#@😈😈😈😈😈😈😈😈@#
“सफर उझबेकिस्तानची,भाग ०२”
✍️डॅा अनिल पावशेकर✍️
————————————————
दिल्ली विमानतळावर चेकइन, इमिग्रेशन आणि सिक्युरीटीचे सोपस्कार पार पाडत बोर्डींग गेटजवळ पोहोचलो आणि आपण ज्या देशात पाऊल टाकत आहोत त्याची एक पुसटशी कल्पना आली. सर्वत्र गुलाबी चेहरे, धिप्पाड, धडधाकट शरीरयष्टीच्या आक्रुत्या, मुली स्त्रियां स्कार्फ बांधून, पायघोळ अंगरख्या सारखे ड्रेस आणि बोलतांना स्तॅाव स्तोव्ह ची बाराखडी! अर्थातच भुभाग, सभोवतालचे वातावरण, खानपान, जिन्स यावर आपले रंगरूप अवलंबून तर जोडीला जैसा देस वैसा भेष असणार. मात्र संपुर्ण सहा दिवस ताश्कंद, समरकंद वावरतांना कुठेही परकीय असल्याची किंवा भेदभावाची वागणूक जाणवली नाही. मुख्य म्हणजे काही नागरिक तर स्वतः पुढाकार घेत आमच्याशी बोलत होते. इथे पर्यटनाला येणार्यांत ६०% पर्यटक भारतीय असल्याने फ्रॅाम इंडीया म्हटले तरी वर्षानुवर्षे ऋणानुबंध असल्यासारखे त्यांचे चेहरे खुलतात आणि त्याचे कारणही विशेष आहे.
इथले वैद्यकीय क्षेत्र सरकारी ताब्यात आहे आणि खाजगी रूग्णालये बोटावर मोजण्याइतपत. त्यातही सरकारी दवाखान्यात कितपत काळजी, दक्षता घेतली जाते हे वेगळं सांगायची गरज नाही. तर तिथली खाजगी वैद्यकीय सेवा सामान्यांच्या आवाक्या बाहेरची. मग गरजू जनतेसमोर दोन पर्याय असतात. एकतर तुर्की किंवा भारत. उझबेक नागरिकांना तुर्कीत व्हिजा लागत नाही. पण जायला पाच तास लागत असल्याने ते दिल्लीला येणे पसंत करतात कारण अवघ्या सव्वादोन तासांत त्यांना दिल्ली गाठता येते. मात्र इथे येण्यासाठी त्यांना व्हिजा आवश्यक असतो. भारतातील वैद्यकीय सेवेबाबत ते अत्यंत समाधानी आहेत, क्रुतज्ञ आहेत. मेडीकल टुरीझम यानिमित्ताने भरभराटीला येत आहे.
आपल्या देशाबद्दल त्यांना आस्था, कौतुक असण्याचे आणखी कारण म्हणजे बॅालिवूड! त्यातही शाहरूख खान म्हणजे त्यांच्या गळ्यातला ताईत! सोबतच राज कपूर, काजोल आणि मिथुन चक्रवर्ती प्रचंड लोकप्रिय आहेत. बॅालिवूड गाण्यांचा तर इथे वेगळाच फॅनबेस आहे. काहींना तर आपली हिंदी गाणी मुखोद्गत आहे. मग ते रेस्टॅारंट असो की बॅले डान्स (याबाबत पुढील लेखात सविस्तर माहिती देण्यात येईल) हिंदी गीतांनी आपला तिथे ठसा उमटवला आहे. तर मा. पंतप्रधान मोदींबाबत इथे बरेच कुतुहल आणि उत्सुकता पहायला मिळाली.
भौगोलीक बाबतीत सांगायचे झाले तर उझ्बेकिस्तान डबल लॅंड लॅाक्ड (दुहेरी भुपरिवेष्टीत) देश आहे. लॅंड लॅाक्ड कंट्री म्हणजे ज्या देशाच्या सिमांना सागरी किनारा नाही आणि त्या देशातील नदी वैगरे जलस्त्रोत आपली जलसंपदा समुद्र किंवा सागरात न सोडता देशांतर्गत जलाशय किंवा तलाव, सरोवरात सोडतात. हा देश कझाकस्तान, किर्गिस्तान, ताजकिस्तान, अफगाणिस्तान आणि तुर्कमेनिस्तान या देशांनी वेढलेला आहे. केंद्रिय आशियातील हा देश पूर्वी सोवीयत संघाचा हिस्सा होता. पण १९९०/९१ पासून सोवीयत संघाची शकले होऊ लागली आणि तब्ब्ल १५ नवीन देश उदयास आले, उझ्बेकिस्तान त्यापैकी एक देश!
इस्लाम हा इथला प्रमुख धर्म असून सुन्नी पंथीयांचे इथे प्राबल्य आहे. उझ्बेक ही सर्वात जास्त बोलली जाणारी भाषा आहे, या खालोखाल रशियन भाषा पण बोलली जाते. इंग्रजीचा फार वापर नसला तरी कामचलाऊ इंग्रजीने काम जमून जाते. ताश्कंद ही राजधानी आहे तर समरकंद, बुखारा आणि खिव्ह ही प्रमुख शहरे आहेत. मस्जिद, मॅासेलिअम (कबरी) आणि प्राचीन रेशीममार्गाशी (सिल्क रूट) जुळलेली शहरे, द्वितीय महायुद्धाशी संबंधीत खाणाखुणा ही या देशाची ओळख आहे. इथली लोकसंख्या केवळ साडेतीन करोडच्या जवळपास आहे तर क्षेत्रफळाच्या द्रुष्टीने या देशाचा ५६ वा नंबर लागतो. सोम हे इथले अधिक्रुत चलन असून आपला एक रुपयाला १४५ सोम मिळतात. इथली अर्थव्यवस्था मुख्यतः कापूस, सोने, युरेनियम आणि नैसर्गिक वायू साठ्यांवर अवलंबून आहे.
ऐतिहासिक द्रुष्ट्या इथे इ.स. पूर्वी पासून अलेक्झांडर नंतर पर्शिअन सासानी साम्राज्याचा दबदबा होता. मात्र ८ व्या शतकातील अरबी आक्रमणाने या भुभागाचा चेहरामोहरा, संस्क्रुती बदलून गेली. १३ वे शतक चंगेझ खान ने तर १४ वे शतक तैमुरलंगने गाजवले. यानंतर तर्को मंगोल संकरातून बाबर उदयास आला, ज्याने आपल्या देशावर आक्रमण करून मुगल सत्तेचा पाया रचला. १९ व्या शतकात उझबेकिस्तान रशियन अधिपत्याखाली आला, जो नंतर १९९१ ला सोवीयत संघापासून स्वतंत्र झाला.
विमानतळातून बाहेर पडताच दोन गोष्टी प्रामुख्याने आपले लक्ष वेधतात, त्या म्हणजे इथलं सर्वकाही भव्यदिव्य, प्रशस्त वास्तुकला आणि नजर लागण्या सारखी शिस्तबद्ध वाहतूक. इथे लेफ्टहॅंड ड्राइव्ह असल्याने ड्रायव्हर शेजारी बसलं तर वारंवार चुकचुकल्या सारखे वाटते. ताश्कंद शहरात कुठे कुठे चक्क दहा पदरी मार्ग आहेत. लेन कटींग किंवा ओवहरटेकिंग कटाक्षाने टाळले जाते. हॅार्न तर चुकूनही ऐकू येत नाही. स्वच्छ चकचकीत रस्ते दिमतीला हिरवीगार व्रुक्षवल्ली मनमोहून घेतात. पादचार्यांची तर विशेष काळजी घेतली जाते. पादचारी सुद्धा रोड ओलांडण्यासाठी झेब्रा क्रॅासिंगचाच उपयोग करतात. मला तर इथल्या ड्रायव्हर्सचे वारंवार कौतुक वाटते. इतक्या शांत डोक्याने कोणी कसकाय ड्रायव्हिंग करू शकतो याचं अप्रुप वाटते. बहुदा इथली ड्रायव्हर मंडळी जन्मजात तपस्वी असावी किंवा डोक्यात बर्फासारखी शितलता ठेवण्याचा हिमालयात येऊन एखादा क्रॅश कोर्स केला असावा!
कितीही रश अवर असो की लगबग असो वाहतुकीचे नियम ते जणुकाही आईच्या पोटातून शिकून आल्यासारखे पाळतात. आणखी एक विशेष बाब म्हणजे कोणत्याही वाहनांवर टक्करच्या खाणाखुणा किंवा स्क्रॅचेस आढळत नाही, धुळ सुद्धा दिसत नाही. इथल्या जवळपास ९९% कार शेवर्ले कंपनीच्या आहेत कारण या कंपनीचे सरकार सोबत टायअप आहे. जर तुम्हाला शेवर्ले व्यतिरिक्त इतर कंपनीची कार घ्यायची असेल तर कारच्या दुप्पट किंमत मोजावी लागते. हास्यास्पद बाब म्हणजे इथे दुचाकी, मोटर सायकल अजिबात दिसत नाही कारण त्यांची किंमत कारपेक्षा कितीतरी जास्त असते. उझ्बेकिस्तानला दुचाकी, मोटरसायकल घेण्यासाठी तुमचे आडनाव अंबानी किंवा अदानी असावे लागते. बहुतेक मध्यमवर्गिय शेवर्ले ची बिट्स वापरतांना दिसतात. या शिवाय पब्लिक ट्रान्सपोर्ट साठी दोन बस एवढ्या मोठ्या सरकारी बस, कुठे कुठे ट्राम तर मेट्रोचा वापर होतो.
क्रमशः,,,,
————————————————
दि. १८ मे २०२४
मो. ९८२२९३९२८७
anilpawshekar159@gmail.com
++++++++++++++++++++++++
No comments:
Post a Comment