@#😈😈😈😈😈😈😈😈#@
*आज ब्ल्यू है शमी शमी!*
*डॉ अनिल पावशेकर*
**********************************
आयसीसी विश्वचषक २०२३ च्या एकविसाव्या सामन्यात यजमान टीम इंडियाने चिवट किवींचा प्रतिकार मोडून काढत आपला सलग पाचवा विजय नोंदवला आहे. २००३ पासून आयसीसी स्पर्धेत सातत्याने भारतीय संघाला छळणाऱ्या किवींना मो.शमी आणि विराटच्या भीमपराक्रमाने लोळवले आहे. जवळपास वीस वर्षे म्हणजे बीस साल बाद टीम इंडियाने गत पराभवांचा पुरेपूर वचपा काढला असून अंकतालिकेत अव्वल स्थानी झेप घेतली आहे. या स्पर्धेत प्रथमच गोलंदाजी आणि फलंदाजीत आपल्या संघाचा कस लागला असून न्युझीलंड चे कठीण गणित सोडविण्यात टीम इंडिया अखेर यशस्वी झाली आहे.
झाले काय तर एरवी दुहेरी मालिकेत गरीब गाय असणारा किवी संघ आयसीसी लढतीत आपल्या संघाला नेहमीच शिंगावर घेत वरचढ होत होता. दुहेरीत शांती आणि आयसीसी स्पर्धेत क्रांती करत किवी अक्षरशः डोक्यावर बसले होते. एकवेळ बर्म्युडा ट्रॅंगल चे रहस्य चुटकीसरशी सुटेल परंतु किवीजचा गुंता सोडवायला चांगलेच नाकी नऊ येत होते. बरेचदा अगदी हाता तोंडाशी आलेला विजयाचा घास किवींनी हिसकावला होता. काही केल्या किवी विरूद्ध टीम इंडियाची खुलता कळी खुले ना अशी स्थिती झाली होती. त्यातही मैदान बदलले, संघ खेळाडू बदलले मात्र किवीं विरूद्ध इक रुत आए इक रुत जाए, मौसम बदले ना बदले नसिब अशी आपली वाईट परिस्थिती होती. हा संघ आपल्या साठी अवघड जागेचं दुखणं होऊन बसला होता.
अखेर किवींच्या दुष्टचक्रातून सुटका होण्यासाठी धर्मशाळेचे मैदान सजले होते आणि रोहीतने नाणेफेक जिंकून गोलंदाजी पत्करली. बहुदा दवबिंदू, निव्वळ पाच गोलंदाज आणि खेळपट्टीच्या ताजेपणाच्या फायद्यासाठी हा निर्णय घेतला असावा. प्रारंभीच सिराज आणि मो.शमी ने भन्नाट सुरूवात करून कर्णधाराच्या निर्णयावर शिक्कामोर्तब केले. पण शमीच्या गोलंदाजीत जडेजाने रचिनचा झेल सोडत सोप्पा पेपर कठीण करून टाकला. या जीवदानाचा फायदा घेत त्याने मिचेलला सोबत घेत आपल्या गोलंदाजांना नाच नाच नाचविले. ना फिरकी, ना वेगवान गोलंदाजांना काही सुचेना. भरीस भर म्हणून खतरनाक फलंदाज मिचेलला बुमराहने सत्तरीत शतायुषी होण्याचा आशिर्वाद देऊन आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला.
दोन्ही संघासाठी तिसाव्या षटकापर्यंत आणिबाणीची परिस्थिती निर्माण झाली होती. किवींना धावांचा खुराक वाढवायचा होता तर आपल्या संघाला विकेटचा बुस्टर डोझ हवा होता. दोन्ही किवी फलंदाज गुप्तधनावर कुंडली मारून बसलेल्या नागोबा सारखे खेळपट्टीवर तळ ठोकून बसले होते. आपल्या गोलंदाजांना विकेट मिळत नव्हती, झेल पकडल्या जात नव्हते, चांगला खेळ करूनही गोलंदाजीत कमावलं डिआरएस मध्ये गमवावं लागत होतं. भारतीय चाहत्यांचा जीव अगदी मेतकुटीला आला होता. कोणीतरी यावं आणि आपल्या संघासाठी तेरी जुल्फ फिर सवारूं, तेरी मांग फिर सजादूं, कोण करणार असा प्रश्न पडला होता.
शेवटी या ट्रॅफिक जाम मधून टीम इंडियाला सहीसलामत काढण्याचा विडा मो. शमी ने उचलला. झुंजार फलंदाजी करणाऱ्या रचिनला गील कडून झेलबाद करत शमीने आज ब्ल्यू है शमी शमी ची झलक दाखवली. लगेचच पहिल्या स्पेलमध्ये दणके खाल्लेल्या कुलदीपने लॅथम, फिलीप्सचा काटा काढला. किवीचा अर्धा संघ बाद होऊनही खेळपट्टीवर डॅरेन मिचेल नावाचा मोठा अडथळा बाकी होता. एकतर तो सेट फलंदाज होता त्यामुळे किवी तीनशे चा टप्पा ओलांडण्याची भीती होती. मात्र सतत चार सामने अडगळीत टाकलेल्या मो.शमी सोबत त्याचा सामना होता. मो.शमीने किवी कुळाचा नाश केल्याशिवाय शेंडीला गाठ पाडणार नाही याची आठवण ठेवत तब्बल पाच फलंदाजांची कत्तल केली. सॅंटनर व चॅपमनच्या दांड्या गुल करत शमीने त्याला संघाबाहेर ठेवणाऱ्यांना आरसा दाखवून दिला.
खरेतर पाऊने तीनशेचे लक्ष्य सध्याचा टीम इंडियाचा फॉर्म पाहता मुश्किल नक्कीच नव्हते. तरीपण किवींची गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण पाहता बस युं गये और युं आए असे अजिबात नव्हते. समाधानाची बाब म्हणजे रोहीतचा दे दणादण ॲप्रोच संघासाठी वरदान ठरत आहे. आपली सुरुवातही झकास झाली होती. मुख्य म्हणजे किवींचा तापदायक गोलंदाज ट्रेंट बोल्ट फारसा प्रभावी ठरला नाही परंतु मॅट हेन्री ने बरीच चकवाचकवी केली. खरी गंमत आणली लॉकी फर्ग्युसनने. तुफानी वेग, आखूड टप्प्याचे चेंडू, त्यातही कधी बळी, कधी धावांचा रतीब. थोडक्यात काय तर प्यार लो प्यार दो गोलंदाजी.
लॉकीने सलामीवीरांना गटकवताच मैदानावरील पारा वाढू लागला होता. रोहीतने पाय न हलवता ऑफ बाहेरील चेंडू यष्ट्यांवर ओढून घेतला तर गील अप्पर कटचा बळी ठरला. चौथ्या क्रमांकावर श्रेयस अय्यर ने चांगल्या खेळीची कशी माती करायची हे दाखवून दिले. आखूड टप्प्याचा चेंडू त्याची दुखरी नस ठरत आहे. केवळ श्रेयसच कशाला, के एल राहुल आणि सूर्यकुमार ने सामना एकतर्फी होणार नाही याची पुरेपूर काळजी घेतली. पुन्हा एकदा मैदानात वद जाऊ कुणाला शरण स्थिती निर्माण झाली आणि त्याचे एकमेव उत्तर होते,, विराट कोहली. वास्तविकत: विराटची खेळी, त्याचे सामना वाचवण्याचे कौशल्य आणि दृढ निर्धार पाहता असा खेळाडू निर्माण होत नसतो तर नियती मुद्दाम जन्माला घालत असते असे वाटते.
विराटने आपल्या लौकिकाला साजेशी खेळी करत पुन्हा एकदा टीम इंडियाची गाडी रूळावर आणली. संपूर्ण खेळीत केवळ आणि केवळ जिंकण्याची वृत्ती त्याला इतरांपासून महान बनवते. त्याला लयात बघून सुंदर ते ध्यान उभे विकेटवरी असे म्हणावेसे वाटते. विराटने ९५ धावांच्या खेळीत श्रेयस, राहुल आणि जडेजा सोबत महत्वपूर्ण अशा अर्धशतकी भागिदाऱ्या केल्या. जोपर्यंत विराट खेळपट्टीवर होता तोपर्यंत भारतीय चाहते निश्चिंत होते. मात्र बांगलादेश आणि या सामन्यात त्याला शतकाची मोहिनी पडू लागल्याचे दिसून येते. अर्थातच त्यात वावगे काहीच नाही. मात्र विराट शतक करतो काय अथवा नव्वदीत बाद होतो, यापेक्षा त्याचा सामन्यातील ॲप्रोच पाहण्यासारखा असतो. जडेजाने विराटला उत्तम साथ देत सामना आपल्या हातून निसटणार नाही याची दक्षता घेतली.
थोडक्यात काय तर हा सामना सुद्धा आपल्या गोलंदाजांनी खेचून आणला आहे. आपल्या फलंदाजांना आवाक्यातले टार्गेट देऊन गोलंदाजांनी आपले श्रेष्ठत्व सिद्ध केले आहे. तर किवींनी फलंदाजीत जो फायनल टच हवा असतो, तो देण्यात ते कमी पडले. विशेषतः डॅरेल मिचेल नव्वदीत असताना शतकासाठी थबकला आणि रनरेटचा चोथा करुन बसला. शिवाय इतर फलंदाजांना हाताशी घेऊन तो संघाला तीनशे पार नेऊ शकला नाही. मॅट हेन्री आणि थोड्याफार प्रमाणात सॅंटनर वगळता इतर किवी गोलंदाजांना फारसा प्रभाव पाडता आला नाही. काहीही असो, हा सामना बघून भारतीय क्रिकेट रसिक नक्कीच म्हणत असतील,,,
इसी खुशी को ढुंढ रहे थे, यही आजतक नहीं मिली!
आज से पहले, आज से जादा खुशी आज तक नहीं मिली!
**********************************
दिनांक २३ ऑक्टोबर २०२३
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
No comments:
Post a Comment