@#😈😈😈😈😈😈😈😈#@
*शमी, सि'राज' ची मुंबईत एकहाती सत्ता*
*डॉ अनिल पावशेकर*
*********************************
आयसीसी विश्वचषकात टीम इंडियाची तुफानी घोडदौड कायम असून सातव्या लढतीत त्यांनी लंकेला अक्षरशः पायदळी तुडवले आहे. विजयाचा सत्ते पे सत्ता ठोकत टीम इंडियाने सेमीफायनलचे बुकींग कन्फर्म केले आहे. शुभमन, विराट, श्रेयसच्या घणाघाती फलंदाजीने लंकेच्या गोलंदाजीचे वाभाडे काढले तर बुमराह, सिराज, शमीच्या वादळात लंकेच्या फलंदाजीचा पालापाचोळा झाला. मुख्य म्हणजे या महत्त्वाच्या सामन्यात लंकेला काही चुकीच्या निर्णयांचा आणि गचाळ क्षेत्ररक्षणाचा चांगलाच फटका बसला आहे.
झाले काय तर मुंबईत धावांचा पाऊस पडणार हे अपेक्षितच होते. त्यात लंकेने नाणेफेक जिंकून टीम इंडियाला फलंदाजी देत आ बैल मुझे मार करून घेतले. कारण सध्या नभात जरी शरदाचे चांदणे लखलखत असले तरी आपल्या फलंदाजीचे तारें जमीं वर बहरून आले आहे. अगदी दुसऱ्या चेंडूवर रोहीत बाद होऊनही साडेतीनशे चा टप्पा सहज ओलांडल्या गेला. मुख्य म्हणजे लंकेच्या गोलंदाजांनी ताज्या खेळपट्टीवर प्रारंभी सुरेख मारा करत शुभमन विराटला चांगलेच भंडावून सोडले होते. भरीस भर म्हणून लंकन खेळाडूंनी प्री दिवाळी ऑफर देत एक कॅच वर एक कॅच फ्री सोडत आपल्या पायावर धोंडा पाडून घेतला.
इतर फलंदाजांचे सोडा, विराटला जीवदान देऊन कांगारुंनी जी चुकी केली तिच लंकेने केली. विराट स्वतःच्या धावा तर वाढवतोच परंतु संघाचा डाव सावरत त्याला सुंदर आकार सुद्धा देतो. एकदा झेल सुटल्यावर विराटने पुन्हा हवेत फटके न मारून आपले कमिटमेंट दाखवून दिले. त्याने शुभमन सोबत १८९ धावांची मोठ्ठी भागिदारी करत लंकन गोलंदाजांना जेरीस आणले. हे दोघेही शंभरी गाठतील असे वाटतांनाच मधुशंकाने दोघांचा बळी घेतला. खरेतर रोहीतला बाद करत त्याने लंकेला झक्कास सुरुवात करून दिली होती. दुसऱ्या टोकाला चमीरा त्याला उत्तम साथ देत होता. पण या दोघांनाही कुशल मेंडीस ने आक्रमणातून लवकर काढत फार मोठी चुक केली. कदाचित या दोघांना आणखी काही षटके दिली असती तर शुभमन, विराट वर दबाव वाढला असता.
शुभमन, विराट तंबूत परतताच डावाची सर्व सुत्रे हाती घेत श्रेयस अय्यर ने फलंदाजीतला आपला बॅकलॉग पूर्ण केला. त्याने सणसणीत सहा षटकार आणि तीन चौकार ठोकत त्याच्यातला टायगर अभी जिंदा है हे दाखवून दिले. गील, कोहलीच्या प्रयत्नांना सुवर्ण कळस चढविण्याचे बहुमूल्य काम श्रेयसने केले. त्याने राहुल आणि जडेजा सोबत दोन अर्धशतकी भागिदाऱ्या करत आपली धावसंख्या गुटगुटीत केली. वास्तविकत: हा आकडा आणखी फुगला असता मात्र मधुशंकाने हाताने कमी आणि डोक्याने जास्त गोलंदाजी करत आपल्या धावसंख्येला थोडेफार वेसण घातले. त्याचे ते ऑफकटर, स्लोअर वन आणि स्लो बाऊंसर आपल्या दिग्गज फलंदाजांना चकवून गेले. त्यातही त्याने गील, विराट आणि श्रेयसला ज्या खुबीने बाद केले ते पाहता त्याला फलंदाजांना नव्वदीत बाद करायचे पेटंट नक्कीच मिळू शकते.
लंकेची फलंदाजी पाहता साडेतीनशेच्या वरचे लक्ष्य म्हणजे त्यांच्या साठी दिल्ली (कोलोंबो) बहोत दूर है सारखे होते. शिवाय बुमराह,सिराज आणि शमीचे त्रिकुट ज्याप्रकारे आग ओकत आहे ते पाहता हा गोवर्धन ते पेलू शकणार नाही हे निश्चित होते. तरीपण ते एक सभ्य, सुसंस्कृत प्रतिकार करतील असा अंदाज होता. मात्र झाले उलटेच. आपल्या वेगवान तिकडीने त्यांना पळता भुई थोडी केली. स्विंग, सिम आणि पेसच्या वावटळीत हाय काय नाय काय करत लंकेचा फलंदाजीचा हवामहल सफाचट झाला. कोण फलंदाजीला येत आहे, कोण बाद होत आहे, काही कळतच नव्हतं. बुमराहने पहिल्याच चेंडूवर त्यांचे नाक दाबल्याने सिराज, शमीसाठी त्यांनी तोंड उघडे करून टाकले. जणुकाही आशिया चषकातील सिराजच्या गोलंदाजीचा रिप्ले पाहत आहोत असे वाटत होते.
सिराजने त्याच्या पहिल्या दोन षटकांत तीन फलंदाजांना बाद करत लंकेचे कंबरडे मोडून काढले. सोबतच लायसन्स टू किल असलेल्या शमीने बेछूट गोळीबार करत लंकेच्या उरल्यासुरल्या आशा आकांक्षांना मुठमाती दिली. आपल्या वेगवान गोलंदाजांना तोंड देऊ शकेल असं एकही नांव, फलंदाज लंकेकडे नव्हता. शमीने पाच फलंदाजांना केवळ बाद केले असे नव्हे तर स्विंग चीज क्या है आप मेरी जान लिजीए याचे प्रात्यक्षिक करून दाखविले. दुर्दैवाने लंकेकडे आपल्या त्रिकुटांचे मिसाईल थोपवण्याची डोम यंत्रणा नव्हती. त्यांची वाताहत कोणीही थांबवू शकले नाही. लंकन समर्थकांची अवस्था तर इस दिल के टुकडे हजार हुए, कोई यहाँ गिरा कोई वहां गिरा सारखी होती.
टीम इंडियाचे चाहते मात्र या विजयाने गदगदून गेले आहेत. या विजयाने सेमीफायनलच्या घाटात, टीम इंडिया थाटात पोहोचली आहे. निव्वळ फलंदाजी अथवा गोलंदाजी नव्हे तर क्षेत्ररक्षकांनी सुद्धा सुंदर झेल टिपत आपली कामगिरी चोख बजावली आहे. तरीपण या स्पर्धेत ज्या प्रकारे आपले गोलंदाज लाईन, लेंथ ची लय टिकवून आहेत आणि सातत्याने बळी घेत आहेत ते पाहता ते आपल्या फलंदाजांपेक्षा काकणभर सरस आहेत असे वाटते. सिराज, शमी बळी मिळवत असतांना सुद्धा रोहीतने त्यांना आणखी न थकवता, त्यांच्या वैयक्तिक विक्रमाच्या नादी न लागता गोलंदाजीत बदल करत आपल्या नेतृत्व गुणांची चुणूक दाखवली आहे. पूर्वी आपण फलंदाजीच्या दादागिरीने जिंकत होतो. प्रथमच आपल्या गोलंदाजांनी प्रतिस्पर्ध्यांच्या उरात धडकी भरवली आहे. थोडक्यात काय तर फलंदाज, गोलंदाज आणि क्षेत्ररक्षकांनी मिले सूर मेरा तुम्हारा केल्याने टीम इंडियाचा वारू चौखुर उधळला आहे. सध्यातरी टीम इंडिया अनस्टॉपेबल असून एकमेव द.आफ्रिकेचा संघ आपल्याला टक्कर द्यायच्या स्थितीत दिसून येत आहे.
*********************************
दि. ०३ ऑक्टोबर २०२३
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
No comments:
Post a Comment