंतु कसोटी क्रिकेट असो की एकदिवसीय सामन्यात संघात दमखम असल्याशिवाय पदरात काहीच पडत नसते. या सामन्यात देखील तेच झाले. पाठलाग करणाऱ्या पाक संघाचा सव्वाशेत खुर्दा उडाला.

एकंदरीत काय तर पाक गोलंदाजी निश्चितच चांगली आहे यात वाद नाही. मात्र या सामन्यात भारतीय फलंदाजांनी त्यांच्यावर ठंडा करके खाओ पॉलीसीने मात केली. रोहीत, शुभमनने पहिल्या सामन्यातील अपयश बाजूला सारत अर्धशतके ठोकली. तर विराट राहुलने पाकची दहीहांडी फोडली‌. वेगवान मारा कुचकामी ठरताच पाक गोलंदाजी भारतीय फलंदाजांना शरण आली. नेमकं मार पडताच पाक वेगवान गोलंदाज जखमी का होतात हा सुद्धा एक गंमतीचा परंतु संशोधनाचा विषय नक्कीच होऊ शकतो. दोन अर्धशतके, दोन शतके, दोन मोठ्या भागिदाऱ्या भारतीय विजयाला कारणीभूत ठरल्या. तर प्रारंभी वर्चस्व गाजवूनही पाक चा वेगवान मारा नंतर भरकटला आणि फिरकीपटू निष्प्रभ ठरल्याने पाक संघ पराजयाचा धनी ठरला. टीम इंडियाचं या सामन्यातील प्रदर्शन जर यापुढे असंच कायम राहीलं तर आशिया चषकाचे ते दावेदार नक्कीच राहू शकतात. आशिया चषकाचा एक नवा आशिया ते जरूर बनवू शकतात‌ 
*********************************
दि‌ १२ सप्टेंबर २०२३
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
+++++++++++++++++++++++++

No comments:

Post a Comment

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...