Tuesday, May 28, 2024

इतिहासाच्या कुशीत, भाग ०८

#@😈😈😈😈😈😈😈😈@#

     *इतिहासाच्या कुशीत, भाग ०८*

           *डॅा अनिल पावशेकर*

—————————————————

उज्बेकिस्तान प्रवासाच्या चौथ्या दिवशी मोहीम होती समरकंद या शहराची. उज्बेकचे हे दुसर्या क्रमांकाचे शहर. या शहराची स्थापना, निर्मिती बाबत इ.स. पूर्व सातव्या शतकापासून पुरावे, माहिती मिळते. मात्र या शहराची खरी ओळख सांगायचे झाले तर चीन, मध्य आशिया आणि युरोपला जोडणार्या रेशिम मार्ग(सिल्क रुट) चे सर्वात महत्वाचे स्थान. रेशिम मार्गाची कहानी इ.स. पूर्व दुसर्या शतकापासून ते पंधराव्या शतकापर्यंत आहे. जवळपास ६४०० किमी लांबीच्या या मार्गाने पूर्व आणि पश्चिम भुभाग जोडले गेले, त्यांच्यात व्यापार, आर्थिक, संस्क्रुती, राजकीय आणि धार्मिक बाबींत देवाणघेवाण झाली. मध्य आशियातील हे शहर वारंवार आणि निरनिराळ्या आक्रमणांचे मुक साक्षिदार आहे. अगदी अलेक्झांडर पासून अरब, मंगोल, तुर्क आणि रशियन आक्रमणाने इथे धुमाकूळ घातला होता.


ताश्कंद पासून ३०० किमी अंतरावर असलेल्या समरकंद साठी आम्ही हाय स्पिड ट्रेनचा पर्याय निवडला होता. जी ट्रेन जुन्या ट्रॅकवर २०० पर्यंत आणि नवीन ट्रॅकवर २५० किमी प्रती तास धावू शकते तिला हाय स्पिड ट्रेन म्हणतात. इथले रेल्वे स्थानक असो अथवा कोणतीही वास्तू, प्रत्येक जागा भव्य आणि प्रशस्त! अर्थातच कुठलीही गर्दी, धक्काबुक्की नाही की सतत कानावर आदळणार्या कर्कश सूचना. सर्वकाही शांततेत, सुव्यवस्थेत आणि वेळेवर. प्रत्येक कोच च्या दाराजवळ कोच अॅाफिसर प्रत्येकाला सिट समजवून सांगणे, वयस्करांना चढ उतरण्यास मदतीचे काम करत होते. इथेही विमानतळासारखी सुरक्षा व्यवस्था, तपासणी होती. तर आंत इकॅानॅामी आणि बिझनेस क्लास होते. सकाळी नऊ ला निघालेल्या हाय स्पिड ट्रेनने सर्वाधिक २३६ किमी ची गती गाठत बरोबर अकरा वाजता, तिच्या नियोजीत वेळी समरकंदला पोहोचवले.


समरकंदचे प्रमुख आकर्षण होते, गुर ए अमीर स्मारक, ज्याचा अर्थ होतो राजाचे, सेनापतीचे थडगे. उज्बेकिस्तामध्ये तैमूरला राष्ट्रनायक म्हणतात. या स्मारकात तैमूर, त्याची दोन मुले शाहरूख, मिरन शहा, नातू ऊलूघ बेग, मुहम्मद सुलतान आणि तैमूरचा धर्मगुरू सय्यीद बरका यांच्या सहीत एकूण नऊ थडगी आहेत. या स्मारकाच्या बांधकामावर मध्य आशियन स्थापत्य कलेचा प्रभाव आहे. यावरूनच पुढे मुगल वास्तू रचना, काबूलचे गार्डन अॅाफ बाबर, दिल्लीतील हुमायूंचा मकबरा आणि आग्र्याचा ताजमहल बांधल्याचे सांगितल्या जाते. या स्मारकाची आणि संलग्न दोन मिनारची ऊंची प्रत्येकी ३० मिटर आहे. आवारात दहा फूट लांबीचे, सहा फूट रूंदीचे आणि तीन फूट उंचीचे दगडी आसन आहे, त्यालाच तैमूरचे आसन म्हणतात. जवळच चार टन वजनी दगडी पात्र आहे, ज्यातील पाणी पवित्र मानतात.


तैमूर चीनच्या कामगिरीवर असताना वयाच्या ६९ व्या वर्षी न्युमोनियाने म्रुत्युमुखी पडला. त्याचा नातू मुहम्मद सुलतानने हा मकबरा बांधणे सुरू केले तर दुसरा नातू उलूघ बेगने हे बांधकाम पूर्ण केले. विटांच्या भिंती आणि पांढर्या निळ्या रंगाच्या टाईल्सने संपूर्ण मकबरा व त्याचा घुमट बांधला गेला आहे. १७ व्या शतकात बुखारा ही नवीन राजधानी झाल्याने व रेशमी मार्ग बदलल्याने समरकंदचे महत्व घटले. रशियन आक्रमणात, सोवीयत शास्त्रज्ञांनी तैमूरची कबर खोदून संशोधन केले. पण असे म्हणतात की तैमूरची कबर खोदाल तर जगाचा विनाश घडेल आणि योगायोग म्हणजे झालेही तसेच. नाझींनी सोवीयतवर आक्रमण करत हा समज पक्का केला. अखेर स्टॅलीनने तैमूरला परत थडग्यात पुरून वाद मिटवला. याच्या एक महिन्यानंतर स्टॅलीनग्रॅडला सोवीयत फौजांनी नाझींना घेरून बाजी पलटवली होती.


यानंतर रेगिस्तान चौक या स्थळाला भेट दिली, जे पर्यटकांनी गजबजून गेले होते. १४ व्या शतकापर्यंत इथे नदी असल्याचे मानले गेले होते. तीन मोठ्या मॅास्कची रचना असलेले हे स्थळ तीन वेगवेगळ्या काळात बांधले गेले आहे. पर्शियन वास्तुकलेचा नमुना असलेली ही वास्तू एकमेकांसमोरील तीन इमारतींची आहे. सर्वात डावीकडे उलूघ बेग मदरसा (१४१७ते १४२०) आहे, ज्याची निर्मिती स्वतः उलूघ बेग याने केली. यात दोन मजली मदरश्याला उंच मिनार, चार घुमट आणि धार्मिक शिक्षणासाठी काही खोल्या आहेत. मधली इमारत शेर दोर मदरसा (१६१९ ते १६४०) म्हणून ओळखली जाते. याचे आणि तिसर्या क्रमांकाच्या वास्तूचे बांधकाम (तिल्या कोरी मदरसा) तत्कालीन सेनापती यालंग्तुश बाखोडर ने केल्याचे सांगितले जाते. खरेतर या तिन्ही मदरशांचा उद्देश विद्यार्थियांना धार्मिक शिक्षण देणियासाठी होत होता. इथेच सरकारी आदेश, फर्मान सोडले जायचे. तैमूर साम्राज्याचे हे महत्वपूर्ण स्थळ होते.


समरकंदची ओळख असलेले आणि मास्टरपीस अॅाफ तैमूर एम्पायर असलेले स्मारक म्हणजे बिबी खानम मकबरा. १५ व्या शतकातील सर्वोत्तम, सर्वात मोठी वास्तू मानली गेलेल्या या इमारतीचे बांधकाम १३९९ ते १४०५ पर्यंत खुद्द तैमूरच्या देखरेखेखाली केले गेल्याचे मानले जाते. प्रवेशद्वार ३० मिटर तर मुख्य उमारत ४० मिटर उंचीची आहे. ही वास्तू लांबी १६७ मिटर तर रुंदी १०९ मिटर आहे. यांत चार मिनार आणि चार गोल घुमट आहेत. दिल्ली स्वारी यशस्वी झाल्यावर तैमूरने आपल्या पत्नीसाठी बिबी खानम मकबरा बांधल्याचे कळते. यालाच फ्रायडे मॅास्क, मॅास्क अॅाफ फिअर पण म्हणतात. कारण ही वास्तू बांधतांना प्रचंड पडझड झाली आणि बांधून पूर्ण होताच एक वर्षाच्या आत तैमूरचा म्रुत्यू झाला. वारा, हवामान आणि भुकंपाच्या झटक्याने ही इमारत खचत होती. १८९७ च्या भुकंपात आतली कमान गळून पडली. अखेर २० व्या शतकात सोवीयतने नंतर उज्बेकांनी याची पुनर्निर्मिती केली. 

क्रमशः,,,

—————————————————

दिनांक २८ मे २०२४

मो. ९८२२९३९२८७

anilpawshekar159@gmail.com

+++++++++++++++++++++++++

No comments:

Post a Comment

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...