Sunday, May 26, 2024

डान्स पे चान्स मार लें, भाग ०७

 #@😈😈😈😈😈😈😈😈#@

      *डान्स पे चान्स मार लें, भाग ०७*

            *डॅा अनिल पावशेकर*

—————————————————

संध्याकाळी 'गाला डिनर' आणि सोबतीला 'बेली डान्स', म्हणजे जणुकाही आंधळा मागतो एक डोळा, देव देतो दोन डोळे! खरेतर बॅले डान्स आणि बेली डान्स दोन्ही वेगवेगळे आहे. बॅले डान्सचा उगम पंधराव्या शतकात इटलीतून आणि प्रसार फ्रान्स, रशिया युरोपा पर्यंत. तर बेली डान्स मध्यपूर्वेतला, इजिप्त, तुर्की अरबी प्रदेशात व्याप्ती. बॅलेत नाच, संगीत, नेपथ्य आणि नाट्याचा समावेश तर बेली डान्समध्ये वाद्यांवर थिरकणे. बॅलेत हात, पाय आणि बॅाडी लाईनिंग तर बेली डान्समध्ये निव्वळ हिप्स, रिब केज, धड ( शरिराचा मध्यभाग) यांचा वापर होतो. अर्थातच दोन्ही डान्स विशिष्ट कला असून नागीण डान्स एवढे सोप्प नक्कीच नाही. बॅलेत स्ट्रेस फ्रॅक्चर, अॅचिलीज टेंडेनायटीस, स्प्रेन्ड अॅंकल्स आदी शारिरीक दुखापती संभवतात; तर या डान्समुळे चांगलाच व्यायाम घडतो.


बेली डान्सबाबत आणखी सांगायचं झालं तर यांत देश, विभागानुसार प्रकार आढळतात. पोट, कंबर आणि नितंब हे चरबी साठवण्याचे राष्ट्रीय कोठार नव्हे; तर बेली डान्स करीता उपयुक्त अंग आहेत. यात लयबद्धतेने हिप्स, रिब्स केजची वाद्य,संगीतावर लवचिक आकर्षक हालचाल केली जाते. हिप्स लिफ्ट करणे, ड्रॅाप करणे, ट्विस्ट करणे, रॅाक करणे यासोबच खांद्यांचे संतुलन राखणे महत्वपूर्ण मानले जाते. यांत अॅब्डॅामिनल मसल्सचे नियंत्रण तेवढेच महत्वाचे आहे. हिप्स द्वारे व्हर्टीकल, हॅारिझॅांटल आठच्या आकड्यांची करामत दाखवणे असो की हवेत वर्तुळे काढून दाखवणे असो, जबरदस्त मेहनत आणि सराव लागतो. वारंवार हिप्स मुव्हमेंटमुळे पाय आणि पाठीच्या लांब मसल्स ताणल्या जातात.


याशिवाय बेली डान्समध्ये हिप्स, रिब्स केजला सतत थिरकवत ठेवणे, स्टेप्स घेणे, टर्न होणे आणि गिरक्या घेणे इ. बाबी येतात. (गिरक्या म्हणजे आजकाल साक्षगंध, लग्नात नवरी मुलगी नव-या मुलाचा हात पकडून स्वतः भोवती गरगर फिरते, वेटोळे घेते ती कला) यांत आणखी कलाकारी म्हणजे फ्रंट बेन्ड, बॅक बेन्ड, हेड टॅास समाविष्ट आहेत. या सगळ्यांचं सर्वोत्तम उदाहरण म्हणजे कोलंबीयन गायिका शकीरा. तिचे गाणे व्हेनेव्हर, व्हेरेव्हर आणि हिप्स डोन्ट लाय प्रसिद्ध आहेत. शकीरा नंतर आणखी एक नांव घ्यायचे झाल्यास 'रिहाना'चे घेता येईल.


आता मूळ विषयाकडे वळू. तर या मेजवानीसाठी सर्वात महत्वाची बाब म्हणजे सर्वांसाठी ड्रेस कोड होता. पुरूषांसाठी कोट, टाय आणि ह्या सुचना हॅालच्या दर्शनी भागात स्पष्ट लावल्या होत्या. भलेही कोणी फॅार्मल ड्रेसमध्ये आले, तरी प्रवेश नाकारला जात नव्हता. परंतु ते सभ्यपणाचे लक्षण मानले जात नाही. काही मुली, स्त्रिया तर पारंपारीक वेषात, स्कार्फ बांधून आल्या होत्या. थोडक्यात काय तर पाहुण्यांकडून डिसेन्ट ड्रेस आणि सभ्यतेची अपेक्षा आयोजकांना असते. इथले वातावरण मंद धुंद प्रकाशात पण सुटसुटीत, निटनेटके आणि बसण्याची व्यवस्था प्रशस्तपणे केलेली असते. वाद्य संगीताने वातावरण निर्मिती केली जाते, खाद्य व पेय वितरीत केले जाते आणि हॅाल भरताच बेली डान्सला सुरूवात होते.


यांत सात नर्तकी भाग घेतात, प्रारंभ "डान्सपे चान्स मारले" या सुपरहीट गाण्याने होते. नर्तकींचे वर्णन काय ते करावे, त्या सप्ततारका साक्षात रंभा उर्वशी! जणूकाही कोमल काया की मोहमाया पुनव चांदणं न्हाली, सोन्यात सजले रूप्यात भिजले रत्नप्रभा तनू ल्याली. ही नटली थटली जशी उमटली चांदणी रंगमहाली, अप्सरा आली इंद्रपुरीतून खाली उतरली. काय ती दिलफेक अदा काय तो जलवा, रशियन सुंदरी म्हणजे अवर्णनीय, 'चाल है की मौज की रवानी जुल्फ है की रात की कहानी, होंठ है की आईने कॅंवल के, अॅांख है की मयकदों की राणी'. थोडक्यात काय तर रुपाची खाण नजरेत बाण! उत्तम पददालित्य, सहजसुलभ हालचाली, एक्सप्रेस संगीतावर तुफानी डान्स, एकदम डेडली कॅाम्बिनेशन, एकदम झकास, बोले तो बेली डान्स नंबर वन.


त्यातही टेबल भोवती येऊन जेंव्हा त्या थिरकतात, माधुर्यपूर्ण उंच आवाजात गात ललकारी देतात तेंव्हा तो स्वर थेट काळजात घुसतो, आपण इंद्रसभेत असल्याचा भास होतो. टेबलवरील खाण्याकडे कोणाचेही लक्ष नसते. जो तो हा नेत्रदिपक सोहळा डोळ्यात सामावून घेण्याच्या प्रयत्नात असतो. आपल्याला दोनपेक्षा जास्त डोळे असते; तर किती बरे झाले असते असा वेडा विचार मनाला स्पर्शून जातो. फारतर पंधरा वीस मिनिटांचा हा थरार असतो, पण अवघं वातावरण मंत्रमुग्ध होऊन जाते. 

—————————————————

दिनांक २६ मे २०२४

मो. ९८२२९३९२८७

anilpawshekar159@gmail.com

++++++++++++++++++++++++

No comments:

Post a Comment

टीम इंडियाचा डबल धमाका

@#😈😈😈😈😈😈😈😈#@       “टीम इंडियाचा डबल धमाका”         ✍️डॅा अनिल पावशेकर ✍️ ————————————————— दिनांक २ नोव्हेंबर २०२५, रविवारला टीम इं...