Tuesday, October 10, 2023

जिया धड़क धड़क जाए

‌@#😈😈😈😈😈😈😈😈#@
           *जिया धड़क धड़क जाए!*
               *डॉ अनिल पावशेकर*
*******************************
२०११ ला प्रदर्शित बॉडीगार्ड चित्रपटात सलमानचा एक संवाद आहे, मुझपे एक एहसान करना, मुझपे कोई एहसान मत करना! खरेतर भारत ऑस्ट्रेलिया लढतीला हा संवाद समर्पक ठरतो. झाले काय तर केवळ फलंदाजी किंवा गोलंदाजीच नव्हे तर क्षेत्ररक्षण सुद्धा एखाद्या लढतीचे रूप कसे पालटू शकते याचे जिवंत उदाहरण या लढतीत दिसले. मिचेल मार्श ने विराटला दिलेलं जीवदान कांगारूंचा गळा घोटण्यास पुरेसं ठरलं. भावनांचा आणि धावांचा भुकेला असलेल्या क्रिकेट मुरारी, विराटने पुन्हा एकदा त्याला चेस मास्टर का म्हणतात हे दाखवून दिले.

सध्याच्या विश्वचषकात ज्याप्रकारे ३५० ते ४०० धावांचा टप्पा पार पाडला जात आहे ते पाहता टीम इंडियाला २०० धावा म्हणजे सोप्पा पेपर होता. मात्र ऑस्ट्रेलिया संघ हा कष्टकऱ्यांचा संघ आहे, श्रममेव जयते हे त्यांचे ब्रीदवाक्य आहे. या मुळ प्रवृत्तीला जागत ते भारताला विना कष्टाचे जिंकू देणार नाही हे निश्चित होतं. पण  प्रारंभीच एवढी दाणादाण उडवतील असं वाटलं नव्हतं. आपल्या तीन गडी बाद दोन धावां, हे ऐकून आत्ताही कंठ दाटून येतो. त्यातही ईशान किशन आणि श्रेयसची आगळीक अक्षम्य आहे असेच वाटते. राहिली बाब रोहितची तर तो चेंडू कहांसे आया था वो, छू के हमारे दिल को कहा गया उसे ढुंढो सारखा होता.

अर्थातच मैदानावर परिस्थिती गंभीर होती, विराटच्या साथीला राहुल होता. सततच्या अपयशाचे डाग पुसून काढण्यास राहुल उत्सुक होताच. तसेही राहुलला लग्न मानवले दिसते, त्याचे प्रतिबिंब त्याच्या सुधारलेल्या फलंदाजीत सध्या दिसत आहे. या दोघांनीही अनावश्यक दबाव न घेता, न कुंथता कायमचुर्ण घेतल्यासारखे सरळसोट कसोटी स्टाईल फलंदाजीला प्राधान्य दिले. मात्र चितलं ते घडत नाही. एक सरप्राइज बाऊंसरने विराटला चुकवले आणि करोडो क्रिकेट रसिकांचा श्र्वास क्षणांसाठी थांबला होता. मात्र ॲलेक्स कॅरी आणि मिचेल मार्शने पहले आप, पहले आप करत विराटवर एहसान केले. वास्तविकत: तो झेल कांगारूंसाठी तू जो मिला, हो गया सब हासील सारखा होता. विचार करा ०४ बाद २० धावा हे किती वेदना दायक चित्र असतं.

सामन्याचा दबाव काय असतं हे त्यावेळी दिसून आले. यानंतर मात्र हळूहळू कांगारूंची सामन्यावर पकड सैल होत गेली. विराट चे फ्लिक आणि राहुलच्या कव्हर ड्राईव्हने सामन्यात रंग भरला. भरीस भर म्हणून खतरनाक गोलंदाजी करणाऱ्या हेझलवूडला आक्रमणातून हटवल्याने कांगारूंची धार बोथट झाली. इथेच पॅट कमिन्स रणनीतीत चुकला. झॅम्पा नावाच्या ॲडम्सला कमिन्स ने आणले परंतु राहुलने त्याला चौकारांची झप्पी देत त्याची हवा काढून टाकली. राहुलने या सामन्यात आपल्या क्लासी फलंदाजीचे दर्शन दिले. ज्याप्रकारे सामन्याच्या प्रचंड दबावाला झुगारत आपल्या दोन्ही फलंदाजांनी डोके शांत ठेवून फलंदाजी केली ते पाहता या दोघांनी चेन्नईत बर्फाचा होलसेल व्यापार सुरू करायला हरकत नाही.

लढत जवळपास भारताकडे झुकल्यावर कमिन्स ने परत एकदा हेझलवूडला आणले मात्र तोपर्यंत पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले होते. चेंडू सॉफ्ट झाला होता, लक्ष्य किरकोळ उरले होते, इतर गोलंदाज निष्प्रभ ठरले होते. दांत आणि नखं नसलेला हेझलवूड शुद्ध शाकाहारी गोलंदाज वाटत होता. केवळ उत्तेजनार्थ पारितोषिक म्हणून त्याला विराटचा बळी मिळाला मात्र तोपर्यंत हत्ती गेला आणि शेपूट उरले होते. त्यातही क्लासी राहुलची फलंदाजी आणखी यौवनात आली होती. सोबतच कुंगफू पांड्या असल्याने कांगारूंना या विश्वचषकात विजयारंभ करता आला नाही. टीम इंडियाचं घोडं या सामन्यात न्हालं असलं तरी आपल्या गोलंदाजांनी पुर्वार्धात केलेल्या कामगिरीला विसरता येणार नाही.

नाणेफेक जिंकून कांगारूंचे फलंदाजीचे स्वप्न बुम बुम बुमराहने लवकरच भंग केले होते. त्याने मार्शला टाकलेल्या चेंडूने अगदी नागासारखा फणा काढत बॅटला दंश केला आणि उर्वरित काम विराटने अफलातून झेल घेत पुरे केले. तरीपण वॉर्नर आणि स्मिथने अस्सल कांगारू बाणा दाखवत चिवट फलंदाजी केली. मात्र भारतीय फिरकीची भानामती ते पचवू शकले नाही. हाथोडा छाप फलंदाजी करणारा वॉर्नर अखेर कुलदीपला शरण गेला. यानंतर सर जडेजा टीम इंडियाच्या मदतीला धावून आले. जडेजाच्या जादूने स्मिथ सारखा कसलेला फलंदाज चारी मुंड्या चीत झाला. वेग आणि गुडलेंथचा टप्पा जडेजाला बळी च्या बाबतीत मालामाल करून गेला. ज्याप्रकारे जडेजाने स्मिथचा ऑफ स्टंप उडवला ते पाहता स्मिथला आपल्या विकेट पेक्षा सर्वांसमक्ष जडेजाने मामा बनवल्याचे दुःख जास्त झाले असेल.

 लगेचच तिसाव्या षटकांत जडेजाने लाबुशेन आणि ॲलेक्स कॅरी ला घरी पाठवत कांगारूंचा बाजार उठवला. धोकादायक ग्लेन मॅक्सवेलला कुलदीपने संपवले तर रवी अश्विनने कॅमरून ग्रीन ला. कमिन्स, झॅम्पा आणि स्टार्क ची वळवळ बुमराह, पांड्या, सिराजने संपुष्टात आणली. कांगारूं तर्फे वार्नर स्मिथने ६९ धावांची आणि स्मिथ लाबुशेन ने ३६ धावांची भागीदारी केली. मात्र ५० षटकांच्या सामन्यात अशा भागिदाऱ्या कुचकामी ठरतात.

सामन्याचा आढावा थोडक्यात घ्यायचे झाले तर एक उत्कृष्ट संघाचा राहुल विराटने उत्तम पाठलाग केला असे म्हणू शकतो‌. भारतीय खेळपट्टीवर फिरकीपटूंचा दबदबा जगजाहीर असूनही ऑस्ट्रेलियन संघ एकमेव ॲडम झॅम्पाच्या भरवशावर कसाकाय आला याचे आश्चर्य वाटते. या सामन्यातील यशस्वी गोलंदाज जडेजा आणि हेझलवूड, दोघांनीही गुडलेंथचा टप्पा धरून ठेवत यश मिळवले. भारतीय फिरकीचे त्रिकुट सामन्यागणिक आणखी तिखट होत जाईल यात शंका नाही. मात्र उर्वरित सामन्यात ईशान, रोहीत आणि श्रेयसने ,,'दो मिनट में मॅगी'  पेक्षा जास्त काळ खेळपट्टीवर उभे राहून चाहत्यांची धडधड वाढणार नाही याची काळजी घ्यावी ही अपेक्षा आहे. कारण प्रत्येक वेळी प्रतिस्पर्धी संघाला आपले गोलंदाज दोनशेत गुंडाळतीलच असे नाही.
*********************************
दि. ०९ ऑक्टोबर २०२३
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++++

No comments:

Post a Comment

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...