@#😈😈😈😈😈😈😈😈#@
*हम तुम दोनो जब मिल जाएंगे!*
*डॉ अनिल पावशेकर*
**********************************
आयसीसी विश्वचषकात सध्या दोन प्रकारचे संघ खेळत आहे. एक म्हणजे भारतीय संघ आणि दुसरा म्हणजे उर्वरित सगळे संघ. ज्याप्रकारे आपला संघ प्रतिस्पर्ध्याला सहजासहजी लोळवत आहे ते पाहता या विश्वचषकावर केवळ आणि केवळ आपल्याच संघाचा हक्क आहे असे वाटते. पण क्रिकेट हा बेभरवशाचा खेळ आहे. एखादा दिवशी कोणता संघ कशी कामगिरी करेल हे गुपीत असते. मात्र जोपर्यंत आपल्या संघाचा अत्यंत खराब खेळ होणार नाही किंवा मोठा उलटफेर होणार नाही अथवा डकवर्थ लुईस खेळखंडोबा करणार नाही तोपर्यंत वर्ल्ड इलेव्हन संघ जरी मैदानात उतरला तरी त्याला आपला संघ पुरून उरणार असेच काही दिसत आहे.
झाले काय तर सुपर संडेला ईडन गार्डन वर टीम इंडियाने द.आफ्रिकेशी दोन हात केले होते. द.आफ्रिकेवर चोकर्सचा ठप्पा लागला आहे आणि काही केल्या तो मिटायचे नांव घेत नाही. खरेतर हा संघ मस्क्युलर, पॉप्युलर, स्पेक्टॅक्युलर असून वर्ल्ड कप च्या बाबतीत बॅचलर आहे. शिवाय त्यांच्याकडे रबाडा, यान्सन, लुंगी सारखे तेज बॉलर असून आजही आपल्या कडे त्यांच्या खेळाडूंची क्रेझ आहे. तरीपण ऐन मोक्याच्या क्षणी त्यांचा पप्पू कान्ट डान्स साला होतोय. या स्पर्धेत त्यांनी प्रथम फलंदाजी करतांना धावांचे डोंगर उभारले. पण पाठलाग करताना मात्र ते लटपटले, गळपटले. अगदी हाच किस्सा ईडन गार्डन वर बघायला मिळाला.
रोहीतने नाणेफेक जिंकून चाणाक्षपणे फलंदाजी घेतली आणि प्रारंभी आपली गाडी टॉप गिअरला टाकली. प्रतिस्पर्धी गोलंदाज कोणीही असो, कोणतेही मैदान असो, रोहीतची बेधडक फलंदाजी संघाच्या धावगतीचा टेम्पो सेट करून देतो. मात्र अवघ्या चाळीशीत त्याची खेळी संपुष्टात आली आणि मैदानात विराट उतरला. मात्र गेल्या काही सामन्यांपासून त्याच्यामागे शतकाचे ग्रहण लागलेले दिसत आहे. रोहीतचा झंझावात संपताच विरोधी गोलंदाज लयात आले आणि केशव महाराजने शुभमनला चकवले. नव्वदीत दोन बळी मिळताच द.आफ्रिकेला हुरूप चढला आणि शम्सी, महाराज या फिरकीपटुंनी विराट, श्रेयसवर फास आवळले. महाराजने विकेट टू विकेट संथ चेंडू सोडले तर शम्सीने दोन्ही फलंदाजांचे पाय जखडून टाकले होते.
सुसाट निघालेली आपली धावगती अक्षरशः धक्कागाडी झाली होती. विराटला ना स्ट्राईक रोटेट करता येत होते ना तो मोठे फटके मारत होता. तर केशव महाराजची अचूकता आणि शम्सीच्या निगेटीव्ह गोलंदाजीने श्रेयसला पुरते हैराण केले होते. अखेर ड्रेसिंग रूममधून रोहीतने वॉरंट पाठवताच श्रेयसची कळी खुलली. जणुकाही लंकेविरूद्धची मागचीच खेळी खेळत असल्यासारखे त्याने यान्सन, शम्सीचा समाचार घेणे सुरू केले. श्रेयसच्या तडाख्यातून वाचण्यासाठी गोलंदाजांनी चेंडूची गती कमी केली आणि त्यांना त्याचा लगेच फायदा झाला. लुंगी ने श्रेयसला झेलबाद करताच राहुल मैदानात आला. पण पुन्हा एकदा आपल्या धावगतीने गोगलगाईचे रुप घेतले. जणुकाही आपल्या फलंदाजांनी विश्वशांतीचा वसा घेतल्यासारखे ते शांतपणे खेळत होते.
अखेर या पेचप्रसंगात आपला बळी देत राहुलने सूर्यासाठी मार्ग मोकळा करून दिला. सूर्याने शॉर्ट बट स्वीट खेळी करत संघाची सुटका केली. त्याची १४ चेंडूतील २२ धावांची खेळी संघाचे मनोबल आणि धावगती वाढवून गेली. मात्र रिव्हर्स स्विपच्या नादात तो आपली विकेट गमावून बसला. तत्पूर्वी विराटचे खग्रास ग्रहण सुटले आणि तमाम क्रिकेटप्रेमींनी सुटकेचा निःश्वास टाकला. आपल्या वाढदिवसाला सचिनच्या ४९ शतकांची बरोबरी करत कोहलीने आणखी एक विराट पाऊल टाकले आहे. मात्र आजची विराटची खेळी नेहमी प्रमाणे फ्री फ्लोविंग नव्हती. कुठेतरी शतकाचे स्पीड ब्रेकर त्याला रिस्क घेऊ देत नव्हते. अखेर सर जडेजा टीम इंडियाच्या मदतीला धावून आले आणि आपण सव्वा तीनशेला ओलांडू शकलो.
प्रत्त्युत्तरात द.आफ्रिकेची झालेली वाताहत कल्पनातीत आहे. समोर सव्वातीनशेचे ओझे आणि सामना होता बुमराह, सिराज, शमीच्या धारदार गोलंदाजी सोबत. त्यातही द.आफ्रिकेचे फलंदाज म्हणजे मन के हारे सब हारे होते. सिराज काय, शमी काय आणि जडेजा काय! जणुकाही हर गेंद पे लिखा है विकेट का नाम! कोण कोणाला बाद करेल याचा नेम नव्हता. इनकमींग आऊटगोईंग फ्री असल्यासारखे त्यांचे फलंदाज आतबाहेर येतजात होते. सिराज, शमी, जडेजा आणि कुलदीपने फुल लेंथ, गुडलेंथ गोलंदाजी करत द. आफ्रिकेचा अवघ्या ८३ धावांत फडशा पाडला. सध्या आपले गोलंदाज स्वप्नवत कामगिरी करत आहेत. बुमराह, सिराज प्रतिपक्षाला खिंडार पाडतात तर शमीची गोलंदाजी म्हणजे तुम मुझे गेंद दो, मै तुम्हे विकेट दुंगा सारखी असते. चायनामन कुलदीपची फिरकी आणि जडेजा ची काटेकोर गोलंदाजी भेदने विरोधी फलंदाजांना जड जात आहे.
थोडक्यात काय तर आश्वासक फलंदाजी, धारदार गोलंदाजी आणि चपळ क्षेत्ररक्षणाला रोहीतच्या नेतृत्वाचा सुवर्ण मुलामा लाभल्याने टीम इंडिया अजेय झाली आहे. असा धाक्कड संघ सध्यातरी या स्पर्धेत दिसून येत नाही. ज्याप्रकारे हा संघ विरोधकांवर केवळ मात करत नाही तर मानहानीकारक पराभव करतो ते पाहता लंकेच्या नेतृत्वात इतर संघांनी टीम इंडियावर अब्रुनुकसानीचा दावा करायला हरकत नाही. टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय, रोहीतची दणकेबाज सुरूवात, विराट श्रेयसची शतकी भागीदारी, विराटचे बहुप्रतिक्षित शतक, सूर्या जडेजाची छोटेखानी परंतु वेगवान खेळी, सिराज शमीचा भेदक मारा आणि जडेजाचे पाच बळी हे या लढतीचे वैशिष्ट्य ठरले. तर तब्बल दोन नो बॉल, बावीस वाईड सहीत एकंदर २६ अवांतर धावा देत द.आफ्रिकेने बेशिस्त गोलंदाजीचे दर्शन घडवले. भरीस भर म्हणून त्यांच्या कचखाऊ फलंदाजीने उरलीसुरली कसर भरून काढली.
विश्वचषकापासून टीम इंडिया अवघे दोन पाऊले दूर आहे. तोपर्यंत संघाची लय अशीच राखणं अत्यंत गरजेचे आहे. टीम इंडिया तिसऱ्यांदा एकदिवसीय विश्वचषक उंचावण्यास जरूर सक्षम आहेत. निश्चितच आपले फलंदाज आणि गोलंदाज मिळून "हम तुम दोनो जब मिल जाएंगे, इक नया इतिहास बनाऐंगे" अशी आशा आहे.
**********************************
दि. ०६ ऑक्टोबर २०२३
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
No comments:
Post a Comment