😈😈😈😈😈😈#@
*मुसाफिर हुं यारों, भाग ०१*
*डॅा अनिल पावशेकर*
*********************************************************************************************
२०१९ च्या व्हिएतनाम प्रवासानंतर कोरोना आणि इतर कारणांनी विदेश सफारीत जवळपास तीन चार वर्षे खंड पडला होता. पण २०२४ ला अखेर योग जुळून आला आणि यावेळी लक्ष्य होते मध्य आशियातील प्रमुख स्थान व उझ्बेकिस्तानची राजधानी ताश्कंद आणि प्राचीन सिल्क रूटच्या केंद्रस्थानी असलेले समरकंद हे शहर. विशेष म्हणजे दिल्ली ते ताश्कंद थेट विमानसेवा असल्याने जवळपास दोन हजार किमी चे अंतर अवघ्या सव्वा दोन तासांत कापल्या जाते. ना वारंवार विमान बदलविण्याची गरज ना कंटाळवाणा दिर्घ प्रवास! खरेतर ताश्कंद म्हटले तर मनाला चटका लागतो आणि आठवते भारताचे माजी पंतप्रधान स्व. लाल बहादूर शास्त्री यांचा दुर्दैवी गुढ म्रुत्यु तसेच समरकंद म्हणजे भारतात मुगल साम्राज्य स्थापन करणार्या बाबर ची भूमि.
यावेळी ताश्कंद मोहिमेत सहभागी मित्र होते डॅा प्रदीप पाटील, डॅा अजय कुलवाल, डॅा अजय अनासाने आणि डॅा निलेश. दिल्लीहून ११ मे रोजी दुपारी पाऊने दोन ला विमान असल्याने आणि सकाळच्या नागपूर दिल्ली विमानाच्या वेळेत फार कमी अंतर असल्याने वेळेवर गोंधळ, धांदल टाळण्यासाठी आम्ही आदल्या दिवशी नागपूर दिल्ली रेल्वे प्रवासाचा बेत आखला. रेल्वे प्रवास म्हणजे काही अलिखीत नियम असतात. प्रवाशांची तुफान गर्दी, धक्काबुक्की, रेल्वे स्थानकाचा एक टिपीकल अप्रिय गंध, कानावर सतत आदळणार्या घोषणा, कधी आपण तर कधी सोबतचे सामान हरवण्याची अनामिक भिती! त्यातही वेटिंग हॅाल गजबजून असतात. कधी एकदाची आपली गाडी येते आणि कधी आपली यातून सुटका होते असे वारंवार वाटते. पूर्वी सासू सुनेचा तर आता सुना सासुंचा छळ करतात. मात्र सुना सासुंचाच नव्हे तर तमाम जनतेचा छळ करण्यात रेल्वे आजही नंबर वन आहे असं माझं प्रामाणिक मत आहे आणि त्याचा भक्कम पुरावा म्हणजे नेमके आपण प्रवासासाठी निवडलेली ट्रेन ऐन वेळेवर लेट होणे!
दिल्लीसाठी आम्हाला विशाखापट्टणम् नवी दिल्ली ही आंध्रप्रदेश सुपरफास्ट ट्रेन उपलब्ध होती. साधारणतः ६६ ते १३० किमी प्रती तास या गतीने ती धावते. ३१ तास ४० मिनिटात १९ थांबे घेत ती २१०० किमी अंतर कापते. अगदी नियमीत असणारी ही गाडी नेमकी आमच्या प्रवासाच्या वेळी रुसून बसली. वास्तविकतः या गाडीचा रूटीन मार्ग काही कारणास्तव वळविण्यात आल्याने पंचाईत झाली. दोन तास उशिरा धावत असल्याने प्रवासाचा पुरता हिरमोड झाला. तरीपण एकदाचे गाडीत बसलो आणि समाधानाचा सुस्कारा सोडला. मात्र हा आनंद क्षणिक ठरला. कारण नागपूर नंतर उरलेले १००० किमी अंतर गाठण्यासाठी या गाडीने धीरे धीरे चलो मोरे साजना चे रुप घेतले. सुपरफास्ट ट्रेनच्या गती आणि धडधडीने जे शरीर डुलायचे किंवा प्रवासाचा जो मौसम बनायचा, तो बनलाच नाही. वन्स लेट अॅालवेज लेट सारखी ही गाडी उपेक्षीत झाली आणि आमच्यासारख्या उपेक्षितांचे अंतरंग कोणालाही कळणार नव्हते. मागून येणार्या जवळपास आठ गाड्यांना पास दिला गेला आणि ही गाडी वेळ आणि वेग दोन्ही बाबतीत नापास झाली.
तरीपण ही ट्रेन मेकअप करून दिल्लीला थोडीफार मागेपुढे पोहोचेल अशी अपेक्षा होती. आग्रा आणि मथुरे नंतर ही गाडी सुस्त अजगरासारखी झाली. काही केल्या गती पकडेना. जणुकाही संथ वाहते क्रुष्णामाई सारखी वाहत होती. दिल्ली विमानतळ फारतर अकरा पर्यंत गाठणे जरूरी होते. पण ट्रेनची गती पाहता दिल्ली बहोत दूर है असेच वाटत होते. कधीकधी तर मथुरे नंतर उतरून चारचाकी वाहनाने उरलेला प्रवास पुर्ण करावा असे वाटत होते. मात्र दिल्लीची व्यस्त रहदारी आणि प्रवासाचा खेळखंडोबा होण्याची भिती होती. सकाळी पाच ला पोहोचणारी एपी एक्सप्रेस साडेदहा वाजले तरी नवी दिल्ली स्थानकापासून दूरच होती. जसजसा वेळ वाढत होता तसतसं ह्रदयाची धडधड वाढत होती. कारण दिल्ली विमानतळावर वेळेत पोहोचलो नाही तर संपूर्ण ताश्कंद प्रवासावर पाणी सोडावे लागले असते.एकदाची ट्रेन तिलक नगर स्थानका जवळ आल्यावर थोडे हायसे वाटले. पण पुन्हा एकदा आऊटरवर या गाडीने बसकण मांडली. आता मात्र आमचा संयम सुटला होता. काही केल्या गाडी पुढे सरकेना. प्राण कंठाशी येणे म्हणजे काय असते याची जाणीव झाली. शेवटी स्थानिक प्रवाश्यांच्या सल्ल्याने या गाडीतून उतरलो आणि भाग मिल्खा भाग चा अध्याय सुरू झाला.
एकतर आऊटरवर उतरलो, त्यातही सामानाच्या दोन मोठ्या बॅग हातात घेऊन तिलकनगर स्थानकावर येणे, ओव्हरब्रिज चढून प्लॅटफॅार्म ओलांडणे चांगलेच दमछाक करून गेले. सोबतच आयपीओ वरून मेट्रो पकडायची की नवी दिल्लीहून विमानतळासाठी मेट्रो पकडायची यांत संभ्रम होता. अखेर ई रिक्षावाले देवदूता सारखे धावून आले. त्यांनी अगदी दहा मिनिटांत आम्हाला नवी दिल्ली मेट्रोला पोहचवून आमचा मार्ग सुकर केला. मनोमन दोन्ही ई रिक्षावाल्यांना हात जोडत आम्ही लगबगीने एअरपोर्ट एक्सप्रेस मेट्रोत दाखल झालो. कधी जमिनीखालून तर कधी वरून मेट्रोचा गारेगार प्रवास सुखावून गेला. दिल्लीच्या अस्तव्यस्त रहदारीवर बर्याच प्रमाणात का होईना पण दिल्ली मेट्रो हा रामबाण इलाज आहे. विकासाच्या नावाने बोंबा ठोकणार्यांनी आणि बोटे मोडणार्यांनी वाहतुकीसाठी सर्वात स्वस्त, मस्त विकसीत पर्याय म्हणूण मेट्रोच महात्म्य जरूर जाणून घ्यावे. अवघ्या विस मिनिटांत एक्सप्रेस मेट्रोने आम्हाला टर्मिनल तीन ला आणून सोडले. थोडक्यात काय तर प्रवासाच्या पहिल्या टप्यात रेल्वेने छळले होते, मेट्रोने सुटका केली असे म्हणावेसे वाटते.
क्रमशः,,,,,
————————————————-
दिनांक १७ मे २०२४
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
No comments:
Post a Comment