@#😈😈😈😈😈😈😈😈#@
*रुणुझुणु रुणुझुणु रे बुमराह*
*डॉ अनिल पावशेकर*
**********************************
आयसीसी विश्वचषक २०२३ च्या बाराव्या सामन्यात यजमान टीम इंडियाने पाकचे बारा वाजवत स्पर्धेत सलग तिसरा विजय नोंदवला आहे. रोहितचे कल्पक नेतृत्व, त्याचा आपल्या गोलंदाजांवर असलेला विश्वास आणि गोलंदाजांच्या नियंत्रित माऱ्याने पाक संघाची डाळ शिजली नाही आणि ते मानहानीकारक पराभवाचे धनी ठरले आहेत. आयसीसी विश्वचषकात सतत आठव्यांदा पाक ची नांगी ठेचण्यात टीम इंडिया यशस्वी झाली आहे. भारतीय गोलंदाजांत,, विशेषतः सिराज बुमराह जोडीने पाक फलंदाजांना गुमराह करत आज कुछ तुफानी करते है हे दाखवून दिले आहे.
झाले काय तर क्रिकेटची कोणतीही लढत असो, भारत पाक लढतीची बरोबरी कोणत्याही इतर दोन संघांच्या लढतीशी करू शकत नाही. खरेतर हा एक साखळी सामना होता परंतु या सामन्याला अंतिम सामन्यापेक्षाही जास्त वलय प्राप्त झाले होते. त्याला कारणही तसेच आहे. प्रत्येक लढत जणुकाही धर्मयुद्धाच्या नजरेत लढणारे आणि विजय झाल्यास जगातल्या कानाकोपऱ्यातील आपल्या धर्म बंधूंना विजय अर्पण करण्याच्या कळलाव्या मानसिकतेने या सामन्यात पाकच्या चिंधड्या उडणे जणुकाही विधिलिखित होते असे वाटते. वास्तविकत: आंतरराष्ट्रीय पातळीवरील युद्ध, हल्ले याचा क्रिकेटशी काय संबंध? पण आगळीक ना करतील तर ते पाक खेळाडू कसले,, आणि याच कारणांमुळे पाकच्या पराभवाची तमाम क्रिकेटप्रेमी तेरा करु गिन गिन के इंतजार प्रमाणे वाट बघत होते.
दोन्ही संघाचे बलाबल बघता भारतीय संघ निश्चितच वरचढ होता, त्यातही मायदेशात, आपल्या प्रचंड पाठीराख्यांच्या साक्षीने खेळणे म्हणजे सोने पे सुहागा होते. भरीस भर म्हणून गत टी ट्वेंटी विश्वचषक असो की नुकताच पार पडलेला आशिया चषक असो, रोहित ॲंड कंपनीने पाक गोलंदाजांचे उठता लात बसता बुक्कीने स्वागत केल्याने आपल्या फलंदाजांत कमालीचा आत्मविश्वास भरला होता. तर गोलंदाजीत कधी नव्हे इतकी विविधता आज आपल्या संघात बघायला मिळत आहे. सिराज बुमराह जोडीला जडेजा कुलदीपच्या फिरकीने कळस चढवला आहे. तर हार्दिक पांड्या आपल्या मायावी गोलंदाजीने भाव खाऊन जातो. मार खाणार पण बळी मिळवून देणार हा त्याचा स्वभावधर्म!
राहिली बाब पाक संघाची तर फलंदाजीत ते सर्वस्वी बाबर रिझवान जोडीवर अवलंबून असतात. निश्चितच त्यांच्या इतर फलंदाजांना कमी लेखून चालणार नाही परंतु सामन्यात फलंदाजीची लय राखण्याइतपत ते सक्षम वाटत नाही. वैयक्तिक शतके झळकावणे आणि डावाची मांडणी करणे वेगळं. तर गोलंदाजीत कभी खुशी कभी गम असते. ज्यादिवशी शाहिनशहा आफ्रिदी चालला, स्वींग, सीम ची कवकुंडले त्याला लाभली की तो टॉप ऑर्डरचा खिमा करुन टाकतो. मात्र प्रारंभी त्याने विकेटची बोहणी नाही केली तर पाकची गोलंदाजी दारिद्र्य रेषेखालील वाटते. आफ्रिदीचा सहकारी, हॅरीस रौफचा कधीच खौफ वाटत नाही. त्याच्या वेगाला फलंदाज भीक घालत नाही. भरीस भर म्हणून पाकचे क्षेत्र रक्षण गचाळ आणि मनोरंजनात्मक असते.
नाणेफेक जिंकून रोहीतने बाबर ॲंड कंपनीला फलंदाजी दिली. पाकने सावध, संतुलित सुरूवात केली. खेळपट्टी संथ आणि कमी उसळी ची होती. फुल लेंथ टाकून स्वींग, सीमची अपेक्षा करणे व्यर्थ होते. नेमके हेच हेरून बुमराहने आपली लाईन आणि लेंथ लगेचच ॲडजस्ट केली मात्र सिराजला थोडा वेळ लागला. सोबतच पाकची सलामी जोडी आठव्या षटकांत पोहचल्याने रोहितची चिंता वाढली होती. सिराजला चौकार पडत असले तरी रोहीतने त्याच्यावरचा विश्वास पडू दिला नाही. अखेर सिराजने कोंडी फोडत अब्दुल्ला शफीकला पायचीतात पकडले आणि भारतीय संघाने सुटकेचा निःश्वास टाकला. शफीकच्या बळीने हुरूप चढलेल्या आपल्या गोलंदाजांनी दबाब वाढवत इमानुल हक ला चुक करण्यास भाग पाडले.
०२ बाद ७३ पासून बाबर रिझवान जोडीने डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र गुजरातच्या मिठाला जागत हे दोघेही अहिंसेचे पुजारी निघाले. दोघेही पन्नाशीत पोहचले परंतु विना षटकार! जणुकाही गुजराती पाहुणचाराने गदगदून जात त्यांनी दिनमे चले ढाई कोस सारखी फलंदाजी केली. ना धावगतीचा ते टेम्पो सेट करू शकले ना भारतीय गोलंदाजीचा दबाब झुगारू शकले. मात्र ही जोडगोळी कधीही स्फोटक होऊ शकते यात वाद नव्हता. त्यातही रिझवानची तडफड पाहण्यासारखी होती. दोन्ही संघाच्या घशाला कोरड पडली होती, पाक संघ ना वेगाने धावा करू शकत होता तर भारतीय संघ बळीसाठी व्याकूळ झाला होता. मात्र इथे पुन्हा एकदा सिराज संकटमोचक ठरला. विशेष फुटवर्क नसल्याने बाबर सिराजच्या लाईन लेंथच्या नेटवर्कला फसला. सिराजने बाबरच्या चिपळ्या वाजवत भारतीय संघासाठी फ्लड गेट्स मोकळे केले.
बाबरचा काटा निघताच पाक संघाने मागेल त्याला विकेट योजना चालू केली. आतापर्यंत घाम गाळणाऱ्या कुलदीपची तपश्चर्या फळाला आली. त्याने ३३ व्या षटकांत डबल धमाका करत सौद शकील, इफ्तिकार अहमदला नारळ दिला. पाकचा अर्धा संघ गारद झाला तरी रिझवान मैदानावर पाय रोवून उभा होता. त्यामुळे रोहीतला त्याचा हुकमाचा एक्का म्हणजेच बुमराहला पाचारण करावे लागले. यावेळी पाकवर निर्णायक हल्ला करत पाकला नेस्तनाबूत करणे गरजेचे होते आणि बुमराह साठी जुना चेंडू अल्लाऊद्दीनच्या जादुई दिव्यापेक्षा कमी नव्हता. त्याने ज्याप्रकारे रिझवान, शादाब खानला उडवले ते पाहता तो मागच्या जन्मी नक्कीच जादुगार असावा असे वाटते. चेंडू कधी आत कधी बाहेर, कधी वेगात तर कधी हळूवार सोडत त्याने पाकच्या मुळावर घाव घातले.
उर्वरित फलंदाजांनी खेळपट्टीवर हजेरी लावण्याचे काम प्रामाणिकपणे केले. त्यात पांड्या आणि जडेजाने आपली गंगाजळी भरून घेतली. खरेतर पाक असो की ऑस्ट्रेलिया, दोन्ही संघांविरुद्ध आपल्या गोलंदाजांनी प्रतिस्पर्ध्याची दोनशे ची पावती फाडून आपल्या फलंदाजांना फारकाही कष्टाचे काम बाकी ठेवले नव्हते. अर्थातच दोनशेच्या आतले लक्ष्य भारतीय संघासाठी धडकी भरवणारे नक्कीच नव्हते. फक्त उत्सुकता होती पाकची गोलंदाजी कशीकाय प्रतिकार करणार याची. मात्र खेळपट्टी जागते रहो, मेरे भरोसे मत रहो सारखी असल्याने पाक गोलंदाजांना निव्वळ घाम गाळून नव्हे तर डोकं चालवून गोलंदाजी करायची होती. आफ्रिदीने आपले जुने शस्त्र फुल लेंथ गोलंदाजी करून पाहिली परंतु रोहीतने पहिल्याच चेंडूवर चौकार ठोकत आपले इरादे स्पष्ट करून टाकले. प्रचंड ताकद आणि अचूक टायमिंगने रोहीतने पाक गोलंदाजांची धुलाई केली. ना आफ्रिदी चालला, ना रौफ ना हसन अली.
सामन्याचा थोडक्यात आढावा घेतो म्हटले तर रोहीतने गोलंदाजांचा कल्पकतेने वापर करत पाकचे नाक दाबून ठेवले होते. विशेषतः सिराजला चौथे षटक देणे असो की बाबरसाठी पुन्हा आक्रमणाला लावणे असो. त्यातही रोहीतने कुलदीपला एका टोकाला बांधून ठेवत पाक फलंदाजांना मोकळा श्वास घेऊ दिला नाही. आपल्या दोन्ही फिरकीपटुंनी विकेट टू विकेट गोलंदाजी केल्याने पाक फलंदाजी संथावली होती. मात्र खरी मजा आणली ती बुमराहने. त्याची उत्तम लाईन लेंथ सिराजसाठी मार्गदर्शक तत्वे ठरली होती. गोलंदाजी सुद्धा प्रेक्षणीय असते हे बुमराहने दाखवून दिले. जुन्या चेंडूने नवीन कल्पना करत सेट झालेल्या रिझवानचा आणि शादाब खानचा बोल्ड काढणे यासाठी कमालीची हुशारी, कौशल्य लागते आणि ते बुमराहने दाखवून दिले. आपल्या पाच गोलंदाजांना प्रत्येकी दोन बळी जरी मिळाले असले तरी यामागे अदृश्य हात बुमराहचा आहे त्याने संपूर्ण सामन्यात फलंदाजांना दबावात ठेवत इतर गोलंदाजांचे काम सोपे केले. अर्थातच या कामगिरीमुळे त्याला प्लेअर ऑफ दी मॅचने गौरविण्यात आले. मोठा गाजावाजा झालेल्या पाक संघाचा टीम इंडियाने धुव्वा उडवत मिशन वर्ल्डकप २०२३ मध्ये आणखी एक यशस्वी टप्पा पार पाडला आहे.
*********************************
दि. १५ ऑक्टोबर २०२३
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
No comments:
Post a Comment